स्वागतकक्ष arrow मराठी पुस्तके arrow मधुघट arrow गोष्टी सांगेन गमतीच्या चार
गोष्टी सांगेन गमतीच्या चार
लेख़क Administrator   
 

गोष्टी सांगेन गमतीच्या चार

पहिल्या गोष्टीची जागा - पुण्यापासून पाच मैलावर असलेली आमची ‘हिंगण्याची’ शाळा. त्या परिसराला आता ‘कर्वेनगर’ म्हणतात. काळ सुमारे पन्नास वर्षापूर्वीचा. गणपती उत्सवामध्ये करमणुकीचे कार्यक्रम सभागृहत चालू आहेत. अंदाजे आठ वर्षाची मराठी दुसरीत शिकत असलेली एक मुलगी स्टेजवर येते. घोट्याइतके वर घेतलेले, खूप बोंगा झालेले, हिरवे, लालभडक टोपपदराचे लुगडे ती नेसलेली आहे. अंगात पिवळ्या रंगाची धारवाडी खणाची चोळी, हातात काचेच्या काळ्या पारव्या बांगड्या, पायात जोडवी, गळ्यात दोर्‍यातच ओवलेले काळ्या मण्याचे मंगळसूत्र,  कपाळावर रुपयाएवढे ऎसपैस ठसठशीत कुंकू आणि मानेपासून वर घट्ट खोपा घातलेला. हातात जवळजवळ तिच्याच उंचीचे मुसळ. चेहरा रागाने नुसता लाल झालेला. हा असा अवतार रंगभूमीवर येताच लाह्या फुटाव्या तसे शब्द तिच्या मुखातून येतात, "कोण मेलं ते माझ्या नवर्‍याला नावं ठेवतंय?  घालू का हे मुसळ टाळक्यात?  नावाची ‘जिजाई’ आहे म्हटलं ऽ ऽ -"

संतश्रेष्ठ ‘तुकाराम महाराजांचे’ हे ’अर्धांग’ पाहताच प्रेक्षकात हशा आणि टाळ्या यांची एकच धमाल उडते. त्यात शाळेतला - प्राथमिक शाळेतला - बालचमू समोरच्या बाजूस बसलेला. त्यात काहीजणी ‘जिजाई’ कडे बोटे दाखवून म्हणताहेत, "अय्या, अगं बघ, बघतरी! ही आपली ‘माली’ नाही का? ‘किल्ली’ गं!" (‘किर्लोस्कर’चे हे सोईने केलेले अपभ्रष्ट आणि संक्षिप्त रूप!) "ओळखायला येते आहे का? पहा ना! " आणि मग आपली चिमुरडी बोटे तोंडाला लावून (त्यातल्या काहींचे नुकतेच दात पडलेले) फिस्‌ फिस्‌ हसणे. भाषण संपवून ठसक्यात ‘जिजाई’ परतली. पुनः एकदा हशा, टाळ्यांचा कडाका!

