स्मरणसाखळीतील मणी
लेख़क Administrator   
 

बदलत्या जीवनाची ‘जाणीव’ देणार्‍या माझ्या स्मरणसाखळीतील कांही मणी

"चांगले घरचेच कारखाने आहेत, त्यात कुठंही तुला सहज नोकरी मिळाली असती, ती सोडून महाविद्यालयात प्राध्यापिका व्हायचं कसलं वेड आलंय तुझ्या डोक्यात?" माझी मैत्रीण सुलोचना काहीशा नाराजीनेच मला विचारत होती. तिच्या नाराजीकडे दुर्लक्ष करीत, हसून मी तिला म्हटले, "अग, महाविद्यालयात शिकवताना तरुण मुलामुलींच्या सहवासात सतत राहायची संधी मिळते. त्यामुळे आपणही तरुणच राहतो. सांग बघू, तुला म्हातारं, म्हणवून घ्यायला आवडेल की तरुण? यावर काहीच न बोलता मानेला एक झटका देऊन आणि नाक किंचित उडवून हातातलं स्वेटर ती विणू लागली.

आमच्या या संवादाला तीन तपांपेक्षा अधिक काळ लोटून गेला. पण मी घेतलेल्या निर्णयाबद्दल मला कधी पश्चात्ताप झाला नाही. सेवानिवृत्तीच्या, आजच्या, निवांत वेळी, गत जीवनाकडे मी जेव्हा वळून पाहते त्यावेळी मला वाटते सुलूला त्यावेळी मौज म्हणून मी दिलेले उत्तरच बरोबर आणि खरे होते. त्याचा मला आयुष्यभर प्रत्यय आला. विद्यार्थ्यांचे मन म्हटले की ते जिज्ञासू, उत्साही, संवेदनाशील आणि संस्कारक्षम असेच सामान्यतः असते. त्या मनाची व माझी तार बेमालूमपणे जुळली एकमेकांच्या सुखदुःखात आम्ही सहभागी झालो, लोभ केला तसेच प्रसंगी एकमेकांवर रुसलो-रागावलोसुध्दा! पण त्यामुळे आमच्या स्नेहात अंतराय पडला नाही. जगाकडे पाहण्याचा माझा स्वप्नाळू, काव्यात्म, आदर्शवादी दृष्टिकोन हळूहळू बदलून त्याला वास्तवाचे भान आले, एवढेच नव्हे तर भविष्याबद्दलही काही अंदाज करता यायला लागला. या बदलांचे मोठेच श्रेय माझ्या विद्यार्थी मित्र-मैत्रिणींना आहे. त्यांच्यात वावरताना आलेले सारे अनुभव सुखदच आहेत असे मात्र नाही. पण इथे मिळालेल्या कटु अनुभवांनीही मला पुष्कळ काही शिकवले. त्यामुळेही माझे जीवन संपन्नच झाले. म्हणून या सगळ्यांबद्दल माझ्या मनात आपुलकीबरोबरच कृतज्ञताही आहे, त्यातल्या काहीची व्यक्ती आणि प्रसंग याची ही स्मृतिचिन्हे!!

