मानवंदना
लेख़क Administrator   
मानवंदना
लेखक - रवींद्र पिंगे
प्रकाशक - चतुरंग प्रतिष्ठान
प्रथम आवृत्ती - २९ एप्रिल २००७
पुस्तक परिचय - सौ. शुभांगी सु. रानडे
 
प्रत्येक कलावंताजवळ ती ती कला उपजतच असते असे म्हणतात. अर्थात त्यासाठी त्या कलावंताला खूप मेहनत घ्यावी लागते. अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. उत्तम लेखकाचेही तसेच असते. श्री. रवींद्र पिंगे यांनी लिहिलेल्या मानवंदनांचे संकलन बघता तर ती खात्रीच पटते. ‘मानवंदना’ ह्या प्रस्तुत पुस्तकात श्री. रवींद्र पिंगे यांच्या खास शैलीतून उतरलेली ३९ मानपत्रे आपणास वाचायला मिळतात. यातून महाराष्ट्राचा गेल्या पन्नास वर्षांचा उज्ज्वल इतिहास वाचकाला बघायला मिळतो. सर्वच क्षेत्रातील महाराष्ट्राची यशस्वी घोडदौड नजरेसमोर उभी राहते.
रवींद्र पिंगे यांनी आवडीने भारतभ्रमण केले. अनेक लोक त्यांना भेटले. अनेकांचे त्यांनी बारकाईने अवलोकन केले. अनेकांचा त्यांना जवळून सहवास लाभला. त्यातून माणसाची पारख करण्याची व त्यांना शब्दबद्ध करण्याची त्यांची शैली विकसित होत गेली. लता मंगेशकरांसारख्या प्रथितयश गायिकेसाठी लिहिलेल्या मानपत्रात लेखकाची अत्यंत म्रूदु-मुलायम, नाजुक, तरल भाषा वाचकाच्या मनाला वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. तर शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे यांच्या मानपत्रातील भारदस्त भाषा पुरंदरे यांच्या व्यक्तिमत्वास साजेशी आहे.. चतुरंग प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणार्‍या ह्या पुरस्कारांचे स्वरूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. पुरस्कारासाठी निवड झालेल्या व्यक्तीचे कर्तृत्व उचित शब्दात, खास शैलीत मांडण्याचे कसब पिंगे यांना चांगलेच साधले आहे. मानपत्राची सजावट संकल्पना ही महेश परांजपे व महेश खरे यांनी अतिशय उत्तम रीतीने सांभाळलेली आहे. यामुळे विविध प्रकारच्या नक्षीदार चौकटीतील मानपत्रे ही वाचकाचे मन वेधून घेतात. प्रत्येक मानपत्राची धाटणी वेगवेगळी असून प्रत्येक मानपत्र ठेवणीतल्या शालूप्रमाणे देखणे आहे.
पिंगे यांच्या दिलदार स्वभावाची साक्ष मानपत्र लिखाणाविषयीच्या त्यांच्या भूमिकेत दिसून येते. समोरच्या माणसाविषयी बोलताना अथवा लिहिताना त्याचे केवळ गुणगौरव करण्याची त्यांची सहजप्रवृत्ती असून दोषांकडे ते नेहमी डोळेझाक करतात. म्हणजे गांधीजींसारखा ‘चांगले बघा, चांगले ऎका व चांगले बोला’ हाच सल्ला ते आपल्या वागणुकीतून वाचकाला देतात.
आचार्य काकासाहेब कालेलकर, कुमार गंधर्व, भालजी पेंढरकर, जयंत नारळीकर, पु. ल. देशपांडे. ही व यांसारखी अनेक लोकोत्तर माणसे त्यांना भेटली तसेच लता मंगेशकर, सुधीर फडके, पं. भीमसेन जोशी यांच्यासारख्या आवडत्या माणसांचं जाहीर कौतुक करण्याची सोनेरी संधी मिळाल्यामुळे ते स्वतःला अत्यंत सुदैवी समजतात.

मान्यवरांचा सत्कार करण्याची चतुरंग प्रतिष्ठानची योजना व मानवंदना पुस्तक प्रसिद्ध करण्याची कल्पना अभिनंदनीय आहे. या पुस्तकामुळे मानपत्र लिखाणाचा आदर्शच उपलब्ध झाला आहे.

 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color