स्वागतकक्ष arrow मराठी साहित्य arrow लेख arrow मराठी साहित्यिक व लेखनव्यवसाय
मराठी साहित्यिक व लेखनव्यवसाय
लेख़क Administrator   
...............................डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली
या जानेवारीत सांगलीत मराठी साहित्य संमेलन भरले होते. त्यावेळी काही साहित्यिकांना आपण इतर सामान्य लोकांपेक्षा वेगळे वा श्रेष्ठ आहोत असे वाटत असावे अशी शंका आली. माझ्यामते साहित्य म्हणजे लिखित स्वरुपातील माहिती. कोणताही माणूस जे लिहितो ते साहित्यच असते कारण तो आपले विचार व आपल्या भावनांना स्थायी स्वरूप देत असतो. तसे पाहता सर्वच लोक साहित्यिक असतात. आपण पाहतो की साध्या संवादात सामान्य माणूसही अतिशय मार्मिक, अर्थवाही बोलतो. मात्र ते लिहिले जात नाही. सतत लिहिण्याची सवय असणारा व लिहिलेले सर्वांसाठी प्रसिद्ध करणारा तो साहित्यिक अशी व्याख्या करणे अधिक योग्य ठरेल.
नुकतेच वैशाली हळदणकर यांनी लिहिलेल्या ’बारबाला’ या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले त्यावेळी सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक महेश भट यांनी याच स्वरुपाचे आपले विचार व्यक्त केले होते. "लेखन ही कुणाची जहागिरी नाही. तेव्हा ज्याच्याकडे शब्दभांडार आहे किंवा ज्याला लिहिता येते त्यानेच लिहिले पाहिजे असे नाही. तर जो जगतोय, जो अनुभवतोय, तो लिहू शकतो आणि जेव्हा अशी पुस्तके लिहिली जातात तेव्हाच त्यात जीवनाचा अस्सल गंध अनुभवता येतो" असे विचार यांनी व्यक्त केले.
फार वर्षांपूर्वी मी आणि माझा मित्र शिराळकर सांगलीतील प्रसिद्ध हिंदुत्ववादी नेते कै. का. भा लिमये यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी आम्हाला सतत लिहित रहा असा संदेश दिला होता याची आठवण झाली. ते म्हणाले ’माझ्यापेक्षाही माझा एक मित्र छ्त्रे माझ्यापेक्षाही खूप बहुश्रुत व हुशार होता. मात्र त्याला लिहिण्याचा कंटाळा होता. दुर्दैवाने त्याचे ऎन उमेदीत निधन झाले. त्याच्याबरोबर त्याची सारी विद्वत्ताही नाहिशी झाली. आज त्याचे नाव कोणालाही माहीत नाही. मात्र मी लिहीत असल्याने लोक मलाच मॊठा विचारवंत मानतात.’
आज ब्लॉगच्या सोयीमुळे कोणीही आपले विचार सहज प्रसिद्ध करू शकतो. ’दिसामाजी काहीतरी ते लिहावे’ हा संत रामदासांचा उपदेश प्रत्येकाने मानला तर अमाप साहित्याची निर्मिती होईल. शिवाय लिहिणार्‍याला साहित्यिक असा मान मिळेल. पण यापेक्षा महत्वाचे म्हणजे त्याच्या साहित्यामुळे त्याचे व्यक्तिमत्व चिरंतन होईल.

भारतातील लेखनव्यवसाय
भारतात अजून साहित्य लेखनाला फारसे महत्व दिले जात नाही. नवोदित लेखकाला चांगली कथा, कविता वा अन्य लेखाच्या प्रसिद्धीसाठी प्रकाशकांची मनधरणी करावी लागते. सर्व हक्क विकूनदेखील लेखकाच्या हातात पानाला ३० ते ५० रुपये एवढे कमी मानधन मिळते. हौसेपोटी स्वत:ची पदरमोड करून एखाद्या लेखकाने स्वखर्चाने पुस्तक प्रसिद्ध केले तरी त्याला ते पुस्तक विकणे दुरापास्त होते. भेटीदाखल पुस्तके वाटून लेखकाला आपली हौस भागवावी लागते. त्यामुळे लेखन हा व्यवसाय म्हणून कोणी स्वीकारू शकत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठॆत मात्र लेखनाला फार महत्व आहे व चांगल्या लेखकाला आपल्याकडल्यासारखी केवळ प्रसिद्धी व मान न मिळता उत्तम धनप्राप्ती होऊ शकते. सध्या इंग्रजी शिक्षण पहिलीपासून देण्यास सुरुवात झाली आहे. इंग्रजीत प्राविण्य मिळविल्यास आज इंजिनिअर वा वैद्यकीय पदवीधारकांना जे महत्व आहे तेवढेच महत्व इंग्रजीत लेखन व्यवसाय करणार्‍यास मिळू शकेल. मग अशा विद्यार्थ्यांनाही परदेशात मागणी येईल. भारतात इंग्रजी साहित्याचे भारतीय भाषेत भाषांतर करण्यास भरपूर वाव आहे. कारण बहुराष्ट्रीय व भारतातील मोठ्य़ा उद्योगांना त्यांच्या उत्पादनांची स्थानिक भाषेत जाहिरात करण्यास, माहितीपत्रके व नियमपुस्तके बनविण्यासाठी भाषांतरकारांची गरज लागते. भारतातील जे उद्योग व व्यवसाय आतापर्यंत स्थानिक बाजारपेठेवर अवलंबून होते त्यांना या श्रीमंत स्पर्धकांपासून धोका निर्माण झाला आहे. त्यावर मात करण्यासाठी त्यांना आपल्या उत्पादनांच्या दर्जात व सेवेत सुधारणा कराव्या लागतील. पण त्याबरोबरच परराज्यातील व परदेशातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी इंग्रजीचा आधार घेण्याची आवश्यकता आहे. स्थानिक उत्पादने व व्यवसाय यांच्या माहितीचे इंग्रजीत भाषांतर करण्यास यामुळे प्रोत्साहन मिळून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळविणे येथील उद्योगांना शक्य होईल. आज भारतीय भाषेतील लेखक अनेक असले तरी इंग्रजीत लेखन करणार्‍या व्यक्ती हाताच्या बोटावर मोजण्याइतपत कमी आहेत. ही स्थिती बदलणे जरूर आहे.

