स्वागतकक्ष arrow मराठी भाषा arrow मराठी - महाराष्ट्राची ज्ञानभाषा
मराठी - महाराष्ट्राची ज्ञानभाषा
लेख़क डॉ. सु. वि. रानडे   

महाराष्ट्र हे उद्योग, तंत्रज्ञान तसेच विज्ञान संशोधनात आघाडीवर असणारे राज्य आहे. मात्र इंग्रजी भाषेच्या अडथळ्यामुळे हे ज्ञान सर्वसामान्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणण्यात अपयशी ठरलेले आहे. सध्या विज्ञान व उच्च तंत्रज्ञान फक्त इंग्रजी भाषेची मक्तेदारी झाल्याने मराठीत याविषयी काही लिहिणेही कमीपणाचे वाटू लागले आहे.

मराठी विज्ञान परिषदेसारख्या संस्था गेली अनेक वर्षे मरा्ठीतून विज्ञानप्रसाराचे काम करीत आहेत. या उपक्र्मात मोठमोठे शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ सहभागी झाले आहेत. त्यांनी विज्ञान तंत्रज्ञानातील शब्दांना समर्पक मराठी शब्द शोधून त्यांचा वापर करून बरेच लिखाणही केले आहे. तरीही हे काम शालेय विद्यार्थ्यांपुरतेच मर्यादित राहिले. याचे कारण मराठीतील पर्यायी शब्द व प्रचलित इंग्रजी शब्द यांची सांगड घालून अर्थ समजावून घेण्याचा खटाटॊप करण्याएवढा वेळ देण्याची लोकांची तयारी नसते. साहजिकच अशा मराठी साहित्याकडे केवळ अभ्यासण्याजोगी मराठी कलाकृती या दृष्टीकोनातून पाहिले गेले.

शुद्ध मराठी पर्यायी शब्दांचा आग्रह धरल्याने मराठीतील असे बरेच साहित्य सर्वसामान्यांना दुर्बोध झाले आहे. कालांतराने हे मराठी शब्द रूढ होतीलही पण प्रगत विज्ञान व मराठीतील भाषांतरित ज्ञान यातील अंतर वाढतच राहील. भाषेचा मुख्य उद्देश ज्ञान संक्रमित करणे हा असल्याने नेहमीच्या वापरातील इग्रजी शब्दही मराठीत निःसंकोचपणे वापरून हे ज्ञान लवकरात लवकर विशेष प्रयास न करता सर्व सामान्य जनतेला कसे समजू शकेल याचा विचार दुर्दैवाने झाला नाही.

माझ्याही बाबतीत असेच घडले. १९६८ मध्ये पर्यावरण विषयात एम. ई. करतानाच मराठीत हे ज्ञान यावे असे मला वाटले. मराठी साहित्य संस्कृती मंडळातर्फे ‘जलशुद्धीकरण’ या विषयावरील जागतिक आरोग्य संघटनेचे चार्लस कॉक्स या लेखकाच्या पुस्तकाचे मराठीत भाषांतर करण्याचे काम मी अंगावर घेतले. मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे श्री. बा. रं. सुंठणकर यांनी सांगलीत माझ्या घरी येऊन या माझ्या कामास प्रोत्साहन दिले. माझ्या या कामास मार्गदर्शक म्हणून निवृत्त सचिव व मुख्य अभियंता असणारे श्री. वि. ह. केळकर हे काम पहात होते. त्यांनी धरण व जलसिंचन विषयावरील पुस्तके भाषांतरित केली होती. जलशुद्धीकरणातील सेटलिंग व फिल्ट्रेशन या प्रक्रियांसाठी त्यानी अवसादन व निस्यंदन हे मराठी शब्द सुचविले. अशा पद्धतीच्या अनेक संस्कृतोद्भव नव्या शब्दांचा उपयोग करून जिद्दीने मी ते ३०० पानांचे पुस्तक भाषांतरित केले खरे. जलशुद्धीकरण केंद्राची देखभाल करण्याविषयी अतिशय बहुमोल अशी माहिती यात असल्याने मी ते जलशुद्धीकरण केंद्रातील लोकांना वाचायला दिल्यावर पूर्ण वाचायचे कष्ट न घेता वरवर चाळून ‘छान भाषांतर आहे’ एवढ्या अभिप्रायाने त्यांनी ते परत केले. या पुस्तकाचा प्रत्यक्ष व्यवहारात काहीही उपयोग होणार नाही हे कळून चुकल्याने जवळजवळ ६०० पानांचे ते हस्तलिखित प्रकाशित न करता मी तसेच ठेवून दिले.

