कै. धोंडूमामा साठे कार्य पोवाडा - प्रा, एच. यु. कुलकर्णी

Parent Category: चित्रफिती

वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संस्थापक कै. धोंडूमामा साठे यांनी महाविद्यालय सुरू करण्यासाठी केलेल्या भगीरथ प्रयत्नांची ओळख करून देणारा पोवाडा.-----प्रा, एच. यु. कुलकर्णी)

जय अंबे भवानी माता, नमन तुज आता, करून प्रथमतः,
चढवूनी पूर्ण शाहिरी साज, गातो वालचंद कॉलेजचा इतिहास,
धोंडूमामांचा गौरव खास ॥जी जी॥


आधी नमन धोंडूमामांना, संस्थापकांना, देणगीदारांना,
ज्यांनी संस्थेचा पाया रचला, शिखरावर नेले ज्यांनी त्यांना


( या महाविद्यालयाला शिखरावर कोणी नेले ? या महाविद्यालयात तळमळीने शिकवणारे प्राध्यापक आणि भारताची जडणघडण करण्यासाठी अविरत कष्ट करणारे या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी यांनी या महाविद्यालयाला शिखरावर नेले. त्यांना वंदन करून)

वंदुनी गातो पोवाड्याला ॥ जी जी॥

स्वातंत्र्यपूर्व काळात, पुणे शहरात, साठे कुटुंबात
धोंडूमामांना जन्म झाला, यौवनात त्यांनी प्रवेश केला
गरुडझेप घेण्या सिद्ध झाला ॥ जी जी॥

भरदार शरीरयष्टीचा, तरुण जिद्दीचा, शांत वृत्तीचा,
बुद्धिमत्तेत श्रेष्ठ ठरला, आय.सी.एस. होण्या सिद्ध झाला
तरुण लंडनला हजर झाला ॥ जी जी।।

नेटाने चाले अभ्यास लंडन शहरात ॥ जी जी।॥।
ज्येष्ठ बंधू निधन पावले पुणे शहरात ॥| जी जी॥
घरचेच बरेच उद्योग त्यांच्या हातात ॥ जी जी।॥


(मामांनी विचार केला, हे उद्योग कोण सांभाळणार ? त्यांनी निर्णय घेतला.)

सोडून ल॑डनचा कोर्स आले पुण्यात ॥ जी जी॥ ,
सांभाळले सर्व उद्योग सार्थ हातात ॥ जी जी॥
बांधकाम क्षेत्र निवडून कीर्ती मिळवीत ॥ जी जी॥


(पुणे व मुंबई येथील कितीतरी इमारती मामांनी बांधल्या, आजही त्या दिमाखात उभ्या आहेत. )

देशभक्ती भिनली हो होती त्यांच्या रक्तात ॥ जी जी।॥
सहा महिने भोगला तुरुंगवास हैद्राबादेत ॥ जी जी॥


(हैद्राबादचा स्वातंत्र्य संग्राम)

देशाला स्वातंत्र्य मिळणार झाले घोषित ॥ जी जी॥

(१९३५ च्या सुमारास देशाला स्वातंत्र्य मिळणार अशी घोषणा झाली.)

मग विचार सुरू हो झाला,
देशाला बलवान करण्याला,
तंत्रज्ञ हवेत देशाला,
अभियंते हवेत देशाला, अभियंते तयार करण्याला,
शिक्षण संस्था हवी हो त्याला
वाटले सर्वांना, खरोखर दादा, दादा रं जीर दाजीर जी।।

मित्रमंडळी जमली सारी पुण्यात चर्चा करण्याला,
सर्वांनी मग तेथे काढली संस्था शिक्षण देण्याला ॥
रररर, माझ्या रामा तुरं, माझ्या सर्जा तुरं, जीजीर, जीजीर जी ॥

(या संस्थेचे नाव - महाराष्ट्र टेक्निकल एज्युकशन सोसायटी असे ठेवण्यात आले.)

बारा जणांनी देणगी देऊन भक्कम पाया हो रचला,
सव्वा लाखाचा निधी मिळाला संस्था सुरुवात करण्याला ॥ जी जी॥

सोसायटीच्या अध्यक्षांनी अर्ज सादर हो केला,
मुंबई विद्यापीठाने दिली परवानगी कॉलेजला ॥र॥।


(त्यावेळी शिवाजी विद्यापीठ नव्हते, पुणे विद्यापीठही नव्हते, म्हणून मुंबई विद्यापीठाकडून परवानगी घ्यावी लागली. मामांना पुण्यात कॉलेज काढण्याची इच्छा होती. पुण्यातील काही ज्येष्ठ मंडळींनी मामांना सांगितले, पुण्यात एक कॉलेज आहे. दुसरे कॉलेज काढू नका, दुसरीकडे कोठेही काढा.)

