आमचा रणजितभाई
लेख़क Administrator   
 

आमचा रणजितभाई

आम्ही दोघंच भावंडे! मुकुंद आणि मी. त्यामुळे लहानपणापासून मला वाटे; आपल्याला एक धाकटा भाऊ हवा होता, मोठ्या भावासारखाच प्रेमळ पण ज्याला मोठ्या बहिणीच्या नात्याने दटावायला मिळेल आणि ज्याच्याशी रुसाय-भांडायलाही मिळेल असा! रणजितभाईच्या रूपाने देवाने ती माझी हौस मनापासून पुरविली.

त्याची ओळख कधी, कुठे नि कशी झाली ते मला आता खरेच आठवत नाही. पण आठवते ती काही वर्षापूर्वीची एक संध्याकाळ. मुकुंदने त्या दिवशी रणजितला आमच्या घरी जेवायला बोलावले होते. दोघांचेही लक्ष जेवणापेक्षा गप्पातच जास्त होते. नव्या जुन्या पुस्तकांपासून मराठ्यांच्या इतिहासापर्यंत आणि प्रचलित राजकारणापासून शेतीपर्यंत कितीतरी विषयात रस घेऊन ते बोलत होते. जेवण झाल्यावर बोलताबोलता गाण्याचा विषय निघाला, (‘गाणे’ हा रणजितचा खास प्रेमाचा आणि अधिकाराचा विषय!) आणि सर्वांनी त्याला गाणे म्हणायचा आग्रह केला. तेव्हा रणजितने तुकारामाचा एक अभंग म्हटला. विलाक्षण तल्लीन होऊन! त्याच्या, भावनेत भिजलेल्या आर्तमधुर स्वरांनी आमचे कान आणि आमची मने अगदी तृप्त होऊन गेली. तुकोबांचा विठुराया त्याने आपल्या स्वरांनी आमच्या मनःश्चक्षुपुढे मूर्तिमंत उभा केला. तेव्हाच मी ओळखले की जे काही करायचे ते अगदी जीव ओतून, मनाच्या गाभ्यापासून करायचे हा याचा स्वभावच असावा.
त्या रात्री रणजितही मुकुंदबरोबर मला निरोप द्यायला स्टेशनवर आला होता. गाडीने शिटी देताच खिडकीपाशी येऊन तो मला म्हणाला, "मालू, मुकुंदबरोबर तूही ये ना एकदा आमच्या कोवाडला." ते आमंत्रण इतके मनापासून होते की मी देखील पट्‌कन ते स्वीकारून टाकले. योगायोग असा की रणजितकडे जाणे मुकुंदला काही अजून जमले नाही पण मी बरीक त्याच्या आणि माधवीवहिनींच्या घरचा यथेच्छ आणि प्रेमळ पाहुणचार दोनतीनदा घेऊन आले.

