भाषांचे चेहरे नि ओळख
कोणत्याही भाषेची ओळख म्हणजे तिचा चेहरा. व्याकरणाची मूलभूत जडण - घडण. ती जडण - घडणच तिच्या चेहऱ्याला विशिष्ट रूप देत असते. चेहऱ्याचे हे विशिष्ट रूप सामान्यतः बदलत नाही, भव्य कपाळ किंवा कपाळाची चिरी, भिवयांच्या कमानी, गालांची ठेवण, नाकाचा धारदारपणा किंवा नकटेपण, कानांची लाम्बी - रुन्दी नि पाळीची ठेवण, लहान किंवा मोठी जिवणी, जाड किंवा पातळ ओठांची ठेवण, त्यांचा रेखीवपणा नि रंग, हनुवटीचा विशिष्ट आकार वगैरे वगैरे. पण व्यक्तीच्या परिसरात काही बदल झाले तर आपल्याला तोच चेहरा बदलल्यासारखा किं बहुना एकदम अनोळखी वाटतो, म्हणजे नेहमी साडीत वावरणारी तरुणी सलवार-कमीज घालून समोर आली तर आपण तिला चटकन् ओळखत नाही, ती वेगळीच कोणीतरी व्यक्ति आहे असे आपल्याला वाटते. तीच व्यक्ति अनपेक्षित ठिकाणी भेटली तरीही आपण गोन्धळतो, उदाहरणार्थ देवळात नेहमी दिसणारे, पिताम्बर नेसणारे पुजारी जीन्स घालून पाणीपुरीच्या गाडीपाशी उभे असतील तर आपल्याला ते गणपतीच्या देवळातले पुजारी आहेत हे ओळखतच नाही. भाषांबाबतही असा प्रकार घडतो. त्याची उदाहरणे मोठी रंजक आहेत. एकाच भाषेला आपण वरलीया रंगाला भुलून वेगवेगळी नावं दिलेली आहेत.
ह्या प्रकारातले भारतातले उत्तम उदाहरण आहे ते हिन्दी / हिन्दुस्तानी / उर्दु भाषेचे. शब्दसंग्रहाच्या किंचित् वेगळेपणामुळे, जो खरे तर शैलीचा भाग आहे, रचनेचा नाही, ह्या एकाच भाषेला तीन वेगळी नावे देऊन त्यांच्यात फूट पाडण्याचे प्रयत्न चालूच असतात.
१. मैं आपकी प्रतीक्षा कर रहा हूं. - हिन्दी.
२. मैं तुम्हारी राह देख रहा हूं. - हिन्दुस्थानी.
३. मैं तेरा इन्तज़ार कर रहा हूं. - उर्दु.
ह्यात "मैं ... कर रहा हूं." ही वाक्यातली मूळ रचना सर्वत्र तीच आणि तशीच आहे, मग भाषा कुठे बदलली? शैली वेगळी आहे, प्रतीक्षा संस्कृत (तत्सम) शब्द आहे तर राह हा देशी (तद्भव) शब्द आहे तर इन्तज़ार हा परक्या भाषेतला (फारसी) शब्द आहे. पण वाक्याची भाषा एकच आहे, ती म्हणजे हिन्दी.
भारतातलेच आणखी एक उदाहरण आहे.
गीर्वाणवाणी / देववाणी / संस्कृत. ह्या तीन नावांनी आढळणारी भाषा प्रत्यक्षात एकच आहे. संस्कृत ह्या शब्दाचा एक अर्थ असा लावला जातो की साफसूफ करून पुनः माण्डणी केलेली, म्हणजे स्वाभाविक नसलेली, मुद्दाम घडवलेली, केलेली अशी कृत्रिम भाषा - संस्कृत.
प्राकृत भाषा म्हणजे स्वाभाविक, नैसर्गिक भाषा. त्यातून बनवलेली कृत्रिम भाषा म्हणजे संस्कृत असा गैरसमज अनेकांच्या मनात ठसलेला आहे.
भाषा म्हणून 'संस्कृत' ह्या शब्दाचा वापर मोठ्या प्रमाणात कधी सुरू झाला हे एकदा बारकाईने शोधायला पाहिजे, पण इंग्रजांच्या राज्यात तो रुळला असे दिसते. एतद्देशीय गोष्टी युरोपच्या तुलनेने कमी दर्जाच्या आहेत हे दाखवण्यासाठीच युरोपीय विद्वानांनी गीर्वाण वाणीला 'संस्कृत' हा शब्द वापरला हे उघड आहे.
फारसी / पर्शियन / दरी / ताजिकी अशा चार भाषांची नोन्द आपल्याला सर्वत्र आढळते. पण ह्या चार भाषांचा नीट विचार केला तर लक्षात येते की युरोपात जिला पर्शियन म्हणतात तिलाच ईरानमध्ये 'फारसी' म्हणतात, त्याच भाषेला अफगानिस्तानात 'दरी' म्हणतात नि त्याच भाषेला ताजिकिस्तानात 'ताजिकी' म्हणतात ! ह्या सर्व भाषा अगदी एकसारख्या आहेत, नव्हे ती एकच भाषा आहे. फारसी, दरी नि ताजिकी ह्यांचे देश वेगळे म्हणूनच त्यांची नावे वेगळी झाली ती केवळ वेगवेगळ्या प्रकारच्या अस्मिता नावाच्या अहंकारामुळे.
