स्मृतीगंध
लेख़क उषा परांजपे   
१९४२ सालातील फेब्रुवारी मार्चचे दिवस होते. रामकृष्णपंत व सावित्रीबाईच्या संसारात परत एकदा अपत्य संभवची चाहूल लागली. परत एकदा मने आशा निराशेच्या झोक्यावर झोके घेवू लागली.  घ्या खेपेस तरी मुलगा होणार कां? बहुधा कार्टीचहोणार कारण नियतीने आत्तापर्यत पोरीच दिल्या होत्या १/२ मुलगे झाले होते पण ते भुरदिशी उडून गेले. पण काय सांगावे देवाला दया आलीच तर! दीर जावेची कुत्सीत बोलणी टोमणे ऐकत ते दिवस कसेतरी लोटले आणि नऊ महिने भरल्यावर सावित्रीबाईना एके दिवशी प्रसववेदना होवू लागल्या देवाला किती नवस बोलून झाले. जे कोण काय सांगेल ते करून झालेच होते आता फक्त निकालाची वाट बघायची. योग्य वेळी बाळाने टँहा केले. आईचे व घरातल्यांचे कान सुईणीचे शब्द ऐकायला आतुरले होते. पण टाहो चालू असूनही सुईण मात्र मुकी झाली होती. त्या अनुभवी मातेने निकाल ओळखला आणि जे भिंतीकडे तोंड करून झोपून घेतले ते काही केल्या बाळाकडे बघेचना. जोडीला हुंदके चालूच होते. घरातील दीर जावेला आनंद झाला कारण पुन्हा एकदा आपले श्रेष्ठत्व सिद्ध झाले कारण ५ मुलांचे ते माता पिता होते नां! इतका जुना काळ तो पण मुलगीच कां? असे प्रश्न सर्रास ऐकू येतातच नां?
    एकत्र कुटुंबातील वातावरण थोडे ढवळूनच निघाले ८ वे मुल व ते पण मुलगी. त्यामुळे तसा कोणाला विशेष आनंद नव्हताच. षष्ठीचा संस्कार करायचा सटवाईने कार्टीच्या नशिबाचा आलेख काय लिहिला आहे काय ठाऊक?
    पण त्या मानाने बाळाचे वडील स्थितप्रज्ञ! जे  परमेश्वर देईल ते विशेष न कुरकुरता मान्य करायचे व सतत जगाच्या कल्याणाला धावून जायचे. नोकरी इमानेइतबारे करून प्रपंच चालवला होता. एक एक दिवस सरता सरता १३ वा दिवस उजाडला. काहीतरी नाव ठेवण्याचा संस्कार तर व्हायलाच हवा! सुशीला, माणिक, कुसुम, कमळा, वगैरे नाव ठेवायला ती थोडीच कौतुकाची होती. काहीतरी कसेतरी ठेवायचे आई म्हणाली त्यातील १ शहरात राहणारी म्हणाली उषा ठेवा. बहुधा तेव्हाचे फॅशनेबल ना ते असावे. पण तेवढ्यात वडील म्हणाले बगुताई ठेवा. १२ दिवसाच्या पोरीच नाव काय पण नामी शोधून काढले त्यांच्या मते १ ओळखीच्या निराधार बाई होत्या त्यांना ना नवरा ना मुलबाळ (सोळ्याबाई कान्हेरे यांचेकडे स्वयंपाकास होत्या.) त्या नुकत्याच वारल्या होत्या. त्यांचे नाव नाहीतर जगातून पुसून जाणार. तेवढेच त्या आत्म्याला शांती. खरा विचार केला तर हा विचार किती उदात्त होता. नाहीतरी पूर्वीच्या काळी आजोबा जन्माला आले आजी जन्माला आली असे घराघरातून चालतच असे. माझे वडील पण त्याच कान्हेरे सरदाराकडे कारभारी किवा मुनीमजी म्हणून नोकरीस होते. तो काळ तसा होता आताचा असता तर आई  करवादली असती दळभद्री लक्षण मेली. माझ्या पोरीने स्वयंपाकीण व्हावी अशी इच्छा आही की काय? पूर्वी बहुतांशी घरातून पुरुषांची सत्ता चालत असे. पुरुषप्रधान संस्कृतीचा काळ तो बायकांना काही कळत नाही त्यांची अक्कल चुलीपुढे चार भिंतीच्या आत. साधारणतः असेच बायकांनापण वाटत असे. त्यामुळे बायका मानसिक दृष्ट्या दु:खी वगैरे नसाव्यात. कोणतीही परिस्थिती भली बुरी आली तरी ते दैवातच होते नशिबाने जे मिळाले तेच घडते असाच सर्वत्र समज होता.
    थोडक्यात म्हणजे व्यक्तींना स्वत: मध्ये असलेल्या सुप्त गुणांची जाणीवच नव्हती. अर्थात पुढे पुढे शिक्षणाच्या प्रसाराने सर्वच चित्र बदलले गेले. कोणाची इच्छा असो अगर नसो ती बाकी हळूहळू आकार घेव लागली वाढत राहिली. उपडे वळणे, पुढे सरकणे, रांगणे, दंगा करणे, सर्व इतर मुलासारखीच प्रगती चालू होती पण त्यात कुणाला विशेष कौतुक नव्हते. पण तोच जर मुलगा असता तर!
    मी मुलगा असते तर माझे आयुष्य पूर्णच बदलून गेले असते. एकदा रांगता रांगता मी समईजवळ गेले व पेटत्या समईनी माझे कपाळावरील केस जळाले. तेवढ्यात आई आत्त्या कोणाचे तरी लक्ष गेल्याने अनर्थ टळला त्या क्षणी एकाद्यावेळी आईच्या मनात असे आले सुद्धा असेल देवाने मला २ मुलगे दिले त्यांना ओढून नेले. आता हिला नेले असते तर माझी चिंता तरी कमी झाली असती. चिंता कसली काय विचारता? अहो लग्नाची! मुलगी जन्माला आल्यापासून आपली एकच चिंता तेव्हाच्या मुलीच्या आयांना. कारण घरात धनधान्य भरपूर होते खायला १ तोंड वाढले एवढी वाईट परिस्थिती नक्कीच नव्हती. 
    असेच हळूहळू दिवस सरत होते. मोठ्या बहिणी चुलतबहिणी माहेरी येत होत्या. रडत रडत सासरी जात होत्या. एकाद दुसरी नशीबवान अगदी मजेत खुशीत माहेरी सासर करीत होती. सासर माहेरच्या प्रेमाने कौतुकाने न्हावून निघत होती. त्याच्या मुलांची कौतुक पण सर्वत्र होत होती. 
