माझे वडील शं. वा. कि.
लेख़क Administrator   
 

माझे वडील शं. वा. कि.

यंदाचे वर्ष ती. शंकरभाऊंच्या जन्मशताब्दीचे आहे. त्यातल्या काही कामासाठी अलिकडेच मी शंकरभाऊंचे कपाट उघडले. तेव्हा एक मजबूत बांधणीची फ़ाईल माझ्या दृष्टीस पडली. कुतूहलाने ती मी चाळू लागले तेव्हा माझ्या लक्षात आले की, शंकरभाऊंना त्यांच्या लेखक-लेखिकांनी दिलेली ती एक हृद्य भेट होती. शंकरभाऊ एक जानेवारी १९५९ साली सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने या सर्व नव्या-जुन्या सुह्रदांनी आपले मनोगत लेख आणि पत्र या रुपांनी कळविले होते. त्यात शंकरभाऊंच्या आठवणी, त्यांच्या संबंधीचे अनुभव, त्यांच्या कामाबद्दलचे अभिप्राय असे बरेच काही होते. या सुहृदवर्गात, पुण्या-मुंबईपासून इंदूर-उज्जैनपर्यंत आणि सांगली-मिरजेपासून अमरावती दिल्लीपर्यंत असलेल्या अनेकांचा समावेश होता. त्यात प्राध्यापक-प्राचार्य होते, डॉक्टर आणि वकीलही होते. कवी-नाटककारांबरोबरच पत्रकार आणि चित्रकारही होते. साहित्यिकांचे ते एक लहानसे संमेलनच वाटले मला.

मासिक काढण्याचा हेतू
१९२० साली ‘किर्लोस्कर’ चा जन्म झाला तो आपल्या नांगर कारखान्याची ‘खबर’ जनतेला कळावी या हेतूने! पण या माध्यमातून आपणाला हजारो माणसांच्या अंतःकरणापर्यंत पोहचता येते व लेखणी ही अनेकप्रसंगी तलवारीपेक्षाही प्रभावी ठरते असा अनुभव येत असल्याने शंकरभाऊंनी त्याच माध्यमाचा विकास व विस्तार केला आणि त्यांची शक्ती समाजप्रबोधनासाठी उपयोगात आणली. समाजप्रबोधनाची प्रेरणा हा त्यांच्या मात्यापित्यांकडून त्यांना मिळालेला वारसा होता. त्यांनी आपल्या एका स्नेह्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, "मासिके चालविण्यात माझा अंतस्थ हेतू समाजाच्या विचारात त्यांनी काहीतरी नवी भर घालावी व नव्या दृष्टिकोनातून आपल्या जीवनातील लहानमोठ्या सर्व गोष्टींकडे पाहावयास शिकवावे हा आहे. शतकानुशतके आपण विचाराचा उपयोग करण्याचे अजिबात सोडून दिल्याने आपली सारी प्रगती खुंटून गेली आहे." त्यांचे हे उद्गार तत्कालीन समाजस्थितीवर पुरेसा प्रकाश टाकणारे आहेत. अंधश्रध्दा, दैववाद, वेडगळ समजुती, अशास्त्रीय दृष्टिकोन, भौतिकशास्त्रांचे अज्ञान या व अशाच अनेक गोष्टींमुळे समाजाची स्थिती दीर्घकाल झोपलेल्या माणसासारखी झाली होती. हा समाज जागृत झाल्याशिवाय डोळस, निर्भय, लढाऊ बनल्याशिवाय त्याचे वैचारिक सामर्थ्य वाढणार नाही हे शंकरभाऊंनी ओळखले होते. म्हणूनच व्यक्तीच्या आणि समाजाच्या विचारसामर्थ्याला आवाहन करण्याचा मार्ग त्यांनी शोधून काढला. तो म्हणजे ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’, ‘मनोहर’ ही मासिके.
या मसिकांविषयी व त्यातून प्रतिपादित केलेल्या विषयांविषयी साहित्यिकांच्या पुढील प्रतिक्रिया त्यांचा पत्रसंग्रह चाळताना वाचावयास मिळाल्या. "समाजाच्या आचारविचारात अभिनंदनीय परिवर्तन घडले", "किर्लोस्कर मंडळींची भूमिका जातीयवादी असती तर त्यांची तिन्ही प्रकाशने, जगाच्या कानाकोपर्‍यातून समाजाच्या सर्व थरांपर्यंत जाऊन पोचलीच नसती!"-(श्री.कळसकर). "मी शंकररावांचे समाजकार्य फुले, आगरकर, कर्वे यांच्या कार्याइतकेच प्रशंसनीय व इष्ट मानतो. स्वातंत्र्यलढ्यापासून सध्याच्या संयुक्त महाराष्ट्राच्या सीमालढ्यापर्यंतची किर्लोस्कर मासिकाची भूमिका पाहिली की, सवंग लोकप्रियतेपेक्षा अक्षय लोकहिताचीच कास किर्लोस्कर मासिकांनी धरलेली दिसून येते."- (दिनकर द. पाटील). हे व असे नामवंत लेखकांचे अभिप्राय म्हणजे शंकरभाऊंना त्यांच्या सत्कार्याची मिळालेली पावतीच म्हणावयास हवी!