गेल्या पन्नास वर्षात मराठीत अनेक नवे पर्यायी शब्द आता रुढ झाले आहेत मात्र त्यासाठी बराच काळ जावा लागला आज विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती ज्या वेगाने होत आहे त्याच्याशी तुलना करता भाषांतरित ज्ञान लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी एवढ्या उशीरापर्यंत थांबणे परवडणारे नाही. इंग्रजी शबदांचा बिनदिक्कतपणे वापर करून म्रराठीचा केवळ संपर्क भाषा म्हणून वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.

शासनाने ठरविले असते तर विज्ञान तंत्रज्ञानातील नव्या मराठी शब्दांच्या वापराला निश्चितच बळ मिळाले असते. रशियाने सर्व इंग्रजी पुस्तकांचे व संशोधनपर लेखांचे रशियन भाषेत भाषांतर करण्याचे काम सक्तीने तेथील साहित्यिक व शास्त्रज्ञांकडून करवून घेतले होते. राष्ट्रीय अस्मिता जपण्याचा व वाढवण्याचा तो मार्ग त्यांनी अवलंबिला होता.
आजही शासकीय व्यवहार, कायदा, शेती, सहकार या क्षेत्रात शासनाच्या पुढाकारामुळे मराठीने चांगले पाय रोवले आहेत. मात्र विज्ञान तंत्रज्ञानाकडे शासन याबाबतीत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. उलट यासाठी इंग्रजी शिक्षणास प्रोत्साहन देण्याचे धोरण निश्चित केले आहे. मुलांनी इंग्रजी शिकून मगच विज्ञान तंत्रज्ञानाच्या वाटेला जावे असे शासनाला वाटत असावे. त्यांचे हे मत विद्यार्थ्यांसा्ठी योग्य आहे असे मानले तरी शाळेबाहेर पडलेल्या वा शाळेतच न गेलेल्या बहुसंख्य मराठी लोकांचे काय? त्यांना हे ज्ञान मिळविण्याचा कोणता मार्ग उपलब्ध आहे.
मराठी ही फक्त साहित्यिकांची भाषा आहे अशा थाटात शासन त्याकडे पहात आहे. केवळ साहित्य संमेलनाला देणगी दिली की आपले मराठीविषयी दायित्व संपले अशी भावना शासनाची झाली आहे. मराठी शिकणे म्हणजे व्याकरण शिकणे व साहित्य वाचणे एवढाच अर्थ शिक्षण क्षेत्रातही रूढ आहे. त्यामुळे मराठी शिकविणारे प्राध्यापकही मराठी वाचतात पण लिहीत नाहीत. मराठी घेऊन बीए एमए होणार्‍यांना काही मान नाही व शिक्षण क्षेत्राशिवाय कोठे संधी नाही. भाषांतर हा मुख्य उद्देश मराठी शिकण्यासाठी ठेवला तर हा विषय व्यवसायाभिमुख होईल. मात्र त्यासाठी मराठीचा दुराग्रह न ठेवता किमान दोन भाषांचा अभ्यास करण्याची व भाषांतराची कृती सत्रे अत्यावश्यक थरविण्याची गरज आहे.
आज मराठी लिहिण्याबद्दल कमीपणाची भावना व विलक्षण उदासीनता शिक्षित वर्गात निर्माण झाली आहे. इंग्रजी वाचलेले कळत नाही व मराठीत साहित्य उपलब्ध नाही जे आहे ते प्रत्यक्ष वापरातील शब्द नसल्याने दुर्बोध आहे आजचा जिज्ञासू मराठी वाचक व विद्यार्थी अशा तिहेरी कात्रीत सापडला आहे.