    आणि तशातच एकदा सातारला प्लेगची साथ आली. कान्हेरे कुटूंबीय गाव सोडून मिरजेकडे काही दिवसासाठी मुक्कामाला गेले व वडिलांना सुट्टी मिळाली ते कव्हर आकले म्हणजे आपल्या घरी आले. एकत्र कुटूंबात बायको मुलीं.च्यात आले. आता जरा निवांतपणा मिळाल्याने घरची बाजूला पडलेली कामे उरकून घ्यावी. भावाला शेतीत थोडीफार मदत करावी अशा विचाराने उत्साहाने कामाला लागले. एरवी ते सातारला शनवारातील कान्हेर वाड्यात व आई आकल्याला घरी. मधूनमधून २/४ दिवस घरी मुक्काम साताऱ्यापासून आकले ७/८ मैलावर असावे. 
    माझे वडील गांधी भक्त होते. म्हणजे नुसते पेपरातील गांधीच्या बद्दल आलेल्या बातम्या बडीशेप चघळत चघळत वाचणारातील नव्हते तर खरे गांधीभक्त देशभक्त होते. ते स्वत: गांधीबरोबर दांडी यात्रेला मिठाच्या सत्याग्रहाला गेलेले होते ६ महिने कुठे बेपत्ता होते. घरादारावर तुळशीपत्र ठेवून थोडी फार जमीन आईचा नावावर करून ३ भाऊ असताना एकाने तरी देशाच्या हाकेला ओ दिली पाहिजे घ्या कर्तव्य भावनेतून गांधीच्या चळवळीत सामील झाले होते. अर्थात आई त्या विषयी फारसे बोलत नसे त्यावरून तीला तो विषय अप्रिय असावा. तिचा एकूलता एक भाऊ म्हणजे मामा रेल्वेत म्हणजे सरकारी नोकरीत स्टेशनमास्तर होते. त्यांच्या इच्छेप्रमाणे आपल्या मेहुण्याने प्रत्यक्ष भाग न घेता सत्याग्रहीना धनधान्य वगैरे देवून अप्रत्यक्ष मदत करावी. पण तो काळ इतका भारलेला होता. परत आले तेव्हा पायावर मीठ बनवण्याच्या क्रियेमुळे मोठे मोठे फोड आलेले होते, मारही खावा लागला असावा जेलमध्ये कसे दिवस काटले असतील पण तेव्हा बायकांना सर्व सांगत नव्हते व त्यांना थोडेच रेकार्ड बनवून ठेवण्यासाठी केले होते. 
यज्ञी ज्यांनी देवूनी नीज शीर
घडीले मानवतेचे मंदिर
तरी जयाचे दहनभूमीवर नाही चिरा नाही पणती|
असे जे कोणी असंख्य होते त्यातलेच माझे वडील होते. 
    असे ते सुट्टीला घरी आले असताना घराचे दुरुस्तीचे काम काढले होते. त्यावेळेच्या भाषेत घर उस्तरून ठेवले होते. आणि अचानक २/४ दिवसांचा ताप आला व ते कोणाच्या ध्यानीमनी नसताना अचानक वारले. मी २ वर्षाची व माझ्या वरची बहीण १० वर्षाची होतो. मोठ्या तिघी लग्न झालेल्या होत्या. छळवादी दीरजाऊ पोटी मुलगा नाही व भोळा सरळमार्गी नवरा अचानक सोडून गेल्यानंतर त्या काळातील बाईच्या वाटयाला जे काही भोग येत असत ते सर्व आईला सहन करायला लागले. व शेवटी आईने आम्हा दोघीं मुलीना घेवून सातारला बहिणीच्या आधाराने बिऱ्हाड केले.
    माझे वडील गेले तेव्हा आजूबाजूच्या ४/५ गावातील लोकसुद्धा शेवटचे दर्शन घ्यायला जमले होते. सर्व गावतर लोटला होताच ते सर्वाना सर्व प्रकारची मदत करीत असत कोणी आजारी असेल तर जातपात न बघता सेवा करीत असत. मदतीला धावून जात असत. त्यांना लोक देवमाणूस  म्हणत असत. त्यांचे दर्शन नीट व्हावे म्हणून ते गेल्यानंतर त्यांनी मांडी घालून व्यवस्थित कपडे घालून कपाळावर भस्म लावून टोपी घालून बसवले होते. तेव्हाच्या काळी काही विशेष साधूवृत्तीच्या लोकांनी असे ठेवत असत सर्वांना नीट शेवटचे दर्शन घेता यावे म्हणून.
    मला नंतर आठवते म्हणजे माझे ७ व्या वर्षी शाळेत नाव घालायला माझी कोकणातील ताई (बहीण) आली होती. नीने माझे नाव ११ नंच्या मुलीच्या शाळेत घालते. त्याकाळी घरातून शिक्षणासाठी प्रोत्साहन वेगैरे कसले आलेय. आणि माझ्या घरात तर एकटी आईच. कमी काय अभ्यास करते काय नाही कोण बघतेय? कारण आईला कुटूंब निर्वाहासाठी सोसायटीच्या मंडळातर्फे मसाले हळद तिखट वगैरे कामासाठी जावे लागे नां? मी तेव्हा दुसरीत नापास झाल्याचे मला आठवते पण त्यानंतर मात्र मी हुशार विद्यार्थीनी झाले. नंतरच्या आयुष्यात कधीही अशी नामुष्की पत्करावी लागली नाही. तो दुसरीचा अभ्यास डबल करावा लागल्याने अभ्यासाची पद्धत पक्की लक्षात आली. थोडक्यात म्हणजे नॅक जमली. नंतर चौथीपर्यतचे शिक्षण अगदी व्यवस्थित इतर चारचौघीसारखे झाले. खेळणे हुंदडने मैत्रीणी अभ्यास आम्ही अतिशय गरीब आहोत असे कधी विशेष वाटत नसे कारण आजूबाजूस साधारण बरेच तसे लोक असत. माझी १ मैत्रीण कमल आडवीलकर शाळेत डब्यात फक्त १/२ भाकरी आणत असे व ती सांगत असे की जेवणातील अर्धी भाकरी कमी करूनच मला डब्यात आणावी लागते अत्यंत गरीबीमुळे तीला असे करावे लागे. पूर्वी माणसे घरात भरपूर पण आजच्यासारखे पैसे कमावण्याची वेगवेगळी साधने उपलब्ध नव्हती. एकूनच बाजारातील पैसाच कमी होता. कमलच्या मनाने आमचे चांगले होते आम्हाला आमटी भाकरी पोटभर मिळत असे. दुधवाला गवळी होता मध्यंतरी सरकारी पावडरचे दुध अर्धाशेर असे सर्वांना फुकट मिळत असे. ते आणीत असू. तेवढेच दुधाचे बिल वाचत असे. 