उर्मिला -
उर्मिला ही, सांगलीच्या ‘विलिंग्डन’ महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकणारी माझी एक विवाहित विद्यार्थीनी. रंगाने गोरीपान, देखणी, प्रसन्न आणि मध्यम उंचीची अशी! तिचा माझा परिचय तसा जुजबीच होता. एक दिवस दुपारी अनपेक्षितपणेच ती माझ्या घरी आली. तिचा पोशाख टापटिपीचा होता आणि तिने घातलेल्या अलंकारावरुन तिच्या सधन घराची सहज कल्पना येत होती. आपल्या डोक्यावरचा पदर सावरीत दरवाजातूनच तिने मला अदबीने विचारले, "बाई, आत येऊ का?" "या ना, या अवश्य" असे म्हणत मी तिला आत बोलावले. ती आली पण काही वेळ गप्पच बसून राहिली म्हणून मीच विचारले, "का आला होतात तुम्ही?" तिने उत्तर दिले, "मला ‘अहो’ म्हणायचं नाही बरंका बाई" आणि ती मनःपूर्वक हसली. स्वाभाविकच आमच्या दोघींमधला संकोचाचा पडदा दूर झाला. मग तिने बोलायला सुरुवात केली, "नुकतीच ग्वाल्हेरहून मी वडिलाकडे इथं परत आलेय, दोन वर्षे सासरी होते पण तिथे राहणे अशक्यंच झाल्यावर, अपुरे राहिलेले शिक्षण पुरे करावे आणि जगण्याचा काही मार्ग सापडतो का ते पहावं म्हणून आले इथे" मी तिचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होते. तेवढ्यात स्वतःशीच बोलल्यासारखे ती म्हणाली "काय वेंधळी तरी बाई मी. स्वतःचच पुराण सांगत राहिले, ते सांगीन पुन्हा कधीतरी. मी आज आले होते ती तुम्हाला एक विनंती करायला ती ऐकाल तुम्ही? तुम्ही वरचेवर आजारी पडता याचे मला फार वाईट वाटतं तुम्ही त्या निळ्या खड्याच्या कुड्या आणि अंगठी वापरता ना त्यांचा परिणाम आहे हा. तो ‘मणी’ एखाद्यालाच लाभतो म्हणतात. तुम्ही तो काढून टाकलात की पटकन बर्‍या व्हाल. वर्गात तुम्ही किती कळकळीने शिकवता ते ऐकतच रहावेसे वाटते आणि त्यावेळी मनात येते आमच्या बाईंना देवानं निरोगी आणि सुखी ठेवावे. मग काढून ठेवाल ना ते दागिने?" तिची प्रांजळ कळकळ आणि किंचित जड झालेला स्वर माझ्या अंतःकरणाला भिडला. शुभ-अशुभाच्या असल्या कल्पनावर माझा विश्वास नव्हता तरीही तिची विनंती मी मानली आणि दागिने काढून टाकून तिला म्हटले, "आता झालं ना तुझं समाधान? बैस जरा निवांतपणे हवा छान पडली आहे, आपण कॉफी घेऊ या" .
तिची माझी पुढे चांगली गट्टी जमली तेव्हा कळले की एका श्रीमंत सरदार घरातील मुलाशी मोठ्या थाटात तिचे लग्न झाले होते. पण विवाहापूर्वीच मुले-बाळे होण्याएवढा एका अन्य स्त्रीशी त्याचा घनिष्ठ संबंध होता. त्याच्या कुटुंबियांना ते माहित असूनही त्यांनी त्याला लग्नाला उभे केले होते. उर्मिलापुढे पहिल्याच रात्री पतीने घटस्फोटाचा प्रस्ताव मांडला. सासर-माहेरच्या प्रतिष्ठेसाठी ती तरीही तेथेच कुमारिकेचे जीवन जगत राहिली. पण मनाचा कोंडमारा सोसवेना. तेव्हा इथे परतली. यथाकाल तिचे शिक्षण पुरे झाले, एका ध्येयवादी, प्रेमळ, तरुणाने तिला मागणी घातली. आपल्या नव्या संसारात ती रंगून गेली. पण ध्यानी मनी नसताना हृदयविकाराचा झटका येऊन तिचा जोडीदार हे जग सोडून गेला. दोन्ही प्रसंगात सासरच्या घरुन ना कोणी तिचे अश्रु पुसायला आले, ना कोणी तिला मदतीचा हात पुढे केला आपल्या मुलीसाठी राबत कष्टत जगणे तिला भागच पडले. आता ती आजीही झाली आहे, पण तिची कहाणी आठवली की माझे डोळे भरुन येतात. माझ्या मनात येते, फुले-आगरकरांचा काळ कधीच मागे पडला पण तरीही स्त्रीच्या दुःखाबद्दल समाजाचा दृष्टिकोन अजून पूर्वीचाच असावा का? उर्मिलाच्या वाट्याला जे दुःखभोग आले त्यात तिचा कोणता अपराध होता?

लीना -
या उर्मिलाप्रमाणेच उत्तम चित्रकार असलेल्या लीनाचा मला लळा लागला. मला फुले फार आवडतात म्हणून दरवेळी घरी येताना ती सुगंधी फुलांचा हार-गुच्छ घेऊन येई आणि निर्मला? तिला तर देवाने संगीत, अभिनय बुध्दिमत्ता अशी कितीतरी गोष्टींचे वरदानच दिले होते. एका गुरुपौर्णिमेला अचानक तिची माझी सोलापुरातच भेट झाली. आपले दवाखान्याचे काम पळभर विसरुन ही डॉक्टर मला म्हणते, "बाई, गुरुदक्षिणा म्हणून आज माझ्याच घरी गाण्याची मैफल करु, मला माहिती आहे तुम्ही गाण्याच्या खूप शौकिन आहात ते!" ती मैफल छानच जमली.

