प्रकरण ५ - जलशुद्धता मानके

Parent Category: मराठी पुस्तके Category: पाणी - जीवन

जलशुद्धता पारखण्यासाठी निर्धारित मानके

शुद्ध पाणी म्हणजे रंगहीन, गंधहीन, रुचिहीन, रोगाणू व अपायकारक द्रव्यरहिंत परंतु प्रमाणित जीवनावश्यक घटकांनी युक्‍त असलेले पाणी होय. शुद्ध पाण्याची ही व्याख्या इतर व्याख्यांप्रमाणे आदर्श स्थिती सूचित करते. असे आदर्श पाणी मिळणे हा बर्‍याच वेळा एक दुग्धशर्करा योगच समजावा लागेल. व्यवहारात सामान्यतः वापरावे लागणारे पाणी जर नेहमी या आदर्शाच्या कसोटीवर पारखू म्हटले तर बर्‍याच वेळेस पाण्याशिवायच राहावे लागेल. याचा अर्थ, अगदी 'आदर्श पाणी' नसले तरी आदर्शाचा आभास उत्पन्न करणारे, आदर्शाप्रत जाऊ पाहणारे पण प्रकृतीस अपायकारक नसलेले पाणी स्वीकारावेच लागेल.

आदर्शाप्रत पोहोचू पाहणारे अशा गुणवत्तेचे पाणी मिळविण्यासाठी देखील काही ठिकाणी कैक वेळा पाण्यावर 'उपचार' करणे भाग पडेल. विशेषत: वाढती लोकसंख्या आणि झपाट्याने होत चाललेले उद्योगीकरण, यांच्या संदर्भात नवीन जल्उद्गम आणि प्रदूषणाचा परिहार करणाऱ्या उपचारण पद्धती, यांच्यावर प्रचंड संशोधन करण्याची नितांत आवश्यकता आहे. तसे जर केले नाही तर १९७७ च्या मार्च महिन्यात संयुक्‍त राष्ट्रांच्या वतीने अर्जेंटिनात झालेल्या जागतिक पाणी परिषदेच्या अधिवेशनात सीरियन प्रतिनिधीने काढलेले, 'तेलापेक्षां पाण्याला अधिक किमत मोजावी लागेल असा दिवस दूर नाही,' हे उद्गार खरे ठरल्याविना राहणार नाहीत. पाण्याचा साठा मर्यादित असल्यास वापरलेले उपयुक्त पाणी पुन्हा वापरण्याची गरज उत्पन्न होते. अशा वेळी प्रथम वापरापूर्वीच्या मूळ अनुपचारित जलाशी बरोबरी करणारे पाणी मिळविण्यासाठी मलोपचारण करणे व त्यापासून मिळणार्‍या निस्त्रावाचे तृतीयक उपचारण करणे आवश्यक ठरते. (आकृती ५.१)

'आदर्शाशी बरोबरी करणारे पाणी' असा वाक्प्रचार स्वीकारल्यानंतर पाण्यात सामान्यपणे सापडणाऱ्या प्रत्येक घटकाच्या बाबतीत स्वतंत्रपणे विचार करावा लागेल. घटकांचे पाण्यातील परिमाण आणि त्यामुळे आरोग्यावर होणारे परिणाम यांचा अभ्यास महत्त्वाचा ठरेल. त्याचप्रमाणे काही घटकांच्या बाबतीत 'तडजोडीची वृती' स्वीकारावी लागेल. म्हणजेच प्रत्येक घटकाच्या बाबतीत 'स्वीकार्य सांद्रता' आणि 'अनुमय सांद्रता' निर्धारित कराव्या लागतील. त्यासाठी 'मानके' प्रस्थापित करावी लागतील. स्वीकार्य सांद्रतेपेक्षा जास्त परिमाणात पाण्यातील एखादा घटक जेव्हा आपले अस्तित्व दाखव्‌ लागतो तेव्हा बऱ्याचशा लोकांना तो आक्षेपार्ह भासू लागतो व पाण्याच्या गुणवत्तेचे नियंत्रण करणाऱ्या प्रचलित पद्धतींचे उल्लंघन केले गेले असे समजण्यात येते. मात्र तोच घटक जेव्हा अनुमेय सांद्रतेचीही पातळी गाठू पाहतो त्यावेळी विशेष दक्षता घेणे जरुरीचे असते. कारण हे परिमाण अनुमेय सांद्रता पातळीच्या पलिकडे गेल्यास ते केवळ आक्षेपार्हच न राहता आरोग्यासही विघातक बनते. त्याचा निश्‍चित परिणाम समाजजीवनावर झाल्याचे दिसून येते आणि पाण्याची 'पेयता' निकृष्ट दर्जाची समजण्यात येते.

