मरणकल्पनेशी थांबे
लेख़क Administrator   
 

मरणकल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा

कविवर्य ग.दि. माडगूळकर यांची प्रासादिक रसाळ, भावस्निग्ध कविता कोणालाही आवडावी अशीच आहे. मानवी जीवनातील अटळ सत्ये ते ज्या नेमक्या शब्दात सांगतात, ते त्यांचे कौशल्य आगळेच म्हणयला हवे. गीतरामायणातील ‘मरणकल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा’ हे त्यांचेच एक बोलके उदाहरण! आपल्या निकटच्या आप्तसुहृदावर जेव्हा मृत्यूचा अकस्मात घाला पडतो, तेव्हा या ओळीतील कठोर सत्य आपले काळीज कापत जाते.

महाराष्ट्रातील थोर विचारवंत प्राचार्य नरहर कुरुंदकर सांगली-मिरजेकडे व्याख्यानाच्या निमित्ताने आले म्हणजे त्यांच्याशी गप्पा-टप्पा, चर्चा, विचारविनिमय करायला नानाविध विषयावरील त्यांचे पुरोगामी, निर्भीड विवेचन ऎकायला लोकांना फार आवडत असे. ते कधी-कधी माझ्या ‘पसायदाना’त उतरत असत. १९८१ मधील एक घटना सांगते. व्याख्यान सांगलीत होते. थिएटरमध्ये स्टेजच्या पायर्‍या ते चढत असताना संयोजकांनी व्याख्यानाचा पूर्वीचा विषय अकस्मात बदलला व त्या दिवशी नेहरू जयंती होती म्हणून त्यांच्याविषयी बोलण्याची प्राचार्यांना विनंती केली. ‘साहित्त्यिक नेहरू’ या विषयावर असंख्य संदर्भ देत त्यांनी उत्तम भाषण केले. श्रोतृवृंद मंत्रमुग्ध होऊन ते ऎकत होता. दुसर्‍याच दिवशी ते परगावी जाणार होते. संध्याकाळची गाडी होती. मी नेहमीप्रमाणे त्यांच्या हातावर दही घातले. ते खाऊन ते स्वस्थच उभे राहिले. हसत-खेळत, कुणाची तरी खिल्ली उडवत मिश्किलपणे ते बोलत राहात. त्यामुळे आजचे त्यांचे हे मौन मला अनपेक्षितच होते. मी त्यांच्याकडे पाहिले तर डोळ्यांना धारा लागलेल्या! मला काहीच अर्थबोध होईना. "तुम्हाला बरे नाही का? डॉक्टरांना बोलावू का?" असे मी पुन्हा पुन्हा विचारत राहिले. त्यांनी मानेनेच नाही, नको असे सांगितले. बसस्टॉपवर मी निरोप घेतला तेव्हाही त्यांचे डोळे पाणावलेलेच होते. योगायोग असा की तीच त्यांची माझी विश्रामबागमधली अखेरची भेट ठरली. त्याला आता पंचवीस वर्षे झाली. पण एक विचार आजही मला अस्वस्थ करतो की त्यांना मृत्यूची चाहूल लागली असेल काय? ते अश्रू त्या अखेरच्या निरोपाचे होते काय? सारे केवळ नियतीलाच ज्ञात असणार! औरंगाबादला संगीतोत्सवाचे अध्यक्ष म्हणून गेले असता स्टेजवरच कोसळले! सारेच अतर्क्य! 

प्रा. श्रीराम पुजारी हे माझे शाळाबंधू. स्वभाव आनंदी, मोकळा! तहान-भूक विसरून उत्तम कामात स्वतःला झोकून देणारा असा तो व्यासंगी विद्यार्थिप्रिय प्राध्यापक. वक्ते म्हणून नामवंत होते. संगीतातले दर्दी! खडतर बालपणावर मात करून हिमतीने अतोनात कष्ट सोसून ते मोठे झाले. स्वतःच्या नावाचा ट्रस्ट करून, पुस्तकांपासून, औषधापर्यंत अनेकपरीने लोकांना सहाय्य केले. सांगली-मिरजेला आले की ‘पसायदानात’ आवर्जून यायचे. गप्पा, चहा-पाणी झाल्यावर पुढचा मुक्काम गाठायचे. अडीच-तीन वर्षापूर्वी ते आले होते. गप्पा-टप्पा झाल्यानंतर रामभाऊ म्हणाले, "बराय मालू, चलतो मी आता. प्रकृतीला जप. आमच्या आधी मरूबिरू नकोस हं! कोण जाणे पुन्हा आपली भेट होते की नाही?" त्यावर मी म्हटलं, "आज हा मरणाचा काय विषय काढला आहे तुम्ही?" त्यावर ते म्लानपणे हसले आणि हात उंचावून मोटारीत जाऊन बसले. त्यानंतर लवकरच ध्यानीमनी नसताना त्यांच्या निधनाचीच वार्ता कानावर आली. मन सुन्नखिन्न झाले. दोन्ही कर्तबगार सुहृदांच्या चिरवियोगाने ‘मरणकल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा’ या दाहक सत्याचा अनुभव मला आला. मृत्यूच्या काठीला नाद नसतो म्हणतात. मला वाटते तिला नाद खचित असावा. पण तो ऎकू येत असावा फक्त त्यांनाच ज्यांना वरचे आमंत्रण आलेले असते.

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color