प्रार्थना
लेख़क Administrator   
 

प्रार्थना

मराठी शाळेत असताना दर शनिवारी आमची शाळा सकाळची असे. शेवटच्या तासाला बाई आम्हाला एक सुरेखशी गोष्ट सांगत. गोष्ट सांगायला त्या उभ्या राहिल्या की आम्ही पहिलीच्या वर्गातल्या मुली त्यांच्याभोवती कोंडाळे करून बसत असू. डोळे बाईंच्या चेहर्‍यावर खिळलेले आणि कान गोष्ट ऎकण्यासाठी विलक्षण आतुर झालेले, अशी आमची स्थिती होई. दोन वेण्या पुढे घेऊन झग्याचा घोळ किंचित उंचावून फतकल मारून बसताना तो नवा आहे याचेही विस्मरण होई. बाईंनी एकदा लाकुडतोड्याची गोष्ट सांगायला सुरुवात केली. "एक होता लाकूडतोड्या. बिचारा भारी गरीब होता. लाकडे तोडताना त्याची कुर्‍हाड पडली विहिरीत. त्याला फार वाईट वाटले. तो लागला रडायला. जरा वेळाने शांत झाल्यावर त्याला एक युक्ति सुचली. तो देवाची प्रार्थना करू लागला,. म्हणाला, "देवबापा माझी कुर्‍हाड मला परत दे. नाहीतर मी पोट कसं भरू माझं?" गोष्टीच्या अखेरीस प्रामाणिकपणाचे फळ म्हणून देवाने त्याला आणखी दोन चांदी-सोन्याच्या कुर्‍हाडी दिल्या, हे बाईंनी अगदी विस्ताराने सांगितले. माझ्या बालमनाला वाटलं, एरवी दूरवर राहणारा देवबाप्पा, मनापासून प्रार्थना केली तर आपल्याला भेटायला पृथ्वीवर येतो. किती दयाळूपणा हा त्याचा! प्रार्थानेने माझ्या मनात, मानाचे अन्‌ श्रद्धेचे स्थान मिळवले ते इतक्या लहानपणापासून!
------------------------
सगळ्या विद्यार्थिनींनी सकाळ संध्याकाळ प्रार्थनेला हजर असलेच पाहिजे, असा आमच्या ‘हिंगण्या’च्या शाळेत दंडकच होता. पहाटे साडेपाचच्या प्रार्थनेची घंटा होताच प्रार्थनामंदिराच्या विस्तीर्ण आवारात आम्ही जमत असू. अण्णा कर्वे, गुरुवर्य वामन मल्हार जोशी असे थोर गुरुजनही त्या वेळी हजर असत. मंद वार्‍याच्या लहरीसवे किंवा रिमझिम पावसाच्या संगीतासह प्रार्थना म्हणताना एक प्रकारच्या अननुभूत आनंदाने मन भरून येई. उजव्या हाताला खडा उभा असलेला सिंहगड, डाव्या हाताला असलेली ‘पर्वती’ची टेकडी, समोर वाहणारा ‘मुठा’ नदीचा जलप्रवाह या सार्‍या निसर्गरम्य परिसरात, त्या शांत नीरव वेळी आम्ही एकमुखाने कधी म्हणत असू रवींद्रनाथांचे गीत, "अंतर मम विकसित करि हे परात्पराऽऽ’, कधी म्हणत असू आमचे आश्रमगीत, "हे वंद्य आश्रमा त्वां माझे प्रणाम घ्यावे! गुरुराज थोर ‘अण्णा’ होवोत श्रीमहर्षि" म्हणता म्हणता आण्णांच्या सावळ्या वामनमूर्तीकडे लक्ष जाई आणि परोपकारी देवाचे हे खरोखरीच ‘साक्षात’ रूप आहे असे वाटे. ’शांताकारं भुजगशयनम्‌’ने सुरू झालेली रात्रीची प्रार्थना ‘देव’मास्तरांनी नंतर केलेल्या लहानशा प्रवचनाने केव्हा केव्हा संपे. कधी संस्था पहायला येणारे थोर, विद्वान पाहुणे उपदेशपर चार शब्द बोलत. त्यातून महाभारत-रामायणातील कितीतरी उद्‌बोधक कथा, मार्मिक सुभाषिते यांचा परिचय होई. धीरोदात्त, वंद्य स्त्रीपुरुषांच्या जीवनाचे मर्म उलगडे. काही ना काही नव्या विचारांचे सुवर्ण प्राप्त होई. ते मनात गोळा करताना, दिवसभरात आपल्या हातून झालेल्या अपराधांचे स्मरण होऊन मन व्यथित होई. मैत्रिणीने नवे गोष्टीचे पुस्तक वाचायला दिले नाही म्हणून तिच्याशी धरलेला अबोला यावेळी मनाला बोचत राही. आपल्या उणिवांकडे क्षणभर का होईना, पण मन निःपक्षपातीपणे पाही, इतरांच्या अपराधाबद्दल ते क्षमाशील बने. ते देवाची प्रार्थना करी,"मी पुन्हा नाही असे करणार! देवा, करशील ना तू मला क्षमा?"

