पेंडसे चाळ
लेख़क Shubhangi Ranade   
  आमची पेंडसे चाळ म्हणजे भली मोठ्ठी होती. त्यात जुनी चाळ व नवी चाळ असे दोन भाग पाडलेले होते. म्हणजे जुनी चाळ दोन पाच वर्षे अगोदर बांधलेली होती एवढेच. तशी दोनही मिळून ‘पेंडसे चाळ’ म्हणूनच ओळखली जाई. चारही बाजूंनी बंदिस्त असलेल्या आमच्या चाळीतील जुन्या चाळीचा भाग फक्त दोन मजल्यांचाच होता. तर नवी चाळ उरलेल्या तीनही बाजूंनी प्रत्येकी तीन मजल्यांची होती. अशा चौकोनी चाळीत मधोमध भलेमोठे अंगण होते. त्याच्या एका बाजूला पाच फूट उंचीचा फरसबंद पाण्याचा हौद होता. त्याच्या निम्म्या उंचीवर बाहेरच्या चारही बाजूंनी पाण्याचे नळ होते. त्यामुळे तेथे धुण्याभांड्याची चांगली सोय होती. तसेच हौदात पाणी भरण्यासाठी म्हणून एक नळ होता. पाणी दररोज पहाटे पाच ते सकाळी आठ वाजेपर्यंत असायचे. तसेच संध्याकाळीही सात ते रात्री दहापर्यंत असायचे. त्यामुळे हौद दररोज ताज्या पाण्याने भरलेला असे. 

पाण्याच्या या हौदाची आणखी एक गंमतशीर आठवण आहे. दरवर्षी रंगपंचमीच्या आदल्या दिवशी चाळीतील आम्ही सर्व मुले मिळून हौदाची स्वच्छता करायचो. नंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी हौदात रंग केला जायचा. त्यामुळे मुले मनसोक्त रंग खेळण्याची मजा लुटायची व प्रेक्षकाची भूमिका करणार्‍या पालकांचीही मोठीच करमणूक व्हायची. रंगपंचमी संपल्यावर मात्र तो हौद परत स्वच्छ कोरडा करून चांगल्या पाण्याने भरण्याची जबाबदारी मुलांचीच असायची. 

चाळीत एक, दोन, तीन खोल्यांची अशी एकूण पंचेचाळीस बिर्‍हाडे होती. आणि गंमत म्हणजे पंचेचाळीस बिर्‍हाडांची लहान मोठी मिळून नव्वद मुले होती. सकाळच्या वेळी अंगणात खेळायला मुले आली की तळमजल्यावरची मंडळी म्हणत, ‘काय रे, काही अभ्यास वगैरे आहे का नाही तुम्हाला ? सकाळ झाली की आली लगेच खेळायला. चला जा आपापल्या घरी.’ मग एवढेसे तोंड करून मुले घरी जायची. सकाळची शाळा असलेली मुले दुपारच्या वेळी अंगणा त खेळायला जमायची. पुन्हा ही मंडळी रागावून म्हणायची, ‘काय रे मुलांनो, दुपारच्या वेळी काही विश्रांती घेऊ द्याल की नाही कुणाला ? जरा झोपू म्हटले थोडावेळ शांतपणे तर ते नाही. कटकट करायला आलात का ?’ संध्याकाळच्या वेळी थोडा वेळ खेळायला मिळायचे खरे. पण नंतर लगेच कोणीतरी म्हणायचे, ‘अरे, आत्ता पाहुणे आले आहेत घरी. तेव्हा जरा गप्पा मारू म्हटले तर तुमच्या कडकडाटामुळे धड बोललेले काही ऎकू सुद्धा येत नाही. जा. जरा बसके खेळ खेळा जा.’ असे प्रेमळ संवाद आम्हा मुलांचे अगदी तोंडपाठ झाले होते. 

आणि हो, खेळ म्हणाल तर अगदी सर्व प्रकारचे बरं का ! म्हणजे लंगडी, लपाछपी, दिसेल ते आऊट, डबा ऎसपैस, हुतुतु, जोडीसाखळी, शिवाशिवी आणि ती सुद्धा जिन्यावरची बरं का ! म्हणजे किती वेळा जिने चढायचे आणि उतरायचे त्याला काही मर्यादाच नाही !आमच्या नव्या चाळीत प्रत्येक बाजूला दोन दोन जिने होते. प्रत्येकी चौदा, पंधरा पायर्‍या असलेले. जिन्याच्या दोन्ही बाजूंना लोखंडी गज होते आजकालच्या रेलिंगसारखे. पण त्याच्या वरच्या बाजूला लोखंडी सळई नसून घराच्या उंबर्‍याप्रमाणे गुळगुळीत, जरा जाडसर व रुंद अशी भरीव पट्टी होती. त्यावरून कसरत करत घसरत खाली येणे ही मोठी मौजेची गोष्ट होती आम्हा मुलांसाठी. मुख्य म्हणजे घसरताना खाली पडू वगैरे भीती अजिबात वाटत नसे.

चाळीच्या एका बाजूला पाण्याचा हौद व त्याच्या शेजारीच भलेमोठ्ठे नारळचे झाड होते. पेरू, पारिजातक वगैरे झाडे पण त्याच्या सोबतीला होती. खरे म्हणजे ते नारळाचे झाड एका बिर्‍हाडकरूने लावले होते. ते मोठे होत होत तिसर्‍या मजल्याच्याही वर गेले होते. आणि ते बिर्‍हाडकरू सोडून गेल्याने नारळाच्या झाडाची मालकी आमच्या चाळीचे मालक डॉ. पेंडसे यांच्याकडे म्हणजे पर्यायाने चाळीकडेच आली होती. नारळाच्या झाडाची एक मोठी गंमत होती. तयार झालेले नारळ एकेक करून कधीही खाली पडत. दिवस-रात्र अशी त्यांना काही काळवेळ नसे. आणि विशेष म्हणजे खाली पडलेला नारळ ज्याला मिळे तो त्याचा मालक. तळमजल्यावरचे लोक किंवा हौदाभोवती धुणेभांडी करणार्‍या बायका यांनाच बहुदा नारळ मिळत असे. नारळ पडल्याचा आवाज सर्वांनाच यायचा. पण दुसर्‍या तिसर्‍या मजल्यावरच्या लोकांना जिने उतरून नारळापर्यंत पोहोचायला थोडा वेळ लागायचाच. अगदी क्वचित्‌ तसा योग यायचा. पण यावेळचा आनंद काही अवर्णनीयच असायचा. हळूहळू नारळ पडायला लागल्याची बातमी चाळीचे मालक डॉ. पेंडसे यांच्यापर्यंत पोहोचायची आणि एक दिचस ते नारळ उतरवून घ्यायला यायचे. नारळ उतरविणार्‍या त्या माणसाचे आम्हाला केवढे कौतुक ! माकडासारखे तो झाडावर भराभर चढायचा. कंबरेला कोयता, विळा खोचलेला असायचा. खरं म्हणजे त्याच्या पायाला नारळाच्या झाडाची खरखर लागत असेल. कारण आजच्यासारखे लोखंडी स्टँडवर पाय ठेवून झाडावर चढण्याची पद्धत तेव्हा नव्हती तर पायांनी झाडाला घट्ट पकडून तो सरसर चढत असे. त्या माणसाला किती खरचटत असेल हे तर खरेच.  पण आम्हा मुलांना मात्र भारी मज्जा वाटायची त्या प्रसंगाची एवढे खरे ! 

