स्वागतकक्ष arrow मराठी साहित्य arrow लेख arrow कुरतडलेले सफरचंद
कुरतडलेले सफरचंद
लेख़क उषा परांजपे   

              २०-११-२०१२
ही माझीच गोष्ट आहे. माझे बालपण अतिशय गरिबीत गेले. मी बाळ अवस्थेतच असतानाच माझे वडील वारले. माझी मोठी बहिण ८ वर्षाची व मी अगदीच लहान असतानाची गोष्ट. मोठ्या तिघी बहिणी लग्न होवून सासरी गेलेल्या होत्या. वडील गेल्यानंतर पूर्वीच्या बऱ्याच घरांत होत असे तसे काकांनी वहिनीला घराबाहेर काढले. जाब विचारणारे कोणी उरले नाही. शेतीवाडी घरदार सर्व बळकावून घेतले. आम्हाला भाऊ नव्हताच. मग आईचे वडीलांच्या नंतरचे अत्यंत हलाखीचे व कष्टाचे आयुष्य सुरु झाले. 
    हल्ली म्हातारपणी बऱ्याच लोकांना चांगले दिवस येतात कारण एकतर पेन्शन असते किवा मुले शिकून सवरून मोठी झाली चांगली निघाली तर ती आईवडिलांना सुखात ठेवतात. आमच्याकडे घ्यापैकी काहीच नव्हते ना कमावता मुलगा ना सरकारी पेन्शन. एक थोडे शेत दान मिळालेले होते त्यावर व बाकीचे आईने स्वत: कष्ट करूनच रुटूखुटू चालवलेले होते. माझे मामा त्या काळी आईला दरमहा १० रु. मनीऑर्डर करीत असत. तेवढाच एक आधार होता. तेव्हा १० रुपयांना खूप किंमत होतो. ज्यामानाने लोकांची कमाई त्या मानाने स्वस्ताई होती. 
    आता पगार वाढले तर महागाई गगनाला पोहचली. मिळून हिशेब तिथेच बाजारात पैसा खूप आहे त्यामुळे पैसे कमवायच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. भरपूर कष्ट करायची तयारी असली तर आणि डोके चालवून काम केले तर कोणी उपाशी नाही राहणार. अर्थात स्पर्धा जबर आहे.
    मी धा वर्षांची असताना माझी आई आजारी पडली. संधीवाताने ती ५ वर्षे तशा स्थितीत होती. माझ्यावरची बहिण लग्न होवून सासरी गेलेली होती. मी व आई दोघीचेच कुटूंब. मी पाचवीत गेलेली होते. आई दुखण्यामुळे सतत कावलेली असे. तिने आयुष्यभर फक्त कष्ट आणि कष्टच उपसलेले होते. आणि आता अशा सर्वच गोष्टीत परस्वाधीनपणा नशिबी आला होता. पण मी लहान असल्याने माझे कसे होईल ही चिंता होती. आपल्या जवळचा शेवटचा रुपाया संपायच्या आधी मृत्यू यावा अशी तिची इच्छा होती. ती मात्र इच्छा पूर्ण झाली. त्यानंतर ३ वर्षाने माझे लग्न झाले. त्यावेळेस व्याजासकट १००० रु. शिल्लक होते. माझी आई म्हणत असे की मी गेले ना की रडू नका पेढे आणून खा! कारण मी यातनातून सुटले म्हणून आनंद मना. माझा बालपणाचा काळ हा असा जगावेगळा गेला. 
    त्यानंतर माझे लग्न झाले. सासरी सगळे ठीक होते. मोठे दीर, जाऊबाई, सासू सासरे, नणंद, धाकटे दोन दीर, सर्वजण प्रेमळ व समजून घेणारे होते. मला तसा कोणताही त्रास नव्हता. मोठ्या जाऊबाई खूपच प्रेमळ होत्या. मला अगदी लहान बहिणीसारख वागवत असत. पुढे मग माझा मुलगा त्यांच्या दोन मुली सगळे आनंदात व कौतुकत दिवस जात होते. नंतर धाकल्या दिरांचे लग्न झाले. त्यानंतर त्या जावेचे डोहाळेजेवण मोठ्या जाऊबाईनी खूप छान केले. तोपर्यत सगळे व्यवस्थित चालू होते. त्यानंतर जाऊबाईना आजारपण आले. प्रथमच घसा दुखत होता व नंतर ताप आला. त्यातच साधे दुखू लागले. ते दुखणे हळूहळू वाढतच गेले. त्यांचे शेवटी ह्युमॅटाइड आर्थराइटीस मध्ये निदान झाले. ४० वर्षे आजारी होत्या. सर्व जागेवरच करावे लागे. इतके प्रचंड डॉक्टरी इलाज करून झाले. सर्व पॅथीचे इलाज झाले. पैशाचा प्रश्न नव्हता. माझे दीर इंजीनियर आहेत. आणि त्या स्वत: एका एम्.बी. बी.एस्. डॉक्टरची मुलगी. बी. ए. झालेल्या अतिशय हुशार व समंजस होत्या. पण नियतीपुढे कोणाचे काय चालणार? 
    माझ्या प्रेमाच्या जाऊबाईंचे हाल व यातना आम्हाला बघायला लागल्या. सहन त्या करत होत्या. मरण यातना त्यांना होत होत्या. त्यांची फॅमिली सासू सासरे सर्वजणच त्या वातावरणातच जगत होते. ते मद्रासला होते आम्ही लांब भगूरला होतो. तरी पण प्रिय व्यक्ती यातनामय आयुष्य कंठत असताना मला संपूर्ण सुख मिळत नसे. होय! माझी जाऊ माझ्यावर फार प्रेम करीत असे ‘जावा जावा उभा दावा’ अशी एक जुनी म्हण आहे. पण आमच्या चौघी जावांत खूप चांगले संबंध होते आणि अजूनही आहेत.
