मस्त मज्जा माडी भाग - १
लेख़क वैभव मालसे   
----------------------------------------- वैभव मालसे, बंगलोर
बँगलोर मध्ये आलो याची खूण आहे, एखाद्यातरी रेडीओ चँनेलवर 'मस्त मज्जा माडी' हे ऐकू आलच पाहिजे. तब्बल २ वर्षांनी मी बँगलोरला परतताना मनामध्ये खूप आनंद होता. इतक्या दिवसांनी सुध्दा बर्‍याचश्या गोष्टी जशा च्या तशा होत्या. ए.सी. डब्यातून बाहेर येत होतो की, लाल हमालांनी अंगावर हल्ला केला . पण या वेळी मी सावध होतो. म्हणून आधीच सामान उचलून चालू लागलो.मागच्याखेपेला दहा पावलं चालायची होती , त्या साठी ८० रुपये मोजले होते.
बाहेर आलो , प्रिपेड रिक्शाच्या रांगेत उभा राहीलो.'आमच्या' पुण्यामध्येपण आहे ही सेवा.पण शेवटचं आठवतं तेव्हा मी स्वारगेट बस स्थानकावर होतो, आणि प्रिपेड सेवा उपलब्ध नसल्याचं कारण सांगण्यात आलं होता की 'कँपुटर बंद आहे'येथुन माझं मन पुणे आणि बँगलोर मधील फरक शोधण्यात गुंतलं होतं.
भिकारी हे रेल्वेचे खास आकर्षण, त्या लोकाना इथून हलवल्यास रेलवे कर्मचार्‍यांना बहुदा तुरुंगात डांबत असावेत , असो, तर इथे भिकारी 'मिसिंग' होते , भिकारी कधीच संपावर गेल्याचं ऐकलं नाही. बहुदा त्यादिवशी ते संपावर गेले असावेत असा मी अंदाज केला. ( पुण्यातील भिकारी कधीच संपावर जात नाहीत ) तेवढ्यात प्लँटफाँर्मवर थोडा केर राहिल्याबद्दल एक माणूस (बहुदा अधिकारी असावा) एका बाईला ओरडत होता. आणि कोणालाही आश्चर्याचा धक्का बसेल, ती बाई निमुटपणे काम करत होती. आमच्याकडे असा कोणी अधिकारी ओरडला तर बायका 'वस्स..' करून अंगावर येतात.असो प्लँटफाँर्म एकुणच खुप स्वच्छ वाटत होता.
रांग पुढे जात होती आणि माझा नंबर आला,खिडकी जवळ आलो पाहतो तर,कुपन देणारा माणुस चक्क तरुण होता,अजुन एक आश्चर्य. आमच्याकडे ही असली कामं करण्यासाठी मी फक्त 'वयस्क' व्यक्ती पाहिलेल्या आहेत,कदाचीत त्यामुळेच मला त्याच्या कपाळावर आठ्या दिसल्या नाहीत आणि माझ्यावर जराही न खेकसता मला 'कुपन' मिळालं.आणि रिक्शत बसल्या बसल्या मी दिवसभर काय करायचं त्याचं 'प्लँनिंग' सुरू केलं. बँगलोरची हवा एकूणच थंड, त्यात भर म्हणून हलका वारा पण असतो. त्यामुळे वारा थोडा झोंबत होता. सकाळची वेळ असल्यामुळे 'प्रदुषणा'चे प्रमाण जरा कमी, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि मंद वारा यामुळे खुप छान वाटत होतं , दारं नसलेल्या रिक्शामधून फिरताना. बँगलोरच्या प्रदुषणा बद्दल बरच काही वाचलं आणि ऐकलं होतं, पण सकाळच्या वेळी तसं काहीच जाणवलं नाही.
'पब्लिक प्लँटफाँर्म' ही एक गोष्ट मला येथे पहावयास मिळाली, विषेश म्हणजे त्याचा उपयोग 'आम जनता'च करत होती.हसू नका , पण ही म्हणजे एका पुणेकराला आश्चर्याचा धक्का देणारी गोष्ट आहे आमच्या पुण्यामध्ये याचा उपयोग चहा वाले , अंडा-भुर्जि वाले , पानपट्टी वाले , रात्रीच्यावेळी रिक्शावाले, भिकारी ,आणि पि.एम्.सी चे वापराचे सामान ठेवणे -याच काही महत्वाच्या कामासाठी केला जातो. लोक, इतर गाड्यांना काही त्रास न होवु देता , रस्त्याचा वापर करतात. आधुनिक पुणेकराला अजुन आपल्या हक्काची जाणीव झालेली नाही आहे, ही चिंतेची बाब आहे, तो दिवस दूर नाही जेव्हा पुणेकर 'पब्लिक प्लँटफाँर्म' वरून चालतील, आणि पुणे गाडामुक्त संस्क्रुतीमध्ये जगत असेल. (टाळ्या ..)
