लाख मोलाचे शब्द
लेख़क Administrator   
 

लाख मोलाचे शब्द

            मला नेहमी वाटते, की भाषेतल्या काही शब्दांना जसे एक रंगरुप असते, शक्ती असते तसाच एक अविस्मरणीय सुगंधही असतो. कधी कधी त्या शब्दानी मन व्याकुळ होते. पण तरीहीतो गंध हवाहवासाच वाटतो.

            आमच्या सौ. नन्नीच्या म्हणजे माझ्या आईच्या तोंडच्या शब्दाची एक आठवण इथे सांगते, ती देवाघरी गेली. त्याला आता जवळजवळ तीन वर्षे होत आली. ती देखणी होती, उत्तम सुगरण, अट्टलपट्टल खेळाडू, छान गाणे म्हणणारी, नाटकांत सुरेख काम करणारी अशी होती, तिचे वक्तृत्व तिच्या स्वभावासारखेच निष्कपट आणि मनमोकळे होते. वयाच्या साठीपर्यंत खतोखरच खडीसाखरेच्या खड्याएवढेही औषध तिला घ्यायला लागले नाही. पण नंतर मात्र अनेक व्याधींनी तिला ग्रासले.  तिला भेटायला म्हणून मग मी वरचेवर पुण्याला जायची. अशीच एकदा महाविद्यालयाला प्रजासत्ताक दिनाची सुट्टी होती, असे पहून मी गेले. लगेच रात्रीच मला परत येणे जरुर होते. म्हणून आठ-साडेआठ वाजताच मी जेवायला बसले, पण का कोण जाणे त्या दिवशी सारखे माझ्या मनात यायले, आज नन्नीच्याच हातचा आमटी-भात आपल्याला खायला मिळाला, तर किती बरे होईल. पण ते शक्यच नव्हते. कारण ती बिछान्यला खिळून होती. मग पाण्याच्या धोटाबरोबरच मी कसेबसे जेवण उरकले. तिच्या खोलीत जाऊन तिला वाकून नमस्कार केला आणि रिक्षात बसण्यासाठी वळले, तर वाटले, की आपल्या नन्नीला पुन्हा एकदा बघून येऊ या ! म्हणून मी घरात गेले तशी ती म्हणाली, "मालेऽऽ, कां गं परत आलीस?" त्यावर बळेच हसून मी उत्तर दिले, "अग, माझी पर्स आणि गाडीचे तिकीटच इथे राहिले बघ" तेव्हां ती म्हणाली, "काय म्हणावं बाई, तुझ्या या विसराळूपणाला? बरं आता सगळे नीट घे आणि हे बघ, माझे एक काम कर. समोरच्या स्टुलावर काळ्या दगडाची विठ्ठलाची सुंदर मूर्ती आहे ना, ती सांगलीच्या आपल्या डॉ. आशा राणीच्या वृद्ध मातोश्रींना दे. साक्षात देवताच आहेत त्या. त्यांना म्हणावे, "पावर्तीबाईंची ही शेवटची भेट आहे. ती गोड मानून घ्यायला तिने सांगितले आहे." तिच्या या शब्दांनी मी गलबलूनच गेले. मी तिला सांगितले, "तुझी ही मूर्ती मी अवश्य त्या आजींना देईन पण ‘शेवटचे-बिवटचे’ असले काही शब्द नाही सांगणार मुळीच. तू अजून खूप वर्षे आम्हाला हवी आहेस." त्यावर तॊ क्षीणपणे हसली, पळभर थांबली आणि मग म्हणाली, "माले ऽऽ, मी काही तुमच्या वडिलांसारखी कुणी हुशार, प्रसिद्ध व्यक्ती नव्हे हो ! पण माझे अडाणीबाईचे एवढे सांगणे तू कधी विसरु नकोस. जन्मभर तुझ्या शक्तीप्रमाणे, पण दुसर्‍यांना देत राहा. देव तुला कशाला कमी करणार नाही."

            रात्रभर प्रवासात तिच्या या शब्दाभोवतीच माझे मन रिंगण घालत राहिले. सांगलीला पोहोचताच तिची भेटवस्तू मी आजींच्या हाती ठेवली आणि तिच्या व माझ्यावतीने त्यांना नम्रतेने नमस्कारही केला. त्या घटनेला किती तरी वर्षे होऊन गेली. पण नन्नीचे पारिजातकाच्या फुलासारखे सुकुमार, सुगंधी, वत्सल आणि लाख मोलाचे शब्द मी विसरले नाही. योगायोगाने तिचे मला ऐकायला मिळालेले शब्द हेच अखेरचे ठरले ! ती काय, की आमचे शंकरभाऊ काय दोघेही हाताने-मनाने फार उदार होते. पण त्यांनी कुणाला आणि किती दिले, काय दिले याचा चुकूनही त्यांनी उच्चार केला नाही. ती दोघे गेल्यावर मुकुंदाला व मला सांत्वनाची जी असंख्य पत्रे आली त्यावरुनच आम्हाला ते कळले. त्यांच्या देण्याशी माझी काय तुलना होणार?  पण नन्नीचे सांगणे मी आजवर अतिशय आनंदाने, समाधनाने आचरणात आणण्याचा प्रयत्न करीत आले. कोणाकडून काही घेण्यापेक्षा त्याला काही देण्यातला आनंद खचितच मोठा असतो. मैत्रिणीला द्यायची चिमुकली अत्तराची बाटली असो, की भूकंप वा दुष्काळग्रस्तांना  धाडायची यथाशक्ती मदत असो, नन्नीचे  शब्द मला सारखे जागवत असतात. जीवन व्यक्तीचे असो की समाजाचे असो त्यांच्या आनंदात आपल्या मगदुराप्रमाणे भर घालणे आणि त्यांच्या दु;खावर मनापासून फुंकर घालणे हे मला माझे कर्तव्य वाटते.  दुसर्‍याला सुखी झालेले पाहणे हा जीवनातला फार मोठा आनंद आहे, असे मी मानते. दुसर्‍यांच्या आनंदात गुंजेनेही भर घातली तर तुमचे सुख तोळ्याने वाढते, हा सुंदर विचार नन्नीच्या शब्दांनी व तिच्या आणि शंकरभाऊंच्या आचरणांनी माझ्या मनावर खोलवर ठसला आहे. त्याने मला अपार आनंद दिला त्याचे वर्णन शब्दात कसे करता येणार ? शीतल चंद्र प्रकाशातल्या प्रियजनांबरोबर केलेल्या नौकाविहाराचे यथार्थ वर्णन थोडेच करता येते?  उपरिनिर्दिष्ट सुखाबाबतही तेच खरे आहे.

            शेवटी एकच सांगते ! नन्नीच्या आशीर्वादाप्रमाणे खरोखरीच नियतीने मला कधी कशाला कमी केले नाही. तिच्या भावनांना, शब्दांना आणि नियतीलाही म्हणून ही माझी कृतज्ञेची भावफुले !

     

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color