सुट्टीतले बसके खेळ ( म्हणजे घरातल्या घरात खेळण्याजोगे खेळ ) सुद्धा फारच गमतीचे व अगदी साधे होते. त्यासाठी कोणाचे घर किंवा अंगण लागायचे नाही तर कोणाच्याही घराबाहेरच्या गॅलरीत बसून खेळायचो आम्ही.  मग त्यात पत्ते, सागरगोटे, कवड्या, पट, सापशिडी, एकी का बेकी, काचापाणी, स्मरणशक्ती, पिकपिक, या आणि असल्या साध्यासुध्या ळांचा समावेश असे. पट नसला तरी फरशीवर खडूने आखून पट तयार करून खेळण्यात सुद्धा आम्ही समाधानी होतो. लाकडी हत्ती, घोडे, गाय, उंट हे पटाला लागणारे साहित्य कोणाकडून तरी मागून आणाण्यापेक्षा त्याऎवजी खडे, पाने, चिंचोके, पेन्सिल वा खडूचे तुकडे असे काहीही चालायचे आम्हाला ! समाधान हे मानण्यावर असते हे चाळीने शिकवले आम्हाला. दोरीवरच्या उड्या, ठिकरी, खांबखांब खांबोली यासारखे खेळही मोठ्ठा आनंद मिळवून देण्यास पुरेसे असत. 

प्रत्येक घराच्या समोर सामाईक गॅलरी होती. तिलाही पाच फूट उंचीचे लोखंडी गज व त्यावर लाकडी कठडा होता. केव्हाही कठड्याला टेकून उभे राहिले की तीन मजल्याची सर्व चाळ अथपासून इतिपर्यंत नजरेत यायची. चाळीचे प्रवेशद्वार म्हणजे दिंडी भलीमोठी होती. त्याला दरवाजा नव्हताच. त्यामुळे सायकली, रिक्षा, स्कूटर्स, इतकेच नव्हे तर चारचाकी वाहने सुद्धा सरळ अंगणात आत येऊ शकायची. एक सहज गंमत म्हणजे आमच्या चाळीत विद्यापीठात नोकरी करणार्‍या भागवत आण्णांची ‘फटफटी’ होती. फटफटी म्हणजे आजकालच्या बाईकसारखी होती. तिच्या ‘फटार्‌फट’ आवाजामुळे तिला असे नाव पडले असावे. त्यामुळे भागवत आण्णा नोकरीवर निघाले किंवा नोकरीवरून परत आल्याचा सुगावा आख्ख्या चाळीला लागायचा. रिक्षातून चाळीत कोणाकडे पाहुणे आले - गेले की प्रत्येकजण आपापल्या घरासमोरच्या गॅलरीतून त्यांच्याकडे वाकून बघत असे. त्यामुळे इतरांच्या नजरेतून सुटून कोणाकडे पाहुणे येणे शक्यच नसे. कोणीना कोणीतरी सारखे गॅलरीत उभे असेच. 

पहाटे चार वाजल्यापासून चाळीला जाग येत असे.  कोणाच्या तरी घराचे दार वाजले किंवा कोणाच्या घराची कडी वाजली हे आम्ही आपापल्या घरात बसून ओळखायचो.  कोण खोकले किंवा कोण शिंकले हे सुद्धा आमचे पाठ झाले होते. सकाळपासून दिवसभर दर पाचदहा मिनिटांनी फेरीवाले चाळीत यायचे. फुलवाले, फळवाले, भाजीवाले, रद्दीवाले, डबा-बादलीला बूड, पिपाला नळ बसवणारे, चाकू-सुरी-विळीला धार करणारे असे विविध प्रकारचे विक्रेते चाळीत येत असत. यांच्या जोडीला भिकारी टाकारी हे तर केव्हाही येत असत.  चाळीला दिंडी दरवाजा नसल्याने सर्वांना मुक्त प्रवेश असे. माकडवाले, अस्वलवाले दरवेशी, गारुडी, डोंबारी यांचे खेळही अधूनमधून चाळीत व्हायचे. अशा खेळ करणार्‍यांच्या भोवती लहान मुलांचा हमखास गराडा असायचा. तर मोठी माणसे आपापल्या गॅलरीतून वाकून बघत खेळाची मजा लुटायची.  हातचलाखी करणारे जादूगार आले म्हणजे तर फारच मजा यायची. हाताच्या मुठीत दगड घेऊन त्यावर जादूची कांडी फिरवून त्याचा रुपया करणार्‍या त्या जादूगाराचे आम्हाला मोठे कौतुक वाटत असे. अन्‌ आमच्या बालमनाला अश शंका येत असे की दगडाचे रुपये करणार्‍या या जादूगाराला घरोघरी जाऊन खेळ करून पैसे का मिळवावे लागतात ? नंतर हळूहळू समजू लागले की आपल्या सदर्‍याच्या बाहीत लपविलेला रुपया मोठ्ठ्या हुशारीने, हातचलाखीने काढून तो सर्वांकडून वाहवा मिळवीत असे. त्याने पुढे केलेल्या थाळीत चार आठ आणे कोणीकोणी टाकीत असत. तर दुसर्‍या कोणी दिलेल्या भाजी-भाकरीचा स्वीकारही तो आवडीने करीत असे. त्यावेळी दहा-वीस पैसे किंवा चार-आठ आण्यांनाही मोठी किंमत होती. आता तर एक, दोनच नव्हे तर पाच रुपयांच्या नोटाही व्यवहारातून गायब झालेल्या दिसतात. पैशाला काही किंमत उरली नाही. अर्थात्‌ पैशाशिवाय कोणाचेही काहीही चालत नाही हेही तितकेच खरे. पण करणार काय ? काळाचा महिमा दुसरे काय !             

चाळीत पाणी हा मोठा प्रश्न होता. अर्थात्‌ फक्त तिसर्‍या मजल्यावरच्या लोकांसाठीच हं ! कारण तळमजल्यावरच्या व दुसर्‍या मजल्यावरच्या प्रत्येक घरात म्युन्सिपालिटीचे पाणी यायचे. पण आम्ही तिसर्‍या मजल्यावर राहायचो. त्यातून आमची खोली सर्वात शेवटची होती. तेव्हा आम्हाला पाण्याचे दर्शन तसे जरा दुर्लभच होते. सुरुवातीस आम्ही अंगणातील हौदाजवळच्या सार्वजनिक नळावरून पाणी भरायचो. पण एका नळाचे पाणी पुरेसे व्हायचे नाही. तेव्हा त्याच्या जोडीला तळमजल्यावरील सार्वजनिक बाथरुममधूनही पाणी भरावे लागे. आम्ही बहिणभाऊ दोघे मिळून पाणी भरायचो. खांद्यावर घागर व हातात बादली अशा थाटात अंगणातील नळापासून ते पहिला मजला चढून जायचा. तेथे भाऊ खांद्यावरील घागर व हातातील बादली घेऊन दुसरा मजला चढून आमच्या घरी नेऊन ओतायचा. घागरीतील पाण्याने प्यायचे पाणी भरले जायचे तर बादलील पाणी गॅलरीतील साठवणाच्या पिपात भरले जायचे. साठवणासाठी आमच्याकडे तांब्याचे मोठे पीप म्हणजे बॅरल होते. त्यात सत्तावीस घागरी पाणी मावायचे.  अमच्या खेडेगावाहून तो तांब्याचा बॅरल आणला होता. चिंच लावून घासल्यावर तो अगदी लालभडक दिसत असे. तो पूर्ण भरून बाथरूममधील बादल्या वगैरे भरायला आम्हाला अर्धा तास लागत असे. पण एकदा का एवढे काम केले की दिवसभर पाण्याची अजिबात चिंता नसे. पुढे पुढे या पाणी भरण्याच्या पद्धतीत आम्ही थोडा बदल केला.  आम्ही म्हणजे चाळीतील पंचेचाळीस बिर्‍हाडांपैकी फक्त आमच्या घरी विहिरीवर रहाट असतो तशी गॅलरीतील पत्र्यालगत एक लोखंडी पुली लावली होती. त्यावर जाडसर दोर अडकविला होता. त्याच्या एका टोकाला घागर बांधायची व दोराचे दुसरे टोक गॅलरीतील गजाला घट्ट बांधून ठेवायचे. त्यामुळे जिन्याची चढ उतार वाचून त्याऎवजी घागरीने ओढून पाणी भरायचे हा क्रम सुरू झाला. दोर म्हणजे लहानसहान दोर नव्हता तर चांगला जाडजूड दोरखंड होता तो ! त्यामुळे सुरुवातीस दोराच्या ओढण्याने हाताला फोड आले, घट्टे पडले.  पण एकजण खाली पाणी भरून द्यायला व दुसरा दोरावरून घागरीने पाणी वर ओढून घ्यायला असल्याने जिन्याची कटकट तरी वाचली व पाण्याचे काम अगदी कमी वेळेत होण्यास मदत होऊ लागली. दोन तीन ठिकाणाहून पाणी भरावे लागत आल्याने थोडी दमछाक व्हायची खरी. पण हळूहळू त्याची सवय झाली. त्यामुळे चाळीतील ‘शिंत्रे’ म्हणजे दोरावरून पाणी ओढणारे अशी नव्याने ओळख झाली आमची. आणि आम्हालाही त्यात गैर वाटत नसे. उलट त्याचा अभिमानच वाटत असे.

