भिंग
लेख़क डॉ. सु. वि. रानडे   
     

आमची सुमेधा म्हणजे भारी उत्साही. एवढीशी चिमुरडी पोर पण कुतुहल व नवीन शिकण्याची आवड यामुळे ती काही नवीन गोष्ट करायला लागली की भल्या-भल्यांना मागे टाकते. साहजिकच अशा मुलीची हौस पुरवायची म्हणजे अस्मादिकांची पंचाईतच. दरवेळी काही तरी नवे तिला द्यायला हवे.
त्या दिवशी लाल कागदाच्या पुडीतून काचेचे भिंग काढून मी तिला दिले तेव्हा ती काय खूष झाली. दिसेल ती वस्तू भिंगातून पहाण्याचा तिने सपाटाच लावला. ते नवे विश्व पहाण्यात ती गर्क झाल्याचे पाहून मलाही समाधान वाटले. आता एक-दोन दिवसांची तरी निश्चिती झाली असा विचार करून मी ही नि:श्वास टाकला.
एक तास झाला असेल नसेल त्या घटनेला. खुर्चीत रेलून पुस्तक वाचत असताना सुमेधा माझ्यासमोर केव्हां येऊन उभी राहिली कळलेच नाही मला. बाबा ! तिने दुसऱ्यांदा हाक मारली आता लगेच कशाला आली या भावनेने थोड्या त्रासिक चेहऱ्याने मी म्हटले काय ? पण तिचा गंभीर चेहरा पाहताच मी नरमाईचा सूर घेतला.
``काय पाहिजे तुला ? काय झाले ? ''
``हे भिंग नको मला''.
तिने भिंग माझ्या हातावर ठेवले व तोंड फिरवून निघू लागली. मी तिचा हात धरला व थोडे रागावूनच म्हटले अग तुला मुद्दाम नवीन भिंग आणले. अगदी सूक्ष्म वस्तूही नीट पहाता याव्यात म्हणून. तर तू -- माझे शब्द तसेच अर्धवट राहिले. तिच्या टपोऱ्या डोळयात पाणी भरलेले होते.
`म्हणून तर नकोय मला ते'
`अगं पण झालं तरी काय?'
तिने माझ्याकडे मान वर करून पाहिले.
`भिंग नव्हते तेच बरे होते. मगाशी काय झाले? कोपऱ्यातली मुंग्यांची रांग मी बघत होते. अंगावर आलेली मुंगी झटकून टाकली पण नंतर वाटले भिंगातून तिला पहावे. तर भिंगातून मला काय दिसले असेल? त्या मुंगीचे दोन पाय अर्धवट तुटले होते एक मिशी लोळागोळा झाली होती व गुंगीची चालण्याची केविलवाणी धडपड चालली होती. भोवतालच्या तुरुतुरु पळणाऱ्या मुंग्यांंमध्ये ही मुंगी जायबंदी होऊन तुटके पाय हलवीत उभी होती. मला वाईट वाटले. मी तिच्या डोळयापाशी भिंग नेले मला वाटले तिच्या डोळयात पाण्यासारखे काही असावे. मी असे तिला बघतेय. कदाचित तिलापण त्याच भिंगातून मी दिसत असेन का. मी चटकन् भिंग बाजूला केले. मी किती क्रूर आहे, विनाकारण तिला जखमी करून वाऱ्यावर सोडणारी. मला ते पहावेना ती मुंगी जितक्या वेळ जिवंत राहील तोपर्यंत असह्य दु:ख भोगणार. ते दु:ख लवकर संपवावे म्हणून मी हात मारून तिची हालचाल बंद करायचा प्रयत्न केला. साध्या डोळयांनी तरी मला काही हालचाल जाणवली नाही. पण भिंगातून ती खरीच मेली की नाही हे पहाण्याची मला उत्सुकता लागली आहे पण ती अशाही परिस्थीतीत जिवंत असल्यास तिच्याकडे मला बघवणार नाही आणि कदाचित तिच्या मरणप्राय यातना मला कल्पनेतही सहनही होणार नाहीत. तेव्हा बाबा ! हे भिंग कुठेतरी दूर फेकून द्या.'
मी अवाक् होऊन तिच्याकडे पहात होतो. नकळत माझ्याही डोळयात अश्रू आले. मी तिला जवळ घेतले व व तिची समजूत काढली व विषय बदलला. पण भिंग हे नुसते छोटी वस्तु पहाण्याचे यंत्र नाही तर सूक्ष्म जीवांचे दु:ख जाणून घेण्यासाठी विज्ञानाने बहाल केलेला. तो डोळा आहेे हे मला उमजले.

- डॉ. सु. वि. रानडे
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color