बापू दि ग्रेट
लेख़क Administrator   
 

बापू दि ग्रेट

"बराय, बापू. येते हं मी. आमच्या "आमच्या ‘मालती’कडं लक्ष असू दे तुझं. आणि तिच्याबरोबर तूही ये ना सुट्टीत पुण्याला." माझी मैत्रिण नंदिनी बापूला आग्रहाचे आमंत्रण देत होती. माझ्याघरी येणारा पाहुणा आपल्या घरी परत निघाला की तो बापूला असे आमंत्रण देणार हे ठरल्यासारखेच असते. मग तो पाहुणा आठ वर्षाचा छोकरा असो की एखदी प्रौढ विदुषी असो. येणार्‍या माणसाशी याचे तासा-दोन तासातच मेतकूट इतके कसे जमते कोण जाणे!

बापूची व माझी ओळख एका गमतीदार प्रसंगानेच झाली. त्याल आता आठ वर्षे होऊन गेली. सध्याच्या माझ्या जागेत मी तेव्हा नव्यानेच राहायला आले होते. ते दिवस होते ऎन पावसाचे. घरची मोटार घेऊन माझा मोठा भाऊ मला इथे ‘विश्रामबाग’ला पोहोचवायला आला होता. पावसाने सगळीकडे चिखलच चिखल झाला होता. त्यात आमची मोटार बसली घराजवळ रुतून!

समोरच काही फुटावर एक मालगाडीचा जुना डबा होता. त्याच्या दरवाजात सुमारे दहा वर्षाचा एक काळासावळा मोहक मुलगा उभा होता. मोठ्या कुतूहलाने आणि आतुरतेने तो गाडीकडे पाहात होता. माझे लक्ष त्याच्यकडे जाताच आपणहोऊन पुढे येऊन त्याने विचारले, "मी येऊ का तुमच्या मदतीला?"  त्या तसल्या स्थितीतही मला हसू लोटले आणि त्या मुलाचे कौतुकही वाटले. मी म्हटले बरं होईल बाबा आलास तर! त्याबरोबर बरेचसे झोपाळू दिसणारे त्याचे डोळे आनंदाने विस्फारित झाले. त्याच्या डोळ्यांचा रंग खूप लाल आणि काहीसा तपकिरी असा संमिश्र होता. माझ्याकडे पाहून एखाद्या निरागस बालकासारखा तो हसला. आपली मातकट रंगची हाफ पॅंट नि पिवळसर रंगाचा हाफ शर्ट सावरून तो लगबगीने बाहेर आला अणि शेजारच्या मातीच्या बैठ्या चाळीकडे तोंड करून, दोन्ही हात तोंडाजवळ नेऊन, गाल फुगवून, किंचित अनुनासिक स्वरात घोगर्‍या आवाजात त्याने हाक मारली. "अहो बंडोबाऽऽ, जरा इकडे या की बाहेर माझ्या मदतीला. या पाहुण्यांची मोटार अडकली आहे बघा चिखलात." थोड्याच वेळात गाडीची रुतलेली चाके बाहेर निघाली आणि आम्ही सुटकेचा निःश्वास टाकला.  