या चाळीने आम्हाला बरेच काही शिकविले. आणि हो, न सांगता सवरता हं ! ‘एकोपा’ हा चाळीने आम्हाला शिकविलेला सर्वात महत्वाचा आणि मोठा गुण होय. त्यामुळे सर्व े 
सणवारात चाळीतील सगळी मंडळी ‘ती ती -मैं मैं’ न करता आनंदाने एकत्रित येत असत. व सणसमारंभ मोठ्या हौसेने साजरे करीत. ‘एकदुसर्‍याला मदत करणे हे तर सगळ्यांच्या रक्तातच भिनले होते. तसेच तुझे माझे न करता सर्वांना समान वागणूक मिळावी यासाठी प्रत्येकजण आपापल्यापरीने झटत असे. त्यावेळी घराला आजकालच्यासारखी लोखंडी शटर्स नव्हती. तेव्हा बाहेर जाताना शेजार्‍यांना एकमेक सांगून जात ‘जरा बाहेर जाऊन येतो. घराकडे लक्ष असू दे.’ तेव्हा आम्ही काय वॉचमन आहोत का ? असा विचारही शेजार्‍यांच्या मनात येत नसे. फोन करून एकमेकांकडे जाण्याची पद्धत नव्हती तेव्हा. कोणीही कोणाच्याही घरी दार बंद असेल तरी कडी वाजवून ‘आत येऊ का ? ’ असे विचारू शकत असे.

सणवार असले म्हणजे चाळ अगदी फुलून येई. गुढीपाडवा हा चैत्रातला पहिला सण. त्यादिवशी सर्वांच्या घरच्या घड्याळाचे गजर नेहमीपेक्षा जरा लवकरच वाजत असत. पर्यायाने रॆडिओवरचे सकाळी सहा वाजताचे प्रभातवंदन प्रत्येक घरी पहाटे साडेचार पाच वाजल्यापासूनच ऎकू येई. स्नानादी कार्यक्रम लवकर आवरून गुढी उभारण्याची प्रत्येकाची घाई असे. गुढीत सुद्धा वैविध्य असे. कोणी मोठी साडी निर्‍या करून गुढीवर चढवत असत. तर कोणी जरीचा खण, कोणी धारवाडी खण. त्यावर कोणाचे चांदीचे भांडे, कोणाचा तांब्या-पितळेचा तांब्या तर कोणाचा गडू असे. थोड्याफार फरकाने सर्वांची गुढी मोठ्या दिमाखात उभी केली जात असे. गुढी जेथे उभी केली जाई तेथे तिच्या पायाशी छोटीशीच पण सुरेखशी रांगोळी काढली जाई. गुढीवरील साडी अथवा खणावर कडुलिंबाची डहाळी, साखरेची माळ म्हणजे गाठी व फुलांची माळ हे मात्र सर्वत्र समान असे. नंतर दुपारी गुढीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखविला जाई. बिचारी गुढी खाणार थोडीच ! गुढीच्या नावावर घरातील सर्वांचीच चंगळ होत असे. फक्त नवीन वर्षाचे मनापासून स्वागत करण्यासाठी ही पद्धत एवढेच. अशा रीतीने ही शिकवण मागील पिढीकडून पुढील पिढीला आपोआपच मिळत असे. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वे ळी आपापल्या सोईनुसार आस्ते आस्ते सर्वांच्या गुढ्या उतरवल्या जायच्या. त्यानंतर प्रसाद म्हणून जवळ असलेल्या लहान मुलांना गाठीची पदके खायला मिळायची. प्रत्येक स णाची अशी मनमुराद मौज चाखण्यात आम्हाला मोठाच आनंद मिळायचा. 

नंतर येणारा सण म्हणजे रामनवमी. अर्थात्‌ हा सण आमच्या चाळीत साजरा व्हायचा नाही हे खरे. पण मला आठवते की आम्ही सर्व मुली रामजन्माच्या वेळी म्हणजे भर दुपारी बारा वाजता आमच्या जवळचासणार्‍या रामाच्या देवळात जायचो. गंमत म्हणजे बिनचपलांचे पायाला चटके बसत तरी एकमेकींच्या नादाने तस्सेच जायचो. रामजन्म झाल्यावर छोट्या पाळण्याला हात लावून मनापासुन नमस्कार करून प्रसाद म्हणून मिळणारा सुंठवडा खाऊन परत यायचो. संध्याकाळी खेळणे झाल्यावर रामाच्या गोष्टी सांगून, आरती म्हणून परत आपापल्या घरी जायचो. 

आमच्या चाळीजवळच्या चौकातच ‘पावन मारुती’ चे देऊळ होते. दर हनुमानजयंतीला तेथे सकाळी सहा वाजता मारुतीजन्माचा उत्सव यथासांग पार पडत असे. तसेच ‘भिकारदास मारुती’ वगैरे मोठ्या देवळातूनही असाच उत्सव होत असे. पुण्यात मारुती व गणपतीची बरीच देवळे आहेत. मुख्य म्हणजे ती आपल्या वैशिष्ट्यपूर्ण नावांमुळे प्रसिद्ध आहेत. उदाहरणार्थ पत्र्या मारुती, जिलब्या मारुती, नवशा मारुती, दक्षिणमुखी मारुती इत्यादी. तएच गणपतींचेही होते बरं का ! हत्ती गणपती, मोदी गणपती, माती गणपती, दगडूशेठ गणपती, चिमण्या गणपती, दशभुजा गणपती, तळ्यातला गणपती इत्यादी. आहे की नाही गंमत ! पावन मारुतीचे देऊळ रस्त्याच्या मधोमध असल्याने जाता येता प्रत्येकाची  पावले सहजच पावन मारुतीकडे वळत.  आम्ही सुद्धा या दिवसापासून दररोज व्यायाम करण्याचा निदान दोरीच्या उड्या तरी मारण्याचा संकल्प आम्ही करीत असू.  चैत्र महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला ‘गौरीची तीज’ असे म्हणतात. या दिवसापासून देवीची स्वतंत्रपणे पूजा केली जाते व हळदीकुंकवाच्या कार्यक्रमांना सुरुवात होते. प्रत्येक घरी एकेक दिवस चैत्रगौरीची आरास करून जवळपासच्या बायकामुलींना हळदीकुंकवाला बोलावले जायचे. आंब्याची डाळ व पन्हे प्रत्येक घरी दिले जायचे. प्रत्येक घरची देवीची आरास वेगवेगळी असायची त्यामुळे ती बघण्यात मोठीच मजा यायची. हा उत्सव अक्षय्य तृतीयेपर्यंत चालायचा. साडेतीन मुहूर्तातला अर्धा मुहूर्त म्हणजे  अक्षय्य तृतीया. गुढीपाडवा, दसरा, दिवाळी, आणि अर्धा मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीया होय.

