स्वागतकक्ष arrow मराठी पुस्तके arrow मधुघट arrow एका अपूर्व सुगंधाची माती
एका अपूर्व सुगंधाची माती
लेख़क Administrator   
 

एका अपूर्व सुगंधाची माती
माझ्या मनात फार वर्षे घर करून राहिलेली एक उत्कट इछा काही दिवसांपूर्वी अनपेक्षितपणे पुरी झाली! ती अंशतःच! पण तरीही मला त्याचा खूप आनंद वाटला. ती इच्छा ‘अंदमान’ बेटाशी संबंधित होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक मी पहिल्यांदा वाचले त्याला पन्नासहून अधिक वर्षे होऊन गेली. पण ते वाचल्यापासून ज्या कारागृहात त्यांनी आणि अनेक थोर, क्रांतिकारक देशभक्तांनी अपरंपार हाल अपेष्टा सोसत आपल्या आयुष्याची बहुमोल वर्षे घालवली ते कारागृह आणि त्याच्या अवतीभवतीचा परिसर एकदा तरी आपण पहावा असे मला वाटे. तिथे जाऊन तिथे राहिलेल्या ‘त्या सच्चा’ देशभक्तांच्या स्मृती जागवाव्यात, त्यांच्या स्मृतिस्थळाला वंदन करावे असे माझ्या वरचेवर मनात येई! तो योग कधी येतो कोण जाणे! पण सुमारे महिन्यापूर्वी एका वेगळ्याच रीतीने ती माझी इच्छा पुरी झाली.

झाले काय तर आमच्या सांगलीतले एक प्रसिद्ध व्यापारी, कळकळीचे लेखक आणि माझे स्नेही श्री. अशोक तेलंग अंदमानहून नुकतेच परत आल्याचे मला कळले. ग्राहक पंचायतीची शाखा तिथे सुरू करण्यासाठी ते तिकडे गेले होते. ‘दादरा-नगर-हवेली मुक्तिसंग्राम समितीतर्फे’ त्या कार्यक्रमाचे संयोजन केले होते. त्यांच्या दुकानात मी गेलेली असताना त्यांची भेट झाली तेव्हा अंदमानच्या रोमहर्षक सफरीचा आणि तिथल्या कामाचा सगळा वृत्तांत त्यांनी मला सांगितला. नंतर आपल्या टेबलाचा खण उघडून त्यांनी एक अतिशय सुंदर असा रंगीबेरंगी शोभिवंत खडे शिंपले बसवलेला-लहानसा करंडक माझ्या हातात दिला. आणि ते मला म्हणाले, "मालतीबाई, उघडून बघा ना आत काय आहे ते!" मी तो उत्सुकतेने उघडला. बघते तर त्यात होती दोन चिमटी माती! क्षणभरात माझ्या लक्षात आले की ती माती अंदमानातल्या ‘सेल्यूलर जेल’मधली आहे! तिचा स्पर्श होताच माझे मन भावनावेगाने उचंबळून आले आणि पट्‌दिशी मी त्या करंडकाला हात जोडून नमस्कार केला. त्यातली माती कपाळाला लावली. त्यावेळी लोकमान्य टिळकांच्या जीवनातल्या एका प्रसंगाचे मला स्मरण झाले. एकदा ते समुद्रस्नान आटोपून परत येत होते. त्यांच्या अंगावरच्या ओल्या कपड्यांनी स्वाभाविकच रस्त्यावरची माती भिजली. लोकमान्यांच्या पाठीमागून येणार्‍या लोकांनी मोठ्या भक्तिभावाने ती माती गंधाप्रमाणे आपल्या कपाळी लावली!

माझ्या हातातल्या करंडकातली माती पाहताच माझ्या मनात आले. आपण आजवर अनेक ठिकाणची, अनेक रंगाची गंधाची माती पाहिली. बागेतली, नदीकाठची, पठारावरची, खेळाच्या मैदानावरची, लाल, काळी, पांढुरकी, खनिजमिश्रित म्हणून उग्र गंधाची, वळवाच्या पहिल्या पावसाने विलक्षण सुगंधित झालेली आणि अशीच कितीतरी प्रकारची! पण आत्ता जिचा स्पर्श मी अनुभवला ‘ती’ माती आणि ‘तिचा’ गंध केवळ अ-पूर्वच म्हणायला हवा!

