यदुनाथजी
लेख़क Administrator   
 

यदुनाथजी : एक सच्चा माणूस

     यदुनाथजींच्या प्रसन्न आणि प्रेमळ व्यक्तिमत्वात अशी काही जादू होती की एखादवेळी त्यांची भेट झालेल्या माणसाला सुद्धा त्यांच्याबद्दल आपुलकी आणि जिव्हाळा वाटायचा.

     त्यांची पत्नी प्रिय जान्हवी ही माझी विद्यार्थिनी-मैत्रीण! त्यामुळे त्यांच्या-माझ्या स्नेहाला आणखी एक माधुर्याचा पदर होता. काही वर्षापूर्वीची - म्हणजे मला वाटते फार तर पाच-सहा वर्षे झाली असतील - तेव्हाची ही एक आठवण. विश्रामबागला माझ्या घरी ‘पसायदाना’त आले होते. त्यांच्या आगमनाची मला काहीच कल्पना नसल्याने त्यांच्या ‘सरप्राईज व्हिजिट’ चा मला खूपच आनंद झाला. थोड्या गप्पाटप्पा झाल्यावर ते सहज म्हणाले, "मालतीबाई, मी निघालो आहे जयसिंगपूरला. तुम्हाला सवड असली तर चला की तुम्हीही आमच्याबरोबर!" अशी संधी मी कशी दवडीन? ते व त्यांचे एक स्नेही यांच्याबरोबर मीही मग जयसिंगपूरला गेले. तिथल्या एका शाळेत त्यांचे भाषण होते. मुख्याध्यापकांचे प्रास्ताविक झाले आणि यदुनाथजी बोलायला उभे राहिले. ते म्हणाले "मित्रांनो, मी प्रथम तुम्हाला एक गाणे सांगतो. ते तुम्ही माझ्याबरोबर म्हणायचे हं " आणि लागलीच खड्या आवाजात ते एक देशभक्तीपर गाणे म्हणू लागले. प्रथम एक ओळ ते एकटेच म्हणत नि नंतर पुन्हा मुलांबरोबरही म्हणत. मुलांना ते गाणे, त्याचा अर्थ, त्याचे नादमाधुर्य आणि ताल आणि मुख्य म्हणजे यदुनाथजींची तळमळ नि उत्साह हे सगळे खूऽऽप आवडले. मुले ज्या जोषात ते गाणे म्हणत होती त्यावरून ते कुणालाही कळत होते. ध्रुपदाच्या ओळी दोन-तीन वेळा आळवून म्हणून यदुनाथजींनी जेव्हा गाणे संपवले तेव्हा सारे मैदान टाळ्यांच्या कडकडाटाने निनादत राहिले. मग त्यांनी थोडा वेळच भाषण केले. त्याचीही त्यांची पद्धत वेगळीच होती. काही राष्ट्रभक्तांच्या जीवनातल्या तेजस्वी आणि अविस्मरणीय कथा अतिशय रसाळ भाषेत त्यांनी मुलांना सांगितल्या. ना केला कसला उपदेश की नाही केली कसली भाषणबाजी! त्यांची छोटी छोटी वाक्ये, मायाळू वत्सल स्वर, कळकळीची भाषा यामुळे त्यांचे भाषण अतिशय प्रभावी झाले.

     प्राचार्य नरहर कुरुंदकर व यदुनाथाजी यांचा परस्परांवर अतिशय लोभ होता. कुरुंदकरांच्या निधनाचा तीव्र धक्का यदुनाथजींनाही अर्थातच जाणवला. त्यांनी पत्रात लिहिले होते, "मालतीबाई, आपले कुरुंदकर गेले! फार अकाली गेले." शब्द मोजके पण व्यथेची आच जाणवून देणारे! त्या दुःखात आपली वैयक्तिक हानी-तिचे दुःख तर होतेच, पण त्या मित्राच्या जाण्याने जी सामाजिक, राष्ट्रीय हानी झाली होती तिचीही वेदना होती. म्हणूनच आपले दुःख मनातच ठेवून ते मराठवाड्यात गेले, कुरुंदकरांच्या स्नेही मित्रांना, विद्यार्थ्यांना भेटले, कुरुंदकरांची नवी पुस्तके लवकर प्रकाशित व्हावीत म्हणून तातडीने कामाला लागले. या वर्षीच्या सप्टेंबरात त्यांची-माझी अखेरची भेट झाली. दुखण्याने ते अतिशय थकले होते. त्यांना भेटून माझ्या पुस्तकाची प्रत देऊन त्यांना नमस्कार करून परत येण्याचे मी ठरवले होते. मी त्यांच्या बिछान्याशी जाऊन हळूच हाक मारली, ‘यदुनाथजी’, त्यावर त्यांनी किंचित डोळे उघडून माझ्यकडे पाहिले. हास्याची, मला ओळखल्याची क्षीण रेषा त्यांच्या चेह‍र्‍यावर उमटली. मी पुस्तक त्यांच्या हाती ठेवले. त्यांनी आपल्या बिछान्याजवळच्या छोट्या मेजावरची दोन सुगंधी फुले माझ्या हाती दिली. स्वतःच्या आजारातही दुसर्‍याला आनंद देण्यासाठी उत्सुक असा त्यांचा स्वभाव - माझे डोळे पाणावून गेले ...  

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color