नागपंचमीला मोठी गंमत असे. आम्ही सर्व मुले मिळून मातीचा भला मोठा नाग करायचो. अंगणातल्या पारिजातकाच्या झाडाच्या अलिकडे मातीचा नाग केला जायचा. त्याच्यावर ज्वारीच्या पांढर्‍या शुभ्र लाह्या लावून सजावट केली जायची. तसेच खरे नाग घेऊन गारुडी पण यायचे. बायका त्यांची पूजा करायच्या. त्यांना दूध, लाह्या वगैरे वाहून पुरणाच्या दिंडांचा नैवेद्य द्यायच्या. गारुड्याच्या पुंगीवर नाग छान डोलत असत. एका क्षणात त्या नागांना टोपलीत बंद केले जायचे. 

नंतर येणार्‍या नारळीपौर्णिमेला प्रत्येक घरी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून ओवाळीत असे.  कोणाला कसल्या व किती राख्या मिळाल्या हे बघणे ही मोठी गंमत असे. प्रत्येकाच्या घरी नारळीभातच केला जायचा. श्रावणातल्या प्रत्येक वाराला काही ना काही पूजा, उपास वगैरे असायचा. रविवारी आई आदित्यराणूबाईची पूजा करायची व कहाणी वाचायची. कहाणीतून लाख मोलाचा संदेश दिलेला असे. म्हणजे अशा रीतीने समाजावर उत्तम संस्कार करण्याचे मोठेच काम सहजगत्या केले जायचे. चाळीच्या जवळच लिमयेवाडीत एक शंकराचे छोटेच पण अतिशय सुरेख देऊळ होते. तेथे कमालीची शांतता असे. दर सोमवारी आम्ही त्या देवळात जात असू.  तेथील पांढर्‍या चाफ्याचे झाड मला अजूनही चांगलेच आठवते. तसे थोडे मोठेच होते ते.  त्याचे खाली पडलेले एखादे ताजे फूल मिळवून ते शंकराच्या पिंडीवर वाहण्यासाठी आमची धावपळ चाले. शिवाय दर सोमवारी संध्याकाळी लवकरच उपास सोडण्यासाठी लवकर जेवण असल्याने चंगळ अस व दर सोमवार हा श्रावणातला सोमवार असावा असे वाटे. चाळीत कोणा लग्न झालेल्या मुलीची किंवा सुनेची मंगळागौर असली की सगळ्या चाळीत मोठी धमाल असे चाळीतल्या पारिजातकाच्या झाडाला फुले येत असत. ती चाळीतील सर्वांना पुरेशी असत. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या सवडीनुसार दररोज पारिजातकाची फुले गोळा करायला जात असे. त्यामुळे ते झाड सर्वांचेच झाले होते. मगळागौरीच्या दिवशी रात्री सर्व बायका व मुली मंगळागौर जागवण्यासाठी अंगणात खेळ खेळायला येत असत. आणि गंमत म्हणजे त्यावेळी झोपमोड झाली तरी त्यांना कोणीही रागावत नसे. 

दर शुक्रवारी संध्याकाळी घरोघरी हळदीकुंकवाचा कार्यक्रम असे. त्यामुळे निदान पाच घरी तरी जावे लागे. अर्थात्‌ यावेळच्या हळदीकुंकवाला आरास वगैरे नसते. फक्त सवाष्णींना व मुलींना फुटाणे व दूधसाखर दिले जायचे. त्या निमित्ताने नव्या साड्यांना जरा हवा लागायची. चार शुक्रवारांपैकी कोणत्यातरी एका शुक्रवारी प्रत्येक घरी पुरणाचा बेत असे. त्यामुळे आम्हा मुलांच्या वाटणीला हा नैवेद्याचा भाग असेच. सवाष्ण म्हणून सहसा माहेरवाशीणच असे. त्यामुळे ताई, माई, आका यांना हक्काने माहेरी यायला मिळे. त्या त्या वारांच्या कहाण्या मनोभावे वाचल्या जायच्या. त्यातल्या त्यात शुक्रवारच्या दोन कहाण्या फारच उद्‌बोधक व काळजाला भिडणार्‍या वाटतात. 

गोकुळाष्टमीचा कार्यक्रम चाळीत असा नसे. पण जवळच असलेल्या ‘खुन्या मुरलीधराच्या’ देवळात मात्र आम्ही मुली मुली मिळून जाऊन यायचो. नावात काय गंमत आहे पहा !  वास्तविक बघता मुरलीधर म्हणजे कृष्ण काही खून करणारा नव्हता. पण इंग्रजी राजवटीत त्या देवळच्या जवळपास खून झाला होता म्हणे. म्हणून त्या बिचार्‍या मुरलीधरालाच ‘खुन्या’ करून टाकले सर्वांनी. तर सांगायचे असे की त्या देवळातील राधा कृष्णाच्या मूर्ती इतक्या देखण्या आहेत म्हणता की शोधून सुद्धा तशा मूर्ती बघायला मिळणार नाहीत अशी आमच्या भाबड्या मनाची तशी ठाम समजूत होती. पांढर्‍या शुभ्र संगमरवराच्या त्या रेखीव मूर्ती, त्यांचे ते साधेच पण दररोज वेगवेगळे कपडे, अंगावर चार मोजकेच दागिने यामुळे मनाला अतीव आनंद होत असे. देवळातील समोराचा सभामंडप लाकडी, नक्षीदार खांबांचा होता.  तेथे दररोज संध्याकाळी कीर्तन, प्रवचन होत असे. ते ऎकण्यास बरेच लोक जमत असत. अजून ते दृश्य नजरेसमोरून हलत नाही. अगदी मनात घर करून बसले आहे ते.