    मी चौथीतअसताना माझी मोठी बहीण बाळंतपणासाठी माहेरी आलेली होती. तिचे डोहाळेजेवण फार छान केले होते. तेव्हा फारच मजा आली होती. तेव्हा बकुळीचे गजरे इतके मोठेमोठे केले होते की आजही ते माझ्या डोळ्यापुढे जसेच्या तसे दिसत आहेत. बकुळीची फुले फुकट मिळतात ना व तेव्हा आमच्या घराशेजारीच मोठे बकुळीचे झाड होते. तेव्हाच्या काळी डोहाळतुळीला ओळखीच्या सगळ्याकडे जेवायला बोलावत असत व कापड व फुलाची वेणी मिळत असे मला सगळीकडे तिच्याबरोबर जावे लागे. व डोक्यात फुलाची वेणी तिची घालायला मिले. फारच आनंद होई. तसेच त्या काळी ९ दिवस नवरात्रीची कुवारीन मला जावे लागे. रोज गोड पक्वान्न असे. शेवटच्या दिवशी कुवारणीला देवी समजून तिची कापड वगैरे देवून बोळवण करीत असत. गरीबांची मुलगी म्हणून मला डिमांड असावी. पण शाळेला उशीर व्हायचा म्हणून कधीकधी राग यायचा पण बोलावणे आल्यावर नाही म्हणायचे नसे. आमच्या घरमालकांच्या सुनेने मला सांगितले होते की तुला फ्रॉकचे कपडे मी मुंबईहून आणीन. मी किती दिवस त्या कपड्याची वाट पहात होते. कसले आणतील? काय आणतील पण ते काही शेवटपर्यत नाहीच मिळाले. 
    त्या बहिणीचे (ठकूचे) पहिले बाळंतपण सुखरूप होवून ती आपल्या सासरी गेली आणि त्या नंतर आईला ताप आला हळूहळू दुखणे वाढू लागले. मी तेव्हा १० वर्षाची होते. जी आई आजारी पडली ती शेवटपर्यत म्हणजे ५ वर्ष आजारीच होती संधीवात झाला म्हणे प्रथम प्रथम खूप औषधे केली झाडपाले, वाफारे, काढे, तेले वगैरे सर्व केले. तेव्हापासून सर्वाचेच नष्टचर्य सुरु झाले म्हणायचे. तेव्हा मला काही एवढे वाटले नाही पण सर्वच मोठ्या बहिणीना खूप टेन्शन आले असणार एकतर पैसा अगदी तुटपुंजा घर सुद्धा भाड्याचे माझे पोरवय पण आमची चंपुताई व ती तात्यांनी मोठ्ठाच आधार दिला. तेव्हा एक बील्यमपल्ली नावाचे फेमस डॉक्टर होते त्यांना १/२ वेळेस तात्यांनी आणले होते आईला तपासायला मी व माझा भाचा सुरेश (गणू) आम्ही दोघे डॉक्टरकडे आईचे औषध आणायला जात असू तेव्हा डॉ. आम्हाला बहीण भाऊच समजत असत. कारण आम्ही पाठोपाठचे दिसत असू. तेव्हा ते डॉक्टरची व्हिजीट फी १२ रु. होती व ते त्यांच्या मोटाराने येत असत. तेव्हा कार वगैरे न म्हणता मोटार किवा गाडीच म्हणत असत. ही साधारण १९५२ सालातील गोष्ट आहे. पण दुखणे कमी झाले नाही. माझी ४ थी ची परीक्षा झाली व नंतर मोठ्या शाळेत घालायचे कारण प्राथमिक शाळा ४ थी पर्यतच होती तेव्हा चंपुताईचे बाळंतपण आले होते. तेव्हा तिच्या घरासमोरील शाळा नं. १६ मुलीच्या शाळेत नाव घातले. म्हणजे मधल्या सुट्टीत थोडा उपयोग तिला चहा वगैरे करून द्यायला व संध्याकाळी थोडेफार काम निरोप वगैरे साठी बरे पडेल. कारण आम्ही तेव्हा चिमणपुऱ्यात रहात होतो व पंचपाळी हौदावर शाळा होती. नंतर ६ वी साठी आमच्या घराजवळ ६ नं. मुलामुलीची शाळेत नाव घातले. घरचे सर्व काम करून शाळा करावी लागे. आईचे दुखणे वाढतच चालले होते. नंतर मग चंपूतीईला घरचे मुलांबाळाचे करून एवढ्या लांब आईकडे बघायला जमत नसावे म्हणून तात्यांनी आईला व मला त्यांचेघरी नेले त्यामुळे अर्थाचा ७ वी साठी राजवाड्यातील मुलीची ८ नं. शाळा चालू झाली. १ वर्ष आम्ही त्यांचेच कुटूंबात रहात होतो. ते दोघे ४ मुले आले गेले व आम्ही दोघी जागा फक्त खोल्या (भाड्याने) ते कसे काम करीत असतील आता विचार केला की वाटते आम्ही फक्त महिन्याला २५ रु. आमच्यासाठी खर्च करू शकत होतो. दर महिन्याला घरात २५ रु. देत होतो. नंतर जागेच्या अडचणीमुळे असावे पंचपाळी हौदाजवळच साठे वाड्यात खोली भाड्याने घेवून मी व आई तेथे राहू लागलो. भाडे बहुतेक २ रु. असावे असे वाटते. 
    मी ८ वी गेले आणि माझे नाव कन्याशाळेत घातले, आहाहा! काय सुंदर शाळा होती ती मला इतका आनंद झाला. साधारण बहुतेक मुली ७ वी पर्यत म्युनिसिपालटीच्या शाळेत फुकट शिकत असत व ८ वी पासूनच आम्हाला इंग्रजी सुरु झाले. अगदी ABCD पासून. फक्त हायस्कूलमध्ये श्रीमंताच्या मुली ५ वी पासून घालत. त्यांना बहुतेक ५ वी पासून इंग्रजी सुरु होते असे वाटते.
    मला कन्या शाळा खूप आवडली व पण ती माझ्या नशिबात नव्हती कारण बरोबर १ वर्षाने म्हणजे २५ जूनला मी नववीत गेले असताना माझ्या आईला काळाने ओढून नेले. व त्या दिवशी मी अगदी खऱ्या अर्थाने निराधार पोरकी झाले. माझे ७ वी शिक्षण सौ. विमल (ठकू) मुळेच चालू झाले. चंपुताई व ठकुला शिक्षणाची आवड होती. आईच्या संसाराला चापुंताई व विमल खूप मदत करीत होत्या. 
