विझलेलं कुंकू
लेख़क Administrator   
 

विझलेलं कुंकू

गतजीवनातल्या आठवणींना विशेषतः आयुष्याच्या सायंकाळी एक आगळाच रंग-गंध लाभतो. त्यातल्या काही आठवणी चंद्रप्रकाशासारख्या आल्हाददायक तर काही मनाला चटके देणार्‍या असतात. काहींनी झालेल्या जखमा वरवर भरून आल्यासारख्या वाटतात.पण आत कुठे तरी त्यांचा सल राहतोच.

त्यातलीच आणि तशीच ही एक आठवण माझ्या हिंगण्याच्या शाळेतली. सुमारे सत्तर वर्षापूर्वीची. मला अजून चांगले आठवते आहे. त्या दिवशी रविवार होता. वेळ असेल आठ साडे आठची. माझी वेणी आंघोळ नुकतीच आटोपली होती आणि मी शेजारच्या खोलीत राहणार्‍या माझ्या जिवलग मैत्रिणीकडे गेले होते. तिचे नाव होते शांता देसाई. पण आम्ही सगळ्या बोर्डिंगातल्या मुली तिला ‘शांती’ असेच म्हणायचो.  ती कोकणातल्या एका खेड्यातून आली होती. घरचे वळण धार्मिक, काहीसे कर्मठच म्हणानात. त्यामुळे शांतीचा पोशाख त्या वातावरणाला साजणारा असा घट्ट परकर-पोलके पेहेरेलेला असा असे. आमच्या दोघींच्या गप्पा अगदी रंगात आल्या होत्या. एवढ्यात कुठून आणि कशा कोण जाणे पण आमच्या ‘दांडेकर बाई’ समोर येऊन उभ्या राहिल्या. माझ्या ओळीतल्या सर्व विद्यार्थिनींची जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली होती. माझ्याकडे बघून त्या म्हणाल्या, "माले तुला आत्तापर्यंत हजारदा बजावलं आहे तरीही तू आज कुंकू लावायला विसरलीस ना? धन्य आहे बाई तुझी. आधी खोलीत जाऊन कुंकू लावून ये बघू. आरशात बघ तुझे हे भुंडे भुंडे कपाळ कसं दिसतं आहे ते. जा चटकन." बाईंचा आवाज चांगलाच तापलेला होता. फुरंगटून बसायला मला तेवढे निमित्त पुरेसे होते. मी स्वतःशीच पुटपुटत म्हटले, "काय रोज बाईंची ही कटकट? कुंकू लाव, कुंकू लाव." आणि खोलीकडे जाता जाता धुसफुसतच मी बाईंना म्हटले, "ही शांती देसाई कधी म्हटल्या कधी कुंकू लावीत नाही. तिला मात्र तुम्ही त्याबद्दल चुकूनसुद्धा रागवत नाही. आम्हाला मात्र त्या टिचभर कुंकवासाठी तुमच्या चापटपोळ्या आणि धम्मक-लाडूही कधी कधी खायला लागतात. आज मी सदरा विजार घातली आहे. त्यावर कुंकू कसे शोभून दिसणार ते एकट्या देवालाच माहिती. हं आता लक्षात आले. शांती तुमची ‘पेट्ट’ आहे, तेव्हा तिला कशा तुम्ही रागावणार हो?" बाईंच्या कपाळावर खूपच आठ्या पडल्या म्हणून तिथे उभी न राहता मी खोलीकडे वळले. तेवढ्यात शांती माझ्याजवळ आली. ती माझ्याच वयाची! म्हणजे सहा-सात वर्षाची. हळू आवाजात, समजुतीच्या स्वरात एखाद्या पोक्त बाईला शोभेल अशा गंभीरपणे मला सांगू लागली, "मालेऽऽ, अगं मी कधीच कुंकू लावयचं नसतं." मी प्रश्नार्थक चेहरा करून बघतच राहिले तिच्याकडे आणि जरा