स्वागतकक्ष arrow मराठी साहित्य arrow लेख arrow परदेशी जाऊन काय मिळतं ? काय हरवतं?
परदेशी जाऊन काय मिळतं ? काय हरवतं?
लेख़क Administrator   
    

माधवराव स्वत: बऱ्यापैकी हुशार. परंतु मेडिकल किंवा इंजिनिअरिंगसारख्या कोर्सला न जाऊ शकलेले. चार पाच भावंड आणि मध्ममवर्गीय साध कुटुंब. त्यामुळे बी. एस् सी. नंतर मॅनेजमेंटचा कोर्स करून खाजगी क्षेत्रात नोकरी करून असिस्टंट मॅनेजरच्या हुद्यावरून मोठ्या कंपनीतून निवृत्त झाले. त्यांना दोनच मुले. मोठी मुलगी रश्मी तर धाकटा राजीव. दोघेही हुशार. रश्मी, एम्. एस् सी, झाली तर राजीवला इंजिनिअर व्हायचं होतं. बारावीला शिकवण्या ठेवून उत्तम गुण मिळवून त्याने इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवला, तेंव्हा त्याच्याबरोबरच त्याच्या आईवडिलांनाही खूप आनंद झाला. रश्मीला डॉक्टर नवरा मिळाला. शरद त्यांच्या माहितीचा होताच. तो एम्. एस् सी. चा अभ्यास करत असतानाच दोघांच्या आई-वडिलांनी रश्मी-शरदचं लग्न करून दिलं. मुलगा इंजिनिअर होणार म्हणून माधवराव आणि त्यांची पत्नी अभिमानाने, आनंदाने मित्रपरिवारात आता चांगलीशी सून आणायचा बेत सांगत होते. पण इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात असताना राजीवने उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याचा बेत केला. त्याला एका युनिव्हर्सिटीत आर्थिक मदतीसह प्रवेश मिळालाही. प्रवासभाडं देण्याची माधवरावांची तयारी होतीच. पुन्हा एकदा अभिमानाने त्यांची छाती भरून आली. मुलाने शिक्षणात यश मिळवून, परदेशी जाण्यासाठी स्कॉलरशिप मिळवून पित्याच्या पुढे पाऊल टाकलं होतं. पण हे पुढे टाकलेले पाऊल त्याला त्याच्या आई-बापांपासून बरंच लांब नेणार होतं.