नावात काय आहे?
उपरिनिर्दिष्ट कार्य ‘कि-स्त्री-म’ या सर्वांनीच केलेले असले तरी लेखिकांना ’स्त्री’चे कौतुक तोळाभर जास्त वाटत असले तर ते स्वाभाविकच आहे. ’स्त्री’ हे मासिकाचे नाव ऐकून ‘काव्यविहारी गद्रे’ यांनी ’कसले गद्य नाव काढलेत’ असे म्हटले. त्यावर शंकरभाऊ म्हणाले, "नुसत्या नावात काय आहे? मासिकाने चांगले कार्य केले तर त्याचे कोणतेही नाव लोकप्रिय होईल" तसेच पुढे झाले म्हणूनच ना, आनंदीबाई शिर्के म्हणाल्या, "आम्हा...लेखिकांना तर ‘स्त्री’ मासिक आमचे स्वतःचेच मासिक वाटू लागले". स्त्रियांनी सकच्छ नेसावे की विकच्छ येथपासून तर कुटुंब नियोजनापर्यंत अनेक विषय ’स्त्री’ मासिकात येऊन गेले. यात येणारे प्रश्न, त्यांची चर्चा यामुळे स्त्रियांना मार्गदर्शन लाभे, त्यांच्या विचारांना चालना मिळे. संजीवनी मराठे लिहितात, "सुखदुःखाच्या प्रसंगी आईबहिणीसारखी ’स्त्री’ आमच्याजवळ येऊन बसलेली मला माहीत आहे."

साहित्य व ललित कलांचा परामर्श घेणारे ’मनोहर’ मासिक कलाप्रेमी मंडळींना विशेष प्रिय असे. ‘मनोहर’मध्ये दर महिन्याला पद्धतशीरपणे एखाद्या नामांकित कलाकाराचे, साहित्यिकाचे चित्र, चरित्र व चरित्रविषय झालेल्या व्यक्तीचाही लेख, वैशिष्ट्यपूर्ण असा घालण्याची शंकरभाऊंची प्रथा अनेकांना आवडली असे दिसते. ती प्रथा फार यशस्वीरीत्या दीर्घकाल चालली हे खरेच आहे.