तिरकसपणे म्हटले, "वा! हा बरीक खासा न्याय आहे म्हणायचा! आम्हाला कुंकू लावायची सक्ती आणि तुला त्याची सुट्टी! लाडक्या मुलीला सगळे गुन्हे माफ करणारच दांडेकर बाई!" माझ्या बोलण्याने ती हिरमुसली झाली. तिच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. थोडा वेळ ती गप्पच बसली. पाच-दहा मिनिटांनी तिने पुन्हा बोलयला सुरुवात केली. "माले, तसं काहीच नाही गं. मी काय सांगते ते तू नीट ऎक. खर्रर्र खर्रर्र काय ते मी तुला सांगते. इकडे हिंगण्याला यायला मी निघाले ना तेव्हा कोकणातल्या माझ्या आजी-आजोबांनी आणि शेजारपाजारच्या सगळ्या वडील माणसांनी मला बजावून बजावून सांगितलं, "शांते नीट लक्षात ठेव. तुझ्या बोर्डिंगातल्या बहुतेक मुली कुंकू लावणार्‍या असणार त्यांचे बघून तुलाही वाटेल आपणही कुंकू लावावं. पण तू कधी म्हणजे कधीही ते लावायचं नाहीस. मैत्रिणींनी किती आग्रह केला तरीही नाही. कळ्ळं का तुला? माले, मला त्यांनी एवढे बजावल्यावर मी कसे लावू कुंकू? ते मी का लावायचं नाही हे मला तरी कुठं ठाऊक आहे? बाई सांगतात ना आपल्याला की लहान मुलांनी वडील माणसांची आज्ञा पाळायची असते म्हणून! आता नाहीना तू माझ्यावर रुसायचीस पुन्हा?" शांतीच्या मायाळू शब्दांनी माझ्या रुसव्याफुगव्याची उकळी जरा थंड झाली. मी खोलीकडे वळणार एवढ्यात दांडेकर बाई गद्रे बाईंना काहीतरी सांगत होत्या, त्यातली काही वाक्ये माझ्या कानावर पडली. "आहो गद्रे बाई, ही माली किर्लोस्कर आहे मुलखाची वावदूशक! समजा मी हिला हजार वेळा सांगितले की, माले अगं ही शांति विधवा आहेम्हणजे हिचा नवरा देवाघरी गेला आहे. म्हणून तिने कधीच कुंकू लावायचं नसतं. तशी आपली हिंदूंची रुढी आहे, तर या मालीला त्यातलं काही कळणार आहे का कप्पाळ? म्हणून मी काही सांगत नाही तर हिची अशी मग चर्पट पंजरी सुरू होते. काय करणार सांगा! बिचार्‍या शांतीचं दैवच फुटकं म्हणायचं! पण दैवापुढे कुणाला जाता येतंय थोडंच? जे काय सुख दुःख ते आपल्या वाट्याला देईल, तेच गोड मानून घ्यावं लागतं ना?" बाईंचे हे बोलणे शांतीलाही ऎकू जात असावे. ती खाली मान घालून एका बाजूला उभी होती. परकराच्या एका कडेने आपले भरून येणारे डोळे पुसत होती. तिचा चेहरा अगदी दीनवाणा झाला होता. बाईंच्या बोलण्यातले ‘फुटकं नशीब’, ‘विधवा’, ‘दैव’ वगैरे शब्दांचे अर्थ ना मला कळले ना शांतीला कळले. पण तिच्या मलूल चेहर्‍याकडे पाहून माझा जीव अगदी कळवळला. आता तिच्यासाठी आपण काय करावे ते मला कळेना म्हणून मी तिला अगदी बिलगून उभी राहिले आणि तिच्या खांद्यावर अलगद माझा हात ठेवला. त्याने तिला जरा बरे वाटले असावे. बाकी काही कळो न कळो पण शांतीला