मला भेटलेले चोर
लेख़क उषा परांजपे   
आज मी एका वेगळ्याच विषयावर लिहिणार आहे. कुणाला वाटेल चोर म्हणजे समाजात वावरताना मुखवटे घालून फिरणारे वरून सभ्य दिसणारे पण मनातून हरामखोर असणारी डॅबीस मंडळी तसे नाही मी जे किस्से सांगत आहे ते अगदी सच्चे चोर म्हणजे चोरी ह्याच व्यवसायात असणारे किंबहुना चोरी हेच करिअर मानून पैसा तो पण बक्कळ मिळवणारे चोर माझ्या आयुष्यात बरेच प्रसंग आले. पण मी त्या सर्वातून अगदी सहिसलामत बाहेर पडले. माझ्या भाषेत देव माझ्या पाठीशी आहे म्हणा किंवा वाचनामुळे अंतर मनात जे रुजलेले ते अशा प्रसंगी नकळत सावध करत असते.
 
आत्तापर्यंतच्या म्हणजे ७२ व्या वयापर्यंत फक्त १ वेळेस मोठ्या पर्समधील छोट चिल्लर असलेले पाकीट गेले २/४ रुपयेच असतील ते पण अस झाल की बसच्या लाईनीत बसलेली असताना एका भिकाऱ्याने ४/८ आणे द्याला काढले होते व नंतर ते पाकीट सापडले नाही. बिचारा चोर मला शिव्या देत असेल. भिकारडी कुणीकडची १०/२० रुपये सुद्धा ठेवू नयेत कां त्यांनी. त्यानंतर दुसरा प्रसंग मोठ्या पर्समध्ये कोणीतरी हात घातला असणार पण त्याचे हाती मेडिकलची होलसेलची बिले लागली असणार कारण जकात नाक्यावर जकात भरण्यासाठी मी मोठी पर्स उघडली तर सर्व बिलांची गुंडाली गायब. त्याने बहुधा बसच्या गर्दीत २ मोठ्या पिशव्या औषधाने भरलेल्या आत चढवताना खांद्यावरील बॅगेत हात घालून २/५ सेकंदात जे काय हातात मिळाले ते ढापले पण पुन्हा तो चोर बिचारा ठरला. फक्त कॅश मेमो किंवा खरेदीची व्हाव्चर्स गेली पैसे थोडेच शिल्लक राहत असत ते कुठल्या दुसऱ्याच कप्प्यात सुखरूप राहीले. 
 
    आमच्या मेडिकल स्टोअर्ससाठी मी औषध खरेदीसाठी १९-२० वर्षे रोज सॅारी आठवड्यातून साधारण २/३दिवस भगूर ते नासिक एस.टी. तून प्रवास करीत असे. बसला प्रचंड गर्दी कारण ही ६८ साल ते ८८ सालातील गोष्ट आहे. तेव्हा भगूर नासिक १\१ तासांनी बस असे. मी नासिकला जाताना माझ्याकडे पैसे असत. आम्ही ५० टक्के उधारी व ५० टक्के रोख खरेदी करत असू. आता चोराविषयी काही चोर बोलके असतात. काही डोळ्यांनी पाठलाग करतात एकदा सावज दिसले की त्याचा पिच्छा सोडत नाहीत. ते मनात हेरून ठेवतात आणि मग ध्येयसिद्धीसाठी प्रयत्न सुरु.
 
    डोळ्यांनी पाठलाग करणारे २/३ भामटे मी अनुभवले एकतर लालसर डोळ्यांचा बुटका माणूस कितो वेळेला मला दिसलेला आहे रोखून बघायचा. मला त्यांची खूप भीती वाटायची कारण तो सामान्य प्रवासी नव्हता त्याच्या हातात कधीही सामान, पिशवी, बॅग काहीही नसायचे असाच एकदा ती व्यक्ती मी व माझे पती देवळाली कॅपला फिरायला गेलो असताना मी ह्यांना तो लांबून दाखवला पण त्यानंतर तो आयुष्यात कधीही दिसला नाही. कदाचित त्याचा काही घाणेरडा उद्देश पण असू शकतो. पण तसे तर वेगळे विचित्र अनुभव ज्यांना बाहेर समाजात वावरावे लागते, ऑफिसात नोकऱ्या कराव्या लागतात. संस्थातून कामे करावी लागतात त्यांना येतच असतात. तरून मुली, स्त्रियांना सतत सावध वागवेच लागते. आणि ती सावधताना स्त्रीमध्ये निसर्गानेच दिलेली असते. मला तर निश्चितपणे ती देणगी मिळालेली आहे त्यामुळे कित्येक वेळा वाचलेली आहे. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे घ्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता. आमच्या दोघांचा एकमेकावर पूर्व विश्वास असलुयाने मी प्रत्येक गोष्ट घ्यांना सांगत असे. दुसरा एखादा संशयी माणूस असता तर रामायण घडायला वेळ लागला नसता. 
 
