स्वागतकक्ष arrow मराठी साहित्य arrow लेख arrow पुन्हा एकदा कारगिल भाग-३
पुन्हा एकदा कारगिल भाग-३
लेख़क श्री. ल. गो. गोळे   
आमचे कंपनीमध्ये कॅप्टन सुब्बाराव हे टूआयसी होते. म्हणजे मेजरसाहेब रजेवर गेले असता किंवा गरज भासल्यास टूआयसी हा ऑफिसर इन चार्ज म्हणून काम पहात असे. श्री. सुब्बाराव यांची थोड्याच दिवसात बदली झाली आणि ११७ कंपनीचा टूआयसी म्हणून माझी नेमणूक झाली. ते पद मी शेवटपर्यंत भूषविले. तसेच या कंपनीचा इन चार्ज म्हणून मी बरेच वेळा आणि बराच काळ कामही पाहिले. या काळात कोर्ट मार्शल चालविणेचा आणि गुन्हेगारास १४ दिवसपर्यंतची स.म.ची शिक्षा फर्माविण्याचा मला अधिकारही मिळत असे. सुदैवाने त्याचा वापर करणेची पाळी माझ्यावर कधीच आली नाही. त्या काळात युनिटप्रमुख म्हणून मी मानवंदना स्वीकारीत असे. दरबारही भरवावा लागत असे.
साधारण २-३ महिन्यातून एकदा कंपनीतील कर्मचार्‍यांची सभा होऊन त्यामध्ये मागील आढावा, पुढील कार्यरेषा, शिवाय इतर माहिती, तक्रारी निरसन, उपदेश इत्यादि सर्व असे. या सभेस दरबार असे म्हणत. जवळजवळ २०० जणांसमोर आणि त्यातील शे-दीडशे वयाने मोठ्या माणसांसमोर हा २६ वर्षाचा कॅप्टन (म्हणजे मी ) हिंदीतून भाषण करतो आहे, याचा मला संकोच होत असे.
आमचे कंपनीमध्ये इतर काहीजण म्हणजे लेफ्टनंट फिलिपोज, लेफ्टनंट कन्नल (हे नाव आहे), इंजिनिअर सुभेदार कर्निआल सिंग, सुभेदार रणभीर सिंग हे प्लॅटून कमांडर होते, कॅप्टन देवैय्या हा मेडिकल ऑफिसर होता, सुभेदार थापा , जमादार मेनन, हवालदार रंधावा हे देखरेख करीत असत. हवालदार नायर हे क्लार्क होता, तर चिन्नास्वामी, मुन्नुस्वामी हे ड्रायव्हर्स होते, रामसिंग, नैनसिंग हे ऑर्डरलीज होते आणि कितीतरी कुशल, अकुशल, उच्च दर्जाचे कारागीर होते. शेजारील कंपनीमधून मेजर वैकुंठम्, कॅप्टन चौधरी व साने (हे पुण्याचे ), तसेच लेफ्टनंट वर्मा, भारद्वाज आणि ५ टास्कफोर्समधील अडज्युटंट कॅप्टन मानसिंग इत्यादि नावे प्रामुख्याने आठवतात.
हिवाळा संपल्यावर, फेब्रुवारी १९६३ मध्ये ५ बीआरटीएफ आणि त्या अंतर्गत सर्व कन्स्ट्रक्शन कंपनीज, शिवाय मदतीला असणारी सर्व युनिटस्/डिटॅचमेंटस् अशी सर्वजण पुढील हिवाळा गाठेपर्यंत पठाणकोटहून रस्ताबांधणीचे मुख्य कामासाठी लडाखमध्ये गेलो. पठाणकोट, जम्मू, उधमपूर, कूद, बटोट, रामबण, बनिहाल टनेल (म्हणजेच सुप्रसिद्ध जवाहर बोगदा) करून श्रीनगरला पोहोचलो. येथे सुप्रसिद्ध दाल सरोवराचे काठी, रम्य ठिकाणी आमचे बीकन प्रोजेक्ट मुख्यालय होते. दालमध्ये हिंडणे, राहणे झाले. त्यास शिकारा म्हणतात. दोन दिवसांनी आम्ही पुढे सरकलो. तेथून ४०-५० कि.मी. वर सोनमार्ग आले. हां, येथून पुढे संरक्षित विभाग सुरू झाला. अशा विभागात जाण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक असते. नंतर आम्ही लडाखमध्ये सोनमार्ग-झुजिला-द्रास-कारगिल-लेह या सध्या गाजत असलेल्या मार्गावर आमच्या निरनिराळया कंपनीजना वाटुन दिलेल्या सेक्टर्समध्ये स्थिरावलो. वाटेने जाताना ठिकठिकाणी, खाली दरीत ढग व धुके आणि आपण विमानातून चाललो आहोत असा आभास करणारा देखावा असे. तसेच हुबेहुब आंबेमोहोर तांदुळाचे वासाप्रमाणे वासही येत असे. या दोन्ही गोष्टी मला अतिशय चित्तवेधक वाटल्या आणि आवडल्या. नंतर सुद्धा बरेच वेळा याचा सुखद अनुभव आम्हाला मिळाला.
आमचे ११७ कन्स्ट्रक्शन कंपनी युनिट झुजिला येथे स्थिरावले. ’ला’ म्हणजे उंचावरची खिंड. झुजिला ही खिंड साधारणपणे ४१०० मी. (१२-१३ हजार फूट) उंचीवर आहे. खाली एका दरीत सपाट जागी बाल्टाल (यालाच सध्या बटालिक असे संबोधलेले दिसते) येथे ५ बीआरटीएफ स्थापन झाले, आणि सर्व कामावर देखरेख करू लागले. रस्तारुंदीकरण-बांधणी ही कामे भराभर पण अतिशय व्यवस्थितरीत्या जोराने आणि जोमाने सुरू झाली. ८-१५ दिवसांनी एखादा दिवस सुट्टीचा दिसे. वर्क टू रूल नसे तर वर्क टू टाईम असे. आमच्या या रस्त्यापासून काही ठिकाणी, भारत-पाक सीमा अगदी २-५ कि.मी. अंतरावर होती. पण सर्वत्र हिमालयाचा उंचच उंच भाग दिसे. सुटीचे दिवशी एखादे वेळी आम्ही सोनमार्ग येथे जाऊन विश्रांती घेऊन, ताजेतवाने होऊन कामासाठी परत जात असू.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color