    लहानपणचे काही स्मरणात राहिलेले अनुभव सफरचंद माझ्या लहानपणी आईने फक्त १ वेळेस व तेही १ आणले होते ते आम्हाला कोण कौतुक झाले होते. काहीतरी अगदी अलौकिक वस्तू अशी लपवून ठेवून मग सर्वाना दिली होती. आमच्याकडे कात्री नव्हती. आई माझी पोलकी परकर विळीवर फाडून बेतत असे व हाताने शिवत असे. कधीमधी कोणाकडून कात्री उसनी मागून आणत असल्यास न कळे. पण मग मी विळीवर कापलेले बघीतले आहे आमच्याकडे २ बशातील १ फुटली तर २ कप १ बशी असे कित्येक दिवस होते. तसेच मी अगदी लहान असताना मामा दरमहा १० रु. मनीऑर्डर करीत असत. सावित्रीबाई साठ्ये अशी पोष्टमनची हाळी आली की आम्ही खुश आईला लिहिता वाचता येत होत. सही करता येत होती. नंतर पुढे बंद केली. मी साधारणतः ७ वीत असताना सिगरेटच्या पाकिटांचा पूर्ण ५२ पत्यांचा कॅट बनवला होता. व तेव्हा सिगरेटच्या रिकाम्या पाकीटांची तोरणे चटया, खेळातील कुत्रा असे फार बनवत असेत. ते सर्व रस्त्यातून फुकट मिळत असे फुटक्या बांगड्यांची तोरणे बनवणे. तेव्हा हे असलेच करमणुकीचे प्रकार रेडिओ आमच्याकडे तर सोडा आमच्या माहीतीत पण जवळजवळ कोणाकडेच नव्हता. रेडिओ मी पुण्याला प्रथम बघीतला. 
    आई वारल्यानंतर मामा मामी दहाव्या बाराव्याला आले ते जाताना मला वाईला घेवून गेले. ४ दिवसापूर्वी मला कल्पना पण नव्हती की आपण आता वाईला जाणार आहोत. अर्थात शाळेतून नाव कडून नेले. मग १ वर्षभर मी घरीच होते. खरे तर मी तशी बऱ्यापैकी हुशार होते. पण मामा मामीना मधूनमधून मुंबईला जायचे असे तेव्हा माझी शाळा होणे शक्य नाही म्हणून शाळेतून नाव काढले. मी साताऱ्यातून वाईला आले तेव्हा १५ वर्षाची होते व साड्या नेसायला लागले होते. आताच्या १५ वर्षाच्या मुली मॅट्रीक पास होतात व कितीतरी स्मार्ट असतात. अर्थार सध्याच्या काळात आईवडील ३ वर्षापासून त्यांना जाणीवपूर्वक घडवत असतात. थोडक्यात एकाद्या बागेतील कुशल माळी फुलझाडे फुलवत असतो ती सुंदर होणारच व माझ्यासारखी रानफुले, रानझाडे, आपोआप वाढत असतात. आमच्या आईने आम्हाला इस्टेट ठेवली नव्हती पण अशी काही शिदोरी बांधून दिली होती की ती आजतागायत तिच्याच आधारावर आम्हा सर्व बहिणीचे जीवन चालू आहे. ती नेहमी म्हणत असे आपण नेहमी पायी चालणाराकडे बघावे घोडयावर बसणाराकडे बघू नये. आपल्यापेक्षा पण जगात कितीतरी वाईट परिस्थितीत लोक जत असतात त्यांच्यापेक्षा आपण सुखी आहोत ना? नेहमी माणसाने समाधानी हसतमुख असावे व कष्टाला कधी मागे सरू नये. कामाने माणूस मरत नाही. जगात एकतर काम, कष्ट, प्यारे आहेत किंवा पैसा आपल्याकडे पैसा नाही तर कष्टाला मागे सरू नका. कोणालाही मदत करावी तरच तुम्ही कोणाला आवडाल आताच्या काळात हे तत्वज्ञान कदाचित कोणाला पटणार नाही. 
    मी वाईला आल्यानंतर माझे आयुष्यच बदलले. आई गेल्याचे दु:ख होतेच. पण मामीच्या प्रेमळ छत्राखाली पन्हा एकदा लहान झाल्यासारखे वाटू लागले. कारण स्वयंपाक बाजारहाट, भांडी घासणे, धुणीधुणे, दळण करणे आईची ५ वर्षे जागेवर असल्यामुळे करावी लागणारी कामे ही कामे काहीच करावी लागत नव्हती, कामाचे स्वरूप बदलले आंगण झाडणे, सडा रांगोळी, खोत्र्यांची केर काढणे, देवाची उपकरणी कपबशा घासणे व देवपूजेची तयारी, धुणे एवढीच तशी हलकीफुलकी कामे करावी लागत. मामांचा मोठा वाडा होता. २/३ भाडेकरू होते. विहिरीवरून पाणी काढावे लागे. फुलांची मागे पुढे मोठी बाग होती. रोज डोक्यात गुलाबाची फुले व जुईचे गजरे करून घालणे हे एक गोड काम होते. नदीवर मैत्रीणीच्या बरोबर जावून जावून पोहायला मात्र शिकले. मामा मात्र फार कडक होते. त्यांचा सतत धाकच वाटत असे मी त्या वर्षात मामाशी वर मान करून १० मिनिटे सुद्धा बोलले नसेन. जे काय चाले ते मामीच्या मध्यस्तीने मामी पण मामांच्या धाकात असत. त्या दोघांचे वाद अगर भांडण मी कधीच ऐकले नाही. वादाचा व भांडणाचा प्रश्नच नसे मामा जे ठरवतील तेच घरात चालत असे. मामीला देवाला जायला किंवा दळणाला पैसे लागले तरी त्या मामाकडून मागून घेत असत. नाही म्हणायला मामांची मोठी मुलगी बबीताई तिचे मात्र मामा ऐकत असत. त्यांच्या दृष्टीने ती एकदम हुशार होती. ती होती खरीच कर्तुत्ववान न संसार उत्तम करीत असे. अगदी शिस्तशीर मुंबईत रहात होती व स्वत:चा बंगला बांधला होता. ती अजून आहे. 
