स्वागतकक्ष arrow मराठी साहित्य arrow लेख arrow आमच्या सिडकोची कथा
आमच्या सिडकोची कथा
लेख़क उषा परांजपे   
मी आत्ता चक्क १९८४ सालात पोहोचलेली आहे. तेव्हा आम्ही भंगूर घ्या गावी रहात होतो.तेथे आमचे स्वत:चे घर व मेडिकल स्टोअर्स होते. आम्ही दुकान १९ वर्षे चालवले. पण नंतर काय झाले की गावात दुसरे मेडिकल  स्टोअर्स निघाले ते पण पक्के मारवाडी माणसाने काढले व त्याने निरनिराळ्या युक्त्या योजून वाट्टेल त्या मार्गाने धंदा करायला सुरवात केली. आम्ही अंत्यत सचोटीने प्रामाणिकपणे धंदा केला अर्थात धंदा आमचा खूप जोरात होता असे नव्हे पण पूर्ण समाधान होते को कोणालाही कधीही फसवले नाही. कधी लांडी लबाडी करून इस्टेट जमवली नाही. अर्थातच आम्हाला देवाने त्याचे फळ चांगले दिले. आमची मुले चांगली निघाली. हुशार व कर्तुत्ववान निर्व्यसनी मुले असतील तर आणखी काय पाहिजे. अस म्हणतात की तुम्ही पैशाच्या मागे लागू नका तुमचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडा पैसा तुमच्या मागे आपोआप येईल.
    तर काय सागत होते. माझा मोठा मुलगा भूषण इंजिनियरींगच्या शेवटच्या वर्षाला मुंबईला शिकत होता. त्याच्या वाचनात आले की नाशिकला सिडको चौथी स्कीम आणत आहे. तेव्हा त्याने कळवले की मध्यमवर्गासाठी छोटी घरे, फ्लॅट वगैरेची स्कीम जाहीर झाली आही तेव्हा जरा चौकशी करा व कसे काय जमते ते बघा. तोपर्यत खरेतर पहिली, दुसरी,तिसरी स्कीम चालू झालेली होतो आमचे १ कडू नावाचे गृहस्थ पहिल्या स्कीममध्ये घर घेवून रहावयास गेलेलेपण होते. पण आमच्या कधी मनात आले नव्हते की आपण भगूर सोडून कुठे दुसरीकडे जावू शकू ते पण खेड्यात धंदा करणे सोपे नसते आणि तसे पण सरळ प्रामाणिक आणि कायद्याप्रमाणे वागणाराना अतिशय कटकटीना सामोरे जावेच लागते त्यातून घ्याचा स्वभाव कडक कुणालाच घाबरणार नाहीत. सतत कसल्या ना कसल्या तरी वर्गणी मागणाऱ्या टोळ्या असोत को नगराध्यक्ष, नगरसेवक असोत कोणाच्या दबावाला बळी पडत नसत. पण माझी मात्र धडपड होत असे. तेव्हा मग असे ठरले की जर घराची सोय झाली तर भगूरचे घर व दुकान विकून टाकू. अर्थात भूषणने अगदी निक्षुन सागितली की मी नोकरीला लागलो की हे दुकान बंद करून टाकू त्याला कारणही तसेच होते. आमच्याकडे नोकर माणसे नव्हती. सर्व कामे आम्हीच करत असू आणि नानांची तब्बेत, सतत त्यांना दम्याचा त्रास होत असे पण तरी त्यांनी एवढी जिद्द धरून मुलांची शिक्षण पूर्ण केली अर्थात ह्यात सर्वात महत्वाचे मुलांनी खूप साथ दिली कधीच कुठला हट्ट नाही, वडिलांशी भाडणे वाद नाही, अभ्यास मनापासून केला त्याचे फळ त्यान मिळाले. 
