निरोप घेताना
लेख़क Administrator   
 

निरोप घेताना

‘लोकमत’चे अभ्यासू, सततोद्योगी आणि उत्साही संपादक दशरथ पारेकर हे आम्हा भावंडांचे जिव्हाळ्याचे स्नेही! त्यांच्या सांगण्यावरून गेले सहा महिने मी या वृत्तपत्रासाठी काही लेखन केले. यथामती व यथाशक्ती पण प्रांजळ मनाने आणि आनंदाने ते लिहिण्याची संधी दिल्याबद्दल संपादकांची आणि लेखांबद्दल आवर्जून आपला अभिप्राय कळविणार्‍या वाचकांची मी मनापासून आभारी आहे. आजचा हा निरोपाचा लेख लिहिताना मन जड झाले आहे. कारण All parting in life is sad हे खरेच आहे. आज पुन्हा एकवार इतकेच म्हणते, ‘लोकमत’ला त्याच्या त्याच्या उज्ज्वल भविष्यकालीन वाटचालीसठी माझ्या खूप खूप शुभेच्छा! ‘तिळा उघड’ य शब्दांनी उघडलेली ऎश्वर्यसंपन्न गुहा अलिबाबाच्या मनाची जी स्थिती झाली असेल तिचा अनुभव मीही घेतला. भूतकाळातील अनेक व्यक्ती, घटना यांची हे लेख लिहिताना जणू पुन्हा माझ्याशी भेटच झाली, असा आनंद मला वाटला. गुरुवर्य आण्णासाहेब कर्वे आणि प्राचार्य गोकाक, कोगेकर सर याच्यावर मी लिहिले. स्त्रियांच्या दुःखाने पोळलेले मन उघड करून दाखविले. न पटणार्‍या सामाजिक गोष्टींवर टीका केली, आणि विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या आठवणीत रमले, प्रसंगी गहिवरलेही!

आज चौर्‍याऎंशीव्या वर्षी या लेखांकडे आणि एकूण जीवनाकडेच वळून पाहताना माझ्या मनात येते, मी एक सामान्य स्त्री! पण नियतीने माझ्या झोळीत, माझी कसलीच योग्यता नसताना भरभरून दान घातले. त्यापैकी कितीतरी गोष्टींबद्दल सांगायचे राहूनच गेले की! विविध क्षेत्रातली मातब्बर, नामवंत माणसे मला भेटली. काहींचा निकट सहवासही मला लाभला. उदंड प्रेम तर अनेकांचे मिळाले. त्यात माझ्या प्रेमळ आप्तांप्रमाणेच माझे विद्यासंपन्न गुरुजन, निरपेक्ष मैत्रीचे सोने मला देणार्‍या माझ्य मित्रमैत्रिणी, प्रतिभाशाली साहित्त्यिक, विधायक कार्यकर्ते अशा कितीतरी जणांचा वाटा फार मोठा आहे. आजच्या लेखात त्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करावे. त्यांच्या जिव्हाळ्याने, मार्गदर्शनाने, आशीर्वाद आणि शुभेच्छा यांच्यामुळे माझे जीवन संपन्न झाले, अशी माझी प्रांजळ आणि गाढ श्रद्धा आहे. त्यातल्या काहींचे हे ओझरते दर्शन!