आर्थिकदृष्ट्या परावलंबी न राहण्याइतकी पुंजी, स्वत:चा फ्लॅट एवढं माधवरावांनी जमा केलं होतं. पण अमेरिकेत एम्. एस्. करून तिथे थोडे दिवस नोकरी करून झाल्यावर राजीव पुन्हा भारतात येऊन राहणं कठीण वाटू लागलं. त्याचा व्हिसाचा प्रश्न सुटल्यावर तो भारतात येऊन आई-वडिलांनी पसंत केलेल्या चार मुलीतून स्वत:ला आवडलेल्या मुलीशी लग्न करून आणखी काही वर्षांसाठी पुन्हा अमेरिकेत गेला. आई-वडिलांच्या पसंतीच्या, आपल्या जातीच्या मुलीशी लग्न केल्यामुळे आई-वडिलांची तक्रार असायचं कारण नव्हतं. बहिणीची पॅथॉलॉजी लॅब, मेहुण्याचं सर्जरीतलं कौशल्य, यांची प्रशंसा करून छोट्या भाच्याला ढीगभर आधुनिक खेळणी व कपडे देऊन त्याने खूष केलं होतं. अमेरिकेतलं त्याचं घर, तिथलं वातावरण पाहायला, माधवराव, मालतीबाई दोन महिने जाऊन आल्या. तिथून आल्यावर मात्र राजीव परत का येत नाही, ते त्यांना समजलं होतं. मुलाच्या यशाने आत्तापर्यंत सदा हुरळून जाणारी, अभिमानाने त्याचं कौतुक करणारी त्याची आई जरा खिन्न दिसू लागली. हळूहळू रश्मी व शरद देखील अमेरिकेत जाण्याच मार्ग शोधत आहेत हे त्यांच्या लक्षात आलं. आपली तरूण पिढी पाश्चात्य जगाकडे का लोभावते, तिथेच राहणे का पसंत करते हे थोडं थोडं कळत असूनही माधवरावांना आवडत, पसंत पडत नव्हतं. अशा प्रकारचे कौटुंबिक संघर्ष आता कित्येक घरातून दिसतात. काही वेळा तरूण मंडळी उच्च शिक्षणानंतर मायदेशी परतून व्यवसाय किंवा नोकरी करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यातले बरेचसे दोन-चार वर्षानंतर पुन्हा अमेरिकेचा रस्ता धरतात. असं का होतं एवढ्या मोठ्या प्रमाणावर ? प्रश्न मोठा गहन असून कारणंही बरीच आहेत. दोष कुठल्याही एका व्यक्तीवर किंवा एकाच गोष्टीकडे नाही. खूपच क्लिष्ट कारणमीमांसा आहे. कोण बरोबर कोण चूक हे ठरवताच येत नाही. मॉर्टगेजवर म्हणजे हप्त्यांच्या स्वरूपात पैसे देण्याचं का होईना पण स्वत:चं घर. एक किंवा दोन गाड्या, उत्तम रहाणी - फ्रीज, फोन, इलेक्ट्नॅनिक वस्तू, उत्तम अन्न व कपडे यांची सुबत्ता हे सगळंया तरूण मंडळींना भारतात चटकन् मिळेल? स्वत:चा व्यवसाय करायचा असला, कष्ट घ्यायची तयारी असली तरी संधीची दुर्मिळता, वेगवेगळे परवाने मिळवताना करावी लागणारी लाचलुचपत, शाळांमध्ये मुलांना प्रवेश असो किंवा फोन, गॅस यांची कनेक्शन्स मिळवण्याचं काम असो, वशिलेबाजीचा अनुभव, चांगल्या नोकऱ्यांसाठी प्रचंड स्पर्धा, शुद्ध हवा, पाणी, कचरापट्टीचे प्रश्न हे सगळं पाश्चात्य जगात सतावत नाही. अमेरिकेत स्थायिक होणाऱ्यांना दोष देण्यापूर्वी भारतातही लहान खेड्यातून मोठ्या शहरात येणारे विद्यार्थी उच्चशिक्षित झाल्यावर शहरात राहणं का पसंत करतात याचा विचार कराया. गावी परत जाऊन कच्चेरस्ते, अभावाने असणारी किंवा मिणमिणती वीज, नळातून येणारं शुद्ध पाणी न मिळणं, कच्ची घरं, अनेकदा ड्न्ेनेजसारखा शहरी सुविधांचा अभाव या सगळयांचा सामना करत लहान खेडेगावात जाऊन राहण्याची धमक कितीजण दाखवतात ? अर्थात या दोन्ही उदाहरणात एक मूलभूत फरक आहे. खेडेगावातून शहरात येणारा माणूस रहाणी बदलली तरी आपल्याच देशात, साधारण आपल्याच संस्कृतीच्या लोकात राहतो. मनात येईल तेंव्हा खेडेगाव-शहर हा प्रवास करू शकतो. आपल्या मुलांपासून, आई-वडिलांपासून प्रत्यक्षात व भावनेनेही तुटून जात नाही. मुलं अमेरिकेत स्थायिक झाली आणि आई-वडिलांना त्यांच्याजवळ राहणं शक्य नसलं किंवा परदेशी राहणं आवडत नसलं तर ती मुलं आई-बापांपासून तुटल्यासारखीच होतात. भारतातच इतरत्र रहाणं हे त्यामानाने फार वेगळं वाटतं.