धोंडूमामा आले सांगलीला, भेटले राजे साहेबांना,
बेहरे त्यांचे मदतीला, कल्पना दिली हो त्यांना.
कॉलेज काढायची इच्छा आम्हांला, राजेसाहेबांना आनंद झाला,
एक लाखाची देणगी हो दिली त्यांनी संस्थेला खरोखर दादा, दादारं, जीर, दाजीर जी ॥


मग भेटले कुंटे साहेबांना

(कोण होते कुटे साहेब ? निवृत्त अभियंता होते व अभियांत्रिकी विषयी नितांत प्रेम होते)

कल्पना दिली हो त्यांना, अभियंते तयार करण्याला,
कॉलेज काढायची इच्छा आम्हांला, विश्रामबागची जागा हवी त्याला
तुम्ही द्यावी विनंती तुम्हांला,
विश्रामबागची जागा कुंटेंनी दिली मामांना खरोखर दादा, दादारं, जीर दाजीरं जी॥


(या जागेबरोबरच धोंडूमामांनी एकूण १५० एकर जागा खरेदी केली. )

बांधकाम सुरू हो झाले, देणग्या मिळवू लागले, मिळवू लागले, हा जी जी॥

प्राध्यापक शोधू छागले, कराचीचे प्राचार्य गोखले , प्राचार्य गोखले, हा जी जी।।

नुकतेच निवृत्त झालेले, स्वेच्छेने तयार हो झाले, तयार हो झाले हा जी जी॥


(या प्राचार्यांनी सांगितले, मी एकटाच येऊन सांगलीला राहीन, माझ्या राहण्याचा व जेवणाचा जेवढा खर्च होईल तेवढाच पगार मी घेऊन, अशा त्यागी प्राचार्यांनी या महाविद्यालयात शिक्षणाचा पाया रचला.)

प्राचार्य पहिले हो मिळाले काम करण्याला खरोखर दादा, दादा र॑॥
१९४७ साली, सुरुवात झाली, स्वप्ने साकारली


(कुणाचे स्वप्न साकार झाले ? धोंडूमामांचे स्वप्न होते की मी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करणार, धोंडूमामांचे ते स्वप्न साकार झाले.)

साठ विद्यार्थी प्रवेश झाला, फक्त सिव्हिल कोर्स सुरू झाला.
हस्ते मामांच्या नारळ फुटला ॥ जी जी॥


(महाविद्यालयाचे नाव 'न्यू इंजिनि अरिंग कॉलेज' असे ठेवण्यात आले. १९५० पर्यंत फक्त साठ विद्यार्थी होते. पुणे विद्यापीठाची स्थापना १९४९ च्या सुमारास झाली. या विद्यापीठाकडून मामांनी १८० विद्यार्थी घेण्याची परवानगी मिळवली. १८० विद्यार्थ्यांचे कॉलेज १९५१ ते १९५४ पर्यंत चालू होते, पण सरकारी ग्रँट नव्हती.)

सरकारी ग्रॅट नसताना, कॉलेज चालवताना, पगार देताना,
पैसा कोठून उभा करणार, झालेले कर्ज कोण फेडणार,
संकटे कोण दूर करणार ॥ जी जी॥


संकटांशी सामना करण्याचा प्रयत्न सुरू झाला ॥ जी जी॥

वालचंद ट्रस्ट हो आला त्यांच्या मदतीला || जी जी॥


(वालचंद हिराचंद मेमोरियल ट्रस्टने ५ लाखाची देणगी दिली.)

पाच लाखाची देणगी हो दिली त्यांनी संस्थेला ॥ जी जी।॥

राज्य सरकार, केंद्र सरकार आले मदतीला ॥ जी जी।॥।

(महाविद्यालयाचे नाव बदलून 'वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग' असे ठेवण्यात आले. राज्य सरकारने आठ लाख व केंद्र सरकारने बारा लाख मदत दिली. त्यामुळे त्यांचेही नियंत्रण महाविद्यालयावर आले. महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी, राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली नियामक मंडळाची स्थापना झाली, या नियामक मंडळाने सिव्हिल बरोबर मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल कोर्सेस सुरू केले. त्याचबरोबर डिप्लोमाचेही सिव्हिल, इलेक्ट्रिकल ब मेकॅनिकल कोर्सेस सुरू केले. नियामक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली या महाविद्यालयाची घोडदौड सुरू झाली. हजारो विद्यार्थी देशात व परदेशात आपल्या बुद्धिमत्तेने व गुणवत्तेने महाविद्यालयाची किर्ती पसरवीत आहेत.)

वालचंदचे विद्यार्थी जगतात, चमकतात खास, नाव कमवतात।
मार्गदर्शन उद्योग क्षेत्रास, वीज आणि इतर सर्व क्षेत्रास,


(या महाविद्यालयाला आज शिकणा-या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, भविष्यात हे मार्गदर्शन तुम्हांला करायचे आहे, त्यासाठी तुम्हांला शुभेच्छा )

शुभेच्छा तुम्हा शाहिराच्या खास ॥जी जी॥

वालचंदचा प्रथम विद्यार्थी, नंतर प्राध्यापक, उपप्राचार्य,
एच.यु. कुलकर्णी करतो कवनास, तंत्रशिक्षण हाच हो ध्यास,


(तंत्रशिक्षणाचा ध्यास घेऊन धोंडुमामांनी तंत्रशिक्षणाची गंगा दक्षिण महाराष्ट्रात सांगलीला आणली. त्या थोर पुरुषाला मानाचा मुजरा.)

धोडूमामांना मुजरा हा खास ॥ जी जी।॥

( -----प्रा, एच. यु. कुलकर्णी)

X

Right Click

No right click