आपल्या जिव्हाळ्याच्या आप्त सुहृदांवर लोभाचा वर्षाव करण्यात हा जेवढा उदार-सढळ आणि तत्पर आहे ना, तेवढाच पत्रलेखनात चालढकल करण्यात पटाईत आहे. प्रतिवर्षी मी याला नारळी पौर्णिमेला राखी धाडते पण तिची पोंच येते ती बहुधा माधवीवहिनींच्या पत्रातून, त्यांच्या वाटोळ्या, सुंदर अक्षरात. काही दिवस याच्या पत्राची वाट पाहून चिडून-भांडून मी याला दुसरे पत्र लिहिते. त्याचे उत्तर रणजित स्वतः लिहितो-तुलनेने जरा कमी उशीर करून, तेही पाच-सात ओळींचे. अनेक मोठ्या माणसांचे अक्षर असते तसेच याचेही आहे. याउप्परही माझ्या रागाची उकळी उरलीच तर ती थंडावते याच्या चातुर्याने. म्हणजे असे की मग हा काय करतो, या पत्रव्यवहारानंतर जेव्हा केव्हा याची सांगली-मिरजेकडे फेरी होते (ती तास-दोन तासापुरतीच का असेना) तेव्हा आवर्जून हा माझ्या ‘पर्णकुटी’त येऊन जातो. ती भेट असते धावतीच. माझी स्वाभाविक इच्छा असते, याने एखाद्या दिवशी तरी आपल्या घरी रहाय-उतरायला वेळ घेऊन यावे, आपल्या हाताने केलेला त्याच्या आवडीचा एखादा पदार्थ याला आपण खाऊ घालावा. तसे मी म्हटले म्हणजे हा काय म्हणतो, सांगू? म्हणतो, एखादा पदार्थ सुरीने कापत असल्याचा अभिनय करीत- "हे असले काही येते आहे का तुला करायला? छेः मग काय तुझ्याकडे जेवून उपयोग?" त्यावर नाक फेंदारून मी उत्तर देते, "ते कापाकापीचे खा तू तुझ्या घरी. ते नाही जन्मात मिळायचे माझ्या इथे. पण माझ्या घरच्या खोबर्‍याच्या वडीची नाहीतर बेसनाच्या लाडवाची चव तर घेऊन पहा ना." त्यावर मनमोकळे हसून, माझी थट्टामस्करी करीत समोर ठेवलेल्या बशीतला पदार्थ आपुलकीने खातो, नि लगेच उठतोच. मात्र जाताना न विसरता बजावतो, "मालू, प्रकृतीला नीट जपत जा हं."

त्याचा माझा पत्रव्यवहार नियमित होतो किंवा वरचेवर गाठीभेटी होतात असेही नाही. पण खरे सांगू? त्याची आवश्यकताच वाटत नाही. कारण माझ्या सर्व सुखदुःखात तो माझ्या पाठीशी उभा असणारच याबद्दल मला मनोमन खात्री असते.

काही वर्षापूर्वी घडलेला एक प्रसंग सांगते. आमच्या ’विलिंग्डन’ महाविद्यालयात आम्ही रणजितच्या व्याख्यानाचा कार्यक्रम योजिला होता. त्याच्या व्याख्यानाला आमच्या विश्रामबाग परिसरतील इतर विद्यार्थ्यांचीही गर्दी होणार हे ओळखून आम्ही सर्वात मोठ्या सभागृहात व्याख्यानाची व्यवस्था केली होती. अकस्मात आमच्या कानावर बातमी आली ती बॅ. नाथ पै यांच्या निधनाची. अशा परिस्थितीत कार्यक्रम कसा पार पडणार याबाद्दल आम्ही साशंक झालो. पण रणजित व्याख्यानाला वेळेवर आला. बॅ. नाथ पै सारख्या उमद्या व तेजस्वी नेत्याच्या आणि सन्मित्राच्या वियोगाने आणि त्याच्या अंत्ययात्रेत सहभागी होऊन त्याला श्रद्धांजली वाहून आल्यामुळे रणजित मनाने तसेच शरीरानेही फार थकला होता. ते त्याच्या सार्‍या हालचालीतून सहज ध्यानात येत होते. व्याख्यान संपल्यावर रात्री कितीतरी उशीरपर्यंत तो आम्हा प्राध्यापक मंडळींशी व्यथित मनाने नाथ पैंच्याबद्दलच बोलत होता. त्यांच्या जाण्याने रणजितच्या मनात केवढी पोकळी निर्माण झाली होती ते त्यावरून जाणवत होते. आम्हाला दिलेला शब्द पाळण्यासाठी, कर्तव्यबुद्धीने तो आला यामुळे कृतज्ञतेने आमची मने नम्र झाली होती.