शैलीच्या दृष्टीने ह्यांच्यात एक छोटासा फरक आहे तो परक्या शब्दांच्या, लोन वर्डच्या सन्दर्भात. ईरानमध्ये फ्रेंच शब्दांचा वापर कौतुकाने होतो तर अफगानिस्तानात इंग्लिश शब्द येतात नि ताजिकिस्तानात रूसी शब्दांचा भरणा असतो, (कारण प्रदीर्घ काळ हे राष्ट्र सोवियत देशाचा भाग होता नि रूसी भाषा हे तिथल्या शिक्षणाचे एकमेव माध्यम होते.) पण मूलभूत रचना, नियम सर्वत्र एकच आहेत, म्हणजे फारसी म्हणा किंवा ताजिकी म्हणा, भाषा एकच आहे.
बहासा इन्डोनेशिया / बहासा मेलायु -
इन्डोनेशियाची भाषा "बहासा इन्डोनेशिया" आणि मलेशियाची भाषा "बहासा मेलायु" ह्यांची जडण - घडण एकच आहे. इन्डोनेशियावर बराच काळ डचांचे राज्य असल्यामुळे डच भाषेतले बरेच शब्द बहासा इन्डोनेशियामध्ये झिरपले आहेत तर इंग्रजांच्या राज्यामुळे मलेशियातल्या बहासा मेलायुमध्ये बरेच इंग्लिश शब्द घुसलेले दिसतात, पण परभाषेतले चार शब्द आल्यामुळे फक्त शैली वेगळी होते, जोपर्यन्त मूळ रचना बदलत नाही तोपर्यन्त भाषा बदलत नसते.
राजकीय कारणांमुळे ह्या दोन्ही भाषांतल्या वेगळेपणाला महत्त्व देण्यातच सत्ताधाऱ्यांना रस असतो त्यामुळे भाषांचे राजकारण चालू राहते.
नावांच्या सन्दर्भात मध्य युरोपातल्या जर्मन भाषेचे उदाहरण खूपच रंजक आहे. खुद्द जर्मन भाषिक आपल्या भाषेला 'डॉइच्' (Deutsch) म्हणतात. ह्याचा अर्थ जनसामान्यांची भाषा असा आहे.
इंग्लिश लोक हिला 'जर्मन' म्हणतात. हा शब्द मुळात 'गेरमानिआ' ह्या देशवाचक लातिन शब्दावरून आला. त्याचा अर्थ असंस्कृत, रानटी टोळ्यांचा प्रदेश.
फ्रेंच भाषिक हिला 'आलमांद' (allemande) म्हणतात. फ्रेंचांना माहीत असलेल्या जर्मनीच्या 'आलेमान्य' (Allemagne) ह्या एका प्रदेशावरून त्यांनी हे नामकरण केले. फ्रेंच भाषिक जर्मनांना शतकानुशतके रानटी, असंस्कृत म्हणत आले होते, दुसऱ्या महायुद्धानन्तर मात्र त्यांच्यातले वैर सम्पले आहे.
इटालियन लोक जर्मनला 'तेदेस्को' (tedesco) म्हणतात. हा शब्द डॉइच् शब्दावरून झालेला आहे (teutsch - deutsch - tedesco). पण त्यांच्या देशाला मात्र इटालियनमध्ये 'जेरमानिआ' (Germania) ह्या रोमन / लातिन परम्परेतलाच शब्द वापरतात, त्याचा अर्थ असंस्कृत. रोमनांना आल्प्स पर्वत ओलाण्डून उत्तरेला गेल्यावर जे लोक भेटले (जर्मन) ते त्या काळात रोमनांच्या तुलनेने खूपच मागास होते, जंगली होते, निरक्षर तर होतेच होते, (तरीही किं बहुना त्यामुळेच रोमनांनी तिथे आपल्या वसाहती स्थापल्या) बलशाली असल्यामुळे रोमनांनी त्यांच्यावर असंस्कृतपणाचा शिक्का मारून टाकला होता.
युरोपात संख्येने सर्वाधिक आहेत ते रूसी भाषिक. रूसीत जर्मन भाषेला म्हणतात 'निमित्सकी'.
रशियाच्या बहुतेक राण्या (झरिना) जर्मन भाषिक होत्या (फ्रान्सच्याही). प्रत्येक राणी लग्नानन्तर सासरी - रशियाला जाताना आपल्याबरोबर पाठराखी म्हणून पाच-पंचवीस जर्मन कुटुम्बे आपल्याबरोबर घेऊन जात असे. राणीच्या माहेरची नि तिच़्या मर्जीतली ही हुषार जर्मन मण्डळी साध्यासुध्या गरीब स्वभावाच्या रशियनांवर सतत हुकुमत गाजवायचे, बळजबरी करायचे, त्यांना वेठीस धरायचे. राणीच्या माहेरची माणसे थेट सैबेरियातही सहजपणे पोहोचली होती. अनेक शतकाच्या जर्मनांच्या अनुभवातून निमित्सकी शब्दाला जो अर्थ प्राप्त झालेला आहे तो विलक्षण आहे, निमित्सकी म्हणजे उद्धट, इतरांना दमदाटी करणाऱ्या लबाड माणसांची भाषा.
संस्कृतीत मुरलेल्या अशा काही शब्दांवरून विविध समाजांची एकमेकांबद्दलची अनुभवसिद्ध मते सहजतेने कळतात. 'मराठी' म्हटल्यावर अमराठी लोकांना, आपल्या सख्ख्या शेजाऱ्यांना काय वाटते हे पाहणेही रंजक (?) होईल.
डॉ० अविनाश बिनीवाले