स्वागतकक्ष arrow मराठी भाषा arrow उच्च शिक्षणातील मराठीचे स्थान अबाधित
उच्च शिक्षणातील मराठीचे स्थान अबाधित
लेख़क Administrator   
संदर्भ- दै. लोकसत्ता प्रकाश परब - सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१२ ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.

मराठी हा एक विषय म्हणून राज्यातील बहुतेक पारंपरिक विद्यापीठांतून व महाविद्यालयांतून शिकवला जातो. परंतु, पदवी व पदव्युत्तर स्तरावरील या विषयाचे जे पाठ्यक्रम आहेत, ते गेल्या अनेक दशकांपासून प्राय: साहित्य व समीक्षाकेंद्री राहिलेले आहेत. त्यात काही किरकोळ बदल विद्यापीठ स्तरावर झाले असले तरी इंग्रजीप्रमाणे त्यांचे उपयोजित व व्यावसायिक अंगांनी विस्तारीकरण झालेले नाही. हे विस्तारीकरण का व कसे करता येईल याची सविस्तर मांडणी करणारा हा लेख.

जागतिकीकरणानंतर रोजगारांचे बदललेले जग लक्षात घेऊन विद्यापीठांनी आपल्या उदारमतवादी परंपरेतून आलेल्या पाठय़क्रमांना उपयोजित व कौशल्याधिष्ठित पाठय़क्रमांची जोड द्यावी अशी भूमिका ‘राष्ट्रीय ज्ञान आयोग’ तसेच ‘विद्यापीठ अनुदान मंडळ’ यांनी घेतलेली आहे. मराठीच्या विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षणात कालोचित असे संरचनात्मक बदल गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित आहेत. आज मराठीच्या महाविद्यालयीन वा विद्यापीठीय शिक्षणाचा प्रश्न केवळ शैक्षणिक राहिलेला नाही. त्याला सामाजिक, सांस्कृतिक, आíथक, राजकीय परिमाणेही प्राप्त झाली आहेत आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रगत व्यवहारभाषा व ज्ञानभाषा म्हणून मराठीची जडणघडण करण्याचे काम ज्या संस्थांकडून अपेक्षित होते व आहे, त्यात राज्यातील विद्यापीठांचा प्रामुख्याने समावेश होतो. अध्यापन, प्रशिक्षण व संशोधन यांच्याद्वारा मराठी भाषेचे भौतिक व बौद्धिक व्यवहारांसाठी सक्षमीकरण करणे, त्यासाठी संस्थात्मक-विभागात्मक यंत्रणा प्रस्थापित करणे ही विद्यापीठांची जबाबदारी आहे.

उच्च शिक्षणातील मराठीच्या स्थानाचा विचार दोन अंगांनी करता येईल. एक माध्यमभाषा म्हणून व दुसरा अभ्यासविषय म्हणून. माध्यमभाषा म्हणूनच नव्हे तर एक अभ्यासविषय म्हणूनही मराठीच्या उच्च शिक्षणाचा कालोचित व गुणवत्तापूर्ण विस्तार झाला नाही याचे अनेक पुरावे देता येतील. उच्च शिक्षणातील मराठीच्या या दुरवस्थेमुळे मराठीच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणाचा पायाही आता खचू लागला आहे. ते अव्यवहार्य आणि कालबाह्य़ ठरू लागले आहे. काही वर्षांपूर्वी मराठी अभ्यास केंद्राने मराठी शाळांच्या प्रश्नावर राज्यव्यापी परिषद घेतली होती. त्यावेळी उच्च शिक्षणासह समाजाचे सर्व प्रमुख व्यवहार इंग्रजीतच असतील तर मराठी माध्यमातून शिकायचे कशासाठी अशी विचारणा झाली. आजच्या स्पध्रेच्या युगात मुलांना मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये पाठवणे ही पालकांसाठी अतीव त्यागाची आणि जोखमीची बाब बनली आहे. राजकीय, सामाजिक इच्छाशक्तीच्या अभावातून ही परिस्थिती आपण ओढवून घेतलेली असली तरी समाजाला दीपस्तंभाप्रमाणे असलेल्या विद्यापीठांनीही मराठीबाबतचे आपले दायित्व नीट पार पाडले नाही हे कबूल केले पाहिजे. समाजामध्ये इंग्रजी म्हणजे प्रगती, मराठी म्हणजे मागासलेपणा हा समज स्वतच्या नाकत्रेपणाने निर्माण करण्याच्या पापात विद्यापीठांचाही वाटा आहे.