आमच्या वसतिगृहातल्या मुलींची सहल, अशीच एकदा गोकाक-घटप्रभा इकडे गेली होती. मुक्काम होता घटप्रभेच्या ’कर्नाटक आरोग्यधामा’त! कोणातरी आप्तांना घेऊन रणजितही त्या दिवशी तिथेच आला होता. ती कुणकुण आमच्या कन्यकांना कुठून लागली देव जाणे! त्यांनी लावला माझ्यामागे लकडा, "बाई, आम्हाला त्यांना पहायचे आहे, त्यांचा ऑटोग्राफही घ्यायचाय, त्यांची पुस्तके आम्हाला फार आवडतात, तुम्ही सांगा की बाई, आमच्यावतीने, त्यांना इकडे यायला." मलाही कन्यांचे मन मोडवेना. रणजितला भेटून मी विनंती केली. थोड्याच वेळात तो आला. हसत खेळत एक छोटेसे भाषणही त्याने आमच्या मुलींपुढे केले. त्या भाषणात वा नंतरच्या गप्पाटप्पात नव्हती कसली सुप्रसिद्ध साहित्यिक म्हणून बढाई की नव्हता कसला रूक्ष उपदेश! होता अंतःस्फूर्त ओलावा, संस्कारक्षम मनाची यथोचित जाणीव आणि ती मने उमलविण्या-फुलविण्याची प्रांजळ तळमळ. 