    घर घ्यायचे ठरल्यानंतर मग आम्ही चौकशीला लागलो माहिती पत्रक मिळवले व अर्ज केला एकुण ४ प्रकारची घरे असणार असे समजले. १२०००, २००००, ५००००, ८५००० हजार असे प्रकार होते व्यवस्थित माहिती पत्रकात होती. आमच्या बजेटमध्ये टू रूम किचन बसेल असे वाटले व ते सुद्धा १ वर्षात ४ भूषण कमवायला लागलेला नव्हता. आणि कोणाकडेच पैसे कधीच मागितले नव्हते. कर्ज तर काढायचे कधी जन्मात मनात सुद्धा आले नव्हते. त्यामुळे आपल्या ऐपतीप्रमाणे आम्ही ठरवले. तेव्हाच ठरविले होते की छोटेसे घर आपला वृद्धाश्रम म्हणून ठीक राहील. कारण मुली इंजिनियर होणार तेव्हा त्यांचे नशीब त्यांच्या बरोबर. त्यांनी दोघांनी स्वत:ला मेहनतीच्या जोरावर व अत्यंत प्रामाणिकपणे करून स्वत:ची सुंदर घरे बांधली आहेत. म्हणजे एकाचा बंगला व एकाचा फ्लॅट झाला आहे. 
    मग त्यांतर नासिकला येवून सिडको ऑफीसला जावून त्यांचे माहितीपत्रक मिळवले. व त्यातील प्लॅन बघून पक्के ठरवले. व आपले अंथरूण पाहून पाय पसरायचे ह्या म्हणीप्रमाणे आमचा दोघांचा निश्चय झाला. व एकदा ठरल्यानंतर मग पुढची जमवाजमव. पण एक बरे होते की दर ३ महिन्यानी १|१ हप्ता भरायचा होता. एकूण ४ हप्ते भरून मग त्यानंतर प्रतिक्षा करणे ३ वर्षांनी घरचा ताबा मिळाला. मे ८७ ला घराचा प्रत्यक्ष ताबा मिळाला. जेव्हा घराचा ताबा घ्या असे लेटर आले तेव्हा आम्ही बाहेरगावी गेलो होतो. आलो तेव्हा ते पत्र मिळाले. येथे एक खास गोष्ट सांगायची म्हणजे तेव्हा फोन जवळजवळ कोणाकडेच नव्हते. त्यामुळे पोष्ट अंत्यत महत्वाचे होते. 
    तुम्हाला सागते घर नासिकमध्ये मिळणार घ्याचा इतका आंनद झाला होता की काय सांगू. कारण गेले २० वर्षे खेडेगावात राहिलो होतो व धंद्याच्या कटकटी आता बंद व्हायचा चान्स आला होता. आम्ही गेले २|३ वर्षे ते माहिती पत्रक सतत काढून बघत असू त्यात किती फुटाचा हॉल’किचन स्पेस, बेडरूम केवढी असे सगळे चर्चेचे विषय असत. एक वेगळीच उर्जा संचारली होती. हे घर लहान असणार होते पण आमचे भगूरचे घर पण लहानच व अडचणीचेच होते. पण त्या घरातच मुलांची शिक्षणे १२ वी पर्यंत झाली. दोघानाही ४ थी व ७ वी दोन्ही स्कॉलरशीप मिळाल्या. 