    त्या वर्षाच्या मुक्कामात माझे मामा मामीबरोबर मुंबईला जाणे झाले जवळजवळ २/३ महिने आम्ही मामेभावाकडे दादरला होतो. मी आयुष्यात पहिल्यादा रेल्वे पहिली मुंबई पहिली व मुख्य म्हणजे चाळीचे आयुष्य जवळून अनुभवले. वाईच्या मुक्कामातच मला माझ्या मामेभावामुळे वाचनाची गोडी लागली. त्याने मला सहज म्हणून ५ रु. दिले होते. त्या पैशांनी मी २ महिने टायपींगचा क्लासला गेले. २.३० रु. महिना फी व वेळ दुपारी २ ते ३ म्हणजे मामा झोपलेले असताना त्यांच्या न कळत पण मामीच्या संमतीने तो भाऊ म्हणजेच नी. र. सहस्रबुद्धे पार्ले टिळक विद्यालयाचा प्रसिद्ध प्रिन्सिपॉल त्याला घरी सुधन म्हणत असत. तेव्हा दुपारचे उद्योग म्हणजे घरच्या घरी जे साहित्य असेल त्यातून काही वेळ घालवणे. पोटीचा बटवा विणून केला मामे बहिणीची भरतकामे करून दिली. घरी कोणी आल्यास फार आनंद होई. कारण तेवढाच वेळ छान जात असे. भविष्यकाळ काहीच माहित नव्हता. संध्याकाळी १ ते १.३० तास सार्वजनिक वाचनालयात जावून पुस्तके वाचत बसणे. ती चटक लागली होती. पण ते मामांना कसे काय चालत असे त्याचे आता आश्चर्य वाटते. पण शक्यतो मामा लायब्ररीत यायच्या आधी बाहेर सटकायचे. संध्याकाळी दिवे लागायच्या आत घरी मुलीनी यायलाच हवे. हा नियम पूर्वी सर्वच घरातून होता. 
    माझे हे असे दिवस चालू असताना तिकडे पुण्यास माझी मोठी बहीण स्वस्थ बसलेली नव्हती. तिने पुण्यात मला शिक्षणासाठी नेण्याच्या दृष्टीने खटपट चालवलेली होती. ती एकत्र कुटुंबात होती. ते लोक पण मध्यमवर्गीयच होते. व भाड्याचे घर व ते पण लहान घरात माणसे बरीच. तिचे २ दीर, जावा, त्यांची मुले व पै पाहुणा शिवाय घरात दुधाचा (डेअरीचा) धंदा पारंपारिक चालू होता. घ्या सगळ्यात आणखी १ मेंबर वाढवायचा व तो पण तरून मुलगी कठीणच की. पण त्या लोकांच्या सहकार्याने मला पुण्याला शिक्षणासाठी आणण्याचे ठरले असावे. माझी १ आतेबहीण व १ आत्या अशा जवळच रहात होत्या. त्यांचेकडे मी रोज रात्री झोपायला जात असे. मला पुण्याला बोलावले ते जूनमध्येच एकदम शाळाच सुरु झालेली. माझे नाव जयहिंद विद्यालय प्रायव्हेट स्कूलमध्ये एकदम १० वीत घातले. गरीब म्हणन फी माफ ९ वी चे पूर्ण वर्ष परिस्थितिने उजाडायला लावलेले. बर पुढे शिकायला मिळेल ही सुतराम कल्पना नसल्याने अभ्यासाला स्पर्शपण केलेला नव्हता. ९ वी ची पुस्तके घेतलेलीच नव्हती कारण त्या वर्षी १० जूनला शाळा सुरु झाली व लगेचच १५ दिवस सुट्टी पडली कारण प्लूची फार मोठी साथ साताऱ्यात आली होती.
    अशा तऱ्हेने अस्मादिक काहीएक कल्पना नसताना अचानक आपल्या १० वीत जावून बसल्या अर्थात प्रायव्हेट शाळेत त्यावर्षी चांगला अभ्यास करून वार्षिक परीक्षेत चक्क दुसरा नंबर आला. त्यामुळे आत्मविश्वास वाढला. घरातल्यांना पण जरा बरे वाटले की ही जबाबदारी घेतल्यासारखी एकदाची मॅट्रीक होणार बहुतेक. त्या दुसऱ्या नंबरचे रहस्य म्हणजे वर्गात मुली बाहेरच्या हायस्कूलपेक्षा कमी व अशाच मागे पडलेल्या काहीतरी कारणाने अभ्यासाची वर्षे बुडलेल्या वगैरे व IMP च्या नावावर पेपरात येणारे बरेचसे आधीच वर्गात करून द्यायचे किंवा घरी करायला सांगायचे. त्या शाळांना पण त्यांच्या संस्था चालायला हव्यात ना? पण ११ वीच्या वर्षी मात्र आम्हाला सर्वाना रेग्युलर बी. रा. वेलणकर हायस्कूलमध्ये जयहिंद विद्यालयातर्फेच पाठवले. तेथे मात्र सर्व अगदी व्यवस्थित अभ्यासक्रम शिकवीत असत. तेथे गोखले सर इंग्रजी व रानडे सर मराठी उत्तम शिकवीत असत.
    मला जयहिंद विद्यालयात मराठीची जास्त गोडी लागली तेथे एक सहस्रबुद्धे सर होते. मराठी खूप छान शिकवीत असत. त्यांनी बाहेरची इतकी पुस्तके आम्हाला वाचायला लावली. पडघवली गो. नी. दांडेकर, शितू, बनगरवाडी, व्यंकटेश माडगुळकर अशी सुंदर सुंदर पुस्तके वाचायची गोडी लागली. त्या वर्षी मराठीची १ परीक्षा पण आम्ही मुलींनी दिली होती. पहिली परीक्षा फस्टक्लासमध्ये मी पास झाले. विमलच्या घराशेजारीच गोखले हॉलमध्ये सार्वजनिक वाचनालय होते तेथे पण संध्याकाळी पुस्तके वाचायला जावून बसे. जयहिंद विद्यालयात माझी १ मैत्रीण निला कामत म्हणून अतिशय बुद्धिमान होती तिचा कायम पहिला नंबर असे. तिला काहीतरी मोठा आजार झाला होता म्हणून बिचारीची रेग्युलर शाळा बरेच महिने की १/२ वर्षे बुडली. ती पुण्याच्या मॉडर्नस्कूलची विद्यार्थीनी होती. पण मला तिच्यामुळे पण त्यावेळी मनात खुपच अभ्यासाची जिद्द निर्माण झाली. 
    जून १९६० साली मी मॅट्रीक झाले. व नोव्हेंबर २७ ला १९६० सालीच माझे लग्न झाले. लग्नाचे साठी फक्त १००० रुपयेच खर्च करणे शक्य होते. कारण माझी आई वारल्यानंतर तेवढेच फक्त शिल्लक राहिलेले होते. नंतरची २ वर्षे बहिणीकडे व १ वर्षे मामाकडेच होते नां? माझे मामा रिटायर झाले तेव्हा सेवेत डेप्युटी कंट्रोलर होते. व ही किती जुन्या काळातील गोष्ट. तसे सधन होते पण शेवटी मी त्यांची मलगी थोडीच होते? त्यांना २ मुलगे व ३ मुली अशी होती. त्याचे सर्वाचे लग्ने कार्य होवून संसार सर्वाचे चांगले चाललेले होते. तेव्हा मामानी लग्नाचे बैठकीत सांगितले की ५०० रु. उचलून देवू व ५०० रुपयात लग्न करून देवू. माझ्या सासू सासऱ्यांनी लगेच मान्य केले. कारण त्यांना त्यांच्या मुलीकडून माझी सर्व परिस्थिती माहितच होती. 