या प्रवेशानंतर दहा पंधरा मिनिटात दुसरा एक करमणुकीचा कार्यक्रम (बहुधा नकलांचा) होतो. आणि तो संपल्यावर मखमली पडदा पुन्हा एकदा वर उचलला जातो. प्रेक्षकांकडे तोंड करून एक सम्राट सिंहासनावर बसला आहे. त्याचा चेहरा रंग लावून बराच गोरा केला आहे., डोक्याला निळा रेशमी भरजरी मंदील आणि अंगात जरीचे बुट्टेबुट्टे असलेला अंजिरी प्रशस्त, अघळपघळ अंगरखा आहे. पिवळ्या रेशमी कापडाची सुळसुळ करणारी, चकाकणारी सुरवार आणि पायात भरजरी चढाव दिसताहेत. गळ्यात टपोर्‍या मोत्यांचा कंठा. त्यात मध्यभागी हिरव्यागार, मोठ्या गोटीएवढा, खडा आहे, कानामध्ये सोन्यामोत्याचे डूल हालताहेत, पाची बोटातल्या (खर्‍या की खोट्या कोण जाणे?)  अंगठ्या आणि मनगटात पोची दिसते आहे, कमरपट्टा चांगला रुंद, रत्नखचित व झगमगणारा, त्यात म्यानात तलवार अडकवलेली (धार आहे ना? की - - ) हनुवटीवर दाढी, ओठावर मिशा, कपाळावर गंधाचा तिलक असा हा सगळा साज आहे. बाजूला उभे असलेले हुजरे त्याच्या अंगावर चवर्‍या ढाळीत आहेत. संथपणे पण तालबद्ध रीतीने. अवतीभवती पाचसात सरदार मानकरी मंडळी उंची पोषाख आणि वस्त्रालंकार घालून अदबीने पण आपापल्या मानानुसार तसेच हुद्यावर उभी आहेत. सम्राट बोलू लागतो. (भाषणाच्या प्रारंभी तो सिंहासनावर बसलेलाच आहे.) "मानकरी सरदर मंडळी हो, शत्रू तर आपल्या राज्याच्या सीमेलगत येऊन उभा राहिला आहे. तुम्हा आम्हा, सर्वांच्या जीवनमरणाचा हा प्रश्न आहे. यावेळी एक दिलाने, एक मनाने, राज्याच्या रक्षणासाठी तुम्ही उभे राहणार ना? शत्रूचा निःपात करणार ना? बोलण्याच्या आवेशात राजा सिंहासनावरून खाली उतरतो, अस्वस्थ मनाने एक दोन येरझारा घालतो, स्टेजवरील प्रकाशात त्याची वस्त्रे, अलंकार, अंगरख्याची बटणे चकाकू लागतात - हातवारे करीत तो पुन्हा म्हणतो, "स्वातंत्र्य ते स्वातंत्र्य! त्याचे मोल कशात करता येईल? पारतंत्र्य म्हणजे मरण. गुलामगिरी म्हणजे सर्वनाश - -"त्याचा आवाज उंचावू लागतो, आवेश वाढू लागतो, प्रेक्षागारातील सर्व बाल-गण श्वास अवरोधून कान देऊन ऎकू लागतो - सम्राट डाव्या बाजूला झोकात मान वळवतो आऽ ऽ णि - - ! काय सांगावे काय घडते म्हणून? अहो, सम्राटाच्या डोक्यावरचा रेशमी मंदिल एकदम घरंगळून स्टेजवर खाली पडतो, आणि आत असलेला राजाच्या केसांचा गुळगुळीत घट्ट खोपा(?) सगळ्यांना दिसू लागतो. मानेच्या हिसक्याने चिकटवलेल्या मिशा वेड्यवाकड्या होतात  - आणि हास्याचा प्रचंड धबधबा ‘सम्राटाच्या’ कानावर येतो, त्यात केलेला आरडाओरडाही ऎकू येतो. "सम्राटाचा खोऽपा बघा सम्राटाचा खोपा! अगबाई, ही मघाशी ‘जिजाई’ झाली होती ना, तीच. नाहीतर राजा कधी खोपा घालील काय?" टाळ्यांचा गजर ऎकताच आठ वर्षाचा ‘सम्राट’ कावराबावरा नि रडवेला होत विंगकडे पाहू लागतो. कार्यक्रमाच्या संयोजिका ‘बाई’ पडदा खाली टाकतात अणि शूर राजा रडतरडत खोपा सांभाळीत पळून जातो! !