मुकुंद -
मुकुंद माझ्या लक्षात राहिला तो त्याच्या परोपकारी वृत्तीने. १९६१ साली ‘कोयने’च्या भूकंपाने सर्वत्र हाहाःकार केला. आमचा हा हुशार विद्यार्थी त्यावेळी त्याच परिसरात राहात होता. भूकंपाच्या भयाण काळ रात्री आपल्या तरुण पत्नीला व मुलाला घेऊन तो कसाबसा घराबाहेर पडला मात्र, त्यांचे घर कोसळले. भोवताली सगळे अंधारगुडुप सर्व बाजूनी आक्रोश आणि किंकाळ्या एवढेच कानावर पडत होते. आपल्या कुटुंबियाना थोड्याशा आडोशाला बसवून, निर्भयपणे, तो संकटग्रस्तांच्या मदतीला धावला. नवप्रसूत स्त्रीला बाहेर पडायला मदत कर, अंधवृध्दाला पाठकुळी घे अशी कितीतरी कामे त्याने माणुसकीच्या ओलाव्याने केली. भूकंपाच्या धक्क्यातून थोडे सावरल्यावर त्याचे मला पत्र आले त्यात त्याने लिहिले होते, "बाई, त्या संकटाची नुसती आठवण झाली तरी काळजाचा आजही थरकाप होता. इथले जीवन पूर्णपणे उध्वस्त झाले आहे ते कधी पूर्वपदावर येईल कोण जाणे!! पण जोपर्यंत मला होईल ती सर्व धडपड मी दुःखितासाठी करतोय. तुमची आठवण अशा वेळी खूपदा येते. तुम्ही आम्हाला केवळ पुस्तक एके पुस्तक कधीच शिकवले नाहीत. त्याच्या अंगाने अनेक मार्गांनी आमचे मन जागे ठेवण्याची तुम्ही पराकाष्ठा केलीत. वर्गात एकदा तुम्ही म्हणाला होतात, "अरे, स्वतःसाठी तर काय जनावरही जगते पण दुसर्‍याचे दुःख कमी करण्यासाठी आपण किती जगतो याच्यावरच आपली ‘माणूस’ म्हणून किंमत ठरते. उंची ठरते हे कधी विसरु नका." खरंच मी ते विसरलो नाही, बाई जास्त काय लिहू? तुमचा आशीर्वाद मला सदैव लाभावा ही विनंती". मुकुंदाच्या पत्राने माझे डोळे पाणावले. मला सुलोचनेची आठवण झाली ती समोर असती म्हणजे मी तिला सांगितले असते, "मुकुंदासारखे विद्यार्थी हीच माझी संपत्ती आहे आणि कारखान्यातल्या पगारापेक्षाही फार फार मोठी आहे. विधायक कामात रमणारी मुकुंदासारखी मुलेच आपला समाज निकोप आणि समृध्द करतात अशी माझी दृढ श्रध्दा आहे.

वसंत -
आमच्या ‘वसंता’ची हकीकत ऐकली की करुणा आणि कौतुक यांनी, ऐकणार्‍याचे मन भरुन येते. त्याच्या पाचसहा भावंडातून जगला वाचलेला हा एकटाच! शरीराने स्थूल, रुंद, चेहर्‍याचा आणि सदैव आनंदी, स्वाभाविकच जगन्मित्र! एक दिवस आपल्या बालमित्राबरोबर हाही स्टेशनवर गेला. त्याच्या बहिणीसाठी जागा बघण्याच्या धांदलीत धावत्या गाडीच्या हॅंण्डलवरचा याचा हात सुटला आणि वसंत प्लॅटफॊर्म व आगगाडी याच्या बेचक्यात सापडताच त्याचे दोन्ही पाय अक्षरशः तुटून गेले. त्याच्या आईवडिलांवर तर जणू वज्राघातच झाला. पण हा बिलकूल डरला नाही कारण त्याचा स्वभाव मोठा जिद्दी आणि महत्वाकांक्षी. काही दिवसांनी त्याची प्रकृती थोडी सुधारली. चाकाच्या खूर्चीवर बसून तो हिंडू फिरु लागला. घरी अभ्यास करुन त्याने पदवीदेखील मिळवली. आता आपण वडिलांवर का अवलंबून राहायचे या विचाराने तो काम मिळविण्यासाठी त्या खुर्चीवरुनच धावपळ करु लागला. कुणाला प्लॊट विकून दे तर कुणाला प्लॉट मिळवून दे, इमारतीचे सामान स्वतः आणवून घेऊन ओनरशिपचे फ्लॅटस बांध अशी नानाविध कामे अंगावर घेऊन तो आत्मविश्वासाने आणि भरपूर कष्ट करुन आता पार पडतो. त्यामुळे अल्पावधीतच आमच्या वसाहतीतला तो एक जबाबदार नागरिक बनला आहे. आपल्या संसारात रमला आहे. आता त्याने कृत्रिम पाय बसवून घेतले आहेत. त्यामुळे त्याच्या महत्वाकांक्षेलाही नवनवे बहर येऊ लागलेत. जेव्हा जेव्हा त्याची भेट होते तेव्हा "नमस्कार, बाई प्रकृती बरी आहे ना आपली?" असे आवर्जून बोलतो त्याला मनातल्या मनात आणि समक्षही अनेकदा मी शाबासकी देते. माझ्या मनात येते, एकेकाळी कॉलेज चॅम्पियन असलेला, दुर्दैवाने पंगू झाला तरीही जिद्द न हरलेला वसंत कुठे आणि चारदोन दिवस भावाच्या पत्राला उशीर झाला तर डोळ्यातून टिपे काढणारी मी कुठे! याच्या नमस्काराला मी खरोखरीच पात्र आहे का! आपले विद्यार्थीच कधीकधी आपले गुरु ठरतात ते हे असे!!