एक उमदा स्वयंसेवक, शेजारी म्हणून झालेली ही बापूची ओळख उत्तरोत्तर वाढतच गेली. मी इथे राहायला आले आणि थोड्या दिवसांनीच मुंबई-मद्रास अशी कुठे तरी क्रिकेटची मॅच होती. अधून-मधून मी मॅचचा स्कोअर मी रेडिओवर ऎकायची. अशीच एकदा दुपारी रेडिओ लावून बसले होते तर समोरच्या पडद्यामागे कोणीतरी उभे आहे असा भास मला झाला म्हणून उठून पाहते तर तिथे बापू उभा! काय रे हवंय तुला - मी. काही नको आहे. पण मी जरा स्कोअर ऎकायला आलो तर चालेल का? त्याने काहीशा संकोचाने आणि अत्यंत उत्सुकतेने विचारले. ये की खुशाल त्याला परवनगी रे कशाला हवी? मी म्हटले. बापू फक्त माझ्या संमतीचीचीच वाट पहात असावा. कारण त्यानंतर या बालवीराने रेडिओच्या हॉलमध्ये जो मुक्काम ठोकला तो मॅच संपेपर्यंत हालवला नाही. त्या दोन-तीन दिवसात ना याला तहान-भुकेची आठवण ना घरा-शाळेची शुद्ध! बापूचे इंग्रजी किती चांगले विचाराल तर इंग्रजीच्या पेपरात शंभरपैकी बावीस म्हणजे हायेस्ट मार्क! पण टेस्ट मॅचमधले इंग्रजी याला उत्तम कळत असावे कारण डावाच्या रंगती-उतरतीबरोबर याचे अवसान चढेउतरे. मी पलिकडच्या खोलीतच वाचीत पडलेली असायची. तिथे ऎकू यायच्या याच्या कॉमेंटस‌. खेळाच्या कॉमेंटरीपेक्षा बापूच्या कॉमेंटरीनेच अधिक करमणूक व्हायची माझी. या क्रिकेटवीरांवर बापूचे एवढे प्रेम की त्यांच्या जन्मतारखाच काय पण त्यांच्या प्रेमाच्या बर्‍यावाईट भानगडीही ‘रामरक्षे’प्रमाणे याला तोंडपाठ! तर असे हे क्रिकेट म्हणजे ‘फर्स्ट लव्ह!’

याचा दिवस तसा उशीराच सुरू होतो. कारण हा आहे जातिवंत सूर्यवंशी! सकाळी उठून तोंड धुऊन आजीने दिलेला चहाचा कप ढोसून हा एकदा बाहेर पदला की परत केव्हा घरी येईल ते सांगता येणार नाही. ताजे वर्तमानपत्र त्याला केव्हा आणि कुठे वाचायला मिळेल त्यावर पुढचे सारे अवलंबून! त्या वाचनाची याची तल्लफ इतकी अनिवार असते की वर्णनच करणे कठीण! रस्त्यातून जाणारा माणूस ओळखीच असो की नसो त्याच्या हातात वर्तमानपत्र दिसले की हा त्याच्या मागून चालायला लागला म्हणून समजावे. मूळ मालक जे पान वाचीत असतो त्याच्या बाहेरचे पान हा कधी माना वळवून तर कधी पाय उंच करून वाचल्याशिवाय राहणार नाही. आपणहोऊन याला कोणी ते वाचायला दिले तर फारच छान! मग त्या मंडळींची पडतील ती कामे बिन तक्रार, वेळेवर आणि तत्परतेने करणार. कधी कोपर्‍यावरचा दूधवाला याला सांगतो, " बापू शेजारी एवढं दोन मापं दूध घालून ये जरा." तर कधी मंगळागौरीसाठी माहेरी आलेली नवपरिणिता विनंती करते, "थोडी पत्री, दुर्वा नि फुले देशील का रे बापू मला आणून?" "आमच्या विदुलाला जरा मॉंटेसरीत सोडतोस का गावात जाता जाता?" शेजारच्या एखाद्या काकू याला विचारतात. बापू सर्वांना ‘हो’ म्हणतो! मी बाजारात गेले आणि वाण्याने साखर कागदात बांधून दिली किंवा शिंप्याने मुलांच्या वह्यांच्या कागदात माझे कपडे बांधून दिले तर त्याचे कागद सुद्धा मागेपुढे करून रस्त्याने हा वाचीत जातो. अभ्यासाच्या मजकुराशी मात्र याचे विळ्याभोपळ्याएवढे सख्य़!