    कारण मी सकाळी ९-९.३० ला जायची तो २.३०-३ पर्यत परत यायची तेव्हाचा काळ म्हणजे मोबाईल तर सोडा आमच्याकडे फोन नव्हता. म्हणजे बाहेर गेली की गेली आणि परत आली की आली. पण ते दिवस गेले निभावून, बर तिकडे होलसेल वा बाजारात मारवाडी, गुजराती, सिंधी समाजाचे वर्चस्व आणि पुरुषी कारभार.
 
    तर असो विषय चोरांचा होता एकदा काय झाले. भद्रकाली स्टँड (नासिकचा) जुना काळ बसच्या लायनीत माझ्या पुढे एक माणूस होता पटापटा पुढे सरकतच नव्हता. पत्र्याची बोळ अंधारी होती. मी त्याला म्हटले अहो नंबर आलाय पुढे सरका. एकदम गप्प. मला खून केली पुढे व्हा मी गेले निघून. हा बसमध्ये चढताना नाही बहुधा सावज मिळाले नसेल नंतर तोच माणूस काही दिवसांनी सार्वजनिक वाचनालयाच्या दारात विरोयोगी पाय पसरून निर्विकार पणे बसलेला होता. माझ्या मनाने सागितले पाकीट मारी करण्याचा प्लॅन चालला असणार. त्यानंतर एकदा मी पंचवटीतून बसमध्ये उभी राहून येत होते. हातात मालाच्या पिशव्या खांघ्याला मोठी पर्स लटकवली. आणि मागेच एकजन मला खेटून उभा पुढे जागा झाली तरी हलेना वर मला सरकायचे म्हणजे माझ्याकडे ओझे. मग मी काय केले मला आतल्या आवाजाने धोक्याची घंटी दिली मीच कशीतरी पुढे गेले. त्यानंतर पुलावर तोच माणूस चालत्या बसमधून उतरून गेला. अंगात सिल्कचा पिवळा शर्ट होता. त्यामुळे मी ओळखला त्यानंतर बसमध्ये बोंब झाली एकाचा खिसा कापला गेला व पैसे गेले. मग नंतर कंड्कटरने बस पोलीस स्टेशनवर नेली. पण उपयोग काय चोर लापता.
 
    परत एकदा असेच सकाळी १०.३० ची वेळ मी शालीमारला उतरून होलसेल एजन्सीकडे चाललेली २/३ हजार पर्समध्ये होते आणि अचानक साडीवर घाण टाकली गेली. एक मुलगा सांगायला आला की बाई मागे साडी बघा त्यावेळी इतकी शरम वाटते. पार्ले ग्लुकोजचा चुरा पाण्यात कालवून अंगावर फेकतात म्हणजे वाटावे की संडासला झाले की काय माणूस इतका शरमतो की कधी एकदा ते धुवून टाकतो ते अशा ठिकाणी टाकतात की जवळपास नळ असेल. मग पर्स किवा बॅग बाजूला ठेवली जाते. त्याचक्षणी दुसरा पोरगा ती लंपास करतो. नंतर सायकलवरून तिसराच एकजन येवून लाब पशार करतात. पण माझ्या नशीबाने ओळखीचे गुऱ्हाळ होते. मी तेथे जावून ती साडी पाण्याने साफ केली व झटकन बाहेर येवून बघितले. बरोबर एक अगदी मळक्या कपड्यातील इसम सायकलवरून झटकन गेला तेव्हा सायकली आता टू व्हीलर नाहीत कार, रिक्षा, तेव्हा नाशकात रिक्षा नव्हत्या टांगे होते.
 
    हे सगळे प्रकार राजस्थानी भामटे करतात हे मी वाचलेले होते. श्रीकांत सिनकर नावाच्या लेखकाने आम्हाला शहाणे केलेले होते आता ते नाहीत पण मी त्यांची निश्चितच ऋणी आहे.
 
    तसेच एकदा नासिकहून भगूरला येताना बसमध्ये चढताना एवढी गर्दी होती. माझ्याकडे केलेल्या औषधे खरीदीचे दोन बोजे होते आणि डाव्या खांद्यावर एक प्लॅस्टीकची बास्केट आणि त्यात मोठी पर्स व त्यात परत आत एक लहान पर्स मी नासिकला जाताना पैसे असत व येताना फक्त थोडे पैसे व बाकीची बिले. कधी कधी तर मी जकात भरण्यासाठी दुकानातून पैसे आणून देत असे. 
 