पुण्याच्या नूतन मराठी शाळेत एका मोठ्या सभागृहात शेकडो विद्यार्थी विद्यर्थिनी गर्दी करून बसली आहेत. आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धांचा बक्षिस समारंभ तिथे व्हायचा आहे. अनेक शाळातील मुलेमुली आणि त्यांचे रंगीबेरंगी पोषाख पाहताच पुष्कळ इंद्रधनुष्ये एकाचवेळी पाहिल्याचा आनंद होतोय - बक्षिस पटकावलेली मंडळी जरा पुढच्या रांगात ऎटीने बसली आहेत. शाळेचे अत्यंत लोकप्रिय कर्तबगार मुख्याध्यापक श्री. नारळकर पाहुण्यांना घेऊन येताना लांबून दिसत आहेत. सर्वांच्या नजरा दरवाजाकडे लागल्या आहेत. विद्यार्थीजनाची आपापसात हलक्या आवाजात कुजबूज चालली आहे. नारळकरांच्या भव्य उंच मूर्तिलगतच डोक्यावर लालचुटूक रंगाची पगडी, धोतर-सदरा-त्यावर कोट आणि पायात जाड वाहणा असलेली गोरीपान, देखणी, अणकुचिदार नाकाची एक व्यक्ती चालते आहे. तिच्या डाव्या उजव्या हाताला कमी जास्ती प्रमाणात तशाच पद्धतीचा पोषाख करून आणखी काही थोर मंडळी येत आहेत. समारंभाच्या आलेल्या इतर पाहुणे मंडळींचे डोळे स्टेजवरच्या या सन्माननीय अतिथीकडे लागले आहेत. ते आपापल्या खुर्च्यांवर बसतात. नारळकर सर डाव्या बाजूस दृष्टिक्षेप करतात. ठरलेल्या मिनिटाला कार्यक्रम सुरू होतो. पेटीवर स्वागतगीत वाजू लागते - विद्यार्थी गाऊ लागतात "करू या ऽ स्वागता ऽ ऽ बुधजन." समोरच्या रांगेत झग्या परकरातल्या कन्या बसल्या आहेत. त्यातली एक दुसरीला खुणांनी विचारते. "आपल्याला बक्षिस देणारे गृहस्थ कोणते गं?"  पहिलीला नक्कल करण्याची हुक्की नेमकी त्याच वेळी कशी येते कोण जाणे? ती आपले ओठ पुढे काढून तोंडात काहीतरी चावून खात असल्यासारखा अभिनय करून सांगते,  "असं करताहेत ना ते! तेच बक्षिस देणारे - " पाहुण्यांनी तेव्हा नुकतेच दात काढले असावेत. तोंडात लवंग धरली असावी आणि ती ते चघळत असावेत. पहिलीने दुसरीला पाहुण्यांची नक्कल करून तोंड वेडेवाकडे करून दाखवायला आणि अध्यक्षांनी तिच्याकडे पहायला एकच गाठ पडली. बक्षिसवाली नक्कलकार एकदम गोंधळली. तिने खाली मान घातली. समारंभ सुरू झला. बक्षिसांची नावे पुकारली जाऊ लागली. "महिलाश्रम हायस्कूल, हिंगणे, येथील कुमारी - - हिने नेमलेल्या विषयावरील भाषणात बक्षिस मिळविले." आपले नाव ऎकताच श्रीखंडी रंगाचा आपला झगा आणि वेण्यांच्या रिबिनी नीट आहेत ना,  हे बघत बघत ती स्टेजवर निघाली, अध्यक्षांच्या हातून पुस्तकांचा गठ्ठा व बुलबुलतरंग हातात घेण्यासाठी वर मान करून पाहते तो ते, आपले पुन्हा ओठ पुढे करून त्याची तालबद्ध हालचाल करताहेत. तिला वाटलं, मघाशी आपण त्यांची नक्कल केली ना म्हणून आता ते आपल्याला चेष्टा करून चिडवताहेत, त्या कल्पनेने ती गेली गांगरुन. हातातली पुस्तके इंग्रजी पहिलीतल्या ह्या छोटीला नीट सावरता येईनात,  त्यातली काही स्टेजवर धबाधबा पडली. छोटी फार वरमली. पाहुणे म्हणाले, "असू दे, असू दे, बाळ." आणि खाली वाकून तिला ते पुस्तके गोळा करयला मदत करू लागले. ती वळली तशी त्यांनी पाठीवर शाबासकी दिली.

बैलाच्या छकड्यात बसून कन्यका हिंगण्याला परतल्या कारण बस वगैरे काही वाहनच त्यावेळी नव्हते. सोबत असलेल्या शिक्षिका काहीशा नाराजीनेच विचारू लागल्या, "सभेत भाषण करायला भ्यायली नाहीस तू आणि बक्षिसे घेताना किती घाबरटपणा केलास गं! वेंधळी कुठली!" पण बाईंना ती काय सांगणार?  अध्यक्षांनी मला नक्कल करताना पकडून नकलेनेच उत्तर दिले म्हणून, म्हणून मी घाबरले.

तुकारामाची ‘जिजाई’ झाली होती ना? तीच ही वेंधळी मुलगी, इंग्रजी पहिलीत असताना झालेली, ही तिची मजेदार फजिती. एम्‌. ए.च्या परीक्षेला त्याच पाहुण्यांचे एक पुस्तक अभ्यासाला लावले होते. त्यावेळी काही तास त्यांनी मुद्दाम कॉलेजात येऊन घेतले होते. पहिले दिवशी ते तासावर आले तेव्हा या ‘जिजाई’ला १०/१२ वर्षापूर्वीचा प्रसंग आठवून अनावर हसू कोसळले. ओळखलेत पाहुणे कोण होते? प्रसिद्ध साहित्यसम्राट न. चिं. उर्फ तात्यासाहेब केळकर!