स्वास्थ्य रक्षणाच्या दृष्टिकोनातून घटकांकरिता मानके निर्धारित करत असताना नियामक प्रधिकरणांना प्रत्येक घटकासाठी विशिष्ट हेतू लक्षात ठेवणे जरूर असते. आकृती ५. २ ही मानकासाठी तयार केलेला ' वस्तुनिष्ठ वर्णक्रम ' दाखविते. एखाद्या घटकासाठी मानक ठरवित असतानां कोणकोणते हेतू लक्षात ठेवावेत हे या आकृतीवरून लक्षात येते.

जगातील काही प्रगत राष्ट्रांनी आपापल्या राष्ट्रापुरती पाण्याच्या बावतीतील मानके प्रस्थापित केली आहेत. एवढेच नव्हे तर त्या राष्ट्रातील कोणत्याही भागात पाण्याचे विश्लेषण करणे सुलभ व्हावे म्हणून विश्लेषण पद्धती व परिमाणांची अभिव्यक्ती, यांबाबत कमालीची एकसूत्रता आणली आहे. बर्‍याचशा इतर विकसनशील व अविकसित राष्ट्रांत अशा तऱ्हेची मानके वा 'मानक विश्लेषण पद्धती' अस्तित्वात नसल्यामुळे जागतिक स्वास्थ्य संघटनेने-WHO ने एक स्वतंत्र समिती स्थापन करून व त्यावर निरनिराळया राष्ट्रातील निष्णात आरोग्याधिकारी वा ' जन:स्वास्थ्य अभियंते ' सभासद म्हणून घेऊन मानकांचा प्रश्‍न सोडविला आहे व विविध उपयोगांसाठी त्याबाबतची निर्धारित मानके तयार केली आहेत. पिण्याच्या पाण्याबाबत निर्धारित केलेली मानके पुढे दिली आहेत. या मानकांमुळे पाण्याची गुणवत्ता 'अविमितीय ' न राहता द्रव्यमानांप्रमाणे ' विमितीय' बनली आहे.

गुणवत्तेच्या बाबतीत विमिती आवश्यक ठेवण्याची ही कल्पना आधुनिक शास्त्राची मानवाला मिळालेली अपूर्व देणगी आहे. यामुळे आरोग्यसंवर्धन करणे सुलभ झाले आहे. जागतिक स्वास्थ्य संघटनेची मुख्य कचेरी स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे असून वेळोवेळी त्या समितीच्या सभासदांच्या बैठकी होतात. त्यामध्ये आरोग्यावर विघातक परिणाम घडविणाऱ्या अनेकविध घटकांच्या विश्लेषण पद्धतीविषयी व मानक परिमाणाविषयी चर्चा होते. कधी कधी तर बाजारात येणाऱ्या नवीन औषधांच्या वा डी. डी. टी. सारखी कीटकनाशके, एल. एस. डी. सारखी मादक अफिमी द्रव्ये, संतती निरोधक गोळ्या इ. अन्य द्रव्यांच्या संभाव्य परिणामांविषयी ही चर्चा होते. पोटात घेतली जाणारी द्रव्ये संपूर्णतया पचविली जाऊ शकत नाहीत. त्यापैकी काही भाग मलमुत्रातून बाहेर पडतो. त्याची टक्‍केवारीही बरीच असते. बाहेर पडणारा भाग वाहित मलजलावाटे पाण्याच्या उद्गमाला जाऊन मिळण्याची शक्‍यता बरीच असते. अर्थात त्यामुळे त्या पदार्थांची पाण्यातील उपस्थिती व त्यांची परिमाणे वाढत जातात. .

जलविश्लेषणासाठो 'नमुना ' गोळा करण्याच्या पद्धती:
जलविश्लेषणाच्या दोन पद्धती सामान्यकरून वापरल्या जातात. एक रासायनिक विश्लेषण पद्धती व दुसरी जीवाणू-शास्त्रीय विश्लेषण पद्धती. काही विशिष्ट प्रसंगी औद्योगिक उच्छिष्ट, रासायनिक खतांचा शेतपाण्यावरोबर झालेला निचरा पाण्यात झाला असल्याची शक्‍यता आढळल्यास वा पिण्याव्यतिरिक्‍त इतर विशेष कारणांसाठी (जसे बाष्पित्रासाठी, शितनासाठी, थंड पेयांच्या कारखान्यासाठी इ.) पाणी वापरावयाचे असल्यास अगर एकादा घटक (रासायनिक) व रोग यांचा अन्योन्य संबंध प्रस्थापित करावयाचा असल्यास रासायनिक न विश्लेषण पद्धती वापरली जाते. एखाद्या उद्गमातील पाण्याची पेयता ठरविण्यासाठी मात्र या पद्धतीचा प्रत्यक्ष उपयोग होत नाही. पेयता पारखावयाची असल्यास इतर कोणत्याही घटकाच्या अस्तित्वापेक्षा रोगाणूंचे अस्तित्व पाहणे अधिक महत्त्वाचे असल्यामुळे जीवणुशास्त्रविषयक परीक्षाच ध्यावी लागते.

Hits: 491
X

Right Click

No right click