स्वागतकक्ष arrow मराठी साहित्य arrow लेख arrow पुन्हा एकदा कारगिल भाग-४
पुन्हा एकदा कारगिल भाग-४
लेख़क श्री. ल. गो. गोळे   
बाल्टाल येथून श्री अमरनाथला जवळच्या मार्गाने पूर्णपणे डोंगरकपारीतील आणि अतिशय अवघड का असेना पण वाट आहे असा तपास लागला. मग आम्ही ८-१० जण धाडसी वीर एके दिवशी ठरवून त्या दुर्गम मार्गाने चालत ५-६ तासांनी श्री अमरनाथ येथे पोहोचलो. जाता-येता अक्षरश: ओढ्यावरून (होय, ओढ्यावरूनच) गेलो-आलो. ओढ्यामध्ये पाण्याऐवजी बर्फच बर्फ होते. म्हणून वरून असे म्हटले आहे. श्री अमरनाथाच्या संपूर्ण मोठ्या, जवळजवळ ३ मी. उंचीच्या बर्फाच्या पिंडीचे दर्शन आम्हाला घडले. थोडावेळ विश्रांती घेतली आणि पुन्हा ५-६ तासांनी बाल्टाल येथे पोहोचलो. अत्यंत रोमहर्षक असा हा प्रसंग होता. साधारणपणे जुलै-नोव्हेंबर हा यात्रेचा काळ असतो, आणि तोही पहेलगाममार्गे. त्यामुळे आम्ही गेलो त्यावेळी तेथे आमच्याखेरीज चिटपाखरूही नव्हते, हे सांगणे न लगे !
ऑक्टोबरमध्ये बर्फ सुरू झाला. पाऊस पडताना छपरांमुळे, झाडाझुडपांमुळे आवाज तरी येतो पण बर्फ पडताना काहीही आवाज येत नाही. पिंजलेला कापूस पडावा त्याप्रमाणे भुरूभुरू बर्फ पडत असतो. त्यावेळी अतिशय आल्हाददायक वाटते आणि थंडी तर अजिबात वाजत नाही हे विशेष होय. मात्र बर्फ पडणे थांबले आणि थंड वारा वाहू लागला की मग मात्र कुत्रेही आपले हाल खात नाही. लोंबणारे अवयव, म्हणजे कानांची पाळी, नाकाचा शेंडा, हनुवटी, हातापायांची बोटे, इत्यादि अगदी बधीर होऊन जातात. हुडहुडी भरते. तापमान शून्याचे खाली किती जात असे कोण जाणे ! सरकारने पुरविलेले स्नोक्लोदिंग घालून दुपारच्या वेळी सुद्धा गुरगुटून झोपून जावे असे वाटते. पण असे झोपणे म्हणजे ह्या कडाक्याच्या थंडीवरचा उपाय नव्हे असे आम्हाला बजावले गेले, आणि जाणवलेही. अशा वेळी कामावर हिंडणे, मेहनतीची कामे करणे हाच उपाय असतो. अर्थात हे दिवसाचे वेळी शक्य असते, रात्री झोपच की !
एके चांदण्या रात्री मी व लेफ्टनंट कन्नल आमचे तंबूमध्ये स्नोक्लोदिंग घालून, गरम कपडे घालून, रजया पांघरून झोपलो होतो. अंगीठी (म्हणजे शेगडी) सुद्धा चालू होती. मध्यरात्री केंव्हातरी साधारण २-३ वाजता आम्हाला जाग आली. आणि पाहतो तो काय ! तंबूमध्ये लख्ख प्रकाश आणि कनातीमधून शिरलेला बर्फ सगळीकडे पसरलेला आहे असे दिसले. ताडकन् आम्ही उठलो अणि मुद्दाम बनविलेल्या काठ्यांचे साहाय्याने तंबूवरील बर्फ खाली ओढून अर्ध्या तासात काढून टाकला व निश्वास टाकला. बर्फाच्या वजनाने तंबू कोसण्याचा मोठा धोका असतो, म्हणून असे करणे अत्यंत जरूरीचे असते.
असेच एके दिवशी दुपारी आम्ही काम करीत असताना कमांडर, ले. कर्नल पुरी साहेब कारगिलहून बाल्टाल हेडक्वार्टर्सकडे पाहणी करीत येत होते. त्यांचे दुपारचे जेवण आमचे ऑफिसर्स मेसमध्ये आयोजित केले होते. नुकत्याच एका प्रसंगातून निभावल्याचे त्यांनी सांगितले. दरीत बर्फ साचून ओझे फार झाले म्हणजे बर्फाचा थिजलेला अतिमोठा भाग - कडा क्षणार्धात ओघळून घरंगळत खाली खोल दरीत कोसळतो; त्यास अव्हेलाँच (म्हणजे हिमपात) असे म्हणतात. एका ओढ्यावरून त्वांची जीप या बाजूला आली, आणि क्षणातच कडाडून मोठा आवाज झाला. कमांडरसाहेब मागे बघतात तो काय, रस्त्याचे वर - खाली आणि खुद्द रस्त्यावरसुद्धा बर्फाचे ढिगारे ! १० -१५ सेकंद त्वांना उशीर झाला असता तर, विचारसुद्धा करवला नाही. या प्रसंगातून सहीसलामत निभावल्याबद्दल सर्वांनी देवाची प्रार्थना केली आणि त्यांचे अभिनंदन केले.
असेच एकदा आमचे कंपनी कमांडर मेजर जयराम आणि मी कारगिलला जाऊन काम करून जीपने परत झुजिलाला आमचे युनिटकडे येत होतो. संध्याकाळ झाली आणि बर्फ पडणे सुरू झाले. उलट दिशेने एक मोठा ताफा- कॉन्व्हाय (कारवा) येत होता, तो बर्फामुळे अडकून पडला, रोड ब्लॉक झाला. आता रात्र झाली. शेवटी चालत जाण्याचे ठरवून २० -२५ कि. मी. चालत चालत अम्ही झुजिला येथे मध्यरात्रीनंतर येऊन पोहोचलो. सगळेजण काळजी करत, वाट पहात होते. आम्ही आल्यानंतर सर्वांनाच हायसे वाटले.
याच सुमारास आमचा मित्र पुसाळकर याला फ्रॉस्टबाईट झाली, आणि बिचार्‍याला श्रीनगरमधील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये रहावे लागले. तब्बल ४ -६ महिन्यानंतर तो बरा झाला. आता ऑक्टोबर १९६३ चा मध्य आला. सगळीकडे बर्फाचे ढीगच्या ढीग साचून राहिले. आणि रस्त्यावरील कामे अशक्य झाली. पुन्हा आमचे ५ बीआरटीएफ आणि अंतर्गत कंपन्या जवळजवळ १२०० - १३०० माणसांचा कारवा खाली आला. या हिवाळयात आम्हास उधमपूर - श्रीनगर या महामार्गावर रस्तारूदीकरण आणि बांधणी ही कामे देण्यात आली. एका दरीत रामबाण येथे ५ बीआरटीएफ स्थापन झाले, सर्व कंपन्याही स्थिरावल्या. आमचे ११७ युनिट चिनानी येथे स्थित झाले. याच सुमारास कमांडर ले. कर्नल पुरी हे बदलून गेले आणि त्यांचे जागी पुण्याचे ले. कर्नल मोडक हे आले. आमचे कंपनीचे मेजर मेनन बदलून जाऊन त्यांचे जागी मेजर जयराम येऊन दोनच महिने झाले होते.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color