कोवाडची त्याची राहण्याची वास्तू म्हणजे एक नमुनेदार सुंदर ’कला भुवन’च आहे. बाकी एरवी ते गाव, भारतातल्या इतर खेड्यांसारखेच. पण गाव ओलांडून तुम्ही त्याच्या घराच्या अंगणात पाऊल टाकलेत की तिथली रंगीबेरंगी देशीविदेशी फुले आणि झाडे. पक्ष्यांचा किलबिलाटही कानावर येईल. पोपटांचे दोन तीन पिंजरे माडीवर हलताना दिसतील, ’रॉबर्ट’ नावाचा बदकासारखा पण खूप मोठा राखी-गुलाबी रंगाचा पक्षी ‘क्वॅक क्वॅक’ करीत दाणे टिपताना दिसेल. बर्फासारखी पांढरीशुभ्र लुसलुशीत अंगाची कुत्रीही त्यांच्या आस्तित्वाची जाणीव करून देतील आणि त्यांच्या पाठोपाठच ‘या हो’, ‘या ना’ म्हणत स्वागत करतील आमच्या माधवीवहिनी. सावळ्या रंगाच्या, रेखीव, शिडशिडीत बांध्याच्या, उंच, डोक्यावरून पदर घेतलेल्या आणि सदैव प्रसन्न अशा. तेवढ्यात ‘कल्लू’ किंवा ‘पुंडलिक’ तुमचे सामान अदबीने पुढे येऊन घेतील. हातपाय धुवून याल तोवर चहाफराळाचा सरंजाम टेबलावर टापटिपीने मांडलेला दिसेल. ‘रणजित’ची भेट इथे होईल किंवा त्याच्या प्रशस्त शोभिवंत दिवाणखान्यात. तिथली बैठक पूर्णपणे भारतीय. तक्क्या, लोड, गालिचा आणि विविध आकर्षक कलात्मक वस्तूंनी थाटलेली. अर्ध्या बाह्यांचा शर्ट, लुंगी अशा साध्या पोषाखात रणजित तेथे कुण्या नवोदित लेखकाला मार्गदर्शन करताना किंवा एखाद्या लेखक प्रकाशकाशी दिलखुलास गप्पा करताना आढळेल. तोंडात विड्याचे पान रंगलेले आणि हाताजवळ अखंड पानाचा चांदीचा डबा संगतीला. जवळच्या खोलीत कुठे भाऊसाहेब खांडेकर, लताबाई अशा मान्यवरांची तर कुठे त्यांच्या जीवनातील मौलिक क्षणाची स्मृती जपणारी आप्त सुहृदांसमवेत काढलेली सुरेख छायाचित्रे दिसतील. नामवंत छायाचित्रकारांची देखणी लॅंडस्केप्स आणि पोर्ट्रेटस देवघरात व जवळही लावलेली आहेत. शिसवीचा केवढा थोरला देव्हारा आहे, पूजा अर्चेनंतर तिथे दरवळणारा गंध सारे वातावरण आणि मन प्रसन्न करतो. दिवाणखान्यातल्या कपाटातून पुस्तकेच पुस्तके दाटीवाटीने उभी आहेत. नवे-जुने, इंग्रजी-मराठी सार्‍यांची तिथे दिलखुलास पंगत आहे. किती वाचावे, काय काय पहावे असे होऊन जाते. बाजुच्याच कपाटात वाद्यांचा सरंजाम आज्ञाधारकपणे उभा आहे. गच्चीलगतची खोली-चिमुकली आटोपशीर-ही रणजीतची खास लेखनसाधनेची जागा. छोटेसे मेज, खुर्ची, निवडक पुस्तके आणि लेखनसाहित्य. बस्स! एक मात्र लक्षात ठेवायचे या घरात कुठेही वावरताना सुंदर सुंदर कलाकृतींची भेट हा कॉमन फॅक्टर म्हणून असतो. या खोलीत बसूनच रणजितने ‘स्वामी’, ‘श्रीमान योगी’ ही मराठी भाषेची अलोलकीची लेणी निर्माण केली असतील या जाणीवेने मनावरून आनंदाभिमानाची लकेर चमकून जाते. गच्चीवरून पाहिले की दूर क्षितिजापर्यंत हिरवीगार शेते, लहानशी घरे असे हृदयंगम दृश्य दिसते. येणार्‍या पाहुण्याला रणजित स्वतः जातीने हे सारे हिंडवून दाखवणार. मलाही त्याने ते तसे दाखविले आणि नंतर एका खोलीतले भले थोरले कपाट उघडून त्यातून एक पेटी काढली. काय होते म्हणाल त्यात? तर निरनिराळी सुंदर फाऊंटनपेन्स. ती हातात घेऊन तो सागू लागला, "मालू, या पेनने मी ‘स्वामी’ लिहिली, याने ‘श्रीमान योगी’ ...माझे लक्ष पेनएवढेच त्याच्या चेहर्‍याकडेही होते. त्याचे डोळे एक प्रकारच्या आंतरिक समाधानाने भरून आल्यासारखे मला वाटले. ती पेने म्हणजे त्याच्या वाङ्मयीन कर्तृत्वाची साहाय्यक साक्षीदार होती. त्यांची जपणूक त्याने अशी हळुवारपणे करावी हे स्वाभाविकच होते. त्याला लाभलेली अनेक सन्मानचिन्हेही मी तिथे पाहिली. आणि कितीतरी उंची अत्तरांच्या नाजुक कुप्याही. पलिकडच्या खोलीत ज्ञानेश्वरांची विलक्षण मनोहारी मूर्ती बसवलेली दिसली. मी स्वतःशीच म्हटले या सार्‍या वास्तूत शालीन सौंदर्य आणि चोखंदळ अभिरुची यांचा केवढा मनोज्ञ संगम झालाय.

