उद्‌घाटन समारंभ
लेख़क Administrator   
(सौजन्य - इसकाळ न्यूज सर्व्हिस) महाराष्ट्र मंडळ बे एरिया आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे आयोजित या संमेलनाचे उद्‌घाटन अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक प्रकाश भालेराव यांच्या हस्ते झाले. इंडिया कम्युनिटी सेंटरमध्ये झालेल्या या शानदार सोहळ्यात पानतावणे बोलत होते. स्वागताध्यक्ष संदीप देवकुळे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, महामंडळाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. दीड तासाच्या भाषणात पानतावणे यांनी मराठी साहित्याचा इतिहास, त्यातील विविध मतप्रवाह, परिवर्तन, चळवळी, ख्रिस्ती, ग्रामीण आणि दलित साहित्याचे योगदान, जागतिक पातळीवरील साहित्य आदी मुद्द्यांचा परामर्श घेतला.
े""जागतिक पातळीवरील नव्या सांस्कृतिक जीवनाचा शोध घेणारे साहित्य वाचताना मला नवा प्रत्यय येत गेला,'' असे सांगून पानतावणे म्हणाले, ""मनुष्यत्वाचा आणि सांस्कृतिक परिवर्तनाचा ध्यास घेणारे साहित्य जगभर निर्माण होत आहे. मराठी साहित्याने अखिल भारतीय आणि वैश्‍विक स्वप्न पाहिले पाहिजे. त्यासाठी भारतीय संवेदना आणि विश्‍वसंवेदना जाणून घेणे अपरिहार्य आहे. आधुनिक शास्त्रज्ञांची विश्‍वाकडे पाहण्याची दृष्टी बदलत आहे. मनुष्याचे मन समजल्याखेरीज आणि मनाच्या शक्तीचे परिमाण आणि मर्यादा जाणून घेतल्याखेरीज मनुष्याचे आकलन होणार नाही, असे भौतिक शास्त्रज्ञांचे मत बनले आहे. भौतिकशास्त्रज्ञ काय किंवा मानसशास्त्रज्ञ काय, ते मनुष्याच्या मनाकडे नव्या पद्धतीने पाहात आहेत. मराठी साहित्यिकांना हा दृष्टिकोन समजून घ्यावा लागेल.''
उद्‌घाटक भालेराव यांनी वीस मिनिटांच्या भाषणात मराठी साहित्यातील विविध प्रवाहांचा उल्लेख केला. ते म्हणाले, ""पन्नासच्या दशकानंतर महाराष्ट्राबाहेर पडलेल्या विशेषतः परदेशी भूमीवर उभ्या राहिलेल्या मराठी भाषक पिढीचे अधिकाधिक अनुभव साहित्यबद्ध झाले पाहिजेत. इंटरनेटसारख्या माध्यमात मराठी भाषा, मराठी साहित्य पसरायला हवे. मराठीची लिपी इंटरनेटवर सहज उपलब्ध कशी होईल, या सर्व बाबींचा प्राधान्याने विचार करायला हवा. जागतिकीकरणात केवळ सहभागी न होता, ते आपल्या इच्छेनुसार घडवून आणले पाहिजे.''
संमेलनाला झालेल्या विरोधाचा संदर्भ ठाले पाटील यांच्या भाषणात आला. ते म्हणाले, ""अमेरिकेत राहून हे संमेलन घेणाऱ्या तरुण पिढीला महाराष्ट्राने नाकारले, याचे दुःख वाटते. विरोध होऊनही ही पिढी खचली नाही, उलट धैर्याने उभी राहिली. खरेतर जे लोक परदेशात राहिल्यामुळे आपल्या मूळ संस्कृतीपासून, आपल्या भाषेपासून तुटत चालले आहेत, तेच आपली भाषा-संस्कृती जपण्याचे प्राणपणाने प्रयत्न करतात. हे संमेलन त्याचे प्रतीक आहे.''
परदेशात मराठी भाषा, संस्कृती रुजावी यासाठी महाराष्ट्र सरकारनेही मदत करण्याची मागणी त्यांनी केली. अमेरिकेत महाराष्ट्राच्या भाषा-संस्कृतीचे माहिती केंद्र सुरू करण्यासाठी महामंडळामार्फत सरकारकडे मागणी करू, असे त्यांनी सांगितले.
""इतिहास एकदाच घडतो आणि महाराष्ट्र मंडळ बे एरियाने तो घडविला आहे,'' असे स्वागताध्यक्ष देवकुळे यांनी सांगितले. ते म्हणाले, ""आम्ही साहित्यिक आहोत का, आम्हाला मराठी येते का, असे प्रश्‍न विरोधकांनी उपस्थित केले; पण आम्ही मराठी आहोत, हे ते विसरले. महाराष्ट्रातील, भारतातील, अमेरिकेतील आणि विविध देशांतील मराठी जनांची या सोहळ्याला उपस्थितीच त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे आहेत.''
आयोवाच्या सिनेटर स्वाती दांडेकर यांनी संमेलनाला शुभेच्छा देताना, ""अमेरिकेतील मराठी परिवाराने अशा उपक्रमातून आपण मराठी मातीशी बांधिलकी घट्ट असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे,'' असे सांगितले.
प्रख्यात निवेदक सुधीर गाडगीळ आणि बे एरियात स्थायिक असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री-निर्मात्या अश्‍विनी भावे यांनी उद्‌घाटन सोहळ्याचे खुमासदार सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांचा विशेष गौरव या वेळी करण्यात आला. संमेलनानिमित्त काढलेल्या "उद्‌घोष' मासिकाचे आणि विविध पुस्तकांचे प्रकाशन पानतावणे यांच्या हस्ते झाले.
इंडिया कम्युनिटी सेंटर सजले -
संमेलनानिमित्त इंडिया कम्युनिटी सेंटर सजविण्यात आले आहे. लेखणीची भलीमोठी प्रतिकृती दर्शनी भागात आहे. प्रवेशद्वाराजवळच संत ज्ञानेश्‍वरांचे भव्य छायाचित्र आहे. एक हजार प्रेक्षक क्षमतेच्या सभागृहात मराठी संतांची आणि लोकनायकांची छायाचित्रे लावली आहेत.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color