स्वतःच्या घरातल्या कामाचा याला अतोनात कंटाळा! एक काडी हा बापडा तिथे इकडची तिकडे करीत नाही. याची गादी घालावी आईने, नि कपडे धुवावेत वृद्ध आजीने, असा सारा खाक्या! याच्या सुस्त आळशीपणाचा नि कमालीच्या मंद गतीचाच सार्‍यांनाच त्रास होतो नि रागही येतो. पण एखाद दिवशी सकाळी उठून मी बाहेर पाहते तर तर हा अंगणातले फाटकाजवळचे गवत झपाट्याने कापताना दिसतो. माझ्या आश्चर्याला मग पारावरच उरत नाही. कारण वर्षानुवर्षाचा माझा अनुभव असा की माझे साधे एक काम इज इक्वल टू बापूला पन्नास हाका मारणे.

त्या दिवशी मात्र गवत काढणे संपले की घामाघूम होऊन डाव्या हाताने केसांचा झुपका मागे ढकलीत हा घरात येतो आणि सांगतो, "अंगण आता कसं झकपक झालय पाहा तुम्ही!" त्याला कामाबद्दल शाबासकी देऊन हलक्या आवाजात एखादे गुपित विचारावे तसे मी त्याला विचारले, "काय रे, पण आज सकाळीच उठून ही सद्‌बुद्धी कशी काय झाली?" बराच वेळ उत्तरच मिळत नाही. पुन्हा पुन्हा विचारले की सांगतो, "प्रिन्सिपॉल वैद्यसाहेब नि वहिनी यायच्या आहेत ना उद्या आपल्या घरी, पुण्याहून? त्यांचं स्वागत अशा वाढलेल्या गवतात उभं राहून करायचं का? ते दोघं किती टापटिपीचे! त्यांना कसं आवडेल हे!" तेव्हा बापूच्या अंगण सफाईचे रहस्य मला उलगडते. मी म्हणते, "बराच पक्का आहेस की तू त्यांच्यावर इंप्रेशन मारण्यासाठी चाललाय होय तुझा सगळा खटाटोप! तरीच!"

या दांपत्याप्रमाणे माझ्याकडे येणारी साहित्त्यिक, कवी, कलावंत मंडळीही बापूच्या दृष्टीने ‘अ’ वर्गातली ठरतात. त्यांना पाहण्याभेटण्यासाठी, त्यांचा काव्यशास्त्रविनोद ऎकण्यासाठी हा अगदी टपून बसलेला असतो. कितीतरी दिवस त्याला ‘रणजित देसाईं’ना पाहण्याची इच्छा होती. रणजितभाई माझ्याकडे येऊन गेले तेव्हा हा गेला होता शाळेत म्हणून त्यांची व याची चुकामूक झाली. ते येऊन गेल्याचे कळल्यावर भेट न झाल्याने हा फार नाराज झाला. तावातावाने माझ्याकडे येऊन म्हणाला, तुम्हाला माहीत होतं मला त्यांची पुस्तकं फार अवडतात म्हणून. त्यांना जरा राहाय-जेवायचा का आग्रह केला नाही तुम्ही? म्हणजे नसते का मला ते बघायला मिळाले? छट्‌, चांगला चान्स हुकला. मी त्याला पुन्हा पुन्हा सांगण्याची धडपड करीत होते की "अरे, मी केला आग्रह कितीतरी पण त्यांना सवडच...." पण तो माझे बोलणे पुरते ऎकून घेईल तर ना? पुढे दोन दिवस बापूचा माझ्या घरावर बहिष्कार, नि गाल फुगलेले नि ओठ बंद! !

असा सत्तेने माझ्यावर रुसणारा बापू माझ्याशी कोणी वाकड्या-तिरकसपणे बोलले, वागले किंवा माझ्याविषयी प्रतिकूल बोलले की एकदम गरम होतो. "पुन्हा पाऊल घालायचं नाही हं बाई, आपण त्यांच्या घरात"-  तो निर्धाराने म्हणतो. अन्याय नि खोटेपणा कुणीही केला की बापूला एकदम नामंजूर! परवाच्या लोकसभेत या भावनेपोटीच त्याने जनता पक्षाच्या प्रचराचे सेवेचे काम रात्रंदिवस नि अगदी जीव तोडून केले. महत्वाच्या अधिकारपदस्थांचे प्रचंड पराभव झाल्याचे कळताच, तीन दिवस घरदार विसरून रेडिओत कान घालून बसलेला बापू आनंदाने फुलून गेला. रात्री साडेतीन-चार वाजताच मला उठवून सांगितलेन्‌, "बाई, गाय-वासरू दोन्ही अगदी सपशेल पडली हो पडली!"

