पुण्यभूमी भारत
पुण्यभूमी भारत
लेखिका - सुधा मूर्ती, अनुवाद - लीना सोहोनी
प्रथमावृत्ती - २ ऑक्टोबर २००६, किंमत - रु. १३०/-
पुस्तक परिचय - सौ. शुभांगी सु. रानडे
सुधा मूर्ती यांच्या ‘गोष्टी माणसांच्या’, व ‘वाइज अँड अदरवाइज’ या दोन पुस्तकांना वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला. याचे महत्वाचे कारण म्हणजे त्यांचे प्रामाणिकपणाने केलेले अनुभवकथन. शिवाय त्यांची लेखनाची धाटणी सरळ, साधी, सुबोध व वाचकाच्या मनाला भिडणारी आहे. मुलखावेगळे जीवनविषयक तत्वज्ञान लेखिकेचे जीवन समृद्ध करून जाते. अशा लेखिकेचे तिसरे पुस्तक म्हणजे ‘पुण्यभूमी भारत’ हे होय. सुधा मूर्ती व अनुवादिका लीना सोहोनी यांची जोडी चांगलीच जमली आहे. लीना सोहोनी यांनी केवळ अनुवाद न करता त्याला मराठी भाषेतील अभिजात साहित्यकृतींचे स्वरूप प्राप्त करून दिले आहे.
सुधा मूर्ती यांच्यासारख्या उच्च पदाधिकारी व्यक्ती. त्यांचे अनुभवक्षेत्र फार विस्तारलेले असल्याने रोज अनेक प्रकारच्या लोकांशी संपर्क येतो. बर्‍या-वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्यातील वैशिष्ट्यपूर्ण अनुभवांची नोंद ठेवून त्यांना कथारूप देण्याची लेखनशैली ही खरोखर अतुलनीय आहे. पहिल्या दोन पुस्तकांच्या पद्धतीचेच हेही पुस्तक आहे. या पुस्तकात वेगवेगळ्या अनुभवांवर आधारित अशा ३१ कथा आहेत. सर्व कथांचे २१ भारतीय भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे. यावरून त्या कथांची लोकप्रियता व वाचकांचा लेखिकेविषयी असलेला गाढ विश्वास दिसून येतो.
‘मातृत्व’ कथेतील मीरा, ‘चप्पल घालून चाल’ मधील सरोजा, ‘फाळणी’ कथेतील रूपा कपूर, ‘स्वार्थ’ कथेतील सुनामीग्रस्तांबद्दल आलेले अनुभव हे वाचून लेखिकेची सूक्ष्म निरीक्षण शक्ती, प्रचंड शब्दसंपदा यांची प्रचिती तर येते. तसेच आपण काही फार मोठे काम करीत नाही असे नम्रतापूर्वक सांगण्याची असामान्य वृत्तीही दिसून येते. ‘ शंभर मुलांची आई हो’ या कथेत खेड्यापाड्यात राहणार्‍या, संसारात लवकर वैधव्य प्राप्त झाल्याने पूर्वीच्या पद्धतीनुसार केशवपन केले असले तरीही आधुनिक विचारसरणी असलेली लेखिकेची आजी आपणास भेटते. स्वतःच्या दहा मुलांच्या जन्माचा अनुभव गाठीशी असलेली ही आजी गावातील गावातील अडल्या नडलेल्या बायकांच्या (बाळंतिणींच्या) मदतीला स्वतः जाते. त्यावेळी जातपात, धर्म काही काही तिच्या आड येते नाही. गावातल्या १००/१५० मुलांचा तिच्याहातून झाला. ही कथा सांगता सांगता सुधा मूर्ती ‘गरजू लोकांना मदत करताना जातपात काहीही बघू नये.’ असा नकळत सल्ला वाचकाला देतात तो अधिक मोलाचा वाटतो.
‘पुण्यभूमी भारत’ या शीर्षककथेत लेखिका तिबेटची राजधानी ल्हासा येथे गेल्या असताना त्यांना आलेला वैशिष्ट्यपूर्ण अनुभवकथन आहे. माणसाला स्वतःबद्दल, स्वतःच्या कुटुंबाबद्दल, गावाबद्दल, देशाबद्दल फार अभिमान असतो. तो स्वतःला फार चांगला समजत असतो. पण आपणच आपले कौतुक करण्यापेक्षा इतरांच्या तोंडून ते ऎकणे अधिक महत्वाचे असते. तिबेटचे सध्याचे दलाई लामांशी चीनच्या प्रशासनाचे सूत न जमल्यामुळे ते भारताच्या आश्रयाला आले. यामुळे भारताबद्दल तिबेटच्या लोकांना वाटणारा आदर या कथेत दिसतो. आपला भारत देश म्हणजे राम-कृष्णांसारख्या देवासमान व्यक्तींची पवित्र जन्मभूमी हे तर खरेच. पण ती तिबेटमधील लोकांनाही तितकीच पवित्र वाटते ते का याचे कारण या कथेत समजते. अशा रीतीने प्रत्येक कथेत आशयघनता असल्याने ती वाचकाचे अनुभवविश्व समृद्ध करून त्याला वेगळ्या जगात घेऊन जाते.
वाचकांनी केवळ वाचक राहता रामदासांच्या म्हणण्याप्रमाणे ‘दिसामाजी कहीतरी ते लिहावे’ व स्वतःही लेखक बनावे असा गोड सल्ला सुधा मूर्ती वाचकाला देतात. पाण्याचा एक थेंब जर अळूच्या पानावर पडला तर तो मोत्याप्रमाणे चमकतो व तोच जर तापलेल्या तव्यावर पडला तर त्याची वाफ होऊन उडून जाते. म्हणजेच अनुभवाकडे बघण्याची सकारात्मक वृत्ती व तो कथन करण्याची सकस हातोटी यामुळे ‘पुण्यभूमी भारत’ हे पुस्तक हे वाचकांच्या पसंतीस उतरले आहे.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color