कदा ओळखीमाजि दूजे दिसेना ।
मनी मानसी द्वैत कांही वसेना ॥
बहुता दिसा आपुली भेटि झाली ।
विदेहीपणे सर्व काया निवाली ॥२०१॥
मना गूज रे तूज हे प्राप्त जाले ।
परी अंतरी पाहिजे यत्न केले ॥
सदा श्रवणे पाविजे निश्चायासी ।
धरी सज्जन संगती धन्य होसी ॥२०२॥
मना सर्वही संग सोडून द्यावा ।
अती आदरे सज्जनाचा धरावा ॥
जयाचेनि संगे महादु:ख भंगे ।
जनी साधनेवीण सन्मार्ग लागे ॥२०३॥
मना संग हा सर्व संगास तोडी ।
मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी ॥
मना संग हा साधका शीघ्र सोडी ।
मना संग हा द्धैत नि:शेष मोडी ॥२०४॥
मनाची शते एकता दोष जाती ।
मतीमंद ते साधना योग्य होती ॥
चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी ।
म्हणे दास विश्वासता मुक्ति भोगी ॥२०५॥