पुण्याच्या विद्यार्थिनींच्या एस्‌.एन्‌.डी.टी. कॉलेजमधून नोकरी संपवून हीच आपली नायिका ‘जिजाई’ फर्ग्युसन्‌ कॉलेजात प्राध्यापिका म्हणून जाणार होती. तिच्या विद्यार्थिनीच्या कानावर ती कुणकुण गेली. त्यांनी आपल्या ‘बाईंना’ थाटाचा निरोप द्यायचा बेत आखला. ‘बाई’ नको नको म्हणतात तरी ऎकताय कोण?  कॉलेजच्या प्राचार्यबाई अध्यक्ष होत्या. इतर सहकारी उपचार म्हणून हजर होते. त्यावेळी विद्यार्थिनींची संख्या असे सगळे वर्ग मिळून अंदाजे तीनशे! त्यातल्या बर्‍याच मुली कार्यक्रमाला हजर. ‘बाईं’साठी हार-तुरे-नारळ-कापड सगळे अगदी सज्ज होते! निरोपादाखल पहिल्या वर्षातली विद्यार्थिनी बोलू लागली. बाईंना कल्पनाही नसलेले गुण त्याणा चिकटवून झाले. आणि मग ती म्हणाली, - किनर्‍या अनुनासिक आवाजात- "आमच्या बाई किनई आम्हाला कित्ती कित्ती आवडतात. त्या खूप भरभर बोलतात ना म्हणून आम्ही त्यांना प्रेमाने ‘डेक्कन क्वीन’ असे म्हणत असू." बाईंचा चेहरा तिने दिलेली - (फार प्रेमाने व मनापासून दिलेली) - पदवी ऎकताच पाहण्यासारखा झाला. ती खाली बसली. दुसरीचा उत्साह ओसंडू लागला, "खरं म्हटलं तर आमच्याच वर्गावर बाईंचं सर्वात जास्त प्रेम होतं. आम्ही तर बाईंना प्रेमाने ‘मुलुख मैदान तोफ’ म्हणत होतो. तुम्हीच सांगा, इंग्रजांच्या काळात आलेली डेक्कन क्वीन श्रेष्ठ की, ऎतिहासिक काळातील मुलुख मैदान श्रेष्ठ?" या प्रेमाच्या वर्षावाने त्या ‘जिजाई’चा कोंडमारा होऊ लागला. भोवतीचे सहकारी व विद्यार्थिनी गालातल्य़ा गालात हसताहेत हे वर किंवा बाजूला न पाहताही तिला जाणवत होते. पण करते काय?  सत्कारमूर्ति करून बसवले होते ना तिला? प्रा. ‘जिजाबाई’ उभ्या राहिल्या - त्यांनी आपले भाषण पाचदहा मिनिटातच आणि पंचवीस एक वाक्यातच संपविले. त्यांना भीती वाटत होती तेवढ्यात कोणी ‘पंजाब मेल’ नाहीतर तशीच आणखी काही पदवी आपल्याला दिली तर काय करा? विद्यार्थिनींनी प्रेमाने दिलेली भेट स्वीकारताना त्या त्या देवाला प्रार्थना करीत होत्या. "Oh God! Please save me from my students."