पाश्चात्य जगात स्थायिक होणाऱ्यांना मुलं होऊन ती तिथे वाढू लागली की मग मात्र दुधा-मधाच्या नद्या वाहणाऱ्या त्या देशातले काटेही बोचू लागतात. मुलं जवळजवळ पूर्ण पाश्चात्य संस्कृतीत वाढतात. त्यांचे आई-वडिल स्वत:च्या आई-वडिलांपासून भावनिक दृष्ट्या भावनिक दृष्ट्या जेवढे लांब आले त्याहीपेक्षा त्यांची ही मुलंं त्यांच्यापासून लांब जातात. ती सांस्कृतिक दृष्ट्या पूर्ण भारतीय होऊच शकत नाहीत. पाश्चात्य समाजात भले मानानं वागवलेले असलो तरी आपण उपरे आहोत हे संवेदनशील लोकांना जाणवू लागतं. शिवाय पाश्चात्य जगात गोऱ्या कातडीला अधिक मान आहे हे जाणवू लागतं. वास्तविक अमेरिकेसारख्या स्पर्धात्मक गुणवत्तेला मान देणाऱ्या देशातही भेदभाव केला जातो याची जाणीव हळूहळू होऊ लागते. आपण जॉनस्मिथपेक्षा कांकणभर जास्तच कर्तृत्ववान असलो तरी त्याचे प्रमोशन आपल्या आधी झालेले पाहून राजीवला राग आणि क्षोभ होणे साहजिक आहे. पण भारतात असेच चालते. निदान इथे सुबत्ता तरी आहे असे म्हणून तो आपले समाधान करून घेतो. मात्र असंतोषाचा हा अनुभव किंचित वेगळया छटांचा असतो. आपल्या देशात आपण हवेतसे चरफडू शकतो. इथे आपण उपरे आहोत, एका ठराविक मर्यादेपलिकडे जाऊ शकत नाही, याची जाणीव सतत होत राहते. मुलांना सहजी उपलब्ध असणारे ड्न्ग्ज, डेटिंगसारखे रिवाज, वृद्धांचं एकटेपण या गोष्टी सहन कराव्या लागतात. एकीकडे ज्यांची मुलं अमेरिकेत स्थायिक झाली, ते आईबापही एकटे, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असूनही नातवंडांची वारंवार भेट न मिळणं, मुलांचा सहवास न मिळणं, यामुळे जरा दु:खी होतात. त्यांनी स्वत:ला रमवण्यासाठी काही छंद किंवा काम करणं जरूरीचं असतं. दोघांपैकी एक कालवश झाल्यास उरलेलं वृद्ध माणूस फारच एकाकी होऊ शकतं. अर्थात् परदेशी जाऊन रहाणं आता आणखीनच कठीण झालेलं असतं.

यासगळया परिस्थितीवर योग्य उपाय शोधणं कठीण आहे. प्रत्येकानं विचारपूर्वक तो शोधायला हवा. मुलांना हौसेने परदेशी पाठवणाऱ्या आई-वडिलांनी, तसेच परदेशी स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या, भारतात वाढलेल्या तरूण तरूणींनी स्वत:ला काही प्रश्न विचारून प्रमाणिकपणे त्यांची उत्तरे शोधावीत असं मला वाटतं.

मुलांना परदेशी उच्च शिक्षणासाठी जाण्यास प्रोत्साहन देणाऱ्या आई-वडिलांसाठी प्रश्न -

१. परदेशात, आपल्या तुलनेने खूप सुबत्तेत राहिल्यावर मुलांना पुन्हा भारतात रहावसं वाटेल याची कुणीच खात्री देऊ शकत नाही. मुलं परदेशी स्थायिक होण्याची शक्यता स्वीकारली आहे ना ?
२. अधिक महत्वाचा प्रश्न - मुलं परदेशी (किंवा देशातच पण खूप दूर) राहिली तर आपण आपला वृद्धापकाळ स्वतंत्रपणे, स्वत:च्या जबाबदारीवर निभावू शकू? वेळ उत्तम जाण्यासाठी चांगले छंद, झेपेल अशा कामाची क्षेत्रं उपलब्ध आहेत ?