     एकदा आम्ही पैसे पूर्ण भरून झाल्यानंतर मग कुतूहल ही स्कीम कोठे होणार काहीच कल्पना नव्हती. मग नंतर तपास लागला की त्र्यंबकरोडवर आहे मग शोध घेतला. भगुरहून रोज सातपूर साठी दिवसातून २ वेळेस एस. टी. बस असे तेथील कामगारांसाठी मग आम्ही दुपारी ४ च्या बेताला भगूरहून सातपूरकडे जाणारया बसने येथून आय.टी.आय. स्टॉपला उतरत असू व तेथून मायको क्लबच्या कडेच्या गल्लीतून त्या नदीतून नदी कसली लहानचा पाण्याचा ओघळ असे तो ओलांडून घ्या बाजूला यायचे व मग बरेच चालल्यानंतर ही बांधकामे दिसायची त्र्यंबकरोडवरून पण ही लांब अशी छोटी छोटी घरे दिसायची. वीटकाम चाललेले असे मग हळूहळू त्याला रंगरूप येवू लागले. सगळीकडे मजूर गवंडी मोठ्या प्रंचड प्रमाणावर बांधकामे चालू होती. रस्ते तर नव्हतेच समोरच्या शाळेचे बांधकाम चालू होते. आत्ता जो शिवशक्तीकडे रोड जातो तोच मुख्य रोड आहे असे वाटत असे. व आपलाल्या घर कोणते मिळाले अशी प्रचंड उत्सुकता होती
    आमची २/४ महिन्यांनी चक्कर असेच. एकदा तर आम्ही सि. बी. एक पासून चालत आलो होतो. एकदा ह्यांचा पाय दुखत होता तेव्हा टांग्यातून आली होतो. मग नंतर ऐकले की पंचवटीतून १\१ तासाने पवननगर नावाची बस चौथ्या स्किला जाते तो एक आंनद मग १\२ वेळेस बस मिळाली. त्यातील लोकांना विचारायचे मग कोणी म्हणे स्लॅबचे घर घेतले. कोणी म्हणे १२००० हजारवाले पत्र्याचे घर घेतले. पण एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला २ रूम किचन किंवा ३ रूम किचन घेतले असे सागितलेली एकही व्यक्ती भेटली नाही. पैसे भरण्याच्या लायनीत पण सगळी बहुधा २०००० १२००० वालेच होते. आणि बरेचसे दरमहा ह्प्तावाले. रोखीवले थोडेच होते. तेव्हा पगार पण कमीच पैसाच कमी होता. पण काही अत्यंत धूर्त बोके मंडळी पैसेवाली त्यांनी २/२ घरे वेगवेगळ्या नावानी बूक केली होती. एकाने तर मला सांगितले की मी सल्यॅबची ६ घरे घरातल्या माणसांच्या नावाने बूक केलीत. धन्य ते व्यापारी सरकारला लुबाडणारे!
    आमच्या सारख्यांना एवढेसे पैसे जमवताना दमछाक होत असे त्या काळी हो! हळूहळू वसाहत पूर्णत्वाकडे जात होती. मग एकदा कळले डांबरी रस्ते झाले मग बातमी आहे इलेक्ट्रीकचे पोल येवून पडले बरका! मग लगेच मी व एक मैत्रीण येवून गेलो बातमी खरी आहे कां बघायला. पायात ताकद होती नां त्यामुळे सुटायचे चालत चालत. एकदा तर आम्ही दोघे ही बांधकामे बघत बघत जे चालत सुटलो ते आग्रारोडवरच्या ३ रया स्किमपर्यत. आणि नंतर रहावयास आल्यावर तर नेहमीच चौथी स्किम ते जुने सिडको चालत जायचो. कारण तेव्हा बस रिक्षा एवढया नव्हत्याच नां! आणि आमचा गॅस राणे नगरला एस्सोचा. पूर्वी स्वत: जावून घेवून यायचा मग काय तो गोंधळ तेथे जावून मोठ्या लायनी सिलेंडर संपले की परत दुसऱ्या दिवशी जा. पुढे पुढे मग रिक्षाला जावून येवून ४० रु. लागायचे. नाहीतर मग सायकल वरून टायरने बांधून सिलेंडर आणावा लागे. भूषणने कित्येक दिवस तसा आणलेला आहे. 
    ८६ साली जूनपासून समोरची शाळा सुरु झाली त्यामुळे शाळकरी मुले असलेली मंडळी जूनमध्येच रहावयास आली. ६ महिने त्यांना अंधारात रहावे लागले. त्यामानाने आम्ही नशीबवान ठरलो आम्ही लाईट आल्यानंतर निवांत आलो. कारण शाळेचा प्रश्न नव्हता व भगूरला आमचे स्वत:चे घर होते. 