विचारवंत काय म्हणतात?
शंकरभाऊंना प्रारंभापासूनच, आपल्या मासिकांचा बहुसंख्य वाचक हा सामान्य व अल्पशिक्षित आहे याचे भान होते. त्याला समजेल, उमजेल, पटेल, शहाणे करील असे साधे व सुबोध लेखन लेखकांनी करावे अशी म्हणूनच त्यांची रास्त अपेक्षा असे. प्रा. वा. ल. कुलकर्णी म्हणूनच म्हणतात, "आपल्या वाचकाला व ग्राहकाला खर्‍याखर्‍या अर्थाने ओळखणारा व आपल्या कार्याने त्याचा संपूर्ण विश्वास संपादू शकणारा शं .वा. किर्लोस्करांसारखा संपादक विरळा." प्रा. दि. के. बेडेकर लिहितात, "लोकांना समजेल, उमजेल... असे लिहा असे ते सांगत म्हणूनच मला ‘किर्लोस्कर’ साठी लिहावेसे वाटले... लोकांसाठी लिहायचे म्हणजे काय, विषय कसे हवेत, मांडणी कशी हवी या सार्‍या गोष्टींचे पाठ मी त्यांच्याकडून घेतले." असा लेखक वर्ग शंकरभाऊंनी सूक्ष्म नजरेने शोधला, मिळविला, टिकवला. आपल्या परिचयात येणार्‍या व्यक्तींची वैशिष्ट्ये अचूक हेरुन आपल्या कार्यात त्या, त्या व्यक्तींची योग्य ठिकाणी योजना करण्यात आणि ‘आपुलकीच्या प्रोत्साहनाने’ त्यांच्याकडून चांगले काम करुन घेण्यात शंकरभाऊंचा हातखंडा होता.

ना. सी. फडके यांचेशी भेट
प्रा. ना.सी. फडके यांच्याशी त्यांची भेट झाली ती १९२७ साली किर्लोस्करवाडीच्या क्रिकेट ग्राऊंडवर, प्रतिस्पर्धी संघातले खेळाडू म्हणून! प्राध्यापकसाहेब त्यावेळी ’रत्नाकर’चे संपादक होते. शंकरभाऊंनी त्यांना आपल्या मासिकास लेखनसाहाय्य करण्याची विनंती केली. तेव्हा ते ‘पाहू’ असे म्हणाले, "पण योगायोग असा की या गोष्टीला वर्ष दीड वर्ष लोटलं नाही तोच मी ’किर्लोस्कर’ मध्ये लिहू लागलो आणि नंतरच्या दहा वर्षात कथा, कादंबर्‍या, लेखमाला, वर्णनं अशा सर्व तर्‍हेचं माझं लेखन मुख्यतः ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’, ‘मनोहर’ या मासिकातूनच प्रसिध्द झालं" असे त्यांनीच सांगितले आहे.

अपरिचितांशी संवाद
वि. स. खांडेकरांनीही आपले विपुल लेखन ‘कि-स्त्री-म’मध्ये केले. आपल्या मासिकासाठी दर्जेदार लेखन सतत मिळविण्यासाठी ते अपरिचित लेखकांशीही आपण होऊन पत्रव्यवहार करीत. आपल्याला कशातर्‍हेचे लेखन हवे याबद्दल सूचना करीत सुस्पष्ट कल्पना देत. डॉ. चंद्रकलाबाई हाटे यांचा व शंकरभाऊंचा परिचय झाला तो अशारीतीने! त्यांचा अन्यत्र प्रसिध्द झालेला लेख वाचून शंकरभाऊंनी त्यांना पत्र लिहिले. त्या म्हणतात, "केवळ शंकररावांच्या उत्तेजनाने माझ्या लेखनास सुरुवात झाली व माझ्या आयुष्यात एक नवीन पान उघडले गेले." विलायतेतून त्यांनी ना. धों. ताम्हनकरांना एका आंग्ल कवयित्रीचा काव्यसंग्रह भेट पाठविला होता आणि त्या धर्तीच्या सोप्या पण स्फूर्तिदायक कविता पाठविण्यास सुचवलं होतं. वि. सी. गुर्जरांना एका फ्रेंच लेखकाने संपादित केलेला लघुकथांचा (अनुवादित) संग्रह स्वदेशातूनच पाठविला होता..