प्रचलित इंग्रजी शब्दांचा वापर करून मराठीत असे साहित्य निर्माण करणेच या परिस्थितीत योग्य ठरेल. मराठीवर प्रभुत्व असणार्‍या लोकांनी नवे शब्द जरूर तयार करावेत पण त्याविना अडायचे कारण नाही. रशियासारखे महाराष्ट्रात होणार्‍या प्रत्येक संशोधनाचा गोषवारा मराठीत प्रसिद्ध करण्याचे बंधन शासन व शिक्षणसंस्था घालू शकतात. सर्वांनी या बाबतीत कर्तव्याच्या भावनेतून मराठीत लिहिण्याचे ठरविले तर मराठी ज्ञानभाषेचे स्थान पुन्हा मिळवू शकेल.
आमच्या ज्ञानदीपने हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मराठीत वेबसाईट (संकेतस्थळे) व सॉफ्ट्वेअर(संगनक प्रणाली) विकसित करण्याचे काम हाती घेतले त्याला आता दहा वर्षे पूर्ण होत आहेत. प्रथम शिवाजी फॉंट(अक्षरसंच) नंतर श्रीलिपी फॉंटचा आम्ही वापर केला. श्रीलिपीतल्या माय कोल्हापूर या वेबसाईटला महाराष्ट्र शासनाचे पारितोषिकही मिळाले होते. जागतिक युनिकोड फॉंट वापरात आल्यावर आम्ही आपल्या सर्व वेबस्दाइत युनिकोडमध्ये परिवर्तित केल्या. आज मायमराठी, मायसांगली, संस्कृतदीपिका, विज्ञान, स्कूलफॉरऑल या वेबसाईट मराठीत असून त्यांना जगभरातून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मात्र अजूनही शासनस्तरावर युनिकोड फॉंटचा वापर सुरू झालेला नाही ही खेदाची गोष्ट आहे. कर्नाटकात तयार केलेल्या बराहा सुविधेचा वापर करून आम्ही मराठी लिहीत आहोत. सीडॅकनेही अशि सुविधा तयार केल्याचे कानावर आले आहे मात्र त्याचा प्रसार व सर्वत्र सक्ती करण्याचे धारिष्ट्य महाराष्ट्र शासनाने दाखविण्याची गरज आहे. शेवटी मराठीविषयी काही कवींचे विचार खाली देत आहे.
मराठी असे आमुची मायबोली,
तिला राज्य का? विश्वभाषा करु
जगातील विद्या तशी सर्व शास्त्रे
तिच्यामाजि आणोन आम्ही भरु
- प्र. ग. सहस्त्रबुध्दे
मराठी असे आमुची मायबोली, जरी आज ती राज भाषा नसे
परभाषेतहि व्हा पारंगत ज्ञानसाधना करा, तरी
मायमराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका
भाषा मरता देशही मरतो संस्कृतिचाही दिवा विझे
गुलामभाषिक होऊनि अपुल्या प्रगतीचे शिर कापु नका
कवि कुसुमाग्रज ( स्वातंत्र्यदेवीची विनवणी )

नको पप्पा - मम्मी आई - बाबा म्हणा
वात्सल्याच्या खुणा शब्दोशब्दी
धन्यवाद म्हणा नको थँक्यू थँक्यू
थोडे थोडे रांगू मराठीत
कवि किशोर पाठक - प्रकाशनविश्व २००१

ठाणे येथील मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्राच्या राजधानीजवळ भरत आहे. नवे मुख्यमंत्री विज्ञान तंत्रज्ञानातील तज्ज्ञ आहेत. या संमेलनात मराठीला खरी ज्ञानभाषा बनविण्याविषयी साहित्यिक व राजकीय नेते काही खास उपाययोजना सुचवतील व त्या अमलात आणतील अशी आशा करूया.

 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color