स्वागतकक्ष arrow मराठी पुस्तके arrow मधुघट arrow किती लहान किती महान!
किती लहान किती महान!
लेख़क Administrator   
 

किती लहान किती महान!

कितीतरी वर्षांनी माझे स्वप्न त्या दिवाशी साकार झाले होते. रायगडावरील शिवरायांची समाधि मला डोळ्यांनी पहायला मिळाली होती. ती पाहून माझे डोळे निवले होते. कृतज्ञतेने, आदराने माझी मान पुनःपुनः खाली लवत होती. हात जोडले जात होते. ‘रायगड’ म्हणजे सगळ्या किल्ल्यांचा मुकुटमणी! त्याच्या उत्तुंग आणि भव्यपणाला शिवरायांच्या समाधीने एक आगळेच वैभव आणि लावण्य लाभले होते. दुर्गराजावर शिवबा चिरकालीन विश्रांतीसाठी विसावले होते. तेथे विसावलेले त्यांचे काळीज या गडाच्या काळजासारखेच बुलंद,  उदार आणि असामान्य होते.

गडावरून अंवतीभंवती क्षणभर नजर टाकली की भोवतालचा विस्तीर्ण आणि घनगर्द वृक्षांनी नटलेला परिसर मन भरून टाकी. पर्वतराजींच्या द्रोणात हा गड एखाद्या महापुरुषासारखा शोभत होता. तटाचे नयनरम्य आणि उग्र असे स्वरूप एकचवेळी अनुभवताना माझे शरीर आणि मन रोमांचित होत होते. तो परिसर आणि त्या महापुरुषाची समाधी पाहताना मनानं मी तीनशे वर्षे मागे गेले होते. शिवरायांच्या जीवनातील कितीतरी अद्‌भुत आणि नाट्यपूर्ण प्रसंगांची माझे मन स्वतःशीच उजळणी करीत होते. समाधीवर फुलांची ओंजळ भक्तिभवाने वाहताना मला वाटले, "राजांना जाऊन तीनशे वर्षे होत आली पण, या समाधितळाशी त्यांचा पार्थिवदेह रजःकणाच्या रूपाने तरी वास करीत असणारच, खचितच असणार!" या कल्पनेने माझे मन एका विलक्षण दिव्य अनुभवाने थरारले. समाधि अत्यंत साधी आहे, तीवर आकर्षक अशी मेघडंबरी आहे. तिच्या जवळच्या जमिनीवर रंगीबेरंगी फुलांचे ताटवे फुललेले दिसत होते. मंद वार्‍याने ती फुले शांतपणे डुलत होती. शेजारीच एकुलता एक बकुलवृक्ष स्थिरचित्ताने उभा होता. रायांच्या कर्तृत्वाचा सुगंध जणू तो आपल्या मनात साठवून घेत होता. बकुळीची सुवासिक आणि सानुली फुले वार्‍याच्या झोताने जमिनीवर पडत होती. त्यांच्या रूपाने वृक्ष जणू राजांची भावपूजा बांधीत होता असे मला वाटले.

भर दुपारची बाराची वेळ होती. बकुलवृक्षाच्या सावलीत उभी राहून मी एकाग्रचित्ताने कितीतरी वेळ त्या समाधीकडे नुसती पहातच होते. जरा मन सावरल्यवर दृष्टी थोडी पलिकडे जाते तो तेथे आणखीन एक समाधी आढळली. त्या समाधीच्या चबुतर्‍यावर एका देखण्या कुत्र्याचा पुतळा उभा होता. कुतूहलाने मी जवळ जाऊन पाहू लागले, तर त्या चबुतर्‍यावर सोनेरी अक्षरात त्या मुक्या प्राण्याचा गुणगौरव रामगणेशाच्या रसवंतीत उद्धृत केला होता. त्यांच्या ‘राजसंन्यास’ नाटकाची ती अर्पणपत्रिका होती- ती अशी

"हे समाधीवरचे श्वान खरोखरीच सर्वांना मान देण्यासारखे होते. हा इमानी जीव आबासाहेबांना कधीही विसंबत नसे. अखेर प्रभूंचे शुभावसान झाल्याबरोबर त्या मुक्या इमानानेही त्यांना स्वर्गापर्यंत सोबत केली." ती कोरीव अक्षरे वाचताना आणि त्या मुक्या जीवाची समाधी डोळा भरून पाहताना ते नकळत ओलावले. ज्याला डोळ्यांनी पाहण्याचे भाग्य मला कधीच लाभले नव्हते तो शिवराजांचा ‘वाघ्या’ कुत्रा माझ्या चक्षूंना सहज दिसू लागला. किंचित तपकिरी, किंचित भगव्या रंगाचा, मधून मधून पांढरे ठिपके केसावर असलेला, झुबकेदार शेपटीचा, उभारलेल्या तल्लख कानांचा, बोलक्या, टपोर्‍या डोळ्यांचा, राजांसमवेत सतत वावरणारा, अंवतीभंवती फिरणारा, प्रेमळ, इमानी, आज्ञाधारक असा हा सवंगडी मला चित्तवेधक वाटला. मी स्वतःशीच म्हटले, "शिवरायांनी आपल्या अलौकिक पराक्रमाने, असामान्य राष्ट्रभक्तीने, निष्कलंक चारित्र्याने स्वकीयांना मंत्रमुग्ध केले, शौर्यधैर्याने शत्रूंना स्तिमित केले. त्यांच्या गुणांवर लुब्ध होऊन नवराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणाचे बलिदान करायला हजारो युवक स्वेच्छेने पुढे सरसावले, हे सारेच अद्‌भुत, विलक्षण आहे खरे, पण त्यांच्यावरील प्रेमाने एका मुक्या जीवाने त्यांच्याबरोबर प्रवेश करावा हेही तेवढेच अद्‌भुत, विलक्षण आणि नाट्यपूर्ण नव्हे तर काय? एका सामान्य गणल्या जाणार्‍या प्राण्याचे हे केवढे जगावेगळे धैर्य! ही केवढी अपूर्व स्वामिनिष्ठा! आपल्या बलिदानाने ‘वाघ्याने’ जनमानसातली आपली कीर्ति तर वाढवलीच पण आपल्या धन्याचीही कीर्ति त्याने शतगुणित केली. "केवळ माणसांनीच नव्हे तर, मुक्या प्राण्यांनीही देव म्हणून ज्याला पूजिले असा हा राजर्षि" अशी राजांची कीर्ति वाघ्यानं केली. एक चिमुकला सान जीव यामुळे चिरंजीव आणि महान ठरला!