उदयोन्मुखांना प्रोत्साहन
उदयोन्मुख लेखकांकडे त्यांचे बारीक लक्ष असे. त्यांच्या गावी गेल्यावर शंकरभाऊ त्यांना आवर्जून भेटत. प्रसंगी नव्या कल्पना, नवे विषयही सुचवीत. रणजित देसाईंना भेटायला शंकरभाऊ कसे गेले, "मला तुमच्या कथा फार आवडतात" असे त्यांनी म्हटल्यावर आपल्याला किती आनंद झाला याचे रणजित देसाईंनी मोठे रसाळ वर्णन केले आहे. शंकरभाऊंच्या अशा गुणग्राहकवृत्तीमुळे अनेक लेखक पुढे आले. र. व. दिघे यांची एक कथा प्रा. मा. का. देशपांडे यांनी त्यांच्याकडे पाठविल्यावर शंकरभाऊंनी लिहिले, "मराठी साहित्याच्या क्षितिजावर एक तेजस्वी तारा लखलखू लागला आहे हे खास!" डॉ. वि. पां. दांडेकर, द. पां. खांबेटे, मालतीबाई दांडेकर अशा अनेकांनी आपल्या लेखनांचे श्रेय मुख्यत्वे शंकरभाऊंनाच आहे अशी कृतज्ञता व्यक्त केली आहे. डॉ. वि. पां. दांडेकर तर म्हणतात, "काही राजकारणी पुरुष ’किंगमेकर्स’ म्हणून ओळखले जातात तर ‘यशस्वी लेखक निर्माते’ म्हणून शंकरभाऊ ओळखले जातील."

साहित्याची पारख
मासिकाकडे आलेल्या लेखांचे वाचन शंकरभाऊ बारकाईने करीत. नवशिक्या लेखकांचेही लिखाण ते काळजीपूर्वक वाचत. लेखांची निवड कसोशीने ’चोखंदळपणे’ करीत. पत्रव्यवहाराबद्दल ते अतिशय दक्ष असत. लेखांची पसंती-नापसंती उलटटपाली कळविण्याबद्दल त्यांची ख्याती होती. एखादा लेख नापसंत असला तर त्या लेखकाच्या भावना दुखविल्या जाणार नाहीत अशा सौम्य शब्दात पण ‘स्पष्टपणे ते नकार कळवीत.’ त्याबाबत ‘मनाने ते ठाम व खंबीर असत.’ त्यांच्या पत्रलेखनातल्या ‘जिव्हाळ्याने, जिवंतपणाने व निकटत्वाने’ एका लेखकाने त्याला ‘मेवा’ म्हटले आहे. भिन्न भिन्न प्रकृतीचे, विचारांचे लेखक शंकरभाऊ जोडू शकले ते यामुळेच! शंकरभाऊंच्या संपादन कौशल्याला उद्देशून डॉ. सुमतीबाई क्षेत्रमाडे लिहितात, "दूध पारख्याच्या हातच्या ’लॅक्टोमीटर’प्रमाणे... श्री. शंकररावांच्या हाती ‘लिटरोमीटर’ (साहित्याचा कस नि गुणदोष पारखणारे यंत्र) असावा."

मासिकांची लगीनसराई
मासिकांचे ‘दिवाळी अंक’ हे मोठेच काम असायचे. त्यांची छपाई खूपच दिवस आधी सुरु करायला लागायची. मग लेखकांचे लेख वेळेत यावेत म्हणून शंकरभाऊ ताराही करत. अशी एक तार आपण खूप वर्षे जपून ठेवल्याची हकिकत चिं. वि. जोशी यांनी विनोदाने सांगितली आहे. संपादकीय संस्कार केल्यामुळे अनेकदा गंमती होत. ‘यंदाची लग्नसराई’ नावाचा लेख श्री. ज. जोशी यांनी एकदा पाठविला. त्या लेखातली खरी नावे शंकरभाऊंनी बदलून टाकली. श्री. ज. सांगतात, "त्यामुळेच एरवी खूप मार खाण्याचा प्रसंग आपल्यावर आला असता त्यातून मी वाचलो." लेख परत गेल्यामुळे अनेक लेखकांची शंकरभाऊंवर नाराजी होई. श्री. य. ज. आठल्ये यांनी आपली हीच प्रतिक्रिया झाली तिला शंकरभाऊंनी चातुर्याने कसे उत्तर दिले त्याचा वृत्तांत सांगितला आहे.