    मला माहेरच नसल्यामुळे तीघी व नंणद सर्वच मला खूप प्रेम देत असत. माझे सासू सासरे दीर सर्वच मंडळी समंजस होती.मला कधी एका शब्दाने हिणवले नाही. आई वडील भाऊ कोणीच नसल्यामुळे माहेरकडून कोणताच आधार नव्हता. नाही माणसांचा नाही पैशाचा. माझे शिक्षण कमीच होते. अर्थात मीही आयुष्यात कोणाचा कधीही हेवा केला नाही.
    माझ्या पतींना दम्याचा विकार असल्याने त्यांना सहन करायला व मला बघायला लागते. त्यामुळे मनाला खूप त्रास होतो. त्याची दुखण्याशी आयुष्यभर झुंज चालू आहे. मी जशी जमेल तशी साथ देत आहे. त्यामुळे आमच्या जगण्याला नाही म्हटले तरी लिमीट येते. शेवटी प्रत्येकाचे नशीब त्याच्याबरोबर असते. त्याला कोण काय करणार? नशीबाने जे दान टाकले ते न कुरकुरता स्वीकारायचे एवढेच आपल्या हातात साते नाही कां! त्यामुळे कधीतरी चिडचिड होतेच.
    दोन्ही मुले सुना खूपच समंजस व चांगली आहेत. आम्हाला काहीही कमी पडू देत नाहीत. आता खरे तर आर्थिक प्रश्नही नाही. आमचे तसे ठीकच चालले होते. आमची नातवंडे पण देवकृपेने हुशार व व्यवस्थित आहेत. 
    पण माझ्या मनाला यातना देणारी घटना १० वर्षापूर्वी घडली मला आता जगात फक्त सख्खी अशी म्हणवणारी एकच बहीण आहे की तिने माझ्या आयुष्याला आकार दिला. माझ्या आयुष्याला योग्य वळण तीच्यामुळे लागले. अतिशय प्रेमळ हौशी आम्ही दोघी भगूरमध्ये १९ वर्ष एकाच गल्लीत रहात होतो पण आमच्यात कधी गैरसमज भांडणे काही नाही. सहवासाने प्रेम वाढते म्हणतात. असे सगळे व्यवस्थित चालले होते. तशी आमची दोन्ही कुटूंबे मध्यमवर्गीयच. पण आपापसात हेवेदावे कधीच नव्हते. मुलामुलांचे पण छान जमत असे. पुढे मग आम्हीही नासिकला रहावयास आलो. व दातार मंडळीनी नासिकला घर घेतले. मुलीना स्थळे पण योगायोगाने नासिकचीच मिळाली. 
    असे सगळे ठीक चालू असताना तिच्या सुनेने आत्महत्या केली. खरा तर एवढा तीला काय त्रास होता आम्हाला कधीच कळवले नाही. लग्नाला २१ वर्षे झालेली स्वतंत्र संसार, मुले सुंदर हुशार, स्वत: कमवती असल्याने आर्थिक स्वांतत्र भरपूर नवरा निर्व्यसनी स्व एकदम सज्जन, संघाच्या संस्कारातील असल्याने वागणे सुसंस्कृत. त्याचा स्वभाव चैनी नाही उगाच उधळमाधळ करायची सवय नाही हा गुन्हा होता काय?
    दोन भिन्न परिस्थितीतील माणसे एकत्र आली की थोडा त्रास होणारच. जळवून घ्यायला लागतेच. पण मुलाबाळांच्या सुखासाठी आपली हट्टी हेखेखोर मते थोडी बाजूला सारायला लागतात. फक्त स्वत:चेच बघायचे मला काय पाहिजे. नाहीतर गोजीरवाणे संसार उध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. पण आईच तशी असेल तर? कारण जास्तीत जास्त प्रभाव हा मुलीवर आईचाच असतो. 
    माझ्या बहिणीला इतक्या भंयकर संकटात टाकून सून चालती झाली. तिचे दु;ख मला बघवत नाही. सगळ्या घरादारालाच घ्या घटनेने दु:खात लोटले. तीला मुलाचा अर्धामुर्धा संसार सावरायला लागला. मन दु:खी आणि घ्या वयात कष्ट अमाप. ते आता तीला मरेपर्यत चुकणार नाहीत. मुलगा सतत उदास एकाकी. तरी तो आनंदी रहावयाच प्रयत्न करतो. इतरांना सुख दु:खात सामील होतो. पण आईला त्याचे मन दिसतेच. आता आईचे वय पण ७८ आहे. तब्बेतीच्या तक्रारी चालूच असतात त्यामुळे कधीतरी चिडचिड होणे अगदी स्वाभाविक आहे. काय करू शकणार? नुसता पैसा असून सुख मिळत नाही हेच खरे मन:शांती हीच खरी सर्वात महत्वाची. 
    असे एकंदर माझ्या जवळच्या प्रेमाच्या माणसाना दु:खी निराश बघताना मला १०० टक्के सुख नाही मिळत. 
    म्हणून मी म्हणते माझे आयुष्य सफरचंदासारखे गोड मधुर आहे. पण सफरचंद कुरतडलेले आहे. त्याचा एक भाग सतत कडक बेचव आहे. शेवटी नशीबापुढे कुणाचे काम चालते? आपल्या जवळची माणसे आनंदात असली तरच आपण संपूर्ण आनंद उपभोगू शकतो हेच खरे. 
                                               सौ. उषा एस.परांजपे       

               
                     
    


            
           
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color