    आत्ता २७/२८ वर्षानंतर त्रिमूर्तीचौकात सिग्नल बसला अर्थात ह्याचे पूर्वीच बसवायला हवा होता. सध्यातरी इतकी वाहनांची गर्दी असते की विचारूच नका ह्यांच्या समोर काही सिग्नल बसला नाही ते गेल्यानंतर सग्नल बसला त्याना फिरायला जाताना रोज क्रॉस करताना खूपच पंचाईत व्हायची तसेच मागील ग्रांउडवर जॉगींग ट्रॅक आत्ता ४\६ महिन्यापूर्वी झाला पण आता तरी लोकांनी ट्रफीक मधून फिरायला जावे लागत नाही. वृद्ध माणसे व स्त्रीयांची चांगली सोय झाली. एकेक करून खूपच सुधारणा आता होत आहेत.
    आमच्या त्रिमूर्ती चौक भागात पुर्वी संध्याकाळी पाणी येत असर नंतर नंतर एकदा बातमी आली की आता पहाटे ५ च्या नंतर पाणी येणार आहे. खरच आला तर खूप आंनद झाला. लवकर सर्व कामे उरकून जातात म्हणून. पण पाणी फक्त पाऊन तासच येत असे. असे कित्येक वर्षे चालू होते. दिवसातून फक्त एकदाच. मग नंतर नवीन नवीन जलकुंभ उभारले. आता तर पहाटे ३\३|| ला येते व ५ वाजता जाते. पण पूर्वीची पाण्याची बोंबाबोंब संपली. पूर्वी रस्ते अगदी लहान होते आता केवढे तरी मोठे मोठे व भव्य झाले आहेत. त्रीमूर्ती चौकातील रस्ता तर इतका अरुंद व त्याच्या कडेला भाजीच्या टपऱ्या. सुरवातीला तर १ च गाडी भाजीची असे तेथे जे काय ताजे सुके मिळतेच ह्यावे लागे. नाहीतर मग नासिकहून भाजी आणावी लागे.
    दुधाची अवस्था तशीच दुधवाल्याकडे लिमीटेड दुध असे मग आपण म्हशीचे दुध मागितले थोडे तरी राग येत असे. आत्ता जेथे सदगुरू हॉटेल आहे तेथे चव्हाण म्हणून छोटेसे दुकान होते. टेलीफोन तर कुठेच नव्हते फक्त टेलीफोन कंपनीत नोकरीला असलेल्यांकडे फोन असे. मग त्यांचेकडे फोन आला तर ते आपल्याला मेसेज सांगत असत. ते पण त्यांच्या मेहेरबानीवर. सुरवातीला अतिक्रमणे अजिबात नव्हती त्यामुळे सगळे मोकळे वातावरण छान होते आता सर्व बिल्डींगच्या मधली जागा आपापसात वाटून घेतल्या आहेत कुठे मोकळी स्पेस जराही ठेवली नाही. ह्या सगळ्या धोरणी लोकांनी खालच्या जागा आणि कोपऱ्यावरची मोकळी घरे जास्त पैसे (खायला देवून) बळकावली. (विकत घेतली)
    आम्ही तेथे ( ऑफीसमध्ये) विचारायला गेली की आम्हाला वरचे घर पाहिजे तेव्हा ते आमच्या बावळटपणावर मनांत हसले असणारच कारण त्यांनी फक्त एवढेच सुचवले की वरची घरे आपोआप मिळतात (अर्थ लक्षात आला ना?) असो पण आम्हाला वरचेच घर हवे होते कारण वरचे घर हवेशीर असते.
    माणसे रहावयास आली मग दुकाने, हॉटेल्स, भाजीबाजार भरपूर वेगवेगळ्या शाळा क्लासेस, डॉक्टर, हॉस्पिटल्स सर्वच आले आता तर प्रचंड गर्दी झाली आहे. माणसे आली. त्याबरोबर त्यांची महत्वाची गरज देवळे आली. प्रत्येक भागात देवळांची संख्या भरपूर वाढली. काही नशीबवान देवळांची मोठी भरभराट झाली. सिडकोला लागून चहुबाजूने प्रचंड घरे दुकाने सोसायट्या बंगले वाढले. मुलभूत सोईसुविधा वीज, पाणी, रस्ते मुबलक सोई झाल्याने नाशिक जिल्ह्यातून व आजूबाजूच्या खानदेश वगैरे भागातून प्रचंड लोक आले. क.स.मा.दे. पट्टा कळवण, सटागा, मालेगाव, देवळा, तसेच विदर्भ एवढेच काय यु. पी. बिहारी सुद्धा बऱ्यापैकी येवून स्थिरावले आहेत. सिडकोच्या ६ स्किमनी प्रंचड लोकांना पोटात सामावून घेतल आहे. जुळे नाशिक (नवीन नाशिक) असेच म्हणतात.
