पी.जी.पी.
लेख़क Administrator   
 

पी.जी.पी.

१९४२ च्या जून महिन्यात विलिंग्डन महाविद्यालयात मी पहिल्या वर्षात प्रवेश केला. स्वाभाविकच तिथल्या वेगवेगळ्या उपक्रमाच्या निवडणुका लगोलगच आल्या. ‘वादविवाद मंडळा’साठी म्हणून जे विद्यार्थी-उमेदवार उभे होते त्यांच्यापैकी एकाचे नाव आम्हा नवीन आलेल्या विद्यार्थीवर्गाच्या सतत कानावर पडे. कोणी म्हणे, "तो पी.जी.पाटील ज्युनिअर बी.ए. त आहे ना, तो फर्स्ट क्लास स्कॉलर आणि फर्डा वक्ता आहे. त्याचा पराभव करणं सोपं नाही महाराज. "कोणी म्हणे, "ऎकच तू त्या ‘पी.जी.पी.’चे भाषण एकदा. नुसता धबधबा आहे धबधबा." मुले उच्चारीत असलेल्या ‘पी.जी.पी.’ या नावाच्या इंग्रजी आद्याक्षरांची मला मोठी गंमत वाटे. बालपणी आम्ही खेळत असू अशा एका खेळाची आठवण येई. एखाद्या शब्दाची उलटसुलट अक्षरे एकच आली की तसे अनेक शब्द शोधण्याची आमच्यात चढाओढ लागे. ‘क-न-क’; ‘न-म-न’, ‘स-र-स’ असे म्हणत राहण्याचा छंद आम्हाला लागे. बॅरिस्टर साहेबांच्या नावाची ‘पी.जी.पी.’ ही अक्षरे ऎकताच मी मनाशी हसून म्हटले, "बरं झालं, हा एक नवा इंग्रजी शब्द घालू या आपल्या वरच्या यादीत."

वादविवाद मंडळा’च्या निवडणुकीचा निकाल बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या अपेक्षेप्रमाणेच लागला. आणि या विद्यार्थि-प्रिय उमेदवाराला जवळून पाहण्याची आमची उत्सुकताही पुरी झाली. त्यावेळी आमची विद्यार्थिसंख्याच मुळी होती तीनशे-साडेतीनशेच्या आसपास. आभार मानण्यासाठी तो विद्यार्थी वर्गात आला, कृश अंगलटीचा, मध्यम उंचीचा, गहू रंगाचा, भव्य रुंद कपाळ असलेला तो विद्यार्थी समोर दिसताच मुलांनी आनांदाने टाळ्य़ा पिटल्या. डोळ्यांना बारीक काड्यांचा चष्मा त्याने लावला होता. माझे लक्ष त्याच्याकडे वेधले ते त्याच्या डोळ्यातून सहजपणे प्रकट होणार्‍या मायाळूपणाच्या छटांनी. त्याने अंगात पांढरा खादीचा शर्ट व लेंगा घातला होता, डोक्यावर गांधी टोपी होती, पायात घट्ट विणीच्या पण कमालीच्या साध्या चपला होत्या. बोलताना तो मान खाली किंचित कलती करी, नाकावरून काहीशा खाली सरकलेल्या चष्म्याच्या कडांवरून बघत तो बोलत असे. पुढेही जेव्हा जेव्हा तो महाविद्यालयात दिसे तेव्हा मित्रांचा एक घोळका त्याच्याबरोबर हटकून असेच आणि काही ना काही चर्चा करीत मोठ्या हिरिरीने तो बोलताना आढळे. त्यावरून हा चांगला तळमळीचा कार्यकर्ता असावा आणि याच्या वृत्तीत एक नैसर्गिक आर्जव व संघटनाचातुर्य असावे असे माझ्या मनात येई. तो हसायचा एखाद्या लहान मुलासारखा आणि अगदी निरागसपणे-

याच्या देशभक्तीचे दर्शन झाले ते १९४२ च्या ऑगस्टमधील देशव्यापी चळवळीच्या वेळी. ब्रिटिशांना उद्देशून ‘छोडो भारत"(Quit India) आणि भारतीयांना उद्देशून ‘करेंगे या मरेंगे’ (Do or Die) अशी महात्मा गांधींनी गर्जना करताच आबालवृद्धांची मने पेटून निघाली. हा भावनाप्रधान हळवा मुलगा थोडाच स्वस्थ बसणार? याच्या घरची परिस्थिती फार बिकट. शिक्षण सगळे फ्रीशिप-स्कॉलरशिपवर चाललेले, पण तो सगळा विचार बाजूला सारून या चळवळीत त्याने स्वतःला झोकून दिले. समविचाराचे विद्यार्थि-विद्यार्थिनीही याने जमविले. आणि महाविद्यालयाच्या परिसरात सकाळ-संध्याकाळ काहीशी निवांत जागा पाहून झेंडावंदन, देशभक्तीची गाणी म्हणणे अशा कार्यक्रमांचा धूमधडाका सुरू केला. गुप्त माहितीपत्रके सायक्लोस्टाईल कर, रात्री अपरात्री त्यांचे वाटप कर, ती भिंतीवर चिकटव, भूमिगत नेत्यांना निरोप पोहोचव, कुपवाडसारख्या जवळपासच्या खेड्यातून ग्राम-सफाईची मोहीम उभी कर, असे एक ना दोन यांचे उद्योग चालू होते. आमचे परम आदरणीय प्राचार्य ‘गोकाक’ सर यांना अशा या तरूण वीरांचे व कन्यकांचे फार कौतुक होते. ते करीत असलेल्या सर्व धडपडीला ते सूचक रीतीने पण मोलाचे साहाय्य करीत. आपल्या वात्सल्याने मुलांची मने फुलवीत. आमचे सर म्हणजे इंग्रजी भाषेच्या प्रभुत्वाचा उत्तम नमुना. पी.जी.पी. चा ऎच्छिक विषय इंग्रजीच. सरांचे या बुद्धिमान व धडपड्या मुलावर इतके प्रेम की आम्ही सर्वजण त्यांना सरांचे ‘मानसपुत्र’ म्हणत असू.