    झाले! माझे लग्न त्या पैशात पण अगदी व्यवस्थित पार पडले. कार्यालय २ दिवस घेतले होते. कारण सासरच्या लोकांना उतरण्याची सोय कोठे नव्हती म्हणून व गोरज मुहूर्त होता त्यामुळे आदले दिवशी रात्रीपासून टे लग्नाचे दुसरे दिवशी दुपारपर्यत द्यावेच लागते. लग्नानंतर मला हक्काचे घर मिळाले पण लग्नातील कुरबुरीमुळी माझे मामाकडील घर जवळजवळ तुटले. पुढे होणाऱ्या घटनांची ती जणू नांदीच होती. आता इतक्या वर्षांनी नंतर वाटते की ते सर्व पूर्व नियोजित असावे म्हणजे मुलीच्या ल्ग्नानतर उगाच सणवार, बाळंतपण बारसे वगैरेचा व्याप ताप व खर्च आपल्या वडिलांना नको म्हणून आमच्या ताईने मामेबहिणीने काहीतरी कुरापती काढून मते बिघडवून ठेवली. त्यावेळेस मामाच्या मुलांपैकी फक्त मोठी मामेबहीण व तिचे मिस्टर मामा मामी व २ मामे वहिनी एवढीच मंडळी आली होती. मला सख्खा भाऊ नसून एकही मामेभाऊ आला नाही. माझे लग्न पुण्यात झाले. माझ्या चौघी बहिणी सहकुटुंब होत्या. आईच्या पैशाव्यतिरीक्तचा जादा खर्च सर्व बहिणीनीच वाटून घेतला. माझी सासरची मंडळी फारच समंजस आहेत. माझ्या सासऱ्यांनी प्रथमच सांगितले होते की तुमच्या बजेटच्या बाहेर खर्च गेल्यास आम्हाला सांगा आम्ही देवू. पण काही तसे मागावे लागले नाही. विमलच्या वाड्यातील सर्व शेजारणीनी तिच्या जावानीच सर्व कष्टाचा भर उचलला. 
    माझे लग्न झाले तेव्हा घ्याना पगार १३२ रु. होता. व ते म्युनिसिपल कार्पोरेशनच्या दवाखान्यात कंपौडर म्हणून होते. मला आजूबाजूला विचारत असत तुला कसा नवरा पाहिजे तेव्हा काय सांगणार? माझ्या सारखीणेने अशा काय मोठ्या अपेक्षा ठेवून उपयोग? मी आपली म्हणत असे सरकारी नोकरी असली की झाले. पण मला खरे तर कंपौडर अजिबात अपेक्षित नव्हता. खरे तर काय क्लार्क काय आणि कंपौडर काय? पण काहीतरी कमीपणा वाटत असे. पण घरातील माणसे अत्यंत सज्जन व इतर पण वातावरण छान मुख्य म्हणजे घरात त्यांना आई वडील भाऊ बहीण असे सर्व असल्याने माझ्यासारख्या मुलीस खुपच भक्कम आधार मिळाल्यासारखे होणार होते. व हे दिसायला सुरेख आणि डाराप्समनचा कोर्स करीतच होता तेव्हा हा सगळा विचार करून हो म्हटले. तेव्हा सुद्धा मामा मामींना मनात नव्हते कारण त्यांना पूर्वीपासून दम्याचा त्रास होता. पण त्याच्या वाद्यात मामाच्या मनात असलेले स्थळ मला पसंत नव्हते. मी पुण्यास क्रेपची फुले शिकायला जात होते. त्या बाई जोशी त्यानीच मला आपली भावजय करून घेतले. माझ्या लग्नानंतर पण मामा व मामेबहीण नाराजच होते. त्याचा परिणाम म्हणजे माझ्या लहानपणचे आई वडीलांच्या काळातील दागिने एकवाणी व चांदीचा कमरपट्टा मला द्यायला लागू नये म्हणून कोठेतरी तो मोडून त्याचे आलेले पैसे दान करून टाकले व पावत्या आम्हाला आठवणीने पाठवल्या. माझ्या बहिणींना त्यांनी विचारले होते की त्या दागिन्यांचे काय करायचे. त्यांनी सांगितले की धाकटीचे आई वडीलांच्या हातून काहीच झाले नाही तेव्हा ते तिलाच देवून टाका पण मामांनी की मामेबहिणीनी ऐकले नाही. 
    अशा रीतीने मी बगुताई साठ्येची सौ. उषा शरद परांजपे असे सुंदर नाव घेवून संसार करू लागले. लग्नानंतर घ्यानी ६ महिन्यातच कंपौडरची नोकरी सोडून मेकॅनिकल डराप्समनची नोकरी धरली. ती नोकरी ८ वर्षे केली. लग्नानंतर मी अंधेरीला इंग्रजी मिडीअम‌मधून STC चा कोर्स केला. म्हणजे तेथे फक्त गुजराथी व इंग्लिश मिडीअमच होता लेसन मराठी मिडीअमच्या शाळेत द्यायचे. म्हणून मी गमतीने म्हणते मी ८ शिक्षणसंस्थाची माजी विद्यार्थीनी आहे. 
    लग्नानंतर बरोबर २ वर्षांनी पहिले मुल झाले. मी तेव्हा २० वर्षाची होते. आमच्या ताई (सासूबाईंनी) सर्व माझे सणवार डोहाळेजेवण बरसे सर्व हौशीने केले माझी मोठी जाऊ व नणंद ह्यांनी पण खुपच हौसेने कपडे स्वेटर्स वगैरे तयार करून बारशासाठी आणले होते. आमच्या सासरचे वातारवण एकदम सुधारक घरातील सर्वजण सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कृत कारण सुशिक्षित असलेला सुसंस्कृत असेलच असे मुळीच नसते. घरात सोवळे ओवळे देवधर्म व्रतवैकल्ये वगैरे काही नाही पण संपूर्ण निर्व्यसनी, पूर्ण शाकाहारी, परोपकारी अतिशय समंजस असे कुटूंबातील लोक माझे सासुसासरे दीर सर्वजण अगदी निस्वार्थी. माझ्या जावा दीर सर्वजण खूप शिकलेले व जावा तर सर्वच बड्या घरातील पण मला आयुष्यात कधीही कोणी १ शब्दाने पण दुखावले नाही. सर्व कुटूंबात आर्थिक दृष्ट्या आम्ही कमकुवत पण आपल्याला प्रसंग पडला तर हे सर्व जन आपल्या पाठीशी भक्कमपणे आहेत ही भावनाच लाखमोलाची वाटत असे. 