याच प्रा. ’जिजाईची शेवटची गोष्ट वरच्या तिन्हींनाही मागे टाकणारी आहे. या प्राध्यापिकेचे गुरुजी, प्रा. रा. श्री. जोग हे मान्यवर समीक्षक व विद्वान म्हणून प्रसिद्ध होते. ते या प्राध्यापिका बाईंचे पुण्यातले स्थानिक पालक होते. ती त्यांना ‘दादा’ म्हणून हाक मारी. त्यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूरचे साहित्य संमेलन व्हायचे होते. ‘दादा’ आदल्याच दिवशी तिकडे रवाना झाले होते. त्यांच्या पत्नी सौ. ज्योत्स्नाबाई व प्रा. जिजाई दोघी दुसर्‍या दिवशी मिळून जाणार होत्या. संध्याकाळी पाच साडेपाचला मद्रास एक्सप्रेसमध्ये बसले की रात्री ११ ला सोलापूर! त्यासाठी दोघी पुणे स्टेशनवर आल्या. एक नंबरच्याच प्लॅटफॉर्मवर गाडी उभी होती त्यात येऊन बसल्या. प्रा. जिजाई उल्हासाने ज्योत्स्नाताईला म्हणाली, "कोण गर्दी असते या गाडीला एरवी! नशिबचं म्हणायचं आज एवढी छान जागा मिळाली म्हणजे! तीही हसली. सामानसुमान फारसे नव्हतेच. पाच सात मिनिटे इकडे तिकडे गेली. गाडीने शिट्टी दिली आणि ती ‘सोलापूर’ ऎवजी निघाली ‘मुंबई’च्या दिशेला. ज्योत्स्नाताई काही बोलणार इतक्यात प्राध्यापिकाबाई म्हाणाल्या, "शंटिंग चाललंय वाटतं! तेवढ्यात गाडीने वेग घेतला. शिवाजीनगर मागे पडले. गाडी धावतच होती. ‘काय करावे बाई आता’ म्हणत दोघी डब्याबाहेर डोकावतात तो खरीखुरी मद्रास एक्सप्रेस धाडधाड करीत मुंबईकडून येऊन त्यांच्या समोरून पुण्याकडे गेली-- अस्सं, म्हणजे यांची ही गाडी मुंबईलाच जाणार होती तर! आपण भलत्याच गाडीत बसलो हे लक्षात येताच त्यांच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. त्यांच्या हातात तिकिटे सोलापूरची आणि त्या बसल्या मुंबईच्या गाडीत. तेवढ्यात भेटली एक पॅसेंजर गाईड. हिचे काम असते प्रवाशांच्या अडचणी दूर करून मार्गदर्शन करणे. ती म्हणाली, "खडकी स्टेशन आता येईल तिथं उतरा. पट्कन्‌ एक रिक्षा करा आणि पळवा स्टेशनच्या दिशेने. तोवर असली मद्रास एक्सप्रेस पुणे स्टेशनात उभी तर मिळेल तुम्हाला - जा सोलापूरला." खडकी येताच त्या दोघींनी अक्षरशः डब्यातून उड्या टाकल्या. समोर तिकिट चेकर उभा होता, तो "तिकिट प्लीज, तिकिट प्लीज" करतोय, पण इथे होते कुणाजवळ खडकीचे तिकिट द्यायला? नि वेळ तरी कुठे होता? त्या ‘सोलापूर’, ‘सोलापूर’ करून त्याच्या हाताला हिसडा मारून रिक्षा गाठायला पळाल्या. चेकर बघतच राहिला ‘आ’ वासून. पळून पळून घामाघूम झालेल्या त्या दोघींनी रिक्षा गाठली, म्हणाल्या रिक्षावाल्याला, "पुणे ठेसन-पुणे ठेसन, मद्रास एक्सप्रेस जल्दी-जल्दी-" तो जरा चमत्कारिक नजरेनेच त्यांच्याकडे पाहू लागला. पण अधिक न विचारता त्यांची मुटकुळी त्याने खर्‍या ‘मद्रास एक्सप्रेस’च्या प्लॅटफॉर्मवर आणून टाकली एकदाची. जिवाच्या आकांताने दोघींनी कुठला तरी एक डबा गाठला. त्यात दोघी बसतात तोवर गाडी हलली सुद्धा-- रात्री ११ वाजता सोलापूरला पोहोचल्यावर दादांनी विचारले, "प्रवास कसा झाला?" त्या दोघी एकदमच म्हणाल्या, "छानच झाला!" अंदरकी बात देव जाने!

या गोष्टीला कितीतरी वर्षे लोटून गेली पण तेव्हापासून सांगलीहून कोल्हापूरला जायचे असले, अवघ्या पंचवीस तीस मैलावर, तरीही ही प्राध्यापिका डब्यातल्या चार जणांना पुन्हा पुन्हा विचारते, "ही गाडी कोल्हापूरलाच जाते ना हो?"  एकदा असाच प्रश्न तिने विचारला तेव्हा दोन मुंडासेवाले डब्यात चढत होते. त्यांना पोहोचवायला एक तरूण मुलगा आला होता. तो म्हणाला, "बाई अडाणी दिसते आहे. संभाळून घ्या वाईच. आणि कोल्हापूर आलं म्हणजे तिला सांगायला इसरू नगा हं."    

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color