न्याय
लेख़क सौ. शुभांगी सु. रानडे   

अजब तुझा हा न्याय देवा
म्हणू की महान ऽ ऽ ऽ . . . ॥ ध्रु.॥

हिर्‍याची न कध्धी आम्हा
झाली पहेचान
सुखासाठी मर्कटी घेई
लहानग्याचे प्राण
आकळे न मजला असले
अगाध तत्वज्ञान ऽ ऽ ऽ
अजब तुझा हा न्याय देवा
म्हणू की महान . . . १

देती कैसे सोडुनि दूर
सोनभरल्या ताटा
गुलाबाच्या वाट्याला का
देसी तू रे काटा
तुझ्याच लेखी आम्ही
जगी सारेचि लहान ऽ ऽ ऽ
अजब तुझा हा न्याय देवा
म्हणू की महान . . . २

कुंतीने त्या सोडुनि दिधले
जळामध्ये बाळ
राधा परि माता करी
प्रेमे प्रतिपाळ
उदार त्या कर्णा दिधले
दैवाने अभिधान ऽ ऽ ऽ
अजब तुझा हा न्याय देवा
म्हणू की महान . . . ३

खरेच तुजला कथिते देवा
न्याय उफराटा
सान वदनी घेते मी हा
घास थोडा मोठा
रागावुनि तू देवा,
होसी का अंतर्धान ऽ ऽ ऽ
अजब तुझा हा न्याय देवा
म्हणू की महान ऽ ऽ ऽ
अजब तुझा हा न्याय देवा
म्हणू की महान. . . ४

 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color