एवढे मात्र बाईंच्या बोलण्यावरून खास कळले की मालीपेक्षा आपल्यात काहीतरी उणेपणा आहे. काहीतरी वेगळं आहे आणि त्याचे बाईंनाही फार वाईट वाटते आहे. म्हणून त्या मला सक्ती करत नसाव्यात. तेवढं शहाणपण शांतीजवळ होतं याबद्दल मला शंका नाही. इतका प्रदीर्घ काळ लोटला तरी दांडेकर बाईंचे बोलणे, शांतीच्या डोळ्यात आणि मुखावर दाटून आलेला अनाथपणाचा व्याकुळ भाव आणि मन हेलावून टाकणारा तो साराच प्रसंग मी विसरले नाही. कारण दुःख ही काय चीज असते, तिचे दर्शन मला त्या प्रसंगाने झाले होते. मराठी शाळा संपता संपता ‘विधवा’ म्हणजे जिचा नवरा देवाघरी गेलेला असतो हा अर्थ मला कळला खरा. पण त्या शब्दातला विखार स्त्रीचे सारे जीवन उदास, भकास करण्याची त्या शब्दाची जहाल विषासारखी असणारी भयानक शक्ती याची जाणीव मी मोठ्या शाळेत गेल्यावर माझ्या वर्गातल्या अनेक विधवा भगिनींच्या दारूण दुःखाच्या हकीकती ऎकल्यावर मला झाली. पण त्यापूर्वी लहान वयातही माझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले आणि म्हणून  बाईंना गाठून पुन्हा मी त्यांना प्रश्न विचारून भंडावून टाकले. मी त्यांना म्हटले, "पण शांतीचे लग्न तिच्या आईवडिलांनी इतक्या लवकर का केले? तिला त्यांनी तिचे म्हणणे काय आहे, ते विचारले होते का? आणि समजा न विचारता केलं असलं तरी कुंकवाचा आणि नवर्‍याचा काय संबंध? आपल्या शाळेतल्या बहुतेक मुली कुंकू लावतात त्यांची कुठे लग्ने झाली आहेत? आपल्या शाळेतल्या सुपरिंटेंडेंट बाईंना तर कुंकू किती छान दिसते. त्यांचे लग्न थोडेच झाले आहे? माझी प्रश्नांची सरबत्ती ऎकून त्या जरा कावल्याच आणि मला म्हणाल्या, "काही तरी बडबड करीत कशाला बसली आहेस तू इथे? जा बघू ग्राऊंडवर दोरीच्या उड्या मारायला, नाहीतर खेळायल!" नाईलाजाने लहान तोंड करून मी बाईंच्या समोरून बाहेर गेले. पण रात्री मनातल्या एका कोपर्‍यात पुनःपुन्हा शांती आणि तिचे कुंकू ही होतीच! माझे बालमन विचार करत होते, शांतीचा नवरा मेला यात तिच काय दोष? परवा आपली किर्लोस्करवाडीची मैत्रिण ‘शका’ हिची आई गेली, तर तिच्या वडिलांनी काही महिन्यातच तिल दुसरी आई आणली. शकाची आई गेल्यावर त्यांनी कुठे शांतीच्या कुंकवासारखे काय पुसले? किंवा मी आता एखादा आवडीचा पदार्थ कायमचा सोडून टाकीन असे तरी कुठे ते म्हणाले? त्यांनी दुसरी बायको घरी आणली तसाच शांतीनेही खूप शिकून नवा दुसरा नवरा का आणायचा नाही? सकाळी उठल्यावर बाईंना गाठून माझ्य़ा स्वभावाप्रमाणे मी तोही प्रश्न विचारलाच परिणम एवढाच झाला की, माझ्या पाठीवर जोरदार दणका त्यांनी घातला आणि म्हणाल्या, "मूर्खासारखे काहीतरी नको बोलूस माले."