मासिकांची मुखपृष्ठे
किर्लोस्कर मासिकांच्या मुखपृष्ठावरील चित्रे अभिरुचिसंपन्न अशी असत. बाबूराव पेंटर, प्र. ग. सिरुर, धुरंधर, ग. ना. जाधव अशा नामवंतांनी काढलेली ती चित्रे आजही आकर्षक वाटतात. त्या चित्रांबद्दल प्रा. पारसनीस यांनी म्हटले आहे की, "‘स्त्री’ मासिकावर नाजुक तरुणींची चित्रे घालण्यापेक्षा सशक्त व भरदार स्त्रियांची चित्रे घातल्यामुळे एका पिढीची सौंदर्यदृष्टी बदलली." शंकरभाऊंनी प्रचलित सामाजिक, राजकीय, परिस्थितीवर काढलेली व्यंगचित्रे त्यांच्या ‘आशयसंपन्नते’मुळे अनेकांना फार आवडत. डॉ. रा. चिं. श्रीखंडे यांनी एका व्यंगचित्राबद्दल तपशीलाने लिहिले आहे. झाले काय तर त्यांची ‘नवनीतीवाद्यांस इषारा’ या नावाची एक कविता ‘केसरी’त प्रसिध्द झाली. किर्लोस्कर मासिकातून प्रकट होणार्‍या नवमतांवर तिचा रोख होता हे उघडच होते. त्या कवितेत "व्यभिचारांते शिकविती। झुकविती कवणास हे स्वलेखांनी? ते ‘हायहाय’ म्हणतील करता त्यांच्याच लेकीलेकांनी!!" अशा ओळी होत्या. त्यातल्या ध्वन्यर्थ ओळखून पुढच्याच ‘किर्लोस्कर’च्या अंकात ‘रुग्णाईत, जवळजवळ मुमूर्षू’ असा ‘महाराष्ट्र पुरुष’ शंकरभाऊंनी काढला होता. त्यात एक वैद्य, जाडासा चष्मेवाला, धोतर कोटटोपीतला वाटीत काही चाटण रोग्यासाठी देऊ पाहणारा चित्रित केलेला होता व स्वतः श्री. शंकररावांसारखा दिसणारा, उंच, सुटाबुटातला, स्टेथॉस्कोपसहित, कोणी डॉक्टर पिचकारीने इंजेक्शन देत आहे असेही चित्र काढलेले होते...पाश्चात्य नवनीतीनेच महाराष्ट्राला उन्नती आरोग्य लाभेल. ‘श्रीखंडाचे चाटण’ मुळीच उपयोगी पडणार नाही असा सर्व चित्रध्वनी होता. "मला हे चित्र पाहून फार गंमत वाटली" असे डॉक्टरसाहेब सांगतात आणि पुढे शंकरभाऊ कधीही भेटले तरी प्रेमाने उत्साहाने त्यांचे स्वागत करीत म्हणून त्यांना "हा शंकररावांचा उमदा स्वभाव अतुलनीय आहे" असे सर्टिफिकेटही देतात. या व्यंगचित्रांप्रमाणेच ‘स्त्री’ मासिकातील विवाहविषयक चित्रमालिकाही शंकरभाऊंनीच काढलेली अनेकांना प्रिय झाली.