बेचाळीसची चळवळ हां हां हणता उग्र रूप धारण करू लागली. पी.जी.पी., सिंधूताई गोखले, कुमुद रेगे इत्यादी मंडळी आमच्या चळवळीचे नेतृत्व करीत. त्यांच्या नानाविध उठाठेवींनी सरकारही प्रक्षुब्ध झाले. गोळीबार करायलाही आम्ही कमी करणार नाही अशी सरकारी उच्चपदस्थांची दर्पोक्ती सरांच्या कानावर जाताच आपल्या या विद्यार्थ्यांच्या भवितव्याची स्वाभाविक त्यांना अतोनात चिंता वाटू लागली. सरांनी निर्भयपणे आणि खंबीरपणे तिकडे उत्तर कळवले, "या परिसराचा प्रमुख मी आहे. माझ्या विद्यार्थ्यांच्या केसाला हात लावण्यापूर्वी तुम्हाला माझ्यावर गोळी चालवावी लागेल, हे ध्यानात असू दे." देवाच्या कृपेने आणि सरांच्या धीरोदात्त वर्तनाने सारे संकट टळले ही भाग्याची गोष्ट. असे गुरू आम्हाला लाभले हे आमचे सुदैव आहेच, पण त्यांनी अभिमान बाळगावा अशा चारित्र्याचे, कर्तृत्वाचे पी.जी.पी., सिंधूताई, कुमुदसारखे विद्यार्थी त्यांना लाभावेत हेही भाग्याचेच नव्हे काय?

प्रथम भूमिगत होऊन आणि नंतर येरवडा सेंट्रल प्रिझनमध्ये ‘सरकारी’ पाहुणचार घेऊन पी.जी.पी. बाहेर आले. १९४३-४४ ला पुन्हा ते ज्युनिअर बी. ए. च्याच वर्गात बसू लागले. करण त्यांचे एक वर्ष वाया गेले होते. १९४४ मध्ये प्राचार्य गोकाक यांनी राजीनामा दिला व ते धारवाडला गेले. देवळातला देवच हलल्याने भक्त पी.जी.पी. फर्ग्युसनला गेले. पुणे गाव तस त्यांना अपरिचितच. वसतिगृह दूर टेकडीच्या पायथ्याशी, ऎन पावसाळ्याचे दिवस त्यातच पी.जीं.ना तापाने गाठले. मी त्यावेळी नव्यानेच फर्ग्युसनमध्ये गेले होते. कुणीतरी सहज म्हणाले, "अहो, तुमच्या विलिंग्डनचे पी.जी.पी. यंदापासून इथे आलेत अणि तापाने आजारी झालेत!" यावेळपर्यंत पी.जी.पीं.शी माझा विशेष परिचय नव्हता. चळवळीच्या काळात झेंडावंदन राष्ट्रसेवादल इथेच क्वचित बोलण्यासवरण्याचा प्रसंग येई तेवढाच. माझ्या मनात त्यांच्याविषयी आदर असल्याने ही वार्ता कळताच मी संकोच दूर सारून त्यांना जाऊन वसतिगृहावर भेटले. माझ्या डॉक्टरकाकांना - डॉ. विष्णुपंत किर्लोस्कर यांना - सांगून त्यांना औषधोपचार करण्याची विनंती केली. त्या आजारात त्यांची सोशिकता आणि डॉक्टरला त्रास होऊ नये, पुनः पुन्हा फेर्‍या घालण्याचा, म्हणून स्वतः धडपडत त्यांच्याकडे जाण्याचा संकोची आणि भिडस्त स्वभाव मला कळला. या आजाराच्या निमित्ताने पी.जी.पीं.शी परिचय वाढला आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाची विविध अंगे ज्ञात होऊ लागली. गप्पांच्या ओघात एक गोष्ट मला जाणवत असे की स्वतःबद्दल बोलायला पी.जी.पी. फारसे उत्सुक नसत.