आज माझी प्रिय बालमैत्रिण शांती या जगात नाही. बालविधवांचा प्रश्नही आता उरलेला नाही. मधल्या पाऊणशे वर्षात स्त्रिया शिकून शहाण्या झाल्या. स्वतंत्रपणे अर्थार्जन करू लागल्या. आपल्या पायांवर उभ्या राहिल्या. शास्त्रज्ञ, साहित्त्यिक, कलावंत एवढेच काय पण पंतप्रधानपदही भूषवण्याएवढ्या समर्थ झाल्या. आमच्या बालपणाच्या काळापेक्षा तुलनेने आज स्त्री कितीतरी स्वावलंबी झाली आहे. समाजात मान-मान्यता मिळवते आहे हे खरेच आहे. त्याचा आनंद आणि अभिमानही मला वाटतो. आणि आमचे गुरुवर्य ती. आण्णा कर्वे, ज्योतिबा, आगरकर अशांचे आम्हा स्त्री जातीवर केवढे मोठे ऋण आहे, याचीही मला तीव्रतेने जाणीव होते. त्यांच्या अथक प्रयत्नांनीच आम्हा स्त्रियांना ‘नवा प्रकाश’ दिसला या विचाराने कृतज्ञतेने मी त्यांना वंदन करते. पण आजही माझ्या मनात काही प्रश्न शिल्लक आहेतच. मी स्वतःशीच म्हणते, "जग आज झपाट्याने जवळ येत चालले आहे. ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रात त्यापूर्वीच्या कित्येक शतकात झाली नव्हती एवढी प्रकाश दिपवून टाकणारी प्रगती होते आहे. माणूस काशातल्या ग्रहगोलांवर चढाई करतो आहे. संगणकाने तर अभूतपूर्व क्रांती घडवली आहे. नवनव्या संस्कतींचा अभ्यास करून माणूस आवडीने काम करतो आहे. सर्व क्षेत्रात स्त्री आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवत आहे. अशा काळात वस्तुतः स्त्रीची दुःखे खरे म्हटले तर किती तरी पटींनी कमी व्हायला होती ना? पण चित्र तर आज असे दिसते आहे की, स्त्री मग ती खेड्यातली असो की शहरातली, शिकलेली असो की निरक्षर तिच्यापुढे नवनवीन आणि जटिल दुःखे उभी रहात आहेत. अपहरणापासून लैंगिक अत्याचारापर्यंत, असुरक्षिततेपासून जाळपोळीपर्यंत अनेक दुःखे तिच्या जीवनाची राखरांगोळी करत आहेत आणि शांतीच्या बालपणच्या वैधव्याचे दुःख जितक्या निष्कंप मनाने आमच्या समाजपुरुषाने पाहिले जवळजवळ तेवढेच त्यांचे मन आज स्त्रीच्या दुःखाबद्दल बधीर, उदासीन, बेपर्वा आणि निष्कंप आहे. आजही स्त्रीला मन आहे, तीही माणूस आहे, तिचा अपमान हा सर्व राष्ट्राचाच अपमान आहे, तिच्या अस्मितेचं रक्षण करण्यानेच समाज अधिक सुंदर, समर्थ, सुसंस्कृत होणार आहे. याची जाणिव अपवादभूत माणसे सोडून इतर कुणाला फारशी आहे, अशी दिसत नाही. म्हणजे पूर्वीचा समाजपुरुष बाह्यांगाने बदलला अस्ला तरी त्याच्या अंतरंगी ‘पुरुष श्रेष्टत्वाचा’ हजारो वर्षांचा त्याने जपलेला-जोपासलेला अहंकार कायमच आहे, असेच म्हणावे लागते. स्त्रीची वाढती जागृती, तिचे आत्मभान हे त्याच्या असूयेचा विषय होतो आहे त्याचे हे पर्यवसान आहे काय? म्हणूनच या समाजात ‘अमृता देशपांडे’, ‘रिंकू पाटील’ वाढताहेत काय? अशा प्रश्नांनी माझे मन पेटून निघते आणि म्हणते, "ईश्वराप्रमाणे स्त्रीच्या दुःखांनाही ‘अनंत’ हे विशेषण आजही लावायला लागत असेलतर शांतीच्या काळापेक्षा ‘आम्ही सुधारलो’, प्रगल्भ, विवेकशील झालो असे म्हणण्याचा या समाजाला काय अधिकार? हा समाज बाहेरून सुंदर दिसणार्‍या पण आतून कीड लागलेल्या आणि म्हणून आरोग्याला घातक अशा आम्रफळासारखाच आहे, असे म्हटले तर चूक होईल का?

कोण देईल या प्रश्नांची उत्तरे? कधी देईल? ती जेव्हा केव्हा मिळतील तेव्हा शांतीच्या ‘माले, अगं मी कधीच कुंकू लावायचे नसते’ या शब्दांनी आणि तिच्या विझलेल्या कुंकवाने माझ्या अंतःकरणाला झालेली जखम अंशतः तरी भरून येईल.       

 

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color