उपोद्धात - ४

Parent Category: मराठी पुस्तके Category: मराठे व इंग्रज - न. चिं. केळकर

तोफखान्याचींच गोष्ट घ्या ना ! युरोपियन लोक तोफा मारण्यांत पटाईत आहेत, तोफांच्या बळावर त्यांना फारच आश्वर्यकारक करामत करून दाखवितां येते, हें युरोपियन आरमारें इकडे प्रथम आली तेव्हां आम्हांला कळलें. याला प्रत्यंतर तोफेच्या मरामतीकरिता माणसे लागतात, त्यांना पेशवाईत दयोवर्दी व खलाशी हीच नांवे होती, आणि इंग्रजी फौजेतसुद्धां या कामावरच्या हिंदी लोकांस 'लॅस्कार ' असेंच म्हणत असत; असो. आम्ही गोरे लोकांच्या आरमारापासून तोफा विकत घेतल्या, कांही येथे ओतविल्या, आणि दारूगोळासुद्धां त्यांच्याच सांगण्याप्रमाणे तयार करूं लागलो. पण पुढें त्या बाबतींत उत्तरोत्तर आम्हांस सुधारणा करता यावी ती कांहीएक आली नाही; त्यामुळे या कामांत इंग्रजांची अगर फ्रेंचांची बरोबरी आम्हांला कधी करतां आली नाहीं. ते हरहमेश्या सुधारणा करीत गेले आणि एकदां कधी फिरंग्यांनी सोळाव्या शतकांत कित्ता घालून दिला तोच आम्ही वळवीत बसलो. इंग्रजांनी विजयदुर्ग घेतला, मागून दहा वर्षानी मालवण घेतलें, तरी आम्ही 'इंग्रजाने आगळीक करून मालवण घेतलें. फारच शेफारला ! वाढते मोडतच आहे. ' असें चरफडण्यापलीकडे अगर ' शिवलंका (शिवाजीनें पाण्यांत बसविलेले लं॑केप्रमाणे असाध्य स्थळ ) होती. किल्ला निर्मिल्या तागायत दुसरियास साध्य झाला नव्हता. ' म्हणून दुःखोद्गार काढण्यापलीकडे काय केले पुनः आणखी दहा वर्षांनी साष्टी घेतली; तरी आम्ही सावध झालोच नाहीं, व तोफांच्या बळावर आमच्या किल्ल्यांचे रक्षण कसें करावें हे आम्ही शिकलो नाही ! मग सिंहगड, पुरंदर, रायगड, वासोटा इत्यादि किल्ले इंग्रजांनी आम्हांपासून भराभर हिसकून घेतले यांत दोष कोणाचा ?

असे तोफा ओतणारे कारागीर अगर दारूगोळा तयार करणारे अगर चापाच्या बंदुका तयार करणारे कल्पक लोक आमच्यांत नव्हते असेंहि नाही ! पुण्याच्या तोफखान्यांत पाहिजे तेवढाल्या तोफा व गरनाळा युरोपियन व देशी कारागीर ओतून देत असत हे तर राहोच, पण मिरजेसारख्या किल्ल्यांतसद्धां लागतील तशा तोफा ओतून घेतां येत असत आणि कुलपी व दुसऱ्या कित्येक प्रकारचे गोळे, एकसारख्या तास पाऊण तास जळणाऱ्या चंद्रज्योती, आणि बाण व दारू तयार होत असे. पंचरसी तोफा ओतण्याची मजुरी तिच्या वजनावर दर शेरास शंभर रुपये याप्रमाणें आकारली जात असे असें आम्ही जुनें दप्तर चाळतांना वाचल्याचे स्मरतें. यापेक्षा इंग्रजी तोफा विकत घेतल्या तर त्या स्वस्त पडत त्यामुळें गरजू सरकारे आयल्या वेळी त्याच बिकत घेत. झीज सोसून स्वदेशी माल घ्यावा व देशी कारागीरांस उत्तेजन द्यावे हे तत्व त्यावेळी सुद्धा पसंत नव्हतेंच.