विद्यार्थी -
प्रत्यक्षात आम्ही शिक्षक, विद्यार्थ्यांची परीक्षा घेत असतो पण कधी असे हरीचे लाल भेटतात की तेच आमची परीक्षा घेतात आणि तीही अगदी कसोटीची! आज त्या परिक्षेची आठवण झाली तरी मला मनस्वी हसू येते, झाले काय, कडक थंडीच्या दिवसात एकदा रात्री दहाच्या सुमारास कोणीतरी तीन चार वेळा ‘टकटक’ असे माझ्या दरवाजावर वाजवले. मी दरवाजा उघडून पाहते तर बाहेर चार पाच विद्यार्थी उभे. त्यांचा माझा फारच थोडा परिचय होता. "आता रात्रीच्या वेळी काय काम काढलेत?" मी त्यांना विचारले. उत्तर कोणीच देईना. सगळेजण एकमेकाकडे पाहू लागले. पुन्हा तोच प्रश्न मी विचारला, तेव्हा त्यातल्या एकाने आपल्या मित्राकडे बोट दाखवत, चाचरत नि अडखळत बोलायला सुरुवात केली. "नाही म्हणजे, त्याचं काय आहे, नाही म्हणजे.. ह्या सुधाकरचे तुमच्या बी .ए. वर्गातल्या विद्यावर...विद्यावर प्रेम आहे. पण हा शिंपी आणि ती जैन म्हणून दोघांच्याही घरचा यांच्या लग्नाला विरोध आहे." या वेळपर्यंत तो ‘सुधाकर’ जरा सावरला असावा, ओठावरुन दोन-तीन वेळा जीभ फिरवीत तो मला म्हणाला, "तुम्हाला माझी विनंती आहे की आजची रात्र तिला तुम्ही तुमच्या घरात लपवून ठेवा. तिच्या आईवडिलांनी तिला कोंडून ठेवलं आहे. तिथून अर्ध्या तासात आम्ही तिला सोडवून आणू. आजची रात्र ती तुमच्या घरी लपेल, उद्या आम्ही दोघं बेंगलोरला पळून जाणार व तिथे लग्न लावणार" तेव्हा कुठे माझ्या डोक्यात त्या ‘विद्या-हरण’ नाटकात माझी भूमिका काय आहे, याचा उजेड पडला. मग मात्र त्याला पुढे बोलू न देता मी विचारले, "समजा तुम्ही लग्न केलंत, तर पोटे कशी भरणार रे तुम्ही आपली? की ‘चारुगात्री’, ‘प्रियदर्शन’ अशा गोडगोड शब्दांनीच पोटे भरणार आहात तुम्ही आपली? तुम्ही घरचे श्रीमंत असलात तरी आज तुमच्या हातात नाही पैसा, नाही तो मिळवायला लागणारे शिक्षण! शिवाय ‘विद्या’ अद्याप सज्ञानही झालेली नाही. या सगळ्याचा काही विचार केला आहेत का? या स्थितीत तिला पळवून नेणे हा तुमचा, आणि तुम्हाला मदत करणे हा माझा, कायद्याने गुन्हा ठरतो तेव्हा असल्या भलत्या झंगटात निष्कारण तुम्ही मला अडकवू नका". त्यावर गप्प बसला तर तो रहस्यपूर्ण नाटकाचा नायक कसा शोभणार? माझ्यापुढे गुडघे टेकून मला हात जोडत तो म्हणाला, "बाई, प्रेमकविता शिकवताना, तुम्हीच ना सांगता नेहमी, की प्रेम हे पाप नाही, ते देश, काल, भाषा, धर्म कशाचीच बंधने जुमानीत नाही, आणि तुम्हीच आम्हाला असे दूर लोटता? त्याच्या स्वरावरुन आता हा गडकर्‍यांची ‘प्रेम आणि मरण’ ही कविता म्हणतो की, काय अशी भीती मला वाटायला लागली, म्हणून त्याला थांबवून मी म्हटले, ‘विद्या पुरी करुन, स्वतःच्या पायावर तुम्ही उभे राहिलात म्हणजे अवश्य मी तुमच्या पालकांचे मन वळवायला मदत करीन. आता घरी जाऊन निमूट झोपा बघू, की आत्ताच तुमच्या पालकांना फोन करु मी?" त्यावर मात्र त्यांनी काढता पाय घेतला, अर्थात, मनात मला त्यांच्या नाटकातली ‘खलनायिका’ ठरवून हे नक्कीच?

