साहित्यसम्राट
लेख़क Administrator   
 

‘साहित्य सम्राटां’च्या स्वभावाचे काही विलोभनीय पैलू

 

‘तोतयाचे बंड’ हे कै. न. चिं उर्फ तात्यासाहेब केळकरांचे फार लोकप्रिय नाटक! परवा बर्‍याच वर्षांनी मी ते पुन्हा वाचले. एका ऎतिहासिक घटनेची तात्यासाहेबांनी केलेली नाट्यपूर्ण आणि चतुर मांडणी, घरंदाज सुंदर भाषा, प्रभावी पात्रचित्रण या आणि अशाच कितीतरी गुणांनी मला पूर्वीच्याच आनंदाचा सुखदायी प्रत्यय आला. त्यावेळी त्यांच्या सहवासातल्या काही आठवणींनी मनाच्या प्रसन्नतेत भर टाकली.

त्याम्चा ‘हास्यविनोदमीमांसा’ हा ग्रंथ एम. ए.च्या परीक्षेसाठी नेमलेला होता. आमच्या प्राध्यापकांनी तो शिकवून पुरा करीत आणला होता. एक दिवस आम्हा विद्यार्थ्यांच्या मनात वेगळीच कल्पना आली. ‘तात्यासाहेबांनी’च आपला एखादा तास घ्यावा म्हणजे त्यांच्याशी चर्चा, प्रश्नोत्तरे करता येतील आणि परीक्षेची तयारी पक्की होईल. आमच्या आमंत्रणाला मान देऊन तात्यासाहेब ठरलेल्या दिवशी सर परशुरामभाऊ महाविद्यालयात आले. त्यांचा लख्ख गोरा वर्ण, चेहर्‍यावरचे मंदस्मित, अंगावरचा नेहमीचाच धोतर, कोट, पगडी, उपरणे असा खानदानी पोशाख यामुळे आम्ही सारेच प्रभवित झालो. आम्ही सर्वांनी उभे राहून नम्रतापूर्वक त्यांना नमस्कार केला. यथाकाल चर्चा, प्रश्नोत्तरे झाली. त्यांनी आमच्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे रसाळ व ओघवत्या भाषेत दिली. एवढेच नव्हे तर आम्हाला पुस्तकाच्या अनुषंगाने कही प्रश्नही खेळकरपणे विचारले. अपेक्षित उत्तर विद्यार्थी देऊ शकला नाही तर ते म्हणत, "बाळ, अभ्यास अजून कसून करायल हवा बरे!" शाळेतल्या विद्यार्थ्यांप्रमाणे हात उंचावून उत्तरे देण्याचा अनुभव आम्ही तेव्हा मजेत घेतला. सारे अकृत्रिम, खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. आम्ही पुष्पहार घालून त्यांचा यथोचित सत्कारही केला. आजही तो तास कितीतरी वेळा मनात रुंजी घालतो तो तात्यासाहेबांच्या पितृतुल्य वात्सल्याने!

परीक्षा पार पडल्यानंतर ‘फर्ग्युसन’ महाविद्यालयत मी अध्यापनाचे काम करू लागले.एक दिवस गंमतच झाली. तात्यासाहेब त्यांच्या अंगणातल्या व्हरांड्यात धोतर गुडघ्यापर्यंत ओढून घेऊन सदराबिदरा काही न घालता वारा खात बसले होते. ऑक्टोबर महिना सुरू झाला होता. मी त्यांच्या घरासमोरून निघाल्यावर मल मोठ्याने हाक मारून ते म्हणाले, "अहो तर्खडकर, (हे एका पारितोषिकाचे नाव) आमच्या ‘ज्ञानेश्वरी-सर्वस्व’ पुस्तकावर तुम्ही काही लिहाना, तुमच्या मासिकाला!’ त्यांच्या बोलण्याने माझा जीव मुंगीएवढा झाला. त्यांना विनयपूर्वक नमस्कार करून मी म्हटले, "सहित्यसम्राटांच्या पुस्तकावर मी बापडी काय लिहिणार?" तिकडे दुर्लक्ष करून ते प्रेमळपणे म्हणाले, "नाही लिहाच. जरूर लिहा." नव्या तरूण रक्ताच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची त्यांची ही उदारवृत्ती मला फार आदरणीय वाटली.

हा प्रसंग घडून चारदोन दिवसच झाले असतील नसतील एवढ्यातच त्यांच्या अतीव दुःखद निधनाची बातमी त्यांच्या छायाचित्रासह वर्तमानपत्रात पाहायला मिळाली. त्या बातमीवर पळभर माझा विश्वासच बसेना! बातमीवरून त्यांनी झोपेतच या जगाचा निरोप घेतल्याचे कळले. पण मृत्यूपूर्वी थोडावेळ आधी त्यांनी जी कविता लिहून ठेवली होती ती अपूर्व आणि चिरस्मरणीयच! तीत त्यांनी म्हटले होते, "दिसो लागे मृत्यु परि न भिववू तो मज शके। तयाच्या भेटीचे असत मजला ज्ञानचि निके। प्रवेशे राती जो धरुनिच शतघ्नी निजकरी। न भी वाघाला परि परि हसुनचि सुस्वागत करी। मला जन्म येता तानुभरणकार्या कणकण । दिले पाचाभूती परत करणे ते निजऋण। तदाधारे सौख्ये सतत जगलो ते मज पुरे। तनुत्यागाऎसा, इतर अनृणा मार्गचि नुरे।" ती कविता वाचताना तात्यासाहेबांच्या अलौकिक धैर्याचं, मृत्यूचे स्वागत करणार्‍या स्थितप्रज्ञ जीवनदृष्टीचे एक आगळेच भारावून टाकणारे दर्शन मला घडले. लहानपणापासून साहित्यनिर्मितीचा त्यांनी हाती घेतलेला वसा मरणकाळीही खाली ठेवला नाही. असे मृत्युंजय, समतोल चित्ताचे, नियतीबद्दल कृतज्ञ राहणारे साहित्यसम्राट जगाच्या वाङ्‌मयात किती सापडतील? या विचाराने मी पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांच्या छायाचित्रास वंदन केले.     

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color