अथातो जिज्ञासा
लेख़क श्री. अरविंद देशपांडे   

जिज्ञासा वृत्ती ही नैसर्गिक आहे. किंबहुना मानवी विकासाचा मूलाधार आहे. मानवाने केलेल्या विविध क्षेत्रातील प्रगतीचा पायाच जिज्ञासा वृत्ती आहे. जाणून घ्यावे, समजावून घ्यावे असे वाटणे हा मनुष्य स्वभाव आहे. कोठे? का? केव्हा? कधी? कसे ? कोणी? काय? हे फक्त शब्द नाहीत तर त्या त्या क्षेत्रातील, विषयाच्या प्रगतीचे टप्पे आहेत. प्रश्र्नातून जीवनाची सुरुवात होते आणि उत्तर शोधता प्रश्र्न पुढील पिढीकडे सोपवून आयुष्य संपून जाते.
भारतीय तत्त्वज्ञानातील उपनिषदांचा आधार प्रश्न आहे. प्रश्नातून ज्ञानाचा उगम झाला. न्यूटन, एडिसन, ग्रॅहमबेल, गॅलिलिओ अशा विविध शास्त्रज्ञांनी लावलेले शोध त्यांच्या जिज्ञासा वृत्तीमध्ये आढळतात. प्रश्न विचारांना गती देतात. समस्या निवारणासाठी ’ वादे वादे जायते तत्व बोध: ’ ! हाच मार्ग स्वीकारावा लागतो. सत्याचा शोध घेणे आणि ज्याला आपण सत्य म्हणतो त्याच्या मुळाशी जाणं हे प्रश्नाचं कार्य. प्रश्नामुळेच मानवी प्रगती झाली.
प्रश्नाची साधी सोपी व्याख्या करताना डॉ. ब्राऊन म्हणतात, ’ ज्ञानाची चाचपणी करणारे वा ज्ञानाची निर्मिती करणारे विधान म्हणजे प्रश्न’. याचा अर्थ असा कीं, प्रश्न विचारल्यामुळे ज्ञान किती प्राप्त झाले याची माहिती मिळते, त्याचप्रमाणे नवीन माहिती मिळते. जिथे प्रश्न नाहीत तिथे प्रगतीही नाही. म्हणून शाळा, महाविद्यालयामध्ये प्रश्न पध्द्ती एक अध्यापन पध्दती म्ह्णून स्वीकारली जाते.
प्रश्नांचा बाऊ न करता प्रश्नाकडे विधायक दृष्टीकोनातून पाहिले की, आपल्यापेक्षा प्रश्नांची उंची कमी वाटते. सॉक्रेटीस अध्यापनाची पध्दती म्हणून प्रश्नाकडे पहात असे. विद्यार्थ्याना विचार करणेस प्रवृत्त करणे हा त्या मागील उद्देश होता. भारतीय विचारधारेत नचिकेताचे प्रश्न असोत अथवा महाभारतातील प्रसिध्द ’ यक्षप्रश्न ’ असोत हे काही समजून घेण्याचे प्रयत्न आहेत. जीवनाला दिशा देणेचे प्रयत्न आहेत. संभ्रमावस्थेमध्ये असणार्‍या अर्जूनाला पडलेले प्रश्न जीवनदर्शी आहेत. अर्जुन फक्त महाभारतात झाला असे नाही. एका अर्थाने आपण सर्वच अर्जुन आहोत. आपल्या प्रश्नाच्या मध्यमातून आपणच अर्जुन होतो आणि आपल्यातील श्रीकृष्ण होऊन आपले प्रश्न आपणच सोडवू शकतो. म्हणूनच प्रश्नाकडे विधायक दृष्टिकोनातून पहायला हवं. प्रश्नाचं सामर्थ्य मोठं आहे. प्रत्येकाच्या विचारप्रक्रियेवर ते आधारलेलं असतं इतकंच. तरीही प्रश्नांचे माहात्म्य कमी होत नाही कारण,
प्रश्न, विचारांना गती देतात.
प्रश्न, नव्या कल्पना वास्तवात आणतात.
प्रश्न, प्राप्त ज्ञान व्यापक करतात.
प्रश्न, नव्या-जुन्याचा समन्वय घडवतात.
प्रश्न, मनाची एकाग्रता वाढवतात.
प्रश्न, सत्य-असत्याचे दर्शन घडवतात.
प्रश्न, आंतरिक शक्तीचा शोध घेतात.
प्रश्न, व्यक्ती-व्यक्तीत संवाद घडवतात.
प्रश्न, नव्या ज्ञानाचा शोघ घेतात.
प्रश्न, ज्ञानाची चाचपणी करतात.
प्रश्न, दिशा देतात, प्रगती करतात, समाधान देतात.
अस्वस्थेकडून स्वस्थतेकडे आणि स्वस्थतेकडून परत अस्वस्थेकडे नेण्याचे सामर्थ्य प्रश्नात आहे.
मुलांचा स्वभाव सामान्यत: चौकस असतो. हे काय? ते काय? असे  त्यांचे प्रश्न भंडावून सोडतात त्याला आपले ठरलेले एकच उत्तर असतं. ’ तुला नको त्या चौकशा कशाला ?’ अशा आपल्या उत्तराने त्यांचे समाधान काही होत नाही. हळूहळू वाढत्या वयाबरोबर प्रश्न विचारणे बंद करतात. पण उत्तराचा शोध चालू राहतो. कधी समवयस्कांकडून तर कधी थोडे मोठे यांचेकडून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात. कदाचित विपर्यस्त माहिती त्यांना प्राप्त होते आणि जीवनाचे संदर्भच बदलतात. म्हणून त्यांना प्रश्न विचारण्याची, समर्पक उत्तरे मिळविण्याची सवय आपण लावली पाहिजे.
प्रश्नांची समर्पक उत्तरे शोधण्यासाठी पुस्तके वाचणे, प्रयोग करणे, विविध माहिती केंद्रांना भेटी देणे, पर्यटन करणे, ज्ञानी व्यक्तीकडून माहिती घेणे अशा विविध गोष्टींच्या सवयी लावणे शक्य आहे.
केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार !
शास्त्र ग्रंथ विलोकन मनुजा चातुर्य येतसे फार !!
      या दृष्टिने हे सुभाषित महत्त्वाचे आहे.
ज्ञानाच्या क्षेत्रांत प्रश्नामुळेच जगण्यालाही अर्थ येतो. मी का जगतोय? मला काय  मिळवायचं आहे? का मिळवायचं आहे? कसं मिळवायचं आहे? आणि मिळविल्याचा उपयोग काय? अशा विविध प्रश्नांची उत्तरे कदाचित मिळू शकतील. ’ जीवेत शरद: शतम्‌ ’ ! ही आपली वेदवाणी आहेच. त्याचबरोबर लोकमड्गंल्वर्धनम्‌! हेही तितकेच सत्य. कदाचित हे सत्य त्यातून उजागर होईल. जिज्ञासा वृत्तीला विधायक विकासासाठी प्रवृत करणेसाठी प्रश्नाचा बाऊ न करता त्यांचा खाऊ करणे सर्वस्वी आपल्या हाती!
श्री. अरविंद देशपांडे

 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color