कोवाड खेडे खरेच पण फ्रीज-रेडिओपासून टेलिफोन-फर्निचरपर्यंत सर्व आधुनिक सोयी रणजितच्या घरात आहेत. अद्ययावत्‌ ध्वनिमुद्रिकांचा खूप मोठा संच आहे. पाहुणा आला की लवकर परत जाण्याची गोष्ट काढणे जरा अवघडच. सामान्य शेतकर्‍यापासून दूरदूरच्या मित्रमंडळींपर्यंत सारी इथे येतात ती या वास्तूच्या अन्‌ तिथे राहणार्‍या देसाई दांपत्याच्या ओढीने. रणजितचा जन्म पूज्य शिवछत्रपतींच्या जवळच्या आप्त संबंधातल्या कुटुंबात झालेला. सर्व प्रकारची संपन्नता हात जोडून समोर उभी असलेल्या वातावरणात याचे बालपण गेलेले. असे असूनही त्याच्या वागण्यात एक पारदर्शक साधेपण आहे, आत्मीयता नि राजसपण आहे. या खानदानाला भडकपणा, भपका-डामडौल वर्ज्य आहे. कोवाडकर जनतेचे व रयतेचे हे ‘सरकार’ आहेत. इथल्या सर्व सत्कार्याला या ‘सरकार’चे उदंड आशीर्वाद आणि आधार असायचाच. मग ती माधवीवहिनींची चालवलेली ’बालवाडी’ असो की गावाचे वाचनालय. गावकर्‍यांशी त्याचे नाते आहे ते वत्सल कुटुंबप्रमुखाचे आहे. याच्या वाड्यापासून थोड्या अंतरावर रणजितची जमीन शेतीवाडी आहे. तिथली त्याची बंगली आणि त्यालगतचे छानदार देऊळ ही एखाद्या भावकवितेसारखी मनात रेंगाळत राहतात. काजू-आंब्यांच्या झाडाशेजारच्याच शेतात रणजित, नरहर कुरुंदकर, माधवीवहिनी आणि मी यांनी दोन वर्षापूर्वीच एक संध्याकाळ किती मजेत घालवली होती. ते दोघे साहित्यातले महारथी! आणि जिवाभावाचे मित्रही. निकोप-अवखळ मनांनी ते एकमेकांना कोपरखळ्या देत होते, वादसंवादही करीत होते. ते पाहणे-ऎकणे हाही आम्हा दोघींना मोठा सुखद अनुभव वाटत होता. कितीतरी दिवस चिंतनाला पुरेल एवढे खाद्य त्यातून लाभत होते. ती संध्याकाळ आठवली म्हणजे आजही चित्त गलबलून येते. दोन दिवस तिथे भर्रर्रदिशी गेले. आम्ही निघालो तसा रणजित जवळ येऊन मला म्हणाला, "हे बघ, हे तुझ्या भावाचे हक्काचे घर आहे मनात येईल तेव्हा इथे यायचे नि रुचेल तेवढे रहायचे, काऽय?" आणि पाठीवर दिन धपके घातलेन्‌. माधवीवहिनींनी कुंकू लावून इंदुरी साडी हातात ठेवली, "कशी आवडली ते कळवा हं" म्हणाल्या. वाड्याच्या पायर्‍या उतरताना माझी पावले जड झाली होती.

बस चालली होती. मनात येत होते, रणजित बालपणीच मातृसुखाला आचवला. तरूणपणातही नियतीने दुःखाचे कडवट अनुभव दिले पण तरीही त्याचे मन बधीर, कडवट झाले नाही. उलट इतरांच्या दुःखावर फुंकर घालणारे, कोमल, स्निग्ध असेच ते राहिले. निसर्गात वा मानवी जीवनात जिथे जिथे ध्येयभारलेपण, उदात्तता, भव्यता, सौंदर्य ही याला दिसली तिथे तिथे हा विनम्र झाला. व्यथा वेदना पाहिली की उदास होतो. व्याकुळ अंतर्मुख बनतो. त्याची करुणा-अनुकंपा बुद्धी उचंबळून येते, त्याच्या साहित्यातला ‘राधेय’ असो ‘मनु’ असो की देवा तुका-मुक्तासारखे दुर्दैवी जीव असोत, मूकपणे दुःखे सोसणार्‍यांबद्दल याचे मन फार हळुवार आहे. त्याच्या मनातल्या या माणुसकीच्या गहिवराने त्याच्या साहित्यविश्वाला एक वेगळीच उंची आणि मोल लाभले आहे. ती. भाऊसाहेब खांडेकरांनी याच्यावर पुत्रवत्‌ माया का केली असेल आणि प्रसंगी त्यांची पादत्राणेही या शिष्योत्तमाने हाताने का उचलली असतील याचे उत्तर दोघांच्या मनःप्रवृत्तीतल्या सारखेपणात सापडेल. जीवनात सत्‌तत्वांची पूजा बांधावी, अनेक प्रकारच्या दुःखांनी गांजलेल्या आपल्या समाजाला धीर-आधार द्यावा, आपल्या हातात पणती असो की दिवा त्या दुर्दैवी जीवांच्या मनाजीवनात प्रकाश आणावा, त्यांच्यावर सुसंस्कार करावेत याचीच दोघांना ही तळमळ. असा आमचा हा रणजित! ‘अहंकाराचा वारा न लागो माझिया चित्ता’ असे अंतःकरणापासून म्हणणारा, तसे वागणाराही. पण तो ज्यांना मानतो अशा त्याच्या श्रद्धास्थानांवर, त्याला जे विश्वस्त मानतात अशांवर किंवा त्याच्या स्वतःवरही कोणी अन्याय करू लागले की आपल्या सर्व शक्तिबुद्धींसह तो ठामपणे प्रतिकाराला सिद्ध होतो. आपली अस्मिता जागरूकपणे जपतो.

