स्वागतकक्ष arrow मराठी भाषा arrow प्राथमिक शिक्षणासाठी मराठी माध्यम
प्राथमिक शिक्षणासाठी मराठी माध्यम
लेख़क डॉ. सु. वि. रानडे   

महाराष्ट्र शासनाने १९ जूनला एक परिपत्रक काढून मान्यता नसलेल्या सर्व मराठी शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्याविषयी ‘आंदोलन शाश्वत विकासासाठी’ या मसिकाच्या सप्तेंबर २०१० मध्ये विस्तृत माहिती आली आहे. अनुदान द्यावे लागू नये म्हणून काढलेला हा आदेश विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढण्यात होत असून शासनाने आपले परिपत्रक त्वरित मागे घेतले नाही तर आत्ता चालू असलेल्या पण अजून मान्यता न मिळालेल्या मराठी शाळेतील मु्लांना पालक विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतील व त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा प्रतिकूल परिणाम होईल हे ध्यानात घेतले पाहिजे.

शिक्षण ही ज्ञानदानाची प्रक्रिया आहे. शाळेत मिळालेले ज्ञान घरात, रोजच्या व्यवहारात वापरल्यावरच पक्के होत असते. महाराष्ट्रात आपल्या रोजच्या व्यवहाराची भाषा मराठी आहे. इंग्रजी एक भाषा म्हणून शिकणे वेगळे आणि सर्व विषय इंग्रजीतून शिकणे वेगळे. नवनवे विषय प्रथमच शिकताना आपल्या मातृभाषेतूनच चांगले समजतात व शाळेबाहेरील जीवनात घडणार्‍या संवादांतून व अनुभवातून ते स्थायी ज्ञानात रुपांतरित होत असतात. अंकगणित, पाढे, लेखन, वाचन यासाठी सभोवतालच्या व रोजच्या अनुभवातील उदाहरणे द्यावी लागतात. दुकानांच्या पाट्याही मराठीत करण्याचा आग्रह धरणार्‍या शासनाने सर्व विषयांच्या शिक्षणासाठी लहान मुलांवर इंग्रजी लादणे चुकीचेच नाही तर अत्यंत गर्हणीय आहे.

बहुतेक पालकांना इंग्रजीचे ज्ञान बेताचे असते. त्यामुळे मुलांना घरात पालकांचे मार्गदर्शन मिळणार नाही. घरात, बाजारात मराठी बोलले जाते. इंग्रजी भाषेचा मुख्य अडथळा उभा केल्याने मुलांना गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल हे विषय नीट समजणार नाहीत व समजले तर त्याचा संबंध त्याना रोजच्या व्यवहाराशी लावता येणार नाही. साहजिकच ते ज्ञान पुस्तकी राहील. मुले पोपटासारखी इंगजी बोलतील, गाणी म्हणतील. पालकांना आपल्या मुलाला इंग्रजी येते म्हणून धन्यता वाटेल. पण थोड्याच दिवसांत त्यांच्या लक्षात येईल की ही केवळ पोपटपंची आहे. इतर विषयात मुलगा मराठी माध्यमातील मुलापेक्षा मागे पडत आहे. जागतिकीकरणामुळे इंग्रजीला फार महत्व आहे हे खरे पण प्राथमिक स्तरावर तरी मराठी माध्यमाचाच आग्रह सर्वांनी धरावयास हवा.

मोठ्या शहरातील व कॉस्मॉपॉलिटन संस्कृतीत राहणार्‍या पालकांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा निवडल्या तर समजू शकते. पण गावोगावी नव्या महागड्या इंग्रजी शाळा निघत असून त्याची भुरळ पालकांना पडत आहे. माझ्या माहितीच्या अनेक गरीब पालकांनी पोटाला चिमटा काढून आपली मुले महागड्या इंग्रजी शाळेत घातली ती आज पस्तावत आहेत.त्यांची मुले अभ्यासात कच्ची राहिली आहेत. त्यांचे मराठी वाचन थांबले आहे. मराथीतील अपार ज्ञानसंपदा त्यांना पारखी झाली आहे. मराठी वर्तमानपत्रेही वाचणे त्यांना नको वाटते. त्याहीपेक्षा त्यांचे वागणे थाटाचे, प्रौढीचे होऊन ती नातेवाईकांपासून व समाजापासून वेगळी होत आहेत. हा धोका मोठा आहे.

कवी किशोर पंडित यांच्या कवितेत त्यानी म्हटले आहे - ‘ नको पप्पा मम्मी, आई बाबा म्हणा, थोडे थोडे रांगू मराठीत’ या संकेतस्थळावर या विषयावर व मराठीच्या महतीबद्दल अनेक थोर व्यक्तीचे विचार दिले आहेत. पु. ग. सहस्रबुद्धे यानी आपल्या ’माय मराठीची हाक’ या पुस्तकात ह्या संस्कृतिबदलाचा धोका विषद केला आहे. हा संस्कृतीबदल आपल्याला रुचणार आहे का?

अशा विनाशकारी धोरणास सर्वांनी विरोध करून शिक्षणाच्या खाजगी इंग्रजीकरणाचा शासनप्रणित उद्योग थांबविला पाहिजे.

 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color