दोन-तीन वर्षपूर्वीची ही आठवण आहे. परिक्षेत बापूची खूप विषयांची दांडी उडालेली! त्यामुळे त्याची आई अगदी कातावून गेली. मलाही बापूचा रागच  आला होता. चार कानपिचक्या देऊन मी त्याला म्हटले, "उनाडक्या करीत गावभर उंडारतोस त्यापेक्षा दुष्काळी कामावर का जात नाहीस, कुदळ फावडं घेऊन सांगलवाडीला? चार पैसे तरी मिळतील घरी प्रपंच चालवायला. किती राबावं घरच्या माणसांनी! तुला थोडी तरी जाण त्याची!"

दुसर्‍या दिवशी मला कळले की खरंच गेला हा सगळे साहित्य घेऊन कामाला तिकडे. मी मनात म्हटले, "काही बिघडत नाही जाऊ दे खुशाल. तेरड्याचा रंग तीन दिवस राहील फार तर!" पण माझा अंदाज यावेळी पार कोसळला. सतत दीड महिना अखंडपणे आमचे बापूराव सकाळी न्याहारी करून कामाला जे बाहेर पडायचे ते दिवस मावळता घरी परतायचे दमून भागून!

पण एक दिवस तो घरीच बसलेला दिसला. मी विचारले, काय पंत, आज तुम्ही घरीचसे बसलात? काम संपलं काय दुष्काळी मुलखातलं? की आटला तुमचा उत्साह? माझ्या बोलण्याने तो काहीसा वरमला. उदास मुद्रेने त्याने मला उत्तर दिले. पण तो माझ्यापेक्षा स्वतःशीच बोलत होत जणू! "ते कुठलं संपतंय एवढ्यात? पण ते काम म्हणजे सगळा आनंदच आहे! आमचे हे कॉंग्रेस सरकार फार हुशार नि पैशाचं वाटप करणारे त्यांच्या सवाई हुशार! काय सांगायचं बाई, कामाच्या हजेरीबुकात वाट्टेल ती खोटी नाटी नावं लिहिली आहेत. जनतेचा पैसा नि वाटताहेत हे खिरापतीसारखा कुणालाही. सगळा खोटा कारभार. कामावर येणारी माणसं बराच वेळ आपापसात चकाट्या पिटत बसतात. चिलीम तंबाखूचे बार भरीत झुरके घेत झाडाखाली खुशाल ताणून देतात. आणि खरं सांगू तुम्हाला, खोटेपणानं वागणं, काम न करता पैसा घेणं मला विषासारखं लागतं, बाई."

बापूचा सारा उद्वेग आणि असहायता त्याच्या शब्दातून आणि चेहर्‍यावरून मला जाणवत होती. माझ्या मनात विचार आला, हातातोंडाची कष्टाने मिळवणी करणार्‍या एका सत्शील जैन कुटुंबातले हे चौदापंधरा वर्षाचे पोर पण याच्याजवळ अत्यंत दुर्मिळ असे सचोटीचे, इमानाचे, दानतीचे शंभर नंबरी नाणे आहे - माझे मन एकदम अंतर्मुख झाले. भरल्या गळ्याने मी त्याच्या पाठीवर थाप देऊन म्हटले, "बापूराया, मनानं असाच राहा रे, निर्मळ जन्मभर. देव कधी तुला कशाला कमी करणार नाही!"