मला दिसलेल्या रणजितचे हे ईषत्‌ दर्शन. त्याच्याबद्दल गेली काही वर्षे मात्र एक काळजी माझ्या मनाला कुरतडत असते. मूळचा हा चांगला बलदंड असावा, चांदीच्या बंद्या रुपयासारखा खणखणीत. (त्याची जुनी छायाचित्रे पहाना.) पण हल्ली मात्र ती प्रकृती पार ओसरून गेली आहे. म्हणून त्याला कळकळीने सांगावेसे वाटते, "अरे रणजितभाई, तुझ्यासारखी जातिवंत प्रतिभेची, रसिक माणसे आमच्यासारख्यांना जीवनप्रवासात क्वचितच भेटतात, पहायला मिळतात. तुमचे कसबी हात जी वाङ्मयसंपदा निर्माण करतात  त्याने केवळ तुम्हीच मानमान्यतेला पोहोचता असे नाही, तर आपला सारा समाजच त्याने श्रीमान्‌ होतो. अशी कितीतरी धनदौलत अजून तुला निर्माण करायची आहे. सध्या राजा रविवर्म्यासारख्या अलौकिक बलवंताचे जीवनदर्शन तुझ्या समग्र लेखणीने घडविण्यात तू व्यग्र आहेस (असा एखाद्या भव्योदात्त कलाकृतीचा ध्यास तू घेतलास म्हणजे तू किती राबतोस -चिंतन-मनन करतोस ते मी पाहिले आहे-) ही कलाकृती तुझ्या मुकुटात नवा मानाचा शिरपेच बसवणार. तिच्याकडे आम्ही आतुरतेने पहात आहोत. त्या सार्‍यांसाठी, तुझ्या असंख्य चाहत्यांसाठी आम्हा सुहृद-आप्तांसाठी तू प्रकृतीनं निकोपच असणं अगत्याचे, फार अगत्याचे आहे. आणि म्हणून तुझ्या निकोप प्रकृतीच्या आड येणारी सारी विघ्नं तू दूर केली पाहिजेस. माधवीवहिनींसारखी समंजस, सोशिक कलाविद्यानिपुण आणि तुझ्या जीवनात विरघळून गेलेली सहधर्मचारिणी तुला लाभलीय. म्हणून म्हणते आमची विनंती लक्षात घेशील ना? अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही तुझ्या आजवरच्या लौकिकात एक नवी भर होय. गौरवोत्सवाच्या क्षणी मी इतकेच म्हणते,

रणजित,
"सौख्याच्या शिखरी सदा विहरू दे मूर्ति तुझी लीलया ।
दुःखाची न कधी जिवास भिववी जन्मांतरी चाहुल।
हर्षाच्या उठती असंख्य लहरी चित्तामधी माझिया ।
आनंदाश्रु थरारती, क्षणभरी, अन्‌ प्रार्थिती मंगल ॥"    

-  मालतीबाई शं. किर्लोस्कर

!’

  

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color