तोफखान्याची शिस्त अशी म्हणण्याजोगी पेशवाईत फारशी असल्याचे त्या वेळेच्या लेखांत दिसून येत नाही. पानशांनी कधी कुठे तरवार (अथवा खरें बोलायचें तर तोफ) मारली होती त्याच लौकिकावर ते पेशताईंच्या अखेरीपर्यंत तोफखान्याचे दरोगे होते. त्यांच्या तोफांचा चांगुलपणा त्या तोफांनी पूर्वी कधीकाळी दाखविलेल्या करामतीवर मोजला जात असे ! मग हल्लीची करामत कशीही असो ! एकाद्या वेढ्यांत मराठी तोफांचा किल्ल्यावर भयंकर भडिमार होण्याचे भय नव्हृतेंच. कारण, दारूगोळ्याच्या खर्चावर दरोग्याची काकदृष्टि नेइमी फिरत असायची; शिवाय फार वार केले तर तोफा फुटतील अगर बिघडतील हो. मोठीच पंचाईत होती ! असल्या जुन्या तोफा आणि 'कृष्णमृत्तिके ' ची टंचाई असल्यावर मग काय विचारावे १ आमच्या फौजांचे मोर्चे एखाद्या किल्ल्यास बसले म्हणजे मोच्यांत गोलंदाजांनी एकदां तोफेचा बार काढून पुनः बार भरून ठेवावा, मग चिलीम ओढावी, घटका दोन घटका गप्पागोष्टी कराव्या, इकडे थोडे हिंडावे, मग तोफेजवळ जाऊन भरलेला बार सोडावा आणि दुसरा भरून ठेवाचा,-पुनः चिलीम गप्पा वगैरे प्रकार व्हावे, याप्रमाणे सायंकाळपर्यंत दहा-पांच बार काढून तोफ तळावर आणून पोंचती केली म्हणजे संपला रोजगार. या लिहिण्यांत आतिशयोक्ति बिलकुल नाही. इंप्रज प्रेक्षकांनी हे लिहून ठेवले आहे याचाच उद्धार आम्हा येथें केला आहे व जुना पत्रव्यवहार आम्ही जो वाचिला आहे त्यावरून अशीच वहिवाट असल्याचें अनुमान निघतं. सन १७७४ पासून १७८१ पर्यंत पेशवाई फौजांची इंग्रजांशी राहून राहून सहा वर्षे लढाई सुरू होती. तीत पानशांनी दहापांच वेळां तरी इंग्रजी फौजेवर तोफांचा म्हणण्यांजोगा एल्गार केला असल्यास फारच म्हणावयाचे ! हरिपंततात्यांची तोफा मारण्याची शक्कल या युद्धांत कांही निराळीच होती. ते लांब पल्ल्याच्या फारच मोठ्या तोफा नेऊन त्यांचा मारा इंग्रजी फौजेवर दीड दोन कोसांवरून करीत. इतक्या लांबून हें काम करविण्याचा हेतू एवढाच की, सुदैवाने टोपीवाल्याला एकदोन गोळे लागले तर त्याची शेपन्नास माणते मरतील. तसे नाही झाले तरी निदान त्याचा हल्ला आल्यास आगाऊच तोफा काढून पिछाडीस पोचावितां येतील.

कोणी म्हणेल की, तोफखान्याच्या कामातली हेळसांड तुम्ही वर्णन करितां ती निदान दौलतराव शिंद्याला तरी लागू नाही. कारण, त्याचा तोफखाना इंग्रजांच्या बरोबरींचा होता हे खुद इंप्रजांनीच कबूल केले आहे. होय, ' म्हणणं खरं आहे. पण त्यावरून आमचे हिंदी लोक तोफा मारण्यांत इंग्रजांच्या बरोबरीला आले होते असं मात्र सिद्ध होत नाही. कारण, शिंद्याचा तोफखाना फ्रेंच व इंग्रज अंमलदारांनी तयार केलेला असून त्याची वहिवाट सुद्धा तेच लोक करीत होते; आणि असल्या परस्वाधीनपणामुळे अखेर शिंद्याचा फायदा न होतां घातच झाला कारण, परकी लोकांपैकी पुष्कळ असामी शिंद्यास आयते वेळी दगा देऊन इंग्रजांकडे निघून गेले. खुद्द सर्व पलटणांवरचा मुख्य मुसा पिरू यानेंच सर्वांआधी इंग्रजांशी सूत जुळवून विलायतचा रत्ता सुधारल्यावर त्याने घातलेले तोफा व बंदुका तयार करण्याचे कारखाने आयतेच दारूगोळ्यांसह इंग्रजांच्या हाती अल्प श्रमाने लागावे, यांत नवल तें काय ?

Hits: 324
X

Right Click

No right click