महालक्ष्मी
लेख़क Administrator   
       कोल्हापूरात सर्वोच्च स्थान या मातेला, महालक्ष्मीला व देवालयाला आहे. श्री महालक्ष्मीची आशीर्वादानेच श्री. शाहू छत्रपती व श्री राजाराम महाराजांच्यासारखे सुपुत्र जन्माला येऊन या शहराची वाढ व विकासाकरिता त्यांनी प्रयत्न केले. आजच्या शहराच्या सद्यस्थितीचा पाया श्री महालक्ष्मीच्या देवालयाने घातला. त्याच्या वाढीस महाराजांचे प्रयत्न कारणीभूत झाले. श्री महालक्ष्मीचे देवालय शहराच्या मध्यवस्तीत, जुन्या राजवाड्यानजीक आहे.
   भव्य व सुंदर हेमाडपंथी पद्धतीचे हे देवालय म्हणजे प्राचीन शिल्प कौशल्याचा उत्कृष्ट नमुना आहे. या देवालयाचा आकार ताऱ्यासारखा असून ते दोन मजली आहे. देवालयात श्री महालक्ष्मीखेरीज दक्षिणेला महासरस्वती, उत्तरेला महाकाली वरच्या मजल्यावर गणपतीच्या मूर्ती आहेत. या देवालयाला असंख्य खांब असून ते मोजता येत नाही असा भाविकांचा समज आहे. मुख्य देवालयासमोर एक प्रवेश मंडप आहे. याला गरूड मंडप असे म्हणतात. नवरात्रात येथे उत्सव साजरा केला जातो. इतर वेळी कीर्तन, प्रवचन, भजन, ग्रंथवाचन वा प्रदर्शनासाठी देखील याचा उपयोग केला जातो. महालक्ष्मीच्या भोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी असलेला मार्ग मंदिराच्या आतल्या बाजूसच असून अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे.
     मुख्य देवालयाच्या सुरवातीलाच प्रवेश करताना मुख्य मंडप लागतो. त्याच्या दोन्ही बाजूला भिंतीवर भरत आणि शत्रुघ्न यांच्या सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. पुढे गेल्यावर मणिमंडप लागतो. कलात्मक कोरीव काम आणि जय विजय या द्वारपालांच्या मूर्ती मनमोहक आहेत. मूळ स्थान म्हणजे देवीची स्थापना केलीली जागा; सन १७२२ पर्यंत श्री महालक्ष्मीची मूर्ती मुस्लिम हल्ल्यापासून बचाव करण्याकरिता म्हणून सुमारे दोनशे वर्षे झाकून ठेवण्यात आली होती.
    

मुख्य देवालयाच्या बाहेरील बाजूस चौसष्ट नृत्य करणाऱ्या योगिनी व इतर कोरीवकाम केलेले दिसते. श्री. महालक्ष्मी देवालयाच्या भोवती आवारामध्ये सर्व बाजूंना अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत. त्यामध्ये शेषशायी व नवगृह किंवा अष्टदिक्पाळ मंडप यांचा समावेश आहे. शेषशायीची मूर्ती तितकीशी आकर्षक नसली तरी त्या समोरील मंडपातील नाजुक व सुंदर कोरीव काम आणि जैन तीर्थंकर पाहण्यासारखे आहे. नवग्रह मंडप म्हणजे प्राचीन भारतीय शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना. या व्यतिरिक्त देवालयाच्या आवारातील लहान लहान मंदिरापैकी मुख्य म्हणजे दत्तात्रय, हरिहरेश्वर, मुक्तेश्वरी, विठोबा, काशीविश्वेश्वर, राम, राधाकृष्ण, शनी, तुळजाभवानी, महादेव इत्यादी मंदिरे.

श्री महालक्ष्मी देवालयात येण्यासाठी चार प्रवेशद्वारे आहेत. त्यापैकी मुख्य प्रवेशद्वार महाद्वार पश्चिमेला असून त्याच्यावर नगारखाना आहे. देवालयाच्या उत्तरेला काशी व मणिकर्णिका ही दोन तीर्थे आहेत. आवारात बाजूला दीपमाळांचा छोटा समूह असून दोन आधुनिक प्रकारची पाण्याची कारंजी आहेत. उत्तरेकडील प्रवेश द्वारावर एक मोठी घंटा वाजविली जाते. महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या व मोठ्या घंटांमध्ये या घंटेचा समावेश होतो. या घंटेचा निनाद चार पाच मैलाच्या परिसरात घुमतो.
दर पौष महिन्यामध्ये सायंसूर्यकिरणोत्सव साजरा केला जातो. या तीन दिवसाच्या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे सायंकाळी ठराविक वेळ सूर्यकिरण हे मंदिरात शिरुन श्री महालक्ष्मीचे मुखावर पडतात व काही वेळातच नाहीसे होतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुख्य देवालय व त्या समोरील गरुड मंडप दोन्ही मिळून महालक्ष्मीच्या मूर्तीसमोर सुमारे १५० फूट आच्छादित बांधकाम आहे. मंदिरा सभोवती व पश्चिमेला अनेक घरे आहेत. या तीन दिवसाखेरीज वर्षात केव्हाही देवीच्या मुखावर सूर्यकिरणे पडत नाहीत.

 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color