महाराष्ट्रात विद्यापीठांचे आणि संलग्न महाविद्यालयांचे मिळून शेकडो मराठी विभाग अस्तित्वात आहेत. या विभागांमार्फत मराठीचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण दिले जाते. मात्र मराठीचे हे उच्च शिक्षण परंपरेने साहित्यकेंद्री राहिलेले आहे. त्या व्यतिरिक्त मराठीचे म्हणून काही शिक्षण असू शकते व त्याचीही समाजाला आवश्यकता आहे याकडे आपण लक्ष दिलेले नाही. राज्यातील नामांकित समजल्या जाणाऱ्या मुंबई आणि पुणे विद्यापीठांतील मराठी विभागांच्या स्थापनेचा इतिहास तपासला तर असे दिसते की ते प्राय मराठी भाषा आणि संस्कृती यांच्या प्रसाराचे उद्दिष्ट समोर ठेवून स्थापन झालेले आहेत. केवळ मराठी विभागाच्याच नव्हे तर संपूर्ण पुणे विद्यापीठाच्या स्थापनेमागेही मराठी भाषा आणि संस्कृती यांचे संवर्धन हा एक मुख्य हेतू होता. स्थानिक भाषेच्या-संस्कृतीच्या विकासात विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची असते हे लक्षात घेतलेले होते. परंतु भाषाप्रसाराचे व संवर्धनाचे उद्दिष्ट समोर ठेवून मराठीच्या पाठ्यक्रमांची व विभागांची निर्मिती-रचना झाल्याचे दिसत नाही.

काळानुसार आणि समाजाच्या बदलत्या गरजांनुसार प्रत्येक विद्याशाखेचा विस्तार व विकेंद्रीकरण होत असते. विज्ञानाचे अर्धशतकापूर्वीचे शिक्षण आणि आजचे शिक्षण यांत स्वाभाविकपणे खूपच फरक पडलेला आहे. तंत्रज्ञानासह अनेक शाखोपशाखा निर्माण झालेल्या आहेत. सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासातही वैशेषीकरणासह आमूलाग्र बदल झालेले आहेत. पण असे बदल मराठीच्या शिक्षणात दिसत नाहीत. मराठीचे शिक्षण व्याकरण, भाषाविज्ञान, व्यावहारिक मराठी अशा काही घटकविषयांचा अपवाद वगळता आजही साहित्याच्या चौकटीबाहेर पडलेले नाही. त्यामुळे साहित्याच्या अभ्यासाचे महत्त्व अबाधित ठेवून एक विषय म्हणून मराठीचे कालोचित विस्तारीकरण करणे ही काळाची गरज आहे. मराठीचे विद्यार्थी, मराठी भाषा आणि समाज या सर्वासाठीच त्याची आवश्यकता आहे. वास्तविक राज्याच्या राजधानीतील विद्यापीठ म्हणून मुंबई विद्यापीठात मराठीच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज होती. परंतु राजभाषा मराठीचा वेगळा विचार न करता अन्य भाषाविभागांप्रमाणे एक भाषाविभाग (खरे तर साहित्यविभाग) म्हणून मुंबई विद्यापीठात मराठी विभाग अस्तित्वात आला. भाषासंवर्धनाच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका असलेले भाषाविज्ञान व भाषाध्यापन हे विभाग मराठीमध्ये आजही अस्तित्वात आलेले नाहीत. मुंबईसह राज्यातील अनेक विद्यापीठांमध्ये इंग्रजी माध्यमातील भाषाविज्ञान विभाग आहेत. तसे ते जगात अनेक ठिकाणी आहेत. पण

मराठीच्या भाषिक अभ्यासासाठी आवश्यक असा मराठी भाषाविज्ञान विभाग जगाच्या भूतलावर केवळ महाराष्ट्रातच अस्तित्वात येण्याची शक्यता होती तो आजतागायत सुरू झालेला नाही. परिणामी मराठीच्या भाषिक अभ्यासाचा-संशोधनाचा अनुशेष सतत वाढत गेला.

