लेखिका - शांता किर्लोस्कर
शांता किर्लोस्कर यांचा जन्म एप्रिल, १९२३ मध्ये बारामती येथे झाला. सन १९४३ साली त्या मुंबई विद्यापीठातून बी.ए. झाल्या. सन १९७७ मध्ये त्यांनी पुणे विद्यापीठातून वृत्तविद्या पदविकाही मिळविली. त्यांच्या आई किर्लोस्करवाडी येथे शिक्षिकेचे काम करीत असत. सुट्टीमध्ये आईकडे गेल्यावर किर्लोस्कर मासिकाचे संपादक शंकरराव किर्लोस्कर यांची मुलगी मालती व तिचा भाऊ मुकुंद यांची ओळख झाली. मुकुंद व शांता यांचे पदवीपर्यंत शिक्षण झाल्यावर १९४३ मध्ये त्यांचा विवाह झाला. पुढे संसार
सांभाळत किर्लोस्कर प्रेसच्या कार्यालयात जाऊन तेथील कामाचा थोडाफार संपादकीय अनुभव घेतला. १९५८ मध्ये किर्लोस्कर प्रेस पुण्यात आल्यामुळे कार्यक्षेत्र व्यापक झाले.
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाल्यावर तेव्हा निजामी राजवटीमुळे मागे पडलेल्या मराठवाडा विभागाची माहिती काढून तेथील शिक्षण, साहित्य, कला, स्त्रीजीवन व सांस्कतिक वैशिष्ट्ये यांची टिपणे करून तेथील लेखकांच्या सहकार्याने स्त्री मासिकाचा मराठवाडा अंक काढला. तो वाचल्यावर ''या अंकाने आपण मराठवाड्याला आपल्या कुटुंबात आणून सोडले आहे.'' असा प्रतिसाद आला. भाषावार प्रांत रचना मान्य झाल्यावर भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेला चालना देण्याच्या दृष्टीने दरवर्षी एकेका प्रांताचा विशेषांक असे पंजाब, बंगालपासून केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू अशा १० प्रांतांचे अंक काढण्यात शांताबाईंनी लक्ष घातले.''त्यांनी काही पुस्तकांचे लेखन केले असून विविध पुरस्कारांनी त्या सन्मानीत झाल्या आहेत. ''