इंग्रजी शाळेत प्रवेश झाल्यावर मराठीचा अभ्यासही वाढू लागला. अशा अभ्यासातच चोखोबांचा अभंग एकदा भेटला. "धाव घालीऽ विठू आता चालू नको मंद. . । तुमच्या द्वारीचं कुतरं. . । नका जी मोकलू चक्रपाणीऽऽ" बाई त्या अभंगाचा अर्थ स्पष्ट करीत होत्या, पण माझे तिकडे नीटसे लक्ष लागेना. कारण आमच्या घरी काय की आमच्या कारखान्यात काय, पंथ, जातिभेद, शिवाशीव या गोष्टींना कधी चुकूनही थारा नसे. त्यामुळे अतिशय करूणार्द्र शब्दात चोखोबा करीत असलेली देवाची ही विनवणी माझ्या काळजाला भिडली. त्यांच्या शब्दाशब्दातून वाहणारी उपेक्षेची जखम माझे काळीज चिरत गेली. मला वाटले, या चोखोबांचा बिचार्‍यांचा अपराध काय? ते महार जातीत जन्मले हाच ना? पण हा जन्म तर देवानेच त्यांना दिला ना? एकाला ब्राह्मण जातीत जन्म आणि गजांत लक्ष्मी हा देवच देतो ना? आणि हाच दुसर्‍याला जनावरांपेक्षा निकृष्ट अवस्थेत ढकलतो ना? देवाने केलेल्या योजनेची शिक्षा निरपराध ‘चोखोबांना’ काय म्हणून? एक माणूस दुसर्‍या जातीतल्या माणसाला आज हजारो वर्षे इतक्या उपेक्षेने, तुच्छतेने कसा वागवू शकतो? हे कोडे मला काही केल्या उलगडेना. आणि खरे सांगू, देवाच्या दयाळूपणाबद्दल, निःपक्षपातीपणाबद्दल विश्वास बाळगणारे माझे मन त्यावेळी शंकाकुल झाले. पाषाणाच्या या देवाला कसला द्रव येणार? असा माझा त्याच्यावर काहीसा रोषही झाला.

कॉलेजात गेल्यावर ‘ज्यूलिया’ची व माझी गट्टी जमली. ती धर्माने ख्रिश्चन. तिचा विवाह कुशाग्र बुद्धीच्या, अत्यंत धनवान अशा डॉक्टरांबरोबर झाला. एका रविवारी त्यांच्या सकाळच्या न्याहारीच्या वेळी मी तिच्या घरी होते. आबालवृद्ध मंडळी टेबलाभोवती जमली होती. सकाळचे आह्निक उरकून शुचिर्भूत होऊन डॉक्टरसाहेब टेबलापाशी आले. सर्वांनी हात जोडले, डोळे मिटून माना लवविल्या. ‘ज्यूलिया’ने डोक्यावरून पदर घेतला. पुष्पपात्रातील ‘अनंता’च्या फुलांचा मंद सुगंध वातावरणात दरवळत होता. देवाशी प्रत्यक्ष बोलावे इतक्या सहजपणे आणि भक्तियुक्त मनाने शांत स्वच्छ सुरात डॉक्टरसाहेब बोलू लागले, "प्रभुदेवा, आजचा दिवस तू आम्हाला दाखविलास त्याबद्दल आम्ही तुझे कृतज्ञ आहोत. तुझे स्मरण-चिंतन करण्यात व आमच्या वाट्याला तू दिलेले काम करण्यात तो आम्ही घालवू. मजकडे येणारे अनेक व्याधिग्रस्त रुग्ण निरोगी होवोत, सुखी राहोत, मी त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीन पण तुझ्या कृपाशीर्वादाशिवाय झाडाचे पान तरी हलते काय? मी त्या सर्वांच्या भल्यासाठी तुझे आशीर्वाद याचितो. आमेन, आमेन." डॉक्टर बोलायाचे थांबले तरी मी त्या भावसमाधीतच बुडाले होते. एका इंग्रजी सुवचनाची मला आठवण झाली. "He prayeth best, who loveth best"