मराठीचे साहित्येतर म्हणता येतील असे अनेक विषय आहेत की जे अभ्यासकांची, संशोधकांची प्रतीक्षा करीत आहेत. मुख्य म्हणजे त्यांत रोजगाराच्या शक्यता आहेत. प्रयोजनमूलक मराठी, भाषा-तंत्रज्ञान, मराठीचा समाजभाषावैज्ञानिक अभ्यास, विविध प्रकारचे समाजोपयोगी कोश व व्याकरणे यांची रचना, मराठीचे संगणकीकरण-प्रमाणीकरण, लिपी व लेखनसुधारणा, मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण व अभ्यास, विविध ज्ञानशाखांसाठी परिभाषानिर्मिती, मराठीचे प्रथम-द्वितीय भाषा म्हणून अध्यापन-प्रशिक्षण व संशोधन, द्विभाषावाद, मराठीच्या व मराठी माध्यमातून दिल्या जाणाऱ्या शिक्षणातील समस्या व उपाय, बदललेल्या परिस्थितीत मराठी भाषेपुढील समस्या व आव्हाने, बहुभाषिक महानगरांतील मराठी, महाजालावरील मराठी, प्रसार माध्यमांतील मराठीचा वापर, भाषानियोजन-व्यवस्थापन, व्यवसाय संज्ञापन, मराठीतून ऑनलाईन-व्यावसायिक शिक्षण इत्यादी. या व अशा अनेक विषयांचा मराठीच्या संवर्धनाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असल्यामुळे औपचारिक शिक्षणात त्यांची काही तरी व्यवस्था लावणे आवश्यक आहे.

मराठीच्या उच्च शिक्षणात साहित्येतर विषयांना मज्जाव केल्याने ना साहित्यविभाग टिकणार आहेत ना मराठी भाषा.इंग्रजीप्रमाणे मराठीच्याही व्यावसायिक वापराची क्षेत्रे शोधून त्यांना पाठ्यक्रमांचे विषय म्हणून स्वीकारण्याची गरज आहे. मुंबईसारख्या शहरात अमराठी भाषकांना मराठी शिकवण्याची मोठी बाजारपेठ निर्माण होऊ शकते. पण मराठी भाषाध्यापनाच्या शास्त्रीय अभ्यासाची, प्रशिक्षणाची व संशोधनाची सोय खुद्द मुंबई विद्यापीठातही नाही. साहित्यव्यवहारापलीकडच्या जगाकडे पाठ फिरवून रोजगाराचे एक मोठे क्षेत्र आपण वाया घालवले. संधी असूनही मराठीचे उच्च शिक्षण व्यावसायिक संधींशी न जोडल्यामुळे व रोजगाराभिमुख न केल्यामुळे हुशार विद्यार्थी मराठीपासून दूर जाऊ लागले.

आजचे आणि साठ-सत्तरच्या दशकातील मराठी विषय घेणारे विद्यार्थी यांच्या सामाजिक, आíथक पाश्र्वभूमीचा तौलनिक अभ्यास केला म्हणजे वर्गीय बदलही लक्षात येतो. मराठीचे आजचे विद्यार्थी प्राय बहुजन समाजातील आहेत आणि भौतिक प्रगती ही त्यांची प्राथमिकता आहे. अभिजन वर्गाने मराठीकडे पाठ फिरवलेली आहे. या सामाजिक बदलाची आपण दखल घेणार आहोत की नाही? आजच्या स्पध्रेच्या युगात मराठी विषय अधिकाधिक कालबाह्य़ व व्यावसायिकदृष्टया अव्यवहार्य ठरण्यात इतर अनेक कारणांबरोबर मराठीच्या उच्च शिक्षणातील कालोचित बदलांचा अभाव हेही एक महत्त्वाचे कारण आहे. साहित्यकेंद्री व उदारमतवादी शिक्षण मराठीतून आणि उपयोजित व व्यावसायिक शिक्षण इंग्रजीतून या अघोषित विभागणीमुळे उच्च शिक्षणातील मराठीचे स्थान डळमळीत झाले तर नवल नव्हे.

 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color