मोगरा, जाई-जुई, प्राजक्त, निशिगंध अशा मला खूप खूप आवडणार्‍या सार्‍या फुलांचा सुगंध या मातीच्या सुगंधापुढे काहीच नव्हे. चंदन-केशर-कस्तुरी, वाळा, हिना किंवा अनेक उंची अत्तरे त्यांचाही सुगंध त्या मातीपुढे फिक्का-मंद ठरतो. या मातीचा गंध अवर्णनीय आहे. तो गंध आहे देशासाठी हसत हसत प्राणार्पण करणार्‍या जाज्वल्य देशभक्तांच्या त्यागाचा! त्यांच्या उदात्त, निष्कलंक चारित्र्याचा! त्यांच्या अतुलनीय निर्भयतेचा! त्यांच्या अजरामर श्रद्धेचा, त्यांच्या वंद्य ध्येयवादाचा! ज्यांनी चार मीटर लांब आणि दोन मीटर रुंद अशा भिकारड्या कोठडीत आयुष्याची मौल्यवान वर्षे मरणयातना भोगत काढली, ज्यांना त्या करंट्या कोठडीत राहून कधी छाती भरून श्वास घेता आला नाही की कधी चंद्राची कोर दिसली नाही. कदन्नाहून कदन्न खात अपार, अनंत यातना ज्यांनी भोगल्या, आपले जिवलग कुटुंबीय, आप्तस्वकीय यांच्यापासून दूर वर्षानुवर्षे जे एकाकीपणे जगत राहिले, इंग्रजांची नोकरी लाळघोटेपणाने करणार्‍या ‘बारी’ या आयरिश जेलरने पदोपदी केलेल्या छळानेही जे डगमगले नाहीत, ज्यांच्या अंतःकरणात तेवणारी लखलखीत देशप्रेमाची ज्योत कधी विझली तर नाहीच उलट "जे दिव्य दाहक म्हणोनि असावयाचे, बुद्ध्याची वाण करी हे धरिले सतीचे" अशी ज्यांची अभंग, ओजस्वी प्रतिज्ञा होती, "तुजसाठी मरण ते जनन। तुजवीण जनन ते मरण" ही ज्यांची जगण्याची बैठक होती अशा चिरंजीव, कर्तव्यकठोर ध्येयवाद्यांच्या, धीरोदात्त, प्रेरक वर्तनाचा मन भरून आणि भारून टाकणारा एक अद्‌भुत सुगंध त्या मातीला येत होता. फुलांचा गंध कालांतराने उणावतो, ती सुकून जातात. अत्तराचा रंग-गंध उडून जातो, पण अलौकिक धैर्याने क्रांतीचा जयजयकार करीत, रात्रीच्या गर्भात उद्याचा उषःकाल आहे अशा ठाम विश्वासाने पावले टाकणार्‍या, पराक्रमी योद्ध्यांच्या आत्म्यांचा सुगंध हा कधी कधीच सुकणारा नसतो. त्या सुगंधाला जरा नाही नि मरणही नसते.

त्या मातीकडे पाहताना मला क्षणभर वाटले, ही माती नाही तर हे देशभक्तांच्या मुशीत ओतलेले शंभर नंबरी सुवर्ण आहे! या मातीला वाचा असती तर ती मला म्हणाली असती, "बाई गं, वाघसिंहाच्या छातीचे असे सावरकर बंधू, उल्हासकर दत्त, वहिंद्रकुमार घोष, उपेंद्रनाथ बॅनर्जी ही आणि असेच कितीतरी तरूण मी इथे पाहिले. ‘स्वातंत्र्ययज्ञात’ त्यांनी टाकलेल्या कितीतरी समिधा पाहिल्या, अजस्र भिंतीत कोंडून राहायला त्यांचा आत्मा गुलाम थोडाच होता? त्यांच्या शौर्याने माझे मन जसे भरून येई तसेच त्यांच्या हाल अपेष्टा पाहताना दुःखातिरेकाने ते आतल्याआत आक्रोशही करी! भारतभूमीरूप अथांग सागरातून निघलेल्या ह्या अमोल रत्नांची चरणधुली होण्याचे भाग्य मला लाभले! मी किती किती नशिबवान बघ! पण बाळा, आजची भारताची दुर्दैवी, भ्रष्ट, बहुमोल नैतिक मूल्यांचा पूर्ण विसर पडलेली स्थिती पाहून मात्र माझ्या मनात पुन्हा पुन्हा येते देशभक्तीचा अंगार प्यायलेल्या अंदमानातल्या ‘त्या’ देशभक्तांच्या आत्म्यांना हे सारे पाहून, स्वातंत्र्याची विटंबना पाहून किती विलक्षण यातना होत असतील."                       

अंदमानच्या मातीचे हे बोलणे ऎकत मी खाली मान घालून उभी राहते. कारण तिला द्यायला मजजवळ उत्तर आहेच कुठे?                 


 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color