लेखन व्यवसाय- आंतरराष्ट्रीय स्थिती
१. भाषांतराचा दर आंतराष्ट्रीय बाजारपेठेत शब्दाला ३ ते ५ रुपये आहे.
२. व्यावसायिक लेखक व भाषांतरकार तासाला ३० ते ६५ डॉलर (सुमारे १२०० ते २५०० रु.) एवढी फी आकारतात.
३. एका फुलस्केप पानातील मजकुराचे भाषांतर करण्यास २५० डॉलर फी आकारली जाते.
४. जाहिरातीतील मजकुरासाठी यापेक्षा कितीतरी जास्त पैसे देण्यास व्यावसायिक तयार असतात.
५. ’घोष्ट रायटींग’ म्हणजे दुसर्‍याच्या ( नेते, उद्योगपती इत्यादी ) नावावर लिहिणे, यामध्येही मानधन खूप जास्त असते.
५. वर्तमानपत्रे, मासिके, वेबसाईट, पुस्तके प्रकाशित करणार्‍या व्यावसायिकांना भाषांतरकारांची गरज लागते.

भाषांतर - गरज व व्यवसाय संधी
मराठीतील अपार साहित्यसंपदा जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी त्याचे अन्य भाषांत भाषांतर वा रुपांतर होणे आवश्यक आहे. महाराष्ट्राबाहेर राहणारे मराठी बांधव हे कार्य अधिक सुलभतेने करू शकतील कारण त्यांना मराठी साहित्याची जाण असतेच शिवाय स्थानिक भाषा व तिची वैशिष्ठ्ये माहीत असतात. असे भाषांतर मोठ्या प्रमाणावर झाले तर मराठी साहित्य सर्वदूर पोहोचेल व त्याचा येथील साहित्यिकांना फायदा होईल. मराठी साहित्य अधिक समृद्ध होण्यासाठी इतर भाषांतील साहित्याचे मराठीत भाषांतर वा रुपांतर करणे तर महाराष्ट्राबाहेर राहणार्‍या मराठी बांधवांना अधिक सोपे जाईल. युनिकोड अक्षरसंच वापरून संगणकावर मराठी मजकूर लिहिणे सोपे झाल्याने आज इंटरनेटवर फार मोठ्या प्रमाणावर लोक आपले विचार मराठीतून व्यक्त करू लागले आहेत. निश्चित योजना व योग्य व्यासपीठ मिळाले तर केवळ अभिप्राय, गप्पा वा चर्चा एवढ्यापुरताच याचा उपयोग न राहता त्यायोगे मराठी साहित्यात लाची भर पडू शकेल. महाराष्ट्राबाहेर राहणार्‍या मराठी लोकांचे सक्रीय सहकार्य मिळाले तर ते त्यांच्यासकट सर्वांनाच लाभदायक ठरेल.
या कार्याला व्यावसायिक संदर्भही आहे. आज जागतिकीकरणामुळे जाहिरात व प्रसारमाध्यमांसाठी मराठीत लेखन व भाषांतर करण्याची गरज वाढली आहे. महिला, विद्यार्थी व शिक्षकांना याद्वारे आर्थिक लाभ मिळविण्याच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगात मराठी साहित्य व उद्योग यांच्या प्रगतीसाठी मराठीचे इंग्रजीमध्ये भाषांतर करण्याचा व्यवसाय वृद्धींगत होण्याची गरज आहे.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color