    पहिल्या भूषणच्या जन्मानंतर ४ वर्षांनी तो दादा झाला. भूषण १९६२ सालचा १० नोव्हेंबरचा  तर किरण १९६६ सालच्या ९ नोव्हेंबरचा व आमचे लग्न २७ नोव्हेंबर १९६० एकंदरीत नोव्हेंबर महिना मला शुभ लागला. आमचा संसार तसा थोडा अडखळत चालू होता म्हणजे घ्यांच्या तब्बेतीमुळे त्रासलेले नोकऱ्या सुटत असत. असे करीत करीत किरण १|| वर्षाचा झाल्यावर घ्यांना दम्याचा भयंकर त्रास होवू लागल्याने आम्ही मुंबई सोडायचे ठरवले नोकरी सोडून नाशिकला कोरड्या हवेत (भगूर येथे) येवून राहिलो. प्रथम ८ दिवस भूषणचे मावशीकडे व ८ दिवस घ्याचे मावशीकडे असे सहकुटूंब राहिलो व नंतर वेगळे बिर्हाड व असे ६ महिने नुसत रिकामे पैसे खर्च करत होतो. मेडीकल स्टोअर्ससाठी हे गावोगावी फिरून योग्य ठिकाणाचा शोध घेत होते. व शेवटी भगूर येथेच मेडिकल स्टोअर्स काढायचे ठरले. जागा व दुकानची जागा अंबादासशेठ पवार घ्यांनी आम्हाला भाड्याने दिली. दुकानाला नाव मोठ्या मुलाचे दिले भूषण मेडिकल स्टोअर्स फक्त ३००० रु. भांडवलात त्यात फ्रीजसकट दुकान सूरु केले जुने फर्निचर मुंबईहून आणले. माझ्या सासू सासऱ्यांचे हस्तेच दुकानाचे उद्घाटन केले. खरे तर मागल्या पिढीतून कोणीच व्यापार केला नसल्याने वडील तयार नव्हते पण त्याचेजवळ पण दुसरा पर्याय नव्हता म्हणून मग काही बोलले नाहीत. दुकान मुंगीच्या गतीने हळूहळू प्रगती करीत होते. मुले मोठी होत होती. भगूरला आलो तेव्हा भूषण मराठी दुसरीत होता. व किरण १|| वर्षाचा होता. माझा भूषण म्हणजे पहिल्यापासून अतिशय बुद्धिमान आहे त्याला बालवाडीत घातलाच नव्हता पण त्याला घरीच सर्व आकडे आणि गाणी अक्षरे शिकवली की येत असत. शाळेत त्याचे नाव घातल्यापासून १ ते १० वी सतत पहिला नंबर येत असे. भूषणचे नाव त्याचे आजीने सुचवले पण तेव्हा भीती मनात वाटत असे नाव भूषण ठेवले चांगला निघाला तर बरे नाही तर! पण तो खरोखरच शाळेचेच काय गावाचे भूषण ठरला मिडलस्कूल स्कॉलरशिप, हायस्कूल स्कॉलरशिप, अंतरशालेय वक्तृत्व स्पर्धात बक्षीसे N.C.C त बेस्ट कॅडेटच बक्षिस असे सर्व मिळवले. शिक्षकांचा लाडका विद्यार्थी होता. त्यांची प्रगती सतत होत राहिली पुढे तो (बी.ई. प्रोडक्शन) व्ही. जे. टी. आय, सारख्या उत्तम संस्थेतून इंजिनिअर झाला व आता महिंद्रा अँड महिंद्रा मध्ये नोकरी करीत आहे. भूषणला कधीही ट्यूशन वगैरे नाही कारण आमचे गाव बारा चौदा हजार वस्तीचे खेडेच म्हणाना तेथे उत्तमोत्तम क्लासेस वगैरे काहीच नाही. स्पेशल मार्गदर्शन कोणतेही नाही. आम्ही आईवडील पण साधे मॅट्रीक पण त्याचा त्याने ऐकटयाने अभ्यास केला. शाळेत कॉलेजात काय शिकवतील ते व बाकीचा स्वतःच्या स्वतः .
    धाकटा किरण पण हुशार आहे पण तो जरा पहिल्यापासून हूड आहे. पण दादाचे यश बघून त्याने सुद्धा जिद्दीने आघाडी मारली. कधी भावाच्या दुस्वास केला नाही. किरणने सुद्धा मिडल स्कूल स्कॉलरशिप, हायस्कूल स्कॉलरशिप, N.C.C. बेस्ट कॅडेट चे बक्षीस अशी मिळवली पण वक्तृत्व कला अगांत असून मुद्दाम भाग घ्यायचा नाही. फक्त १ वेळेस १५ ऑगस्टला भगूरच्या शिवाजी चौकात इंग्रजीतून भाषण केले होते. त्यावेळेस तो ७ वीत होता बहुधा लहान होता. अर्थात ते भाषण पाठ करून घेतलेले असते. पण एवढ्या मोठ्या समुदायापुढे इंग्रजीतून म्हणून विशेष किरण सुद्धा आता (बी.ई. प्रोडक्शन) व्ही. जे. टी. आय मधूनच झाला. व तो पण पुण्याला Thermex कंपनीत नोकरीस आहे. आमच्या दोघाही मुलांना कधीही अगदी स्कॉलरशिपच्या परीक्षेच्या वेळी सुद्धा शिकवणी हा प्रकार माहित नाही. कारण भगूरमध्ये क्लासेस नाहीतच तसे शिक्षक घरी घेतात पण तज्ञ शिक्षकांचे वर्ग तेथे चालत नसल्याने व शिकवणीला घ्याचा विरोध असल्याने अगदी १० वी १२ वी सुद्धा सर्व अभ्यास स्वत:चा स्वत: दोघांनी करून उत्तम यश मिळवले हे विशेष. पूर्वी स्कॉलरशिपचे वर्गपण शाळेत घेत नसत. कारण भगूरला मुले २/३ च बसत असत. आमची दोन्ही मुले ४ थी पर्यत झेड पी च्या शाळेत शिकली हे  विशेष आहे. त्यांना त्याचे नशिबाने गुरुजन चांगले मिळाले संस्कार चांगले झाले. आम्ही आई वडील त्यांना फक्त प्रोत्साहन देत असू व काकासारखे तुम्हाला मोठे व्हायचे आहे. आपल्याकडे वडीलार्जीत इस्टेट काही नाही तुम्हाला स्वत:च्या कर्तुत्वाने पुढे यायचे आहे. आम्ही त्यांच्यावर संस्कार चांगले केले. त्याच्या नशिबाने माझ्या सासरी व माहेरीपण आदर्शांना तोटा नाही. अर्थात त्यांनी कष्ट केले मेहनत केली आम्ही फक्त आई वडिलांचे कर्तव्य पूर्ण केले असे आम्हाला वाटत आहे. आता भूषणने J.C.W.A पूर्ण केले किरण करीत आहे. भूषण ब्रीज उत्तम खेळतो व किरण बुद्धिबळ खेळतो. बक्षीस दोघेही मिळवत आहेत. लहानपणापासून त्यांना घरच्या परिस्थितीने व भगूरच्या वातावरणामुळे श्रीमंतीखेळ कधी खेळायला मिळाले नाहीत मैदानी खेळ खळण्याची पण संधी नव्हती तेव्हा बैठे खेळ व बुद्धीचे खेळ ते खेळतात.