श्रावण संपेतो भाद्रपदातल्या गणपतीउत्सवाची चाहूल सर्वत्र लागलेली असे. आमच्या चाळीतही सार्वजनिक गणपती बसविला जायचा. त्याच्या आदल्या दिवशीची हरितालिका म्हणजे तर आम्हा मुलींना जणू एक पर्वणीच असे. हरितालिकेच्या पूजेसाठी विविध प्रकारची पत्री गोळा करणे हा मोठा कार्यक्रमच असे. शेजारपाजारच्या वाड्यांमधून, बंगल्यांमधून पत्री गोळा करायला आम्ही मुली आदल्या दिवही संध्याकाळीच जात असू. गणपतीसाठी लागणार्‍या दूर्वाही अशाच प्रकारे एखाद्या मैदानावरून किंवा नदीकाठावरून आम्ही आणत असू. त्या सुद्धा भरपूर हं ! म्हणजे किती?  तर हजारभर. भारी मज्जा यायची. चाळीत घरोघरी दीड दिवस, पाच, सात, नऊ किंवा दहा दिवस असायचे. पण चाळीचा गणपती मात्र दहा दिवस असायचा. गणपतीसाठी एक खास समिती नेमलेली असे. गणपतीची वर्गणी तशी फार नसे. आधी मुळात त्यावेळी स्वस्ताई होती. अर्थात्‌ पगारही फार नव्हते. गरजाही माफक होत्या. पण जेवढे होते त्यात समाधान मात्र खूप होते हे महत्वाचे. आत्ता पैसेही सर्वांना भरपूर मिळतात पण त्याला पायही अनेक फुटलेले असतात. आणि समाधान म्हणाल तर काकणभर कमीच ! गणपतीसाठीच्या वर्गणीची कोणालाही कोणतीही सक्ती नसे. अगदी पाच रुपयांपासून ते पन्नास रुपयांपर्यंत कितीही चालायची. सकाळ-संध्याकाळ आरती होत असे. त्यामुळे लहान मुलांच्या सर्व आरत्या आपोआप पाठ व्हायच्या. संध्याकाळच्या आरतीला बहुतेक सर्वजण एकत्र जमत असत. प्रसादाचे वार ठरवून घेतले जायचे. त्यामुळे एखाद्या वारी दोन-चार खिरापती मिळत असत. गणपतीसाठी जागाही ठरलेली होती. चाळीच्या दिंडी दरवाजाच्या डाव्या बाजूला खालच्या सानेंच्या खोलीच्या बाजूची जागा नक्की केली होती. एक टेबल ठेवून त्यावर सुरेखशी चादर घालून सजावट केली जाई. टेबलाच्या मागे व डाव्या-उजव्या बाजूला पडदे सोडून जणू स्वतंत्र खोलीच तयार केली जायची. गणपतीच्या आरतीला जमणार्‍या लोकांना पाऊस लागू नये म्हणून ताडपत्री पण बांधलेली असे. चादरीवर मांडलेल्या चौरंगावर गणपतीची स्वारी विराजमान झाली की सर्वांचेच भान हरपून जात असे.

दहा दिवस भरगच्च कार्यक्रम असत. कधी कोणाचे जादूचे प्रयोग असत, तर कधी बायकांचे भजन असे. आम्हा मुलांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम असल्याने त्याची तयारी आम्ही दहा-पंधरा दिवस आधीपासूनच करीत असू. त्यात लहानमोठे नाच, नाटुकली एकांकिका, एकपात्री प्रयोग असे नानाविध प्रकार असत. तसेच हत्तीला शेपूट लावणे, रांगोळ्या काढणे, बादलीत चेंडू टाकणे, लांब उडी, उंच उडी, गाणी, गोष्टी, वक्तृत्व अशा वेगवेगळ्या स्पर्धाही असत. त्यात जिंकलेल्यांना लहानमोठी आकर्षक बक्षिसे दिली जात. एक दिवस सर्वांसाठी कॉफीपानाचा कार्यक्रमही केला जाई. मोठ्या बायकांसाठीही पाककलेच्या स्पर्धा असत. एक दिवस वेगवेगळ्या पदार्थांचा अन्नकोटही केला जात असे. एकंदरीत खाणेपिणे,  मौजमजा यांची अगदी रेलेचेल असे. अर्थात्‌ हे सर्व शाळा वगैरे सांभाळून बरं का ! अशा रीतीने नऊ दिवस कसे संपून जायचे ते कळायचेही नाही. पण दहावा दिवस उगवायचा आणि सर्वांच्याच एका डोळ्यात हसू तर एका डोळ्यात आसू यायचे. गणपतीबाप्पाला निरोप द्यायच्या कल्पनेने मनात कलवाकालव व्हायची. आपल्या घरचा, अगदी जवळचा नातेवाईकच परगावला जात आहे असे वाटून आम्हा मुलींना तर रडू आवरत नसे. दुपारी चार वाजता गणपतीविसर्जनाची तयारी सुरू व्हायची. मोठमोठ्याने आरती म्हटली जायची. पण आम्हा मुलींना मात्र डोळ्यातील पाण्याने आरती म्हणणेही अशक्य व्हायचे. बाकीजण आमच्या या अवस्थेकडे पाहून हसत असायचे. पण रडून रडून आमचा रुमाल मात्र पार ओला होऊन जायचा. ‘गणपतीबाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ असे म्हणताना तो बाप्पा पुढच्या वर्षी परत येणार ह्या कल्पनेपेक्षा तो आत्ता आपल्या घरी परत जाणार ह्या कल्पनेनेच फार वाईट वाटायचे. अशा रीतीने गणपतीला भरल्या डोळ्यांनी निरोप दिला जायचा. 

गणपती उत्सव संपून पक्ष पंधरवडा झाला की नवरात्रीची सुरुवात होते. नवरात्र मात्र घरोघरी केले जायचे. देवीची नऊ दिवस पूजा स्वतंत्रपणे केली जाते. कोणाकडे उठती-बसती सवाष्ण, कुमारिका वगैरे जेवायला असतात. आठव्या दिवशी महालक्ष्मीची पूजा असते. नवीन लग्न झालेल्या मुलींनी ही पूजा करायची असते. रात्री देवीसमोर बायका घागरी फुंकायला जातात. संध्याकाळी सातच्या सुमारास तांदुळाच्या पिठीचा मुखवटा करून पाच फूट उंचीची खरी महालक्ष्मी देवीची मूर्ती तयार केली जाते. तिला सुंदर भरजरी साडी नेसवली जाते. दागदागिने घातले जातात. तिची ओटी वगैरे भरली जाते. सुरुवातीस ती लहान कुमारिकेसारखी नाजुक दिसते. नंतर दोन तासांनी मध्यमवयीन गृहिणीसारखी तर रात्री अकरा बाराच्या सुमारास प्रौढ स्त्रीसारखी दिसते.  तिचे सोवळेओवळे थोडे कडक असल्याने घरोघरी पूजा केली जात नाही. पण सार्वजनिक ठिकाणी उभ्या केलेल्या देवीच्या दर्शनासाठी लोक आवर्जून जातात. दोन दिवसांनी येणारा दसरा मात्र सर्वजणांच्या आवडता असल्याने ‘दसरा सण मोठा, आनंदा नाही तोटा’ याची साक्ष पटते. त्या दिवशी संध्याकाळी सर्वजण एकमेकांना आपट्याची पाने म्हणजेच सोने देऊन शुभेच्छा व्यक्त करतात. लहानांनी सोने द्यायचे व मोठ्यांनी त्यांना आशीर्वाद व हातावर काहीतरी खाऊ द्यायचा ही पद्धत असल्याने नवीन कपडॆ घालून आम्ही मुले चाळीत घरोघरी जाऊन सर्व मोठ्या माणसांना नमस्कार करून सोने देत असू व त्याबदल्यात हातावर मिळालेला खाऊ खात असू. त्यामुळे दसर्‍याची संध्याकाळ कशी संपून जायची ते मुळी कळतच नसे. 
 
आणि हो, महत्वाचे सांगायचे राहिलेच हं !यासर्व सणवारांच्या गडबडीत आम्ही शाळा मात्र कधीच चुकवली नाही. शाळेचे भान ठेवून मगच चाळीतील सर्व कार्यक्रमात भाग घ्यायचा ही रीतच होती. आणि सर्व मुले कटाक्षाने तिचे पालनही करत असत. आमची मुलींची शाळा ‘मुलींचे भावेस्कूल’ म्हणजे सध्याची ‘रेणुकास्वरूप’  ही आमच्या शाळेच्या जवळच पाच पावलांवर होती. जुन्या चाळीच्या मागच्या दारातून बाहेर पडले की शाळेचे दारच यायचे. तेव्हा अशा रीतीने शाळा व चाळ या दोन्ही आघाड्यांवर आमची लढाई अगदी सफाईदारपणे चालू होती. 

