स्वागतकक्ष arrow मराठी साहित्य arrow लेख arrow पुन्हा एकदा कारगिल भाग-१
पुन्हा एकदा कारगिल भाग-१
लेख़क श्री. ल. गो. गोळे   
( कारगिल युद्धानंतर १९९९ मध्ये लिहिलेला लेख)
श्री. लक्ष्मण गोविंद गोळे , सांगली
कारगिल भागामध्ये ८ मे १९९९ रोजी घुसखोरी करून पाकने युद्धच मांडले. अर्थात त्याला चोख असे प्रत्युत्तर देऊन आपणास सन्मान्यरीत्या भारताने हे युद्ध अल्पावधीतच जिंकले. या कालावधीत द्रास, कारगिल या सतत गाजणार्‍या शब्दांनी ३५-३६ वर्षांपूर्वीच्या आठवणी माझ्या मनात घुमू लागल्या, रुंजी घालू लागल्या. होय, १९६२ ते १९६५ या कालावधींमध्ये त्या रस्त्यांवरच भारत सरकारचा ऑफिसर म्हणून `ग्रेफ' मधून मी प्रत्यक्ष काम केले आहे. म्हणून या आठवणी सांगणे अप्रस्तुत होणार नाही, असा विश्वास वाटतो. शिवाय श्री. प्रभाकर पेंढारकरांच्या रारंग ढंग या पुस्तकानेही मला प्रेरणा दिली.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर उत्तरेकडील सीमांपलिकडील पाक व चीन या संभाव्य शत्रूंचा धोका ओळखून भारत सरकारने १९६० मध्येच सीमा रस्ते बांधणी विभाग सुरू केला. आणि ग्रेफची उभारणी केली. काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, नेपाळ, सिक्कीम, भूतान, अरूणाचल प्रदेश इत्यादि सर्वच क्षेत्रांमध्ये ताबडतोब सीमा रस्ते बांधणीकाम जोमाने प्रत्यक्ष सुरू झाले. १९६२ मध्ये चीनने चढाई सुरू केलेली, आणि ते १९६२ सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये संपलेही. मात्र या घटनेने बॉर्डर रोडस् व ग्रेफ यांची आवश्यकता प्रकर्षाने जाणवली व महत्वही वाढले. जर हे काम १९५० मध्य्रेच केले गेले असते तर चीनने चढाईच केली नसती.
या लेखामध्ये रँक्सचा उल्लेख वारंवार करावा लागला आहे म्हणून त्यंची थोडक्यात माहिती देत आहे. चढत्या क्रमाने रँक्स अशा - सेकंड लेफ्टनंट, लेफ्टनंट, कॅप्टन, मेजर, लेफ्टनंट कर्नल, कर्नल, ब्रिगेडियर, मेजर जनरल, लेफ्टनंट जनरल, जनरल. लेख वाचताना या माहितीचा उपयोग नक्कीच होईल.
आता आपण ग्रेफची रचना पाहूया. ग्रेफच्या सर्वश्रेष्ठ अधिकार्‍यास डायरेक्टर जनरल बॉर्डर रोडस्‌ (डी. जी. बी. आर.) म्हणतात. आणि त्यांचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. आमच्या वेळी मेजर जनरल हॆ अधिकारी असत. त्यावेळी मे. जनरल आर्. ए. लूम्बा हे होते. आता ही जागा अपग्रेड झाली असून लेफ्टनंट जनरल मोदकाय हे पद सांभाळतात. त्यांचे लगतचे ऑफिसर म्हणजे एडीजीबीआर. तीही जागा अलिकडेच आस्तित्वात आली असून मे. जनरल बन्सीलाल तिकू हे ती जागा भूषवीत आहेत. हे श्री. तिकूसाहेब आणि मी वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज, सांगली येथे एकाच वर्गात शिकत होतो आणि जून १९६१ मध्ये एकत्रच बी. ई. सिव्हिल पास झालो. त्यांची व माझी गाठ लडाखमध्ये पडली.
त्यावेळी आम्ही दाघेही ग्रेफमध्ये कॅप्टन रँकला होतो. त्यानंतर ३५ वर्षानंतर २-५-१९९८ रोजी वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज, सांगली येथे ब्रिज (पूल) सेमिनारमध्ये आम्ही प्रत्यक्ष भेटलो, आणि आमच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. त्यांचेबरोबर कमांडर सूरजप्रकाश हेही होते. त्याच दिवशी या व्हीआयपीनी सांगलीला आमचे घरी भेट दिली. सूरजप्रकाश हे सध्या नवी मुंबई येथे ७४९ बॉर्डर रोडस्‌ टास्क फोर्स कमांडर आहेत. आम्हा गोळे कुटुंबीय मंडळींना तेथे दि. १६/१२/१९९८ रोजी भेट देण्याची सुसंधी मिळाली.
त्यांचे हाताखाली प्रोजेक्टस् म्हणून विभाग आहेत. त्यांची नावेही मोठी सुरेख आहेत. बीकन प्रोजेक्ट (लडाख), दीपक (हिमाचल प्रदेश), स्वस्तिक (सिक्कीम), दंतक (भूतान) तर वर्तक,सेवक, पुष्पक ही प्रोजेक्टस् इशान्य भागातील सीमांवर आणि चेतक हे राजस्थान सीमेवर स्थित आहे. अशी एकूण १३ प्रोजेक्टस् आहेत. ब्रिगेडियर हा प्रत्येक प्रोजेक्टचा प्रमुख असतो. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये ३ ते ६ टास्क फोर्स कमांडस्‌ असतात. त्यांचा प्रमुख लेफ्टनंट कर्नल रँकचा ऑफिसर असून त्यास टास्क फोर्स कमांडर किंवा नुसतेच कमांडर असे म्हणतात, प्रत्येकामध्ये ३ ते ६ कन्स्ट्रक्शन कंपनीज असतात. मेजर ग्रेडचा अधिकारी कंपनी युनिटचा प्रमुख असतो. त्यास कंपनी कमांडर असे म्हणतात. सध्या काहींचे रूपांतर रॊद मेंटेनन्स कंपनीज किंवा तत्सम कंपनीमध्ये झालेले आहे. प्रत्येक कंपनीमध्ये ३ ते ६ प्लॅटून्स असतात. कॅप्टन किंवा लेफ्टनंट हा प्लॅटून कमांडर असतो. मी असाच एक प्लॅटून कमांडर आणि बरेच वेळा आमच्या ११७ कन्स्ट्रक्शन कंपनीचा टू. आय. सी. (सहकमांडर) म्हणून होतो.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color