काव्यदीप - मनोगत

Parent Category: मराठी पुस्तके Category: काव्यदीप पुस्तक परिचय

हा काव्यसंग्रह आपल्यासमोर सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. देवाघरी जाताना माझ्या आईने दिलेल्या आपल्या काव्यधनातील थोडासा भाग माझ्याकडे आला असावा असे मला वाटते. कारण 'काव्यदीप'मधील जवळजवळ सर्व कविता मी तिच्या मृत्यूनंतर लिहिल्या आहेत; नव्हे तिने माझ्याकडून लिहून घेतल्या आहेत.

खरं म्हणजे मला स्वप्नात सुद्धा बाटलं नव्हतं की कवितेच्या प्रांतात आपल्याला प्रवेश करता येईल. आणि अशा माझ्याकडून एकापाठोपाठ एक कविता लिहिल्या जाव्यात यामागे तिची प्रेरणा हेच सर्वात महत्वाचे कारण असावे असे मला वाटते. आपल्या प्रत्येकालाच अनेक प्रकारचे अनुभव येत असतात. अनुभव जसाच्या तसा लिहिणे म्हणजे डायरी किंवा रोजनिशी लिहिण्यासारखे होय. अनुभव मनात पुन्हापुन्हा घोळवला गेला की त्यातील व्यक्तींचे संदर्भ गळून पडतात आणि केवळ भावनांचा आशय लोण्यासारखा तरंगून वर येतो. वस्तूंचे निखळ वर्णन म्हणजे कविता नव्हे अशी आपली माझी समजूत आहे. कविता म्हणजे मनाच्या गाभाऱ्यातून, भावनांचा ओलावा घेऊन आलेले शब्दांचे एकसंध, एकात्म मिश्रण होय. दूध तापवताना जसे कधी कधी उतू जाते तशी एखादी कल्पना मनात भरून ओसंडू लागली की ती कागदावर उतरविण्याची ऊर्मी अनावर होते. मनाला भावलेल्या कल्पनेला आपोआपच गाण्याचे वळण लागते. माझ्या सर्व कविता याच प्रकारच्या आहेत.

काव्यविश्‍वात माझे मन पार बुडून जाते. क्षणभर भोवतालच्या सर्व गोष्टींचा विसर पडतो. त्योळी मनाला जे सुख, समाधान, आनंद मिळतो त्याची सर कशालाच येणार नाही. मला मिळालेला हा आनंदाचा ठेवा मी माझ्यापुरता मर्यादित न ठेवता सर्वांना वाटून देत आहे.

तसे पाहिले तर माझे अनुभवविश्व मर्यादित आहे. आणि म्हणूनच नातेसंबंध, भक्ती याबद्दल अनेक कविता लिहिल्या गेल्या. मन तितके कणखर नसल्याने, मनाच्या हळवेपणामुळे साधारणत: प्रत्येक कवितेला कारुण्याची झालर लागली जाते. का कोणास ठाऊक पण राजकारण, समाजकारण यासारख्या विषयांनी माझ्या मनाचा ठाव घेतला नाही. त्यामुळे ते कवितेचे विषय बनू शकले नाहीत. माझ्या मर्यादांची मला जाणीव आहे. तेव्हा काव्यगुणांच्या दृष्टीने त्या किती सरस उतरल्या आहेत हे मला ठाऊक नाही. भावनेला धक्का न लावता ती शब्दबद्ध करताना शब्दांना कचित्‌ बोजडपणा आलेला असेल. पण आपण सर्वजण मोकळ्या मनाने त्यामागची भावना समजून घ्याल अशी आशा आहे.

कवितालेखनाचा हा माझा अल्पसा प्रयत्न आहे. खरं म्हणजे कवितेच्या विषयाला बंधन, वर्गवारी नसते. पण मायमराठी डॉट कॉम या आमच्या वेबसाईटवर ह्या सर्व कविता घातल्या आहेत आणि संगणकशास्त्राप्रमाणे त्याची वर्गवारीही केली
आहे. म्हणून पुस्तकछपाईच्यावेळीही तीच पद्धत बापरली आहे. वाचकांनी या काव्यसंग्रहावरील आपले अभिप्राय विनासंकोच कळवावेत. त्याचा मला फार उपयोग होईल.

या पुस्तकाच्या कामात अनेकांचे सहकार्य लाभले. टायपिंगच्या कामात श्री. नितीन वैद्य यांची मदत झाली. तसेच श्री. अमोघ कुलकर्णी यांनी मुखपृष्ठ काढून दिले. छपाईचे काम गजानन मुद्रणालय यानी योग्य रीतीने, वेळेवर करून दिले. त्याबद्दल या सर्वांची मी ऋणी आहे.

हे मनोगत लिहिताना 'मला, माझे, मी 'अशी “म 'च्या बाराखडीतील शब्दांचा वरचेबर आधार घेतलेला दिसतो असे कोणासही सहजपणे वाटेल. पण खरं सांगायचं तर अहंकारप्रदर्शनासाठी या शब्दांची योजना केलेली नाही. तेव्हा कृपया गैरसमज नसावा. मनातले विचार सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी या 'म ' च्या बाराखडीचा प्रपंच करावा लागला याबहल क्षमस्व.

सौ. शुभांगी सु. रानडे
“ज्ञानदीप ', विजयनगर,
शिल्परचिंतामणी सोसायटी,
वानलेसवाडी (सांगली ४१६ ४१४)
६ डिसेंबर २००२

Hits: 689
X

Right Click

No right click