दसर्‍यापासून दिवाळीपर्यंतचे दिवस कसे भुर्रकन्‌ उडून जायचे कळायचे नाही लहान मुलांनाही व मोठ्या माणसांनाही. छोट्या मुलांना आकाशकंदील व किल्ला ही महत्वची कामे असत.  त्यावेळी आकाशकंदील कधी विकत आणला जात नसे. त्यामुळे दिवाळीत चाळीतील जवळजवळ प्रत्येक घरी वेगवेगळ्या प्रकारचे, आकाराचे, रंगांचे आकाशकंदील दारासमोर टांगलेले असायचे. त्यासाठी लागणार्‍या बांबूच्या कामट्या आणून त्याचा सांगाडा करून आकाशकंदील तयार केला जायचा. गंमत म्हणजे कामट्या बांधायला पुडीच्या दोर्‍याचे रीळ आधीपासूनच तयार ठेवलेले असायचे.  कागद चिकटवायला डिंकाच्याऎवजी कणकेची 
खळ तयार केली जायची. चुरमुरा कागद किंवा चकचकीत प्रकाश पडणारा जिलेटिन कागद वापरला जायचा. पण खरं सांगायचं तर चुरमुर्‍या कागदाचा आकाशकंदील हा अतिशय मंद, शांत व सुंदर दिसायचा. कोठे झिरमिळ्यावाला साधा तर कोठे चांदणी, कोठे विमान असे वेगवेगळ्या आकाराचे आकाशकंदील मोठ्या दिमाखात दारापुढे टांगलेले असायचे. सोनेरी कागदाच्या पट्ट्यांनी व कागदाच्या फुलांनी सजविलेले हे आकाशकंदील दिवाळीची शोभा वाढवण्यास मोठीच मदत करायचे. 
  
यासोबतच दुसरीकडे किल्ल्याची तयारीही जोरात सुरू असायची. त्यासाठी घराबाहेरच्या गॅलरीतील जागा ठरवून घेतली जायची. नंतर एस्‌. पी. कॉलेजच्या किंवा दुसर्‍या एखाद्या मैदानावरून पिशव्या भरभरून माती आणली जाई.  ती माती उचलून आणणे थोडे जिकिरीचे काम असे म्हणून कोणाच्या तरी सायकलच्या कॅरिअरला लावून हाश्‌हुश्‌ करीत ती माती अखेर घरापर्यंत यायची. काही मुले दगड, विटा, जुने डबे वगैरे खाली मांडून त्यावर माती घालून किल्ला करायचे. काहीजण थोड्या वेगळ्या प्रकारचा किला करायचे. मातीत पाणी घालून त्याचे सैलसर चिखलाचे पाणी करून त्यात पोते बुडवायचे. फरशीवर दगड, विटा इत्यादींच्या साह्याने काठ्या वगैरे उभ्या करून त्यावर ते चिखलात बुडवलेले पोते अंथरून त्यापासून उंचसखल असा किला करायचे. मग त्यावर मोहरी, हळीव पेरून त्यावर पाणी घालायचे. किल्ल्याच्या एका बाजूला गुहा करून शेजारी गहू पेरले की त्याची शेतासारखी झाडे येत. गहू, हळीव, मोहरी यांची चार-सहा दिवसातच लहान लहान रोपे येतात ती बघण्यात फारच मौज वाटे.  किल्ल्यावर जाण्यासाठी म्हणून वळणावळणाचा रस्ता करून त्यावर विटेची पूड घालायची. रस्त्याच्या दोन्ही कडेला मैलाचे दगड म्हणून पांढर्‍या खडूचे लहान लहान तुकडे लावायचे. नंतर जरा जाडसर कागदाची लहानमोठी घरे बनवायची.  त्यावर दारे व खिडक्या रंगवायच्या. एक मजली घरांबरोबरच दोन दोन मजली घरेही केली जायची. काही झोपडीसारखी तर काही बंगलेवजाघरेही असायची. तसेच किल्ल्यावर ठेवण्यासाठी म्हणून पुठ्ठ्याचा बुरूजही केला जायचा.  बुरुजावर दगडी बांधकामाचे रंगकाम केले जायची. घरातली लहानमोठी मातीची चित्रे बाहेर यायची ती किल्ल्यावर मांडायची. एका ताटलीत किंवा ट्रेमध्ये आणी घालून त्याभोवती माती घालून त्याचे तळे केले जायचे. त्यात खेळण्यातली छोटी प्लॅस्टिकची बदके सोडली जायची.  गुहेत वाघोबा ठेवला जायचा - मातीचा हं ! बुरुजाच्या आत शिवाजी महाराज स्थानापन्न व्हायचे. संरक्षणासाठी म्हणून सभोवती छोटेमोठे मावळे ठेवले जायचे. शेतकरी, भाजी विकणार्‍या बायका, घोडागाडी, बैलगाडी इत्यादी चित्रे मांडून वेगवेगळ्या प्रकारे किल्ला सजवला जायचा.   

मोठी मुले मोठ्ठा किल्ला एकत्रितपणे करायची.  त्यावर हालती चित्रे मांडून देखणी आरास करून सर्वांची वाहवा मिळवायची.  काडेपेटीच्या गाड्यांबरोबरच दोरावरून पळणारे विमान वगैरे केले जायचे. गंमत म्हणजे त्या किल्ल्याच्या पुढे खडूने लिहिलेले असायचे - ऎच्छिक वर्गणी समोरच्या थाळीत टाकावी. आणि बघायला येणारी मंडळीही किल्ल्याचे कौतुक करून पाच-दहा पैसे जास्स्तीत जास्त चार-आठ आणे थाळीत टाकायचे. त्यातच आनंद ! 

आकाशकंदील व किल्ल्याबरोबर चाळही आनंदात रंगून जायची. घरोघरी भाजणीचे खमंग वास यायचे.  तसेच नंतर फराळाचे पदार्थ करायला सुरुवात झाली की वेगवेगळ्या वासांनी चाळही सुगंधित व्हायची. सर्वांच्या घरी दिवाळीचे चार दिवस आधी फराळाचे पदार्थ करायला सुरुवात व्हायची. पण आमची आई नोकरी करायची - ताराचंद हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून. त्यामुळे तिला सवड असेल तेव्हाच आमच्या घरी फराळाचे पदारथ बनवले जायचे. आणि गंमत म्हणजे दिवाळीच्या आदल्या दिवशी फाराळाचे पदार्थ करायला सुरुवात व्हायची. मग रात्रीचाही दिवस केला जायचा.  नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटेपर्यंत आमचे सर्व पदार्थ तय्यार व्हायचे.  रात्रीची झोप नसली तरी आम्हाला काही वाटायचे नाही उलट मजाच यायची. लगेच पहाटे आई आंघोळीच्या गरम पाण्यासाठी बंब पेटत घालायचीच. 