एकटीने फिरायला जायला मला फारसे आवडत नाही. मग बापू शाळेतून कधी येतो याची मी वाट बघत राहते. आम्ही फिरायला निघालो की बापूच्या गप्पांना रंग भरत जातो नि लक्षात येते माझ्या की हा म्हणजे चालताबोलता इन्फर्मेशन ब्यूरो आहे. त्या गप्पात पी. डब्ल्यु. डी. खाते कसे कामचुकार आहे, त्याने ठिकठिकाणी रस्ते कसे खोदून ठेवलेत महिनोन्‌महिने. इथपासून ते मटका म्हणजे काय, कॉंग्रेस सरकारने मिरज-सांगली शट्‌ल ट्रेन बंद का केली त्यात त्यांचे काय काय राजकारण आहे, असे अनेक विषय येऊन जातात. त्यांचा घळघळीत तपशील कधीकधी आकडेवारीसह हा मला सुनावतो. राजकीय विषयावर बापूला भलतेच अवसान चढते. कारण तो त्याचा अगदी स्पेशल आवडीचा विषय. त्यावरच्या त्याच्या इंटरप्रिटेशनला मी खास ‘बापू- फॉर्म्युला’ म्हणते.

मध्यंतरी काही दिवस माझ्याबरोबर हा दिसला नाही म्हणताच मंडईतल्या एका माळीणीने मला विचारले, "त्यो तुमचा ल्योक दिसत नाही हल्ली तुमच्यासंगट!" माझ्या मनात आले की तिला खुलासा करावा की "तो माझा मुलगा नव्हे". पण मी तिला नुसतेच म्हटलं, "वरीस झालंय ल्योकाला नोकरी मिळालीय - त्याला टाईम गावत नाही भाजीला यायला आता". 

गोव्याच्या ट्रीपहून परत येताना भाऊसाहेब खांडेकरांना भेटायला मी कोल्हापुरात उतरले. बापूला त्यांनी जवळ बसवून घेऊन मोठ्या मायेने पाठीवरून हात फिरवून त्याची विचारपूस केली. भाऊ निवर्तले त्यावेळी बापू त्या सर्व प्रसंगांच्या आठवणींनी गहिवरला होता -

विश्रामबागेत याला न ओळखणारी माणसे क्वचितच भेटायची. सार्‍या गावाची उसाभर करण्यात चुकून याला वेळ उरलाच तर शेजारच्या लहान पोरांबरोबर झाडाच्या फांदीने क्रिकेट तरी खेळत बसेल नाहीतर शेजारच्या रुक्मिणीची रिबन टेबलाला बांधून ठेवील. कधी रस्त्याने एखादा बॅंड चालला तर तो बघायला हा धावणार किंवा ट्रकमधून जाणार्‍या उसाचे कांडे मोडून खुशाल रस्त्याने खात जाणार! त्याची आई मग चिडते नि म्हणते, "तू कधी मोठा व्हायचास रे?" भुईमुगाच्या शेंगा, पेरू असले माकडखाद्य याला मनापासून प्रिय! माझी नोकर इंदू शेंगा फोडायला बसली की हाही बसणार पण याचे निवडणे किती नि शेंगा खाणे किती ते देवालाच ठाऊक! असे विचारले की म्हणतो, "आज दोन मुठीच शेंगा खाल्ल्या हं फक्त!" भाजीचा हिशोब सांगताना म्हणणार, "बस मिळाली नाही बराच वेळ म्हणून छत्र्यांच्या दुकानात भेळ खाल्ली हं पस्तीस पैशाची. ती आधी लिहा बाई." बाजार असो की बॅंक असो, याचा सर्व हिशोब निर्मळ नि चोख! म्हणूनच घरात काहीही आणले चांगलेचुंगले तर याला सोडून खावेसे वाटत नाही मला. माझ्या घराशी गेली आठदहा वर्षे सेवकापासून सल्लागारापर्यंत नि मित्रापासून मुलापर्यंत अनेक नाती याने आपल्या या अशा वागण्याने जोडली. त्याचे खरे आडनाव आहे लठ्ठे पण ‘मालतीबाईंचा बापू’ या नावानेच इकडे याची प्रसिद्धी जास्त!