    मला कधीकधी आश्चर्य वाटते की दोन्ही मुलांना सारखे शिक्षण कसे मिळाले. तसे काही आमच्या निश्चय नव्हता. निश्चय करून घ्या दिवसात मार्काच्या चढाओढीमुळे शक्य नसत. भूषण संसारात पहिला शाळेत नंबर पहिला किरण संसारात दुसरा आला शाळेत सुद्धा कायम दुसरा नंबर क्वचित पहिला येत असे. म्हणजे मॅट्रीकला सुद्धा भूषण केद्रात पहिला,किरण दुसरा आला. दोघेही व्ही. जे. टी. आय. संस्थेतच इंजिनिअर झाले. एकच ब्रॅच फक्त जे यश भूषणला सहज मिळत गेले ते किरणला थोडा संघर्ष करून यश खेचून आणावे लागले. म्हणजे किरणला बारावीला कमी मार्क पडल्याने प्रथम गव्हर्नमेंट पॉलीटेक्नीक पुणे येथे D.M.E करून मग मेरीटवर बी.ई.ला अॅडमिशन मिळाली. पण त्याने घरापासून ६ वर्ष दूर होस्टेलला राहून शिक्षण पूर्ण केलेच. दोघानाही फस्टक्लास मिळाले. 
    आता ५ वर्षापूर्वी भूषण मेडिकल स्टोअर्स बंद केले. घर विकून टाकून आता रिटायर आयुष्याची मजा अनुभवीत आहोत दुकानात आम्ही सर्वानीच कष्ट केले. संपूर्ण १९ वर्षात दुकानात नोकर नाही. झाडू मारणे पासून मालाची खरेदी, विक्री, अकौंटची कामे सर्व आम्ही करीत असू. माझ्याकडे खरेदी व अकौंटचे काम व अत्यंत महत्वाचे विक्रीचे काम हे स्वतः बघत असत. मुळे विशेषतः भूषण १२ वी पर्यत घरीच होता. तेव्हा फार मदत करीत असे. आज आम्ही जे आरामात आहोत त्यात सर्वाचाच वाटा आहे. प्रामाणीकपणा काटकसर, निर्व्यसनी, यामुळे आमचा संसार येथपर्यत येवून पोहोचला आहे. 
    खरा विचार केला तर आम्ही दोघेही लहानपणी असलो काय व नसलो काय सारखेच होतो. आमच्या नसण्याने कुटूंबात कोणाचेच अडणार नव्हते कारण मी मुलगी म्हणून व हे आजारी. आईला दसरी ४ मुळे होती की व हे तब्बेतीमुळे अभ्यासात मागे पडले सर्व भाऊ एकदम हुशार त्यामुळे अर्थातच आईचा नावडता असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण जसे एखादे झुडूप कोठेतरी रानावनात वाढत असते कोणाचे लक्ष नसते जगाच्या दृष्टीने अगदी नगण्य पण तेच उनपावसाशी झगडत तसेच वाढत असते व एकेदिवशी त्याला छान फुले फळे आलेली दिसतात मग जगाचे लक्ष तिकडे जाते! आरे हे चांगले झाड दिसतय की आपण तर त्याच्याकडे किव करून बघत होतो. थोडक्यात नगण्य समजत होतो. असा आहे हा माझा संसार!
    आज माझ्या वयाला ५० वर्षे पूर्ण होतील. तसे आयुष्य ठीक गेले. यापुढील कुणी सागावे? आता भूषणचे लग्न होवून त्याला १ गोडस मुलगापण आहे. सुवर्णा भूषणला सर्वार्थाने योग्य अशीच जोडीदार मिळाली आहे. ते दोघेजण एकमेकांना छान संभाळून घेतात ती सुद्धा इलेक्ट्रॉनिक  डिप्लोमा इंजिनिअर आहे पण सध्या टी पूर्ण गृहिणी आहे पिल्लू लहान असल्याने त्यालाच आई लागते. पुढे ती पण संधी मिळाली की कर्तुत्व दाखवील. जाता जाता घ्यांच्याविषयी हे तब्बेतीने सतत त्रासलेले असत. लहानपणी फार त्रास वाढला त्यामुळे शिक्षणात मागे पडले. नाहीतर ते तसे हुशार आहेत. सुतारकाम, घरच्या सर्व दुरुस्त्या अगदी घड्याळ, शिवण्याचे मशीन, गॅसच्या शेगड्या दुरुस्ती, घराला रंग लावणे इलेक्ट्रॉनिकची कामे सर्व करतात. होमिओपॅथिक पुस्तकावरून खूप अभ्यास केला. व औषधे देतात व गुणही येतो पण स्वतःच्या दम्यापुढे उपाय चालत नाही. दुकान बंद केल्यानंतर रेडीओ, टी. व्ही. रिपेअरिंगचा कोर्स कोहिनूर क्लासला जावून तरून मुलांच्यामध्ये जावून न लाजता पूर्ण केला. तसे ते हरहुन्नरी आहेत. दमा नसता तर ते इंजिनिअर झाले असते पण अरे हो मग माझ्यासारख्या मॅट्रीक आईवडील नसलेल्या गरीब मुलीशी लग्नच केले नसते. असे हे खवाट चव्हाटच नाही तर काय? 
    हे चव्हाट वळण्याच कारण माझे सांगलीचे मेहुणे तात्या वारले असताना आम्ही सर्व जमलो होतो तेव्हा तात्यांची ७५ व्या वाढदिवसाला त्यांच्या स्वत:च्या शब्दातील कॅसेट ऐकली अर्थात त्यांचे जीवन केवढे कष्टमय व आदर्श होते आमचे काय? पण माझ्या भाचे मंडळीनी मावशीला चढवले हरबऱ्याच्या झाडावर पडेल बिडेल याची फिकीर न करता व तू सांग तुझे आयष्याबद्दल लगेच काय थोडेच सांगता येते. पोरे म्हणाली लिहून काढ काढले लिहून इतकेच! बाकी चूकभूल क्षमस्व! अधिक उण्याबद्दल माफी असावी.
  ----       सौ. उषा शरद परांजपे                                                                   ०८/०९/१९९२
                    
                             
      
             

             
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color