बंगलोर मध्ये मला सर्वात काय आवडत असेल तर इथले भले मोठे वृक्ष.रस्त्याच्या दोहो बाजुंनी हिरवी झाडं गार सावली देतात. यातील काही वृक्ष तर १०० वर्षापूर्वीचे आहेत म्हणे.एकूणच महानगर पालिका झाडांची काळजी घेते हे बंगलोर मध्ये पाउल ठेवता क्षणीच कोणाच्याही लक्षात येइल. अशा प्रकारचे वृक्ष पुण्यामधे 'सिंहगड' रोड वर होते एकेकाळी. तो रस्ता जेव्हा सिमेंटचा केला तेव्हा सर्व वृक्ष तोडण्यात आले, लोकानी आनंद व्यक्त केला , कारण त्यांचा खूप वेळ वाचणार होता, त्या रस्ता रुंदिकरणमुळे.पण ज्या भागातील वृक्ष तोडले गेले तेथे रहाणार्‍या लोकाना घराचं घरपण गेल्यासारखं वाटत होतं.बरेच जण आजही डोळ्यातून पाणी काढतात, त्या वृक्षांचा विषय काढला की.सुदैवाने वृक्ष 'वट' वृक्ष असल्यामुळे त्यांचे परत रोपण केले. त्यातील किती जिवंत आहेत, त्याची कल्पना नाहीपुणे महानगर पालिकेला 'वृक्षांचं' महत्व अजुनही कळालेलं नाही, वृक्ष पाहिला की कदाचीत त्याना 'वखार' दिसते...ज्या गतीने पुण्यामधील वृक्ष तोडले गेले , त्यावरून हेच विधान योग्य वाटते.
मी बँगलोरच्या वृक्ष सौंदर्याचा आनंद घेत होतो आणि रिक्शावाला शक्य तेवढ्या ज्यास्त वेगाने रिक्शा चालवत होता.रिक्शावाले सगळीकडे सारखेच असतात , बंगलोरचे अधिक वाईट आहेत कारण ते हिंदी ला किम्मत देत नाहीत. आपण जरी हिंदी मध्ये बोललो तरी उत्तर 'कन्नड' मधूनच मिळातं.ज्याला हावा तो अर्थ, त्याने लावावा. पण आधुनिक संस्क्रुती मध्ये आपण 'आंग्ल' शब्दांचा वापर आधीक करत असल्यामुळे, 'लेफ्ट' , 'राइट' , 'स्टाँप', 'स्ट्रेट' आणि इतर काही शब्द एकदम 'काँमन' झाले आहेत, त्यामुळे आयुष्य थोड'ईझी' झालं आहे.रिक्शावाला विचारतो "स्ट्रेट जाना?" आपण फक्त "हा" म्हणायचं.
बँगलोर मध्ये 'सि.एन्. जी' वापरणं बंधनकाराक नाही, तरी सुद्धा बर्‍याच रिक्शा 'सि.एन्.जी' वापरतात. मला वाटतं सर्व मुख्य शहरांमध्ये 'सि.एन्. जी' वापरणं बंधनकारक केलं पाहिजे, तरच येथील प्रदुषण आटोक्यात राहील.पुण्यांध्ये काही दिवसापूर्वी, १५ वर्षापेक्षा जुन्या रिक्शांना 'सि.एन्.जी' बंधनकारक केलं होतं. ते आमलात आणेपर्यंत आणखी ५ वर्ष जातील. प्रदुषण 'जैसे थे' ... सरकार डोळे मिटून आणि 'ए.सी.' मध्ये बसून सर्व काही योग्य प्रकारे 'मँनेज' करत आहे.लोक नेहमी प्रमाणे २-४ दिवस मोठा आवाज करतात , 'सकाळ' चघळतात, आणि काही दिवसांनी 'युजलेस फेलोज' असं मनामध्येच पुटपुटतं शांत होतात. जे कोणी यासाठी दिवस रात्र काम करतात त्यांच्या फायली कात्रणाने भरून पुन्हा एकदा त्याच कोनाड्यमध्ये लपुन बसतात.
बँगलोरमध्ये पत्ता शोधणं म्हणजे एक कसरत आहे, तुमचा पत्ता , आधी म्हटल्या प्रमाणे , जर 'लेफ्ट' , 'राइट' , 'स्ट्रेट' , या मापात बसला तर तुम्ही नशिबवान, नाहीतर खिशाला 'फाळ'.पुण्यापेक्षा रिक्शा थोडी महाग आहे आणि माझ्यामाहिती प्रमाणे 'फसवणूक' सुद्धा . येथे तुमच्याकडे सामान असणं याला रिक्शावाले 'गुन्हा' मानत असावेत, कारण तुमच्याकडे एक पिशवी जरी असली तरी ते 'लगेज चार्ज' मागतात. पण पुण्यामध्ये रिक्शावाल्याशी भांडणाची सवय असल्यामुळे इथे फार कठीण गेलं नाही.'टेन रुपिज एक्ट्रा दुंगा' असं मोठ्या आवाजात म्हटलं, की काम होतं. तसे बँगलोर वासीय मुळात साधे सरळ लोक.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color