हिंगण्याच्या वसतिगृहात मला ठेवून तीर्थरूप शंकरभाऊ परत निघालेले पाहताच मी ओक्साबोक्शी रडू लागले. सहा वर्षाच्या मला पोटाशी धरून "" येतो ना तुझ्याशी खेळायला.. " असं म्हणणारे वामन मल्हार उर्फ तात्या, विद्यापीठाची सभा संपवून कोल्हापूरहून सकाळी लवकर परतताना आपल्या चहाबरोबर माझ्यासाठी कॉफी करून ठेवणारे व पुन्हा पुन्हा "एकट्या राहता, जपून रहा" म्हणून सांगणारे पितृतुल्य भाऊसाहेब खांडेकर, माझ्या पसायदानात आल्यावर माझ्या कानाच्या दुखण्याची मायाममतेने चौकशी करणारे, इकडच्या तिकडच्या भागातले कुणी भेटले तर "आमच्या मालतीबाई कशा आहेत?" हे आवर्जून विचारणारे कवि, कुलगुरु कुसुमाग्रज, उसाच्या गुर्‍हाळात आग्रहाने रस पाजणारे तेजस्वी साहित्त्यिक दांपत्य विश्राम व मालतीबाई बेडेकर, ज्ञानसागर डॉ. रा. चिं. ढेरे याच्यासारखा लाभलेला दैवदुर्लभ भाऊ, माझ्या आईच्या निधनानंतर आठवणीने सांत्वनपर पत्र लिहिणार्‍या साक्षात सरस्वती असलेल्या दुर्गाबाई भागवत, विश्वविख्यात विदुषी इरावतीबाईंनी "गडे मालती ये ना" म्हणून केलेले स्वागत, ज्योत्स्नाबाई भोळ्यांनी त्यांच्या घरी जेवताना लोणच्याची कृती सांगत म्हणून दाखविलेले गाणे, असे प्रसंग व स्वतःचा मोठेपणा विसरून सर्वांनी केलेला लोभ, ही कोणत्या पुण्याईने मला मिळली म्हणावे? रॅगलर परांजपे व डॉ. चिंतामणराव देशमुखांची माझ्या अभिनंदनपर पत्रांना आलेली स्वतःच्या अक्षरातली पत्रे, हा अभिमानास्पद ठेवा मनाच्या मखमली पेटीत मी जपून ठेवला आहे. या सर्व उत्तुंग व्यक्तिमत्वांना माझे अभिवादन!

माझ्या मैत्रिणींचे माझ्या जीवनतील स्थान तर अनन्यसाधारणच आहे. त्या सार्‍या स्वतेजाने तळपणार्‍या! त्यात नृत्याप्रमाणे अनेक कलात निपुण असलेली रोहिणी भाटे, भविष्यात साहित्यसंमेलनाची सहजच अध्यक्ष होईल, अशी प्रिय वाग्विलासिनी डॉ. सरोजिनी वैद्य, प्रज्ञावंत प्रा. नलिनी पंडित, ख्यातनाम संशोधिका डॉ. तारा भवाळकर अशा कोण-कोण आहेत. त्यांच्या मैत्रीने माझे जीवन सुगंधी फुलबागच होऊन गेले. मी त्या बागेतली एक अगदी साधी वेल!

मला लाभलेले सुहृद ही देवाची मोठीच देणगी! मौजचे साक्षेपी संपादक प्रा. श्री. पु. वैद्य, थोर विचारवंत प्रा. ग. प्र. प्रधान, बालमित्र रंगा वैद्य, प्रज्ञा भास्कर, प्रा. नरहर कुरुंदकर, सुसंस्कृततेचा आदर्श असे वसंतराव आगाशे अशी किती नावे सांगावी? ‘पसायदान’ त्यांच्या भेटी-गाठीने, गप्पा-गोष्टींनी फार भाग्यवान ठरले. प्रा. अविनाश सप्रे अणि सदा डुंबरे ही अशीच दोन बहुमोल रत्ने! याच पंक्तीत, उपवास असून स्वतःजवळचा एक रुपया माझ्या शाळेच्या फंडाला मदत म्हणून देणारा आमचा सेवक दशरथ याची जागा आहे. केवळ माझ्याच नव्हे तर आपणा सर्वांच्याच जीवनात अशी थोर माणसे, घटना असतात. तीच आपली जडणघडण करतात. म्हणूनच त्यांचे मोल सोन्याहून मोठे!

निरोप खूप लांबला, क्षमस्व! आयुष्याच्या गडद होत चाललेल्या संध्याकाळी नियतीला एकच प्रार्थना, "कधी बोलावशील तेव्हा हातात उत्तम पुस्तक आणि ओठात शब्द असू देत .." ‘सर्व सुखी असोत.’ बराय मंडळी, नमस्कार, लोभ असावा, ही विनंती. 
 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color