प्राध्यापिका झाल्यावरा एकदा एका महाविद्यालयाच्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी पाहुणी म्हणून मी गेले होते. गाव तालुक्याचे होते. संस्थेच्या प्रशस्त पटांगणावर कमालीच्या शिस्तीत खाकी पॅंट, पांढरा शर्ट, स्वच्छ टोपी आणि पायात चपला अशा नेटक्या पोषाखात सर्व विद्यार्थी उभे होते. ध्वजवंदन झाल्यावर एक विद्यार्थी खड्या आवाजात म्हणू लागला, "जयोऽस्तु ते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे। स्वतंत्रते भगवति त्वामहं यशोयुतां वंदे।" स्वतंत्रता देवीचे स्तोत्र गाताना, " तुजसाठी मरण ते जनन । तुजवीण जनन ते मरण " या ओळी त्याने इतक्या जीव ओतून म्हटल्या की, सारे आसमंत मंत्रमुग्ध बनले. देशासाठी आपल्या सर्वस्वाची आहुती देणारे कितीतरी ज्ञात अज्ञात वीर माझ्या डोळ्यापुडून क्षणार्धात गेले. माझ्या मनात आले देवाची किती अनंत रूपे आहेत. आपली मातृभूमी हे त्याचेच एक श्रेष्ठ रूप नव्हे काय?

सहजच महात्माजींची कित्येक वर्षापूर्वी पुण्यात ऎकलेली प्रार्थना डोळ्यापुढे उभी राहिली. त्या कृश ‘दरिद्रीनारायणाला’ त्यावेळी मी प्रथम पाहिले अन्‌ विस्मयादराने किती तरी वेळ पाहतच राहिले. प्रार्थनेला जमलेला जनसागर म्हणत होता, "वैष्णव जन तो तेणे कहिये, जो पीड पराई जाने रे" मी स्वतःशीच म्हटले धर्म कोणताही असो, देवाचा रंग, रूप, आकार कसाही असो, स्वतःच्या मनःशांतीसाठी, सुखासाठी केलेल्या प्रार्थनेपेक्षा दुसर्‍यांचे, आपल्यापेक्षा अधिक दुःखी असणार्‍यांचे, अश्रू पुसण्यासाठी केलेली प्रार्थना देवाला अधिक लवकर ऎकू जात असावी. मग तशीच प्रार्थना केलेली ज्ञानेश्वरांपासून आजवरच्या थोर तपस्व्यांची परंपरा मला आठवली. आठवले ज्ञानेश्वरांचे ‘पसायदान’ "दुरितांचे तिमिर जावो। विश्व स्वधर्म सूर्या पाहो। जो जे वांछील तो ते लाहो। प्राणिजात॥" सार्‍या चराचर विश्वाच्या कल्याणासाठी केलेली ही चिरस्मरणीय प्रार्थना. आत्मकेंद्रिततेचा तिला लवभर तरी स्पर्श झाला आहे काय? व्यक्ती आणि समष्टी ही एकाच विश्वचितार्‍याच्या कुंचल्यातली दोन हृदयंगम चित्रे आहेत याची किती सहजसुंदर शब्दातून इथे ओळख करून दिली आहे! ‘तुकोबा’ यांचेच वंशज! साक्षात्काराच्या महन्मंगल अनुभवानंतरही ‘उरलो उपकारापुरता’ ही यांची भावना. समाजाची शुद्धि, त्याचे उद्‌बोधन हे यांचे जीवितकार्य! यांनी केलेल्या प्रार्थनेत ना शब्दांचा चकचकाट ना कल्पनांची फुलबाजी. इथे आहे तो मनाचा निखळ प्रांजलपणा! सच्चेपणा! अगदी हृदयाच्या गाभार्‍यापासून निघालेला आणि म्हणूनच हृदयाला भिडणारा! देवळाच्या गाभार्‍यात केलेला घंटानाद कानात कितीतरी वेळ घुमत राहावा ना, तसे प्रार्थनेने माझे होते. लहानपणापासून अशा प्रार्थना ऎकत असल्याने हा प्रार्थनेचा संस्कार वर्षाऋतूतल्या पावसासारखा कल्याणकारी, शुभंकर असा मला वाटतो. लहानथोर माणसात तेवणारी मानवता धर्माची ज्योत हा संस्कार जागवतो, टिकवतो आणि म्हणूनच "सर्वेऽपि सुखिनः सन्तु । सर्वे सन्तु निरामयाः ।" अशी प्रेरणा देणारी प्रार्थना त्या निरंजन देवाचे खरे रूप आहे असे मला वाटते. सर्व समाजाच्या दुःखाचा भागकार आणि सर्व समाजाच्या सुखाचा गुणाकार करायला शिकवणारी, तशी प्रेरणा देणारी प्रार्थनाच माणसाला विकासाकडे नेईल. आणि म्हणूनच प्रार्थनेच्या किल्लीने सकाळी जीवनाचे द्वार खोलावे आणि रात्री ते लावावे असे प्रत्येकाने मनापासून केले तर सार्‍या देशाला आज ज्या अशांत-अस्वस्थ-उध्वस्त-अंधारी वातावरणाने घेरले आहे, त्यातून प्रकाशकिरण सापडेल, यात शंका नाही.                      

     

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color