पी.जी.पी. बोलता बोलता नक्कलही करीत. गोकाकसरांची तर अगदी हुबेहुब करीत. एकपाठीपणा आणि जबरदस्त पाठांतर हे पी.जी.पीं.च्या जवळचे अगदी हुकमाचे एक्केच म्हणाना. सरांचे वर्गातले व्याख्यान असो की एखाद्या समारंभातले डॉ. राधाकृष्णन्‌, श्रीनिवास शास्त्री, पं. नेहरु, सरोजिनी नायडू इ. असो, ते संपले रे संपले की पंधरा-वीस मिनिटात पी.जी.पी. ते जवळ जवळ शब्दशः म्हणून दाखवीत. मला तर तो आजही एक चमत्कारच वाटतो. बोलताना किंवा पत्रात लिहिताना आपण वाचलेली किती सुभाषिते, इंग्रजी-मराठी, त्यांनी उद्‍धृत करावी. मी प्रसंगवशात त्यांना पत्र लिही. त्यावेळी त्यांना कधीतरी मौजेने मी म्हणे, "‘शेक्सपिअर’ अमुक म्हणतो नि ‘मिल्टन’ तमुक म्हणतो, ते काय म्हणतात ते तुमच्या पत्रावरून कळले. पण काय हो, आमचे मित्र ‘पी.जी.पी.’ नावाचे जे सद्‌गृहस्थ आहेत ते काय म्हणतात ते कळवाल काय?" अवतरणे आणि सुवचने यासंबंधीच्या त्यांच्या या अमाप हौसेमुळे मी माझ्या मैत्रिणींना म्हणे, "अगं, आज ते इंग्रजीचे ‘सुभाषितभांडागारम्‌’ भेटले होते, दिसले होते." त्याही हसून माझ्या या पदवीला दुजोरा देत.

बी.ए. उत्तम रीतीने उत्तीर्ण होऊन ते बॅरिस्टर होऊन इंग्लंडहून परत येईपावेतोच्या काळात बर्‍याच दिवसात त्यांची भेट झाली नव्हती. (१९४६ ते १९५२) तिथून परतल्यावर (१९५२) ते पुण्यातल्या आमच्या घरी आले. मी एकदम म्हटले, "अगबाई, तुम्ही तर इथे होतात तसेच आहात की, नवलच म्हणायचे!" त्यांच्या मोकळ्या निगर्वी स्वभावाला उद्देशून मी तसे म्हटले होते, नाहीतर असे ‘हरीचे लाल’ काय कमी भेटतात का आपल्याला, की जे ऑफिसच्या कामासाठी म्हणून आठ पंधरा दिवस इंग्लंड अमेरिकेत योगायोगाने पाय ठेवून येतात आणि जन्मभर आपल्याला ऎकवत राहतात. When I was in America or England ..."  

बॅरिस्टर होऊन परतल्यावर त्यांनी तोच व्यवसाय करावयाचे ठरविले असते तर उदंड पैसा त्यांनी मिळविलाही असता. पण कर्मवीर भाऊरावांच्या तळमळीच्या व एकाग्रवृत्तीच्या कार्याचा एवढा खोल संस्कार त्यांच्यावर झाला असावा की त्यामुळे त्यांनी विद्येच्या क्षेत्रातच राहायचे ठरविले असावे. तळागाळाच्या समाजबांधवांपर्यंत विद्येचे अमृत पोहोचविण्याचा भाऊरावांचा संदेश मुरांब्याच्या फोडीसारखा त्यांच्या मनात मुरलेला असल्याने तोच त्यांनी आचरणात आणला. रयत शिक्षणसंस्थेत विविध अधिकारपदे सांभाळीत यशस्वी व व्यासंगी प्राध्यापक, प्राचार्य अशा एकेक क्रमाने शिक्षणक्षेत्रातल्या अत्युच्च सन्मानाच्या स्थानी ते येऊन पोहोचले. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आणि नंतर पब्लिक सर्व्हिस कमिशनचे माननीय सभासद अशा जागी ते स्थानापन्न झाले.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू झाल्यावर त्यांनी जेव्हा आमच्या ‘विलिंग्डन’ महाविद्यालयाला भेट दिली त्या दिवशी आम्हा सुहृद मंडळींची मनेही आनंदाने सुखावली. त्या दिवशी दोन अडीच तास अस्खलित इंग्रजीत ते बोलले. मन भरभरून ऊर ओसंडून ते बोलले. त्या वास्तूच्या स्पर्शाने त्यांना सारा भूतकाळ आठवला. आपले विद्यार्थिजीवन आठवले, आपल्याला घडविणारा काळ आणि गुरुजन आठवले. वळवाच्या पावसात चिंब भिजून निघावे तसे त्या ओघात आम्ही बुडून गेलो होतो. आमचे विद्यार्थीही. माझ्या मनाला विशेष स्पर्शून गेली ती त्यांच्या वृत्तीतली कृतज्ञता बुद्धी आणि गरीब विद्यार्थ्यांबद्दलची खरी कळकळ!     

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color