परदेशी उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्यांसाठी प्रश्न-

१. परदेशी स्थायिक होण्याची संधी शोधणार ?
२. भारतात परत जाण्याची इच्छा असल्यास, भारतात येऊन उपयुक्त काम करता येईल असा अभ्यासक्रम निवडला आहे का ?
तुमच्यावर भारतीय संस्कृतीचे जेवढे संस्कार झाले तेवढे, तुम्ही परदेशात स्थायिक झाल्यावर तुमच्या मुलांवर होणार नाहीत. पाश्चात्य जगात मुलांना ड्न्ग्ज, डेटिंग व एकूण सर्व प्रकारचे स्वातंत्र्य यांचा परिचय लवकर होतो. भोवतालच्या संस्कृतीपेक्षा वेगळी संस्कृती त्यांच्यवर लादता येत नाही हे मान्य आहे ? अर्थात् तिथेही सुसंस्कृत, अभ्यासु, चांगल्या सवयीची मुलं असतात, पण प्रलोभनं भरपूर आहेत सत्य आहे.
३. आपल्याला अमेरिकेत ज्या शिक्षणाच्या जोरावर नोकरी, पैसा मिळतो, त्याचा पाया भारतात झाला आहे आणि या गरीब देशाच्या पैशातून आपण आपली गुणवत्ता वाढवली. श्रीमंत पाश्चात्य देशात कामं करून पैसे मिळवताना, आपल्या गरीब देशाला कुठल्यातरी मार्गानं परतफेड करणं हे तुम्हाला आपलं कर्तव्य वाटतं ? ते पुरं कसं करता येईल याचा विचार करता ?

आपल्या आई-वडिलांची जबाबदारी उचलणार का, आणि कशी हे प्रश्न मी विचारणार नाही कारण भारतात राहूनही आई-वडिलांची जबाबदारी अजिबात न पेलणारी मुलंही दिसतात. मग हा प्रश्न फक्त परदेशी राहणाऱ्या मुलांना विचारणं अप्रस्तुत आहे.

शेवटी परदेशी नशीब काढणारे आणि इथेच संसाराचा गाडा पुढे रेटणारे यांच्यात ते आणि आपण अशी खाई असण्याचे कारण नाही. आपल्या तीन-चार आठवड्याच्या मायदेश यात्रेत ते इथल्या परिस्थितीवर तोंडसुख घेऊन ही खाई निष्कारण वाढवतात. तसेच आपण इतक्या सुस्थितीत आणि इथे आपले पिचत पडलेले भाऊबंध कर्तृत्वहीन असा समज त्यांनी करून घेऊ नये. वास्तविक इथल्या परिस्थितीला तोंड देत राहणे यातले कर्तृत्वदेखील वाखाणण्याजोगे असते. त्याचप्रमाणे परदेशात मिळवलेल्या मिळकतीचा अल्पांश जरी त्यांनी कृतज्ञतेच्या भावनेने इथल्या समाजाच्या भल्यासाठी लावला तरी ही खाई कमी होईल.

आपणदेखील केवळ लंकेतील सोन्याच्या विटांकडेच दृष्टी लावून बसलो तर इथल्या दगडविटांतून रचनात्मक शिल्पे कोणी उभारायची ? इस्रायलसारख्या देशाचे उदाहरण डोळयासमोर ठेवून हम भी कुछ कम नहीं अशा भावनेने स्वकर्तृत्वावर इथेच इतक्या बिकट परिस्थितीतून नशीब काढणाऱ्यांचे आपण कौतुक केले पाहिजे. परदेशातील सेकंड रेट विद्यापीठात निव्वळ प्राध्यापकी करून देखील सुबत्ता मिळवणाऱ्यापेक्षा इथे राहून जागतिक मान्यता मिळवणारा (पण घर आणि गाडी नसलेला ) अधिक उच्च पातळीवरचा हे मूल्यांकन आपण स्वत:च करायला शिकले पाहिजे. जीवनात महत्वाच्या गोष्टींचे क्रम आपण ठामपणे लावले पाहिजेत.

(स्वरसंदेश १९९६ या मासिकातून साभार)

- डॉ. जयंत नारळीकर / डॉ. मंगल नारळीकर

 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color