किर्लोस्कर मासिकाचा वक्तशीरपणा हे त्यांच्या लोकप्रियतेचे आणखी एक कारण होते. एक तारीख आली की किर्लोस्कर येणारच असे अतुट नाते होते. प्रसिध्द होणार्‍या प्रत्येक लेखनाला-चित्राला ‘प्रेमोपहार’ देण्याची पध्दत हिचा ‘शोध’ किर्लोस्करलाच प्रथमतः लागला. या पध्दतीची प्रशंसा एकमुखाने सर्वांनी केली आहे. राजरत्न वा. वि. जोशींनी एक आठवण सांगितली आहे. १९३१ साली बडोदे संस्थानातला ‘स्त्रीविषयक हिंदू कायदा’ बदलण्याच्या त्यांच्या प्रयत्नाला यश आले. त्या प्रश्नाचा प्रचार करणारा लेख त्यांनी शंकरभाऊंकडे धाडला आणि काही ध्येयनिष्ठेने आपण हे काम करणार असल्याने त्याचा मोबदला आपण घेणार नाही असे त्यांनी कळविले. त्यावर "मोबदला दिल्याशिवाय आम्ही लेख छापत नाही" असे शंकरभाऊंनी त्यांना लिहिले. शेवटी तडजोड म्हणून किर्लोस्करवाडीच्या बॅंकेत जोशी बुवांच्या नावे खाते उघडावे व त्यातले पैसे त्यांनी फक्त प्रचारकार्यासाठीच खर्च करावे असे ठरले. राजरत्न लिहितात, "मोबदला लेखकाने घेतला पाहिजे असा हटट् धरणारा संपादक विरळाच! संयम, शिष्टाचार, व्यवहार, ह्यांचे काटेकोर पालन करणारा संपादक.... शंकरराव ह्यांच्याशिवाय माझ्यातरी पाहण्यात कोणी आला नाही.!"

संपन्न व्यक्तिमत्व
शंकरभाऊंचे व्यक्तिमत्व संपन्न समृद्ध होते. नियतीने अनेक कलांचे वरदान त्यांना दिलेले होते. त्याचाही परिणाम त्यांच्या लेखक-वाचक वर्गांवर होई. बडोद्याच्या साहित्य संमेलनात अश्लील वाङमय निषेधाच्या ठरावावर त्यांनी भाषण केले. त्याबद्दल अपर्णाबाई व राजरत्न लिहितात, "शंकररावांच्या संथ, विचारप्रधान, सुटसुटीत भाषणाने आणि पूर्वपक्षाचे म्हणणे खोडून काढताना दाखविलेल्या ‘समंजसपणाने’ व ‘समतोलपणाने’ ठराव फेटाळला गेला." या वक्तृत्वाला कोणताही प्रसंग रंगतदार आणि नाट्यपूर्ण करुन सांगण्याची हातोटी आणि विनोदप्रियता यांची जोड मिळत असल्याने कमलाबाई फडके यांना त्याचा फार आनंद वाटे. केवळ माणसांशीच नव्हे तर मुक्या प्राण्यांशी अगदी कावळ्याशीही शंकरभाऊंची दोस्ती होती हे त्यांच्या स्वभावाचे ‘विलोभनीय वैशिष्ट्य’ आहे असे गंगाधर गाडगीळ यांना वाटते. त्यांच्या मते "‘किर्लोस्कर’ मासिकाचे संपादक या नात्याने शंकररावांचे जे व्यक्तिमत्व महाराष्ट्राला दिसले त्याहून त्यांचे समग्र व्यक्तिमत्व कितीतरी मोठे आहे."

आमचे कुटुंबमित्र व मासिकांचे लेखक कै. प्रा. प्रभाकर ऊर्ध्वरेषे सांगतात, "तारुण्य हा शरीराचा गुणधर्म नसून मनाचा आहे, ही ‘गंमत’ शंकरभाऊंनी ओळखून आत्मसात केल्यामुळे ते ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’, ‘मनोहर’ या तीन भिन्न प्रकृतीच्या व भिन्न स्वरुपांच्या पाक्षिकांचे यशस्वी संपादक होऊ शकले. समाजवादाचा प्रसार करुनही यशस्वी ‘कारखानदार’ झाले. बुवाबाजीविरुध्द लढा उभारुनही महाराष्ट्रात ‘किर्लोस्करी’ विचारसरणीचा ‘मंत्र’ देऊन मोकळे झाले." कुसुमाग्रज म्हणतात, "मराठी नियतकालिकांच्या इतिहासात शंकररावांचे कर्तृत्व संस्मरणीय होऊन राहील यात शंका नाही."
समाजाच्या अभ्युदयासाठी आपली वाणी आणि लेखणी आयुष्यभर झिजवणारी ती शंकरभाऊंसारखी व्यक्ती आपल्याला पितृस्थानी लाभली. या जाणीवेने माझे अंतःकरण भरुन आले आणि त्या कृतार्थ जीवनाला मी मनोमन अभिवादन केले.

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color