या सुधाकरवरही ताण केली ती एका अनामिक विद्यार्थ्याने. तिन्ही सांजेच्यावेळी, धापा टाकीत एक विद्यार्थी माझ्यासमोर येऊन उभा राहिला आणि घाईघाईने मला म्हणाला, "तुम्ही मराठीच्या प्राध्यापिका आहात ना? झटपट मला एक गोड प्रेमपत्र लिहून द्याल कां, प्लीज? मी कॉमर्सचा विद्यार्थी आहे त्यामुळे मला ते नीट जमेना हो!" आणि त्या पत्राचा मेहनताना म्हणून मला द्यायला त्याने खिशातून दहा रुपयांची नोटही काढली! बसतोय यावर तुमचा विश्वास? मी धाडदिशी दार आपटले त्यातच तो काय ते समजला. आमचे विद्यार्थी वाचतात त्या प्रेमकथा पाहतात ते चित्रपट, यांच्यातच या सर्व घटनाचे मूळ असेल काय?

महाविद्यालयीन विश्व-
महाविद्यालयीन विश्व ही बाहेरच्या विशाल समाजजीवनाचीच एक संक्षिप्त आवृत्ती असते. छोटीशी प्रतिकृती असते. त्यामुले जे ब्रह्मांडी तेच पिंडी या न्यायाने! समाजातल्या अनेक गढूळ, अपप्रवृत्तींचा इथेही वावर असतोच! मी आता सांगते तो प्रसंग घडल्याला जवळ जवळ वीस वर्षे तरी सहज होऊन गेली. एका रविवारी दुपारी साधारण अडीच पावणेतीनचा सुमार असावा - मी सांगली-मिरज आगगाडीने ‘विश्रामबाग’ या आमच्या स्टेशनवर उतरले. रस्त्यावर वर्दळ बेताचीच होती. मी घराच्या दिशेने चालू लागणार एवढ्यात दोन विद्यार्थी हमरीतुमरीवर येऊन बोललेले ऐकू आले. मागे वळून पाहते तर त्यातल्या त्यात ‘गब्रू’ असणार्‍या एकाने दुसर्‍याचा गळा डाव्या हाताने व शर्ट उजव्या हाताने घट्ट धरलेला दिसला. तो तावातावाने म्हणत होता, "क्रिकेटचा सेक्रेटरी म्हणून निवडून आलास म्हणून चढून जाऊ नको शिर्‍या, तुम्ही बामणांनी फक्त संध्या म्हणत बसावी" तुम्ही रडे काय खेळणार, ते दिसतंच आहे. तेव्हा निमूटपणे त्या सेक्रेटरीपदाचा राजीनामा देतोस की दाखवू तुला चांगला इंगा? होतास की नव्हतास करुन टाकीन, समजलास?" ते ऐकल्यावर मात्र मला राहवेना, मी चटदिशी पुढे झाले आणि त्या ‘इंगा’ वाल्याला म्हटले, "कसल्या धमक्या देतो आहेस रे त्या श्रीकांतला? आणि आधी हात काढ बघू त्याच्या गळ्यावर धरलेला". तरी तो मख्खपणे माझ्याकडे तांबरलेल्या डोळ्यांनी पहात उभाच राहिला. एवढेच नाही तर उर्मटपणे वर म्हणतो कसा, "हे कॉलेजचे आवार नाही आहे तुम्ही मला आज्ञा करायला, जावा तुम्ही गुमान पुढे. बायका माणसांनी सोडवायची भांडणे नव्हेत ही". त्याच्या उद्धटपणाने माझा पारा चांगलाच चढला. मी म्हटले, "आधी तुझे नाव, नंबर, वर्ग, सगळे मला सांग बघू, मग उद्या प्रिन्सिपॉल साहेबांपुढे ठरवू बायकांची कामे कोणती आणि तुझ्यासारख्या मर्दाने करायची कोणती ते!" ही गोळी बरोबर लागू पडली. मुकाट्याने त्याने मी सांगितले ते सर्व ऐकले. कारण हे ‘गब्रू’ नादारीत शिकत होते. प्रिन्सिपॉल साहेबांनी लढाईचा निकाल असा दिला, "बाईंची आधी लेखी माफी माग, न पेक्षा कॉलेजातून रस्टिकेट व्हायची तयारी ठेव." मग मात्र हा ‘मोहरमचा वाघ’ एकदम शेळी झाला. हा प्रसंग माझ्या मनात खोलवर जाऊन राहिला, मला वाटले, "आज सर्वच क्षेत्रात दडपशाही, जातीयता यांचा वापर मुक्त हाताने चालला आहे, सत्तासंपत्ती बळकाविण्याचा तो ‘शॉर्टकट’ आहे. त्याचेच अनुकरण विद्यार्थ्यांनी केले त्यात दोष कुणाचा? समाजपुरुषांचा की त्यांचा ?