‘वाघ्या’च्या गोष्टीने माझे मन काहीसे चाळवल्यासारखे झाले. महाभारत रामायणातील अशीच कितीतरी चित्रे वर्तमानकाळचे विस्मरण घडवून माझ्या नजरेपुढून जाऊ लागली-

शांतिब्रह्म असा धर्मराज आणि त्याची सोबत करणारा त्याचा एकमेव सखा ठरलेला कुत्रा; सारे रान आपल्या थकल्या पायांनी तुडवून बोरे वेचून आणणारी व आपल्या निःशक्त दातांनी ती खाऊन पाहून मग वनवासी रामाला भक्तिभावाने अर्पण करणारी शबरी आणि त्या अर्ध्याउष्ट्या बोरांचा निःशंक मनाने स्वीकार करणारा प्रजावत्सल रघुपति,  मूठभर पोहे आपल्या जीर्ण उपरण्याच्या वस्त्रात आपल्या मित्रासाठी नेणारा प्रेमळ बालमित्र सुदामा व त्याला पाहताच हातातील कामे आणि प्रिय भार्या करीत असलेले पदसंवाहनही सारी दूर सारुन मित्रभेटीसाठी त्वरेने, आनंदाने धावणारा द्वारकेचा राणा श्रीकृष्ण! या कथांमधल्या कुत्र्याला, शबरीला, सुदाम्याला लहान कोण म्हणू शकेल? आपल्या धन्याचे मोठेपण उजळून टाकणारे हे त्यांच्या जीवनातले मंगल प्रकाशदीपच म्हणायला हवेत-

ही चित्रमाला पाहता पाहता मनाने एकदम वर्तमानकाळात झेप घेतली. वर्षादीडवर्षापूर्वी भारतात झालेली आगळीच राज्यक्रांति मला आठवली. सार्‍या देशाचे भवितव्य या क्रांतीने बदलून टाकले. प्रथम शेदीडशेवर्षे इंग्रजांच्या आणि नंतर काही वर्षे आसुरी महात्वाकांक्षेने झपाटलेल्या एका उन्मत्त प्रबलेच्या घृणास्पद गुलामगिरीतून भारत त्या दिवशी प्रथमच मुक्त झाला होता.

खर्‍या स्वातंत्र्याचा सर्वत्र जयजयकार ऎकू येऊ लागला होता. हा चमत्कार कुणी घडविला होता? भारतातल्या पाच-साडेपाचफूट उंचीच्या हजारो, लाखो सामान्य माणसांनी! माणूस पोटभर अन्न-वस्त्र-निवारा यासारख्या जीवनाच्या प्राथमिक गरजांनाही आज शेकडो वर्षे पारखा झाला होता. जनावरांपेक्षाही अधिक निकृष्ट जीवन तो शतकानुशतके जगत होता. दारिद्र्य-दैन्य-अज्ञान-अंधश्रद्धा-अनारोग्य याच्या अंधारात जो दीर्घकाळ खितपत पडला होता, त्या, त्या एका सामान्य जनसमूहाने ही किमया करून दाखवली होती. जगातील सारी राष्ट्रे तो चमत्कार पाहून अवाक्‌ झाली होती. "अशिक्षित विचारवंतांनी केलेली क्रांति" अशी जगात लोकशाही राष्ट्रांनी त्याची एकमुखाने प्रशंसा केली होती. या भारतातल्या सामान्य, लहान माणसाने काळाची हाक आणि गरज अचूक ओळखली होती. तिला खुल्या मनाने आणि निर्भयवृत्तीने प्रतिसाद दिला होता. या सामान्यांची उंची असामान्य आहे हे अखिल जगाला प्रथमच कळले होते.

लोकमान्य-लजपतराय, विवेकानंद-रविंद्र, जवाहर-मोहनदास, सावरकर-सानेगुरुजी, भगतसिंह-सुखदेव, लोहिया-जयप्रकाश आणि अशाच कितीतरी महानुभावांनी ज्या भारताची शान आणि मान जगात वाढवली होती त्याच भारताची उंची भारतातल्या सामान्य समजल्या जाणार्‍या मानवाने हिमालयासारखी उत्तुंग केली होती. लहानांचे हे महानपण होते.

राष्ट्र मोठे कशाने होते? देशाच्या केवळ औरसचौरस क्षेत्रफळाने नव्हे, केवळ दाट लोकवस्तीनेही नव्हे- तर लोकोत्तर महापुरुषांच्या आत्मतेजाच्या सूर्यप्रकाशात, सामान्य माणसाच्या अंतरंगातील आत्मतेजाच्या पणतीचा प्रकाश असा बेमालूमपणे जेव्हा मिसळतो तेव्हा ते खरे मोठे होते--

 

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color