    आता एक गंमत सांगते देवीमंदिर (त्रिमूर्ती चौकातील) त्या जागेवर पूर्वी तेथे कलेक्टरच्या हस्ते वडाच्या झाडाचे वृक्षारोपण मध्यभागी केले होते. नंतर एकदा पोरांनी नवरात्रातील देवीची शाडूची मूर्ती तेथे उघड्यावर बसवली होती. मग तेथे मंदिर बांधण्याची कल्पना मोठ्या मंडळानी अमलात आणून बाहेरील मूर्ती आणून देवळात बसवली.
    बसण्यासाठी ठिकाण आहे. बाके टाकलेली आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी संध्याकाळी निवांत जागा आहे. देवळात भजन किर्तनचालू असते. आता त्या मोठ्या आवाजाने उंच स्वरातील भजन वगैरे मुळे आजूबाजूच्या बिल्डींगमधील लोकांना थोडा त्रास सहन करायला लागतो. पण एक सांगू का कलेक्टरांनी वडाचे झाड का लावले होते सांगू? कारण पूर्वी त्या मोकळ्या जागेत कचराकुंडी होती. भरून वाहणारी मग आजूबाजूच्या लोकांनी तक्रार करून कुंडी हलवली व तेथे वडाचा वृक्ष लावण्याची कल्पना काढली. त्या काळात घंटागाडी ही कल्पना आलेली नव्हती. 
    सिडकोमध्ये जिकडे तिकडे देवळांचा सुळसुळाट आहे त्याचे एक कारण सिडकोनी लोकसंख्येच्या प्रमाणात मोकळ्या जागा आदर्श प्लॅनप्रमाणे सोडवलेला होता. पण बऱ्याच जागा आजूबाजूच्या लोकांनी बळकावल्या व त्या जणू काही त्यांना ती जागा वापरण्याचा हक्कच आहे अशा थाटात त्याचा उपयोग, फायदे भरपूर लाटले. कधीकधी मोकळ्या जागा दिसल्या कि लोकांना घाण, कचरा जुने भंगार तेथे टाकायचा मोह होतो. माझ घर आत स्वच्छ. तो कचरा मोकळ्या जागेत कधीकधी रात्री चोरून फेकून यायची सवय असते ते होवू नये म्हणून पण काही लोकांनी तेथे देवांना आणून बसवले. पण आता घंटागाड्या आल्यामुळे तो पूर्वीचा प्रकार जवळजवळ संपला आहे.
    असे हे सगळे सिडकोचे परिवर्तन घडले. अजून भविष्यात कायकाय बदल होणार आहे त्या देवालाच माहीत. माझ्या आयुष्याचा काळ आता संपत आला आहे. पूर्वी सिडको म्हटले की लोकांना अगदी फारच गरिबी व केवीलवाणी वस्ती अशी कल्पना होती. सिमेंटची झोपडपट्टी म्हणायला कमी नाही केले.अर्थात हे बोलणारे वाडवडीलांनी बांधून ठेवलेल्या वाड्यांचे वारस होते हे सांगायला नको. 
    पण एक गोष्ट नक्कीच की सिडकोमुळे हजारो लोकांना स्वत:चे घर छोटेसे का होईना घेण्याचे स्वप्न पुरे करता आले. मिडलक्लास व आर्थिक दृष्ट्या दुर्बल वर्गाला मानाने जगण्याची संधी मिळाली. आता तर काय घर छोटे पण दाराशी कार अशी हजारो घरे सिडकोत दिसत आहेत. मनात विचार आले ते लिहले एवढेच.     
             
    
      
       

 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color