ग्रामीण विद्यार्थी -
आणखी एक किस्सा असाच लक्षात राहिला आहे माझ्या! तो आहे ग्रामीण जीवनातून आलेल्या विद्यार्थ्यांचा गेल्या पंचवीस वर्षात शिक्षणाचा प्रसार, विशेषतः खेड्यापाड्यातून वेगाने होत आहे. आमची सांगली म्हणजे खेडेवजा असे शहर आहे. इथल्या शिक्षणसंस्थांतून ग्रामीण विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. यातले बरेचसे पैशाने बेताच्या परिस्थितीतले, बहुधा गरीबच, आणि मनाने तसे पापभीरु असतात, यात एखादा बेरकी भेटतो. महाविद्यालयात प्रथमच प्रवेश करताना ते थोडे बुजतात-गांगरतात म्हणून मी काय करी, त्यांच्या पहिल्या तासाला, शाळा व महाविद्यालय यांत कोणते अंतर आहे, ते का असते, इथे त्यांच्याकडून कोणत्या अपेक्षा आहेत, इथे कोणकोणत्या सुखसोयी त्यांच्या विकासासाठी केल्या आहेत, हे सर्व त्यांना तपशीलवार समजावून सांगत असे. आमच्या शिक्षण संस्थेची उज्वल परंपरा सांगून ती पुढे चालविण्याबद्दल त्यांना सदिच्छा देत असे. माझे हे भाषण संपविण्यापूर्वी मी स्मरणपूर्वक त्यांना सांगायची, "तुमच्यापैकी अनेकांचे पालक आपल्या पोटाला चिमटा घेउन तुम्हाला इथे शिकायला पाठवतात त्यांचे नित्य स्मरण ठेवा, त्यांचा पैसा अनाठायी खर्च करु नका." एका वर्षी मी परिक्षेत निबंधासाठी त्यांना विषय दिला, "महाविद्यालयातील पहिला दिवस". त्याचे उत्तर लिहिताना, एका बहादूराने खास त्याच्या भाषेत माझ्या भाषणाचा गोषवारा लिहिला व पुढे म्हटले, "आमी कॉलेजात मस्तपैकी मज्जाच कराया येतो. आमचा बा आमाला पैसा देतो, आमी तो खर्चतो, यात किर्लोस्करबाईंच्या बापाचे काय जाते?" त्या विद्यार्थ्याच्या निबंधाचा हा शेवट म्हणजे ठसका लागेल असा मिरचीचा झणझणीत खर्डाच वाटला मला. त्याने माझे तोंड इतके पोळले की पुढच्या वर्षीपासून तो ज्ञानामृताचा तास मी बंदच करुन टाकला. आज त्या प्रसंगाबद्दल विचार करताना मला कळते की तो विद्यार्थी, "काय म्हणतो रे तुझा मास्तर/किंवा मास्तरीण" अशा संस्कृतीतूनच लहानाचा मोठा झाला आहे आणि बाकीचा समाज तरी शिक्षकाचा कितीसा सन्मान राखतो आहे? स्वातंत्र्य मिळून चाळीस वर्षे होत आली तरी, आजही शिक्षकाकडे ‘मुकी बिचारी कोणी हांका’ अशाच भावनेने बहुतांशी बघितले जाते. मग एकट्या ‘मारुती’वर रागावण्यात काय हशील?

