माय मराठीची हाक
लेख़क Administrator   
      

'माय मराठीची हाक' या नावाचे एक पुस्तक नुकतेच प्रसिध्द झाले आहे. त्यामध्ये मराठी भाषेसंबंधीचे लेखक श्री. प्र. ग. सहस्त्रबुध्दे यांचे विचार खाली दिले आहेत.

'माय इंग्लिश बुक वन' वर खूप काही लिहिता येण्यासारखे आहे. पृष्ठसंख्या ७४ आहे आणि पुस्तकाची किंमत दहा रुपये आहे. ग्रामीण जनांच्या दृष्टीने ती अधिक आहे. जवळजवळ एक हजार शब्द शिकवण्याचा प्रयत्न या पुस्तकाद्वारे करण्यात आला आहे. मुलांच्या कोवळेपणाचा विचार न करता ही संख्या वाढवली आहे. त्यातही नाम, क्रियापद, विशेषणे, सर्वनामे अशी काही साखळी साधलेली नाही. उच्चाराच्या दृष्टीने, स्वरांच्या दृष्टीनेही नीट संगती लावलेली नाही. पुस्तकाची रचना शास्त्रशुध्द व क्रमबध्द नाही असे मोठ्या खेदाने म्हणावे लागते. या पुस्तकातील लहान मोठे असे अनेक दोष दाखविता येतील. पण पुढील दोन कविता सर्वात अधिक विचारणीय आहेत. शिक्षकांना, मुख्याध्यापकांना, शिक्षणसंस्थांच्या संचालकांना, शिक्षणाधिकाऱ्यांना, शिक्षणमंत्र्यांना, 'माय इंग्लिश बुक वन' च्या संपादकांना माझा सवाल आहे की पुढील दोन कवितात शिकवण्यासारखे काय आहे? हे त्यांनी मला समजावून सांगावे. मला म्हणजे, पालकांना आणि महाराष्ट्रातील सामान्य जनतेला समजावून सांगावे. ह्या कविता नेमण्यामागील हेतू काय आहे ? याचा उलगडा त्यांनी करावा. सध्या सगळीकडे बालमानसशास्त्राची खूप चर्चा होत असते. शिक्षण शास्त्रातील तो एक महत्वाचा अभ्यासाचा विषय मानला जातो. तरी त्या दृष्टीनेही या दोन कवितांचा विचार व्हावा.
एक कविता आहे, तीत पितापुत्रांचे संभाषण आहे. वर लिहिले आहे, 'लिसन अँड अँक्ट'. कविता अशी आहे :-

जानी जानी यस पप्पा
ईटिंग शुगर? नो पप्पा
टेलिंग लाईज? नो पप्पा
ओपन युअर माउथ हा,हा,हा !

या कवितेचा अर्थ असा आहे - 'बाळया तू साखर खाल्लीस का ?' 'नाही बाबा !' 'बाळया तू खोटे बोलतोस का ?' 'नाही बाबा !' तोंड उघड पाहू, आ कर पाहू' बाळया हसतो हा ! हा ! हा !
या कविताचा सरळ अर्थ हा आहे की मुलांनी चोरी करावी आणि खोटे बोलावे, ती एक प्रकारची गंमतच आहे. पूर्वी एक कविता शिकवली जात असे-

चोरी कधी करु नये, खोटे कधी बोलू नये ।।
गोड फार खाऊ नये, कोणासंगे भांडू नये ।।
चित्ती धरी जो हे बोल, त्याचे कल्याण होईल !

जणू काही ह्या कवितेचा सूड उगवण्यासाठी 'जानी जानी यस पप्पा' ही कविता या पुस्तकात घालण्यात आली आहे. बालमानस शास्त्रज्ञांनी या कवितेवर अवश्य भाष्य करावे.

दुसरी एक कविता आहे. तिच्याही वर लिहिले आहे, 'लिसन अँड अँक्ट' ती पुढील प्रमाणे आहे

'लेझी मेरी, वुइल यू गेट अप '
वुइल यू गेट अप वुइल यू गेट अप टुडे ?'

नो, नो, मदर, आय वोन्ट गेट अप,
आय वोन्ट गेट अप, आय वोन्ट गेट अप टुडे'

या कवितेत शिक्षकांनी काय शिकवायचे ? आणि मुलांनी त्यापासून काय बोध घ्यायचा ? तुम्ही मूर्खासारख्या
'उठ गोपाळजी, जाई धेनूकडे। पाहती सवंगडे वाट तूझी'
अशा कविता शिकवता काय ? तुम्ही घरोघरी
'घन:श्याम सुंदरा श्रीधरा ! अरूणोदय झाला । उठि लवकर वनमाळी उदयाचळी मित्र आला !' अशा कविता मुलांच्या कानावर घालता काय ?
'उठा उठा हो सकळीक, वाचे स्मरावा गजमुख ऋध्दी सिध्दीचा नायक, सुखदायक सकळासी ।।' अशा भूपाळया ऐकवता काय ? त्या सगळया गोष्टी वाईट आहेत मुलांना 'लेझी मेरी' शिकवा, ही भारताची सद्यस्थिती आहे आणि तेच भारताच्या भविष्याचे चित्र आहे. आम्हाला जागृत भारत नको आहे. झोपलेला दिवसभर झोपलेला, कायमचा झोपलेला भारत आम्हाला हवा आहे.
'अहो या कवितेच्या द्वारे नुसती भाषा किंवा शब्दोच्चार शिकवायचे आहेत अर्थाकडे कशाला लक्ष देता ?' असे कदाचित कोणी म्हणतील. यावेळी पूज्य विनोबाजींनी दिलेले एक उदाहरण आठवते. एका गणित शिक्षकाने मुलांना सांगितले, 'एका मुलाला त्याच्या आईने दोन आंबे दिले. त्याने लगेच आंब्याच्या टोपलीतून तीन आंबे चोरले आणि बहिणीच्या आंब्यापैकी एक चोरला. आता त्याच्याजवळ एकूण किती आंबे झाले? कोणीतरी म्हणेल हे बेरजेचे उदाहरण आहे.
पुढे विनोबा ठासून म्हणतात, 'नाही हे नुसते गणिताचे उदाहरण नसून चोरीचे उदाहरण आहे. चोरी शिकवणारे आणि चोरीला मान्यता देणारे, हे उदाहरण आहे. बेरीजच शिकवायची आहे तर आईने दोन दिले, भावाने एक दिला, वडिलांनी तीन दिले, बहिणीने एक दिला आता त्याच्याजवळ किती आंबे झाले? असे विचाराना! चोरले कशाला? सूक्ष्म विषकण खायला देण्यासारखे हे कुसंस्कार कशाला?

'माय इंग्लिश बुक वन' मधील साखरेची चोरी आणि लेझी मेरी ह्या कविता वाचून असेच अनेक प्रश्न डोक्यात उत्पन्न होतात. एकापेक्षा एक उत्तम शिक्षण शास्त्रज्ञांचे संपादक मंडळ असतांना ह्या कविता कशा निवडल्या गेल्या ?


श्री. प्र. ग. सहस्त्रबुध्दे
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color