वसुबारसेच्या दिवशी संध्याकाळपासूनच प्रत्येकाच्या घरासमोर आकाशकंदील लागायचा व पणत्या लावल्या जायच्या.  त्यामुळे सगळीकडे मंगलमय वातावरण पसरले जायचे. त्या मंद, शांत प्रकाशाने सगळी घरेदारे उजळून जायची. नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे सर्वात आधी कोण उठतंय, व पहिला फटाका कोण वाजवतंय याकडे सर्वांचेच लक्ष लागायचे. लवकर आंघोळ केली जायची. ती सुद्धा साधीसुधी म्हणजे नेहमीसारखी आंघोळ नसायची हं ! तर रांगोळी घालून त्यावर पाट मांडून तेल, उटणे लावून मग गरमगरम पाण्याने केलेले पवित्र स्नान फरच आनंददायक असे. त्यानंतर नवीन कपडे - जे आणि जसे असतील तसे - घालून देवाला जाऊन येणे हे फार महत्वाचे मानले जाई. त्यामुळे सर्वजण अगदी मनापासून देवाला नमस्कार करीत असत. घरी आल्यावर सर्व मिळून गप्पाटप्पा करीत फराळ करण्याचा आनंद घेतला जाई. वसुबारसेच्या दिवसापासून आणखी एक गोष्ट विशेषकरून केली जात असे.  आणि ती म्हणजे प्रत्येक घराच्या पुढे सकाळ संध्याकाळ सुरेखशी रांगोळी काढून त्यात रंग भरले जात असत.  आम्हा मुलींच्यासाठी तर ही फार महत्वाची बाब असे. दारासमोर अर्धगोलाकार किंवा चौकोनी फरशीवर काव वापरून प्रथम सारवले जाई. काव म्हणजे एक प्रकारचा विटकरी दगड किंवा त्याची पावडर असे. ती काव वाळल्यावर त्या विटकरी रंगावर काढलेली रांगोळी अतिशय मनमोहक दिसत असे. वसुबारसेच्या दिवशी गायवासराची पूजा केली जायची. समजा गायवासरू भेटले नाहीच तर  निदान घरातल्या दत्ताच्या फोटोतल्या गाईची पूजा करून तिला नैवेद्य दाखविला जायचा. लक्ष्मीपूजनाला प्रत्येक घरी लक्ष्मीची पूजा केली जायची. पाटावर अथवा चौरंगावर लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवला जायचा. तसेच शेजारी एका भांड्यात काही पैसे, एकात दागिने व बॅकेची पासबुके ठेवली जायची व त्यांचीही लक्ष्मी मानून मनोभावे पूजा केली जायची.  दरवर्षी प्रत्येकजण जमेल तशी पाच - दहा रूपयांपासून ते हजारो रुपयांपर्यंत त्या लक्ष्मीपूजनाच्या पैशात भर घालीत असे. पूजा झाल्यावर नैवेद्य म्हणून साळीच्या लाह्या व बत्तासे ठेवण्याची पद्धत होती. नंतर शेजारापाजारच्या बायकांना बोलावून हळदकुंकू व लाह्या, बत्तासे दिले जायचे. त्यानिमित्ताने एकमेकांकडे जाणेयेणे व्हायचे. मुले लक्ष्मीपूजनाचे म्हणून फटाके उडवायची. मला चांगलेच आठवते आहे की त्यावेळी फटाक्यांच्या किंमती फार नव्हत्या. पाच - दहा रूपयांमध्येही भरपूर फटाके येत असत. दिवाळीचे चारही दिवस रोज कही ना काही गोडाधोडाचे जेवण असे. पाहुणेरावळे येतजात असत त्यामुळे ते दिवस कसे बोलबोलता संपून जात. दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. या दिवशी प्रत्येक घरी बहिणीने भावाला ओवाळण्याची पद्धत असते - तीही तबकातील व डोळ्यातील निरांजनांनी ! आणि भाऊही त्यात त्याला जमेल तशी व तेवढी भाऊबीज घालीत असे. ती भाऊबीज काय व किती याला महत्व नसून त्यामागच्य़ा भावनेला अधिक महत्व असे. या दिवशी रात्री तुळशीच्या लग्नासाठी थोडे फटाके शिल्लक ठेवून उरलेले सर्व फटाके उडवले जात. 

दिवाळीच्या सुट्टीसाठी म्हणून शाळेतील बाईंनी भरपूर अभ्यास दिलेला असे तो पूर्ण करण्यात सुट्टीही कशी संपून जायची ते समजायचेही नाही. सुट्टीत आम्ही अनेक नवीन गोष्टी शिकायचो. अर्थात्‌ पैसेवाले क्लासेस लावून नाही हं ! तर कमीत कमी किंवा बिनपैशात होईल तेवढे शिकायचे. आमच्या शाळेत सुट्टीत म्हणून एकदा ग्लास पेंटिंग, शिवण, भरतकाम, किंवा वेगवेगळे खेळ, पोहणे असे कोर्सेस ठेवले होते. पण त्या सर्वांना फी व साधनसामुग्रीही लागे. त्यावेळी मी बिनपैशाचा पोहण्याच्या कोर्समध्ये पोहायला शिकले होते. त्यासाठी साधन म्हणून एक हवाबंद डबा व बांधण्यासाठी दोरी लागे. तीही त्यांच्याकडूनच मिळण्याची सोय होती. आमच्या चाळीजवळच असलेल्या महाराष्ट्र मंडळाच्या विहिरीत आम्हाला पोहायला शिकवले गेले. 

दिवाळीनंतर येणारे तुळशीचे लग्न मात्र चाळीत केवळ काही घरीच केले जायचे. उंच तुरेवाल्या उसाचा त्रिकोणी मांडव घातला जायचा. कावेने रंगवलेल्या एका सुंदर कुंडीत तुळशीचे नवे छानदार रोपटे लावलेले असे. ती कुंडी उसाच्या मांडवाखाली ठेवून तिला झेंडूच्या फुलांच्या मुंडावळ्या बांधून नवरीप्रमाणे सजवले जायचे. तिच्या समोरील पाटावर एका छोट्या ताम्हनात देवातला बाळकृष्ण ठेवून त्यालाही लहान नाजुक फुलांची माळ घातलेली असे. नंतर तुळशीची कुंडी व बाळकृष्ण यांचेमधे अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून  त्यांचे यथासांग लग्न लावले जायचे. आनंद व्यक्त करण्यासाठी टाळ्या वाजवून माफक फटाके उडवले जायचे. दिवाळीसारखे पण मोजकेच लाडू, चकली असे पदार्थही केले जायचे.  या तुळशीच्या लग्नाचे मुख्य महत्व म्हणजे यानंतर खरे लग्न मुहूर्त धरले जायचे.   
 
संक्रांतीपर्यंतचे मधले दिवस शाळेतील सामने, स्पर्धा यात पटापट संपून जायचे.  जानेवारी महिना येताच संक्रांतीचे वेध लागायचे. संक्रांतीचे वैशिष्ट्य म्हणजे ही दरवर्षी चौदा जानेवारीलाच येते. बाकी सण वेगवेगळ्या तारखांना येतात. पण संक्रांत मात्र स्वतःचा आब राखून असते. घरोघरी तिळगूळाच्या वड्या व हलवाही केला जायचा. आम्ही लहान मुलीही कोळशाच्या शेगडीवर हलवा करायचो. त्यावेळी हलवा करताना हात कसा भाजायचा ते अजूनही चांगलेच आठवते.  पण तो काटेरी पांढरा शुभ्र हलवा बघून सारे श्रम नाहीसे व्हायचे. कागदाचा छानसा हलव्याचा डबा करण्यात आम्ही मुले रमून जायचो. त्या डब्यात हलवा घालून नवीन कपडे नेसून घरोघरी जाऊन ‘तिळगूळ घ्या गोड बोला’ असे म्हणून एकमेकांना हलवा व शुभेच्छा देण्यात ती संध्याकाळ सोनेरी पंख लावून उडून जात असे. 