प्रसाद -
‘प्रसाद’हा विज्ञानशाखेकडचा विद्यार्थी. त्याच्या जीवनाची शोकांतिका एका अतिशय विचित्र कारणामुळे व परिस्थितीने झालेली आहे. "बळी तो कान पिळी" हा सगळ्या सृष्टीवरच चालणारा नियम आहे मग शिक्षण संस्था तरी त्याला कशा अपवाद असणार? शेतकी खात्यातल्या एका बड्या अधिकार्‍यांचा ‘प्रसाद’ हा एकुलता एक मुलगा! स्वभावाने मुळचा शांत, संगीत, वाचन, खेळ या छंदात रमणारा. बुद्धीने चांगलाच तल्लख! मॅट्रिकला बोर्डात पहिल्या दहात आलेला! पुढील शिक्षणासाठी तो पुण्याला गेला आणि त्याचे दुर्दैव ओढवले. नव्याने महाविद्यालयात शिकायला येणार्‍या मुलांना, वरच्या वर्गातली मुले, अतिशय ओंगळ, हिडीस, अश्लील असे काही प्रकार सक्तीने करायला लावतात. त्याला ‘रॅगिंग’ म्हणतात. त्या प्रयोगात रात्री गाढ झोपलेल्या ‘प्रसाद’ला त्याच्या बिछान्यासकट मुलांनी संस्थेच्या आवारामागच्या स्मशानात नेऊन ठेवले हा जागा झाल्यावर भोवतालचा अंधार, अर्धदग्ध प्रेते व त्यांची दुर्गंधी पाहून त्याला एवढा जबरदस्त धक्का बसला की तो ठार वेडा झाला. त्यांच्या वडिलांनी तो बरा व्हावा म्हणून अक्षरशः पाण्यासारखा पैसा खर्च केला. पण त्याच्यात आजही फारशी सुधारणा नाही. अर्ध्या बाह्यांचा सदरा, चड्डी घालून सिगारेटचे झुरके घेत, रस्त्याने जाताना किंवा आपल्याशीच हसत, हॉटेलात काहीतरी खात असताना पुष्कळदा मला तो दिसतो. कधी ‘बाई’ तर कधी ‘मालतीबाई’ असे संबोधून हातातली सिगारेट आम्हा शिक्षकांना पाहताच आठवणीने टाकून देऊन तो ‘नमस्कार’ असे म्हणून पुढे जातो. लहर लागली म्हणजे कोणत्याही वर्गात जाऊन बसतो. इंग्रजी कविता अस्खलित भाषेत म्हणतो, कोणी खोडी काढली म्हणजे मात्र एकदम बेभान होतो. चांगल्या बुद्धीचे हे पोर हकनाक वाया गेलेले पाहून माझे मन विषण्ण होते. मायेचे चार शब्द त्याच्याशी बोलण्यापलीकडे आपल्याला त्याचा आजार कमी व्हावा यासाठी काहीच करता येत नाही म्हणून अपराधीही वाटते. ज्या विकृत मनाच्या विद्यार्थ्यांनी ही रॅगिंगची प्रथा सुरु केली, ती पालक-शिक्षक-सरकार यांनी संघटितपणे ठेचूनच टाकायला हवी, असेही तीव्रतेने म्हणावेसे वाटते.