तर असा हा आमचा बापू वर्षा दीड वर्षापूर्वी मॅट्रिक झाला. तोही पहिल्या झटक्याला! (तेव्हापासून एस. एस. सी. बोर्डासंबंधी माझी आदराची भावना आशंकेने  घेतली) लवकरच आमच्याच संस्थेच्या एका महाविद्यालयात, तीही वाचनालयात बापूला प्यूनची नोकरीही मिळाली. घरच्या आर्थिक दुरवस्थेने ती त्याला पत्करणेच जरूर होते. वृद्ध आजी, सेवानिवृत्त आईवडील नि दक्षिणेत डॉक्टरीचा कोर्स स्वतःच्या हिमतीवर पुरा करणारा याचा भाऊ - एवढीच याची घरची माणसे. आपल्या मर्यादित मिळकतीत त्या सार्‍यांसाठी याला होईल तेवढे करण्याची याची धडपड असते. कधी म्हातार्‍या आजीचा चष्मा तर कधी दमेकरी आईला औषध. मोठ्या भावाला निर्मत्सर बुद्धीने होईल सवड तेव्हा पैसेही धाडतो. असे कितीतरी -- !

बापूचे खाकी कपडे, तोंडावर आलेल्या भरघोस मिशा इत्यादीमुळे बापू आता या वर्षाभरात खूपच वेगळा दिसू लागलाय. वर्तमानपत्राच्या जोडीला त्याच्या हातात आता प्रणयपर कथा-कादंबर्‍याही दिसू लागल्या आहेत. तोंडात अधून मधून पानाचा विडाही रंगू लागलाय. राजकीय, सामाजिक चळवळीबद्दलचे त्याचे भान नि आकर्षण अधिक तीव्र नि डोळस होऊ लागले आहे. राजकीय सभांना आवर्जून रात्री हजर राहून त्याचा काटेकोर तपशील वक्त्याच्या अभिनयाच्या नकलेसह तो इतरांना दाखवू लागला आहे. पोटाला चिमटा घेऊन एखादे सेव्हिंग्ज सर्टिफिकिट घेण्याची, विमा उतरविण्याची भाषा बोलू लागलाय. हे सारे पाहिले की माझ्या मनात विचार येतो, "हा आता मोठा झाला म्हणायचा!" पण दुसरे मन म्हणते, "याला मोठा म्हणावे तर हा लहान आहे, नि लहान म्हणावे तर मोठा व्हायला लागलाय. नोकरीमुळे याच्या बालकासारख्या निर्व्याज वृत्तीवर किती बघता बघता सावट आले हे!"

हल्ली शेजारीच असूनही त्याची भेट पूर्वीइतकी नियमितपणे होत नाही. परवा बोलता बोलता सहज म्हणाला, "एक्सटर्नली बसून बघितलं कॉलेजच्या पहिल्या वर्षाला दोनदा - ते काय मला जमत नाही. पण बाई, थोड्या वर्षांनी म्युनिसिपालिटीच्या इलेक्शनला मात्र उभा राहणारच हं मी! मग बघा निवडून आल्यावर आपल्या विश्रामबागचा कसा कायापालट करतो ते!"

कोण जाणे दहा बारा वर्षांनी बापू म्युनिसिपल कौंन्सिलर होईलही आणि आपले शब्द तो खरे करून दाखवील. त्याला अशा एखाद्या मानाच्या नि जबाबदारीच्या खुर्चीवर बसलेले बघायला मिळाले तर मला संतोषच वाटेल. पण डोळ्यांनी त्याला असा पाहताना माझे मनःचक्षू मात्र अगदी पहिल्या भेटीतला, "येऊ का बाई मी मदतीला" म्हणणारा, हाफ पॅंट - हाफ शर्टमधला, निखळ झर्‍यासारखे निर्मळ मन असलेला, स्वयंभू स्वयंसेवक बापूच दिसत असेल नि तोच मला अधिक हृद्य वाटेल.  

 
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color