त्यानंतर शाळेचे वेध लागायचे सर्वांना. अभ्यासाच्या अगदी मागे लागायचो सर्वजण.  सर्वांचा काही पहिला नंबर येणार नाही हे पक्के ठाऊक असले तरी चांगले गुण मिळ 
वण्याचे यथाशक्ती प्रयत्न मात्र मनापासून केले जायचे. त्यातच भर म्हणजे दररोज संध्याकाळी पावन मारुतीला जाऊन ‘परीक्षा चांगली जाऊ दे’ अशी विनवणी करायला आम्ही कोणीही विसरत नसू परीक्षेच्या वेळी आठवणीने देवाला व मोठ्यांना नमस्कार करून, तोंडात तुळशीचे पान ठेवून मगच प्रत्येकजण शाळेत जात असे.  आमच्या वेळी रिझल्टच्या आधी दोन दिवस नापास विद्यार्थ्यांच्या घरी त्यांची कार्डे पोस्टाने येत असत. त्यामुळे रिझल्टच्या आधी दोन - चार दिवस पोस्टमन आपल्या घरी न येवो अशीच प्रार्थना सर्वजण करीत असत. वास्तविक पोस्टमन काय तेवढे एकच कार्ड घेऊन येतो का ? इतरही टपाल असतेच की ! पण त्यावेळी तरी पोस्टमनची आम्ही सर्वजण धास्ती घेत असू. आणि गंमत म्हणजे त्यावेळी पोस्टमन दिवसातून तीनदा टपाल द्यायला येत असे. सकाळी आठ वाजता, दुपारी अकरा - बारा वाजता व संध्याकाळी  चार - पाच वाजता असा येत असे. आजकालच्यासारखा दिवसातून फक्त एकदाच येत नसे. असो.

डॉक्टर पेंडसे आमचे चाळमालक अतिशय सज्जन गृहस्थ होते. आम्हाला त्यांचा फार अभिमान वाटत असे. त्यांचा स्वतःचा स्वतंत्र वाडा पेरूगेटच्या पुढच्या चौकात होता. चाळीतील सर्व बिर्‍हाडकरूंशी त्यांचे घरगुती संबंध होते. दर महिन्याला पहिल्या आठवड्यात भाडे घ्यायला म्हणून ते येत असत. तळमजल्यावर जेथे गणपती बसविला जाई तेथे ते येऊन बसत. बिर्‍हाडकरूही एकमेकांना त्यांची वर्दी देत आपापले भाडे नेऊन देत असत. त्याकाळी भाडेही तसे फार नव्हते. अर्थात्‌ त्यावेळच्या पगाराच्या मानाने ठीकच होते.  पण आता ते ऎकले म्हणजे हसूच येते. एका खोलीला साधारणपणे पाच रुपये भाडे असे.  तसेच वीजबीलही दोन - तीन रुपये होत असे. एखाद्या बिर्‍हाडकरूला त्या महिन्यात भाडे देणे जमणार नसेल तर तो तसे प्रामाणिकपणे मालकांना सांगे. मालक हसून म्हणत, "ठीक आहे. पुढच्या महिन्यात द्या हं ! " आजकाल हे सर्व दुर्मिळच वाटते. 

काहीशी स्थूल प्रकृती, गव्हाळ वर्ण, सदैव प्रसन्न व हसतमुख चेहरा असे आमचे मालक लहानमोठ्या सर्वांचेच अत्यंत आवडते होते. पेशाने जरी ते डॉक्टर होते तरी त्यांचा वेश मात्र अत्यंत साधा असे. पांढरे शुभ्र धोतर नि पांढरा मलमलचा हाफ शर्ट. पायात साध्याच वहाणा. बाकी काही थाटमाट नसायचा. पण आम्हा सर्वांना मात्र त्यांच्या हसतमुख चेहर्‍याने व सौजन्यपूर्ण वागण्याने त्यांच्याबद्दल नितांत आदरच वाटत असे. चाळीतील सर्व लहानमोठ्यांचेही त्यांना भारी कौतुक ! सर्वांची अगदी आपुलकीने, आठवणीने चौकशी करीत. कोणाला किती मुले, मुली ? कोणत्या शाळेत ? काय शिकतात ? इत्यादीची मोठ्या आस्थेने विचारपूस करीत. त्यामुळे आम्हा मुलांनाही आजोबा भेटल्याचा आनंद होत असे. कोणाचीही आर्थिक अडचण वगैरे असली तरी ती सोडवण्यासाठी प्रयत्न करीत. 

आताशे चाळीचे काम त्याच्या हातून होईना झाले होते. म्हणून त्यांनीच सुचविले होते की सर्व बिर्‍हाडाकरूंनी मिळून पैसे भरून आपले राहते घर आपापल्या नावावर करून घ्यावे. एका खोलीला साधारणतः पंधरा - वीस हजार असे ठरले होते. अण कोणी ‘हो’ म्हणाले तर कोणी ‘नको’. या ‘हो, नको’मध्ये चाळीचे ते भिजत घोंगडे तसेच राहून गेले. जुन्या चाळीतल्या लोकांनी मात्र याला संमती दिली व आपापली दोन दोन खोल्यांची जागा पैसे देऊन आपापल्या नावावर करून घेतली. अखेर मालकांनी ती सगळी नवी चाळ दीक्षित नावाच्या एका गृहस्थांना विकली. पण डॉक्टर पेंडसे यांच्याप्रमाणे आमच्या नव्या मालकांचे बिर्‍हाडकरूंशी काहीकेल्या सूत जमू शकले नाही. तेव्हा चाळीच्या हस्तांतराची ही प्रक्रिया पुन्हा एकदा नव्याने पुढे आली. त्यामुळे मूळच्या ‘पेंडसे चाळी’चे नाव बदलून ‘दीक्षित चाळ’ झाले पण तेही काही काळापुरतेच. आणि नंतर त्या पाटीवर ‘पालकर चाळ’ असे नाव झळकू लागले. अर्थात्‌ पोस्टाच्या पत्त्यावर मात्र अजूनही २५५/१०, पेरुगेटजवळ, पेंडसे चाळ असे लिहिले तरी पोस्टमन इमाने इतबारे चाळीत पत्रे नेऊन देतो हे विशेष ! 

म्हणता म्हणता चाळीला शंभर वर्षे होत आली. तिने अनेक सण समारंभ, बरे वाईट प्रसंग, चढ उतार बघितले. तीही आता थकली होती. अर्थात्‌ कोठेही तशी पडझड वगैरे झाली नव्हती. पण ती होण्याच्या आतच नव्या बिल्डरने नवा कार्यक्रम जाहीर केला. चाळ पाडून त्या जागी ‘सप्तशृंगी अपार्टमेंट’ नावाची सात मजली इमारत उभी करण्याचा ! ‘हो - नाही’ म्हणता म्हणता सर्वांनी त्याला संमती दिली. आज आमच्या त्या पेंडसे चाळीच्या जागी ही नवीन सात मजली इमारत मोठ्या दिमाखात उभी आहे. पण आम्हा त्यावेळच्या लहानमोठ्यांच्या मनात मात्र तीच चाळ, तेच अंगण, तोच हौद, तेच नारळाचे झाड इत्यादी सर्व सर्व गोष्टी अगदी ताज्या तवान्या आहेत. बिल्डरने जरी पेंडसे चाळ भुईसपाट करून त्याजागी नवी शानदार इमारत उभी केली असली तरी आमच्या मनातल्या चाळीची स्मृती पुसून टाकणे मात्र कोणालाही जमणे शक्य नाही. 

जरी दैवे आमुची चाळ पाडली गेली
तर जाऊ न शकते स्मृती मम मनी जपलेली

आमच्या जीवनाला आकार देणार्‍या, बालमनावर नवनवे संस्कार करणार्‍या सुजाण नागरिक बनवण्यात मोठा हातभार लावणार्‍या त्या पेंडसे चाळीला माझे शतशः प्रणाम !  


 

    
 

                        
                             

    
 

                


                 
 
                     
 
   
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color