राष्ट्रीय सण -
गेली काही वर्षे एक गोष्ट मला सतत खटकत आली. ती म्हणजे, आमच्या राष्ट्रीय सणांबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात असलेली उदासीनता! भले स्वातंत्र्यदिन असो की जवाहर-जयंती असो, त्या कार्यक्रमाला बहुसंख्येने विद्यार्थी गैरहजर! त्याविषयी वर्गात मी विद्यार्थ्यांना अनेकवेळा विचारले. सगळेच चूप बसले. पण एक दिवस ‘अभिराम’ (हा दलित मानल्या गेलेल्या जमातीतील एक विद्यार्थी) मला भेटला. म्हणाला, "एक कविता वाचून दाखविण्यासाठी आलो आहे". महाविद्यालायाच्या आवारातच एका निवांत जागी बसून पहाडी आवाजात त्याने ती कविता मला वाचून म्हणून दाखविली. तिचे नाव होते "स्वातंत्र कशाचे, स्वातंत्र्य कुणाला?" ती ऐकताना अभिरामाच्या स्वतःतला आवेश, त्यातली धग आणि आक्रमकता, शब्दयोजनेची धार या सार्‍यांनी मी चकितच होऊन गेले. हे पोर मोठे पाणीदार आहे. याची मला खात्रीच झाली. कवितेबद्दल त्याचे मी अभिनंदन केले, तेव्हा माझे आभार मानून तो म्हणाला, "बाई वर्गात तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचे माझ्यापुरते उत्तर आज देतो तुम्हाला, खरं सांगतो बाई, आपण स्वतंत्र राष्ट्रात राहतो आहोत असच मला वाटत नाही. सर्वत्र खाबूगिरी, भ्रष्टाचार, याचेच राज्य दिसते. आम्हांला तर सदैवच ‘तळागाळातले’, ‘दलित’ असे हा समाज संबोधतो. एकीकडे आमचे पुढारी आणि सरकार समतेच्या, लोकशाहीच्या लंब्याचौड्या गप्पा मारतात, आणि काही विशिष्ट धर्मियांना मतांच्या जोगव्यासाठी सतत जवळ करतात, त्यांची लाळ घोटतात. ‘सम ऑर मोअर इक्वल’, असे यांचे वागणे. आम्हाला नोकरीत, शिक्षणात हे चार सवलती देतात म्हणून का आम्ही स्वतःला स्वतंत्र झालो म्हणायचे? आमचे हजारो बांधव वर्षानुवर्षे अन्नवस्त्रनिवार्‍याला मोताद राहतात, ही काय राष्ट्र स्वतंत्र, सतेज झाल्याची निशाणी? बोला ना बाई". अमुक वर्ण श्रेष्ठ आणि अमुक कनिष्ठ हे ठरवणार कोण? त्यांची कसोटी काय? का म्हणून यांनी आम्हाला ‘दलित’ ठरवावे? का म्हणून आम्ही ते सोसावे? कुठंवर सोसावे? बाई, मलाही देशभक्तांच्या अतुलनिय त्यागाविषयी आदर आहे, त्यांची योग्यता मीही जाणतो, पण आजचे पुढारी म्हणजे, "पुढे जाणार्‍यांचे अरी" म्हणजे शत्रू आहेत. यांना कसे देशाचे शिल्पकार म्हणायचे?" अभिरामच्या भाषणाच्या रुपाने हजारो वर्षे दबलेले, दाबलेले मन बंड करुन उठते आहे हे माझ्या लक्षात आले. त्याच्या बोलण्यात काय चूक होते? खोटे होते? मला वाटले, हे मन पेटून उठले तर त्यात कशाकशाची आहुती पडेल कोण जाणे! मी त्याचे बोलणे मन एकाग्र करुन ऐकत बसले होते. घरी परतताना मी स्वतःलाच उद्देशून म्हटले, "केवळ पुस्तकांच्या जगात आपण आजवर राहिलो तसे आता चालणार नाही, डोळे उघडे ठेवून या वणव्याचे काय परिणाम होतात ते पाहणे आता अटळ आहे."

डेक्कन क्वीन ? -
जिव्हाळ्याच्या आप्ताप्रमाणे माझ्याशी वागून, माझ्या वह्या-टिपणाचा घरा-पैशाचा उपयोग करुन घेऊन आपले काम होताच सगळे विसरुन गेलेले विद्यार्थी-विद्यार्थीनीही मला भेटले. त्यांच्या अशा वागणुकीचा ‘मनस्ताप होत नाही’ असे खोटे कशाला सांगू? पण त्यांच्यावर कधीकधी गमतीदारपणे गुलाबपाण्याचा शिडकावा होतो आणि पाऊस पडून गेल्यावर आकाश पुन्हा स्वच्छ व्हावे तसे मनाचेही होते. नुकतीच एक फार जुनी विद्यार्थीनी बेळगावात भेटली. आपल्या पतीशी माझी ओळख करुन देताना ती म्हणाली, "या आमच्या बाई, विषय छान सोप्पा करुन शिकवायच्या, पण बोलायच्या इतक्या जलद की, आम्ही प्रेमाने त्यांना ‘डेक्कन क्वीन’ म्हणत असू."  माझ्या दोषावर अचूक तिने बोट ठेवले होते पण किती भाबडेपणाने आणि प्रेमानेही. तिच्या बोलण्यावर आम्ही सगळेच खो खो करुन हसलो.

आजच्या विद्यार्थ्यातल्या अनेक उणिवांची, दोषांची मलाही जाणीव आहे. त्यामुळे त्यांचे जीवन कोमेजून जाऊ नये, त्याला कीड लागू नये, उमलावे, फुलावे, या भावनेने माझ्या शक्ती-बुद्धीनुसार मी प्रयत्न केला याचे शांत समाधान आयुष्याच्या संध्याकाळी मला लाभते आहे. म्हणूनच म्हणते पुनर्जन्म असलाच तर देवाजवळ मी आजचाच जन्म निःशंकपणे मागेन.

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color