    पण ते चोरांना कसे कळणार? माझ्या मागे चढताना दोन बायका होत्या व त्यांच्या हातात तान्हे मुल ६-७ महिन्यांचे होते. बायका अशाच खालच्या वर्गातील अडाणी होत्या व त्या बाळाच्या मागे एक फडके सोडलेले होते. म्हणजे पाकीटमारी करताना हातावर तो फडक्याचा पडदा असा सोडायचा की लक्षात येवू नये. आणि नेमकेच त्या बाईने धक्काबुक्की करत माझ्या बास्केटमध्ये हात घातला आणि मी चढण्याच्या गडबडीत माझे काही लक्ष नाही आत बास्केटमध्ये गेल्यावर एकजन म्हणाला की तुमचे काही चोरीस गेले का बघा त्या बाईने बास्केटमध्ये हात घातला होता. पण नशीबाने माझ्याकडे पैसेच नव्हते. नंतर भगूर स्टॅडवर उतरल्यावर लक्षात आले की बास्केटमध्ये लिमलेटच्या गोळ्यांचे पाकीट थोडे फोडलेले आत दिसले तेव्हा माझ्या सगळा प्रकार लक्षात आला की पकडले गेलेच तर म्हणायचे की बाळाच्या गोळ्यांचे पाकीट आत पडले म्हणून हात घातला होता. विशेष गोष्ट म्हणजे त्या दोघी जणी बसमध्ये बसल्याच नव्हत्या. त्या निघून गेल्या होत्या.
 
    अलीकडील म्हणजे ३ वर्षापूर्वीचा प्रकार बोलके चोर. बनावट सी.आय.डी. म्हणून २ जन होते. मी टेलिफोनचे बिल भरावयास जात होते. सकाळी ९.१५ ची वेळ एक तरून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभा होता एक अलीकडील बाजूला स्वत:ला साहेब म्हणवणारा साधारण ५०-५५ वयाचा डोक्यावर हेल्मेट, बऱ्यापैकी रुबाबदार दिसणारा डोळ्याला चष्मा साधारण सावळा जाडगेला असा इसम मला त्या असिस्टंटतर्फे बोलावून घेतले. व मला म्हणतो घाबरू नका आम्ही सी. आय. डी. पोलीस आहोत चेकिंग चालू आहे. तुम्ही कोठे निघालात? पिशवीत काय आहे? तो पर्यत तो दुसरा जवळ आला होता त्याला म्हणतो घ्यांची पिशवी तपास नंतर मला म्हणतो पर्स उघडून दाखवा आत काय आहे? त्याच्या दुर्दैवाणे आतमध्ये आयडेक्स बाटली, व्होव्हेरान ट्यूब, रुमाल, ११० रु. पर्समध्ये व टेलिफोनचे बिलाचे पैसे त्याच पोष्टाच्या इनव्हलपमध्ये असा मोठा? ऐवज होता त्याला काय करावे ते सुचेना मग त्यांनी पुढची खेळी खेळली आजी  कुठे राहता? मी सांगितले समोरची बिल्डींग दिलते. तेथे मनातून वैतागला असणार त्याला काही सावज गटवता येईना मग शेवटी म्हणतो दिवस वाईट आहेत दागिने घालून फिरत जावू नका तेव्हा मी रोजच ४ बांगड्या सोन्याच्या  व मंगळसूत्र एकेरी घालत असे मी त्याला म्हटले की बर! बर! घरी गेल्यावर काढून ठेवते आणि मी निघून गेले मग माझ्या डोक्यांत आले की असे हे तर चोर असणार मी मागे वळून बघितले ते दोघेही वेगात मोटार सायकलने पसार झाले होते. दुसरे गिऱ्हाईक शोधायला. मी तशीच जवळच पोलीस चौकी आहे तेथे गेले चौकीला कडी पोलीस जागेवर नाहीत. 
 
    नंतर मी घरी आल्यावर प्रथम कॅलेंडरकडे धाव घेतली त्या दिवशी गुरुपुष्यामृत नक्षत्र होते. लोकांच्या सोने खरेदीच उत्साह म्हणून चोर कंपनीपण धंदा करायला निघाली सनर. पण मला आंतर शक्तीने वाचवले. घरात बोलणी खायला लागली. पिशवीत हात कसा घालून दिलास? पर्स उघडून कशाला दाखवलीस? असं हे मला भेटलेले चोर! त्यांच्या दुर्दैवाने व माझ्या सुदैवाने मी फसले गेले नाही हे खरे!            
  

 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color