आकाशवाणी
लेख़क Administrator   
 

आकाशवाणी

माणसाच्या जीवनात असे काही क्षण, प्रसंग येतात की त्याने तो अगदी दिङ्‌मूढ होतो. त्या क्षणाचा, प्रसंगाचा ठसा त्याचा मनावर कायमचा उमटून राहतो.

माझ्या आजोबांबाबत घडलेल्या एका प्रसंगाने माझी अशीच अवस्था झाली. त्या प्रसंगाने माझ्या मनाला कायमचा चटका लागून राहिला. उत्तम धन्वंतरी, पुरोगामी समाजसुधारक, कुशल इंजिनिअर अशा विविध नात्यांनी आमच्या सोलापुरात त्यांचा मोठाच लौकिक होता. निष्णात सतारवादक आणि टेनिसपटू अशीही त्यांची कीर्ती होती. ते गोरेपान, तरतरीत नाकाचे, उंच, भव्य होते. जरीकाठी स्वच्छ रुमाल लॉंगकोट, पॅंट असा पोशाख करून ते सोन्यच्या छड्याचे घड्याळ खिशात घालून ते दवाखान्यात जायला निघाले म्हणजे इतके रुबाबदार दिसत की पाहणार्‍यावर लगेच त्यांची छाप पडे.

ते तसे मितभाषीच होते. त्यांना कोणावर कधी रागावल्याचे पाहिलेले मला फारसे आठवत नाही. गड्याला सुद्धा अपल्या भरदार आवाजात शांतपणे ते हाक मारीत, ‘अरे राम’. तर असे हे आमचे बाबा! आम्ही त्यांची नातवंडे असल्याने आमच्यावर त्यांचा स्वाभविकच जीव असायचा! आम्हीही त्यांच्या अवतीभवती असायचो! पण तरीही जवळकीपेक्षा त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आणि भक्ती हीच असायची! फार मोठीमोठी दुःखे आयुष्याच्या उतरत्या काळात त्यांच्यावर अक्षरशः कोसळली. पंचविशीतला कर्तासवरता डॉक्टर झालेला मुलगा दाढीच्या ब्रशाने सेप्टिक होऊन चोवीस तासात तडकाफडकी गेला, मागे तरूण पत्नी अन्‌ चार महिन्याचे तान्हे मूल ठेवून, पहिल्या वर्गात इंजिनिअरची परीक्षा उत्तीर्ण झालेला अत्यंत देखणा मुलगा अमेरिकेतच निवर्तला, जन्माची जोडीदारीण राजयक्ष्म्याने गेली, कर्तबगार मोठ्या मुलीचा त्याच दुखण्याने बळी घेतला, अन्‌ धाकटी वर्षभरातच कुंकू पुसल्याने माहेरी परतलेली. दुर्दैव असे की ही सारी संकटपरंपरा लागोपाठ तीन-चार वर्षातच त्यांच्यावर कोसळली! त्यांच्याकडे पाहिले की शाळकरी वयातही मला केवढा दुःखाच्या आगीचा डोंब या विवेकी पुरुषाने आपल्या मनात पचवला आहे! कसा पचवला असेल हा? अंतर्यामी किती उदास, एकाकी वाटत असेल नाही यांना? पण कधी अक्षरानेही या देवमाणसाने आपल्या दुःखाचा उच्चार कोणापुढे केलेला आम्ही ऎकला नव्हता. पाहिला नव्हता! त्यामुळे तर मला आतल्या आत अगदी भडभडून येई!

गाणे त्यांना फार आवडे! विशेषतः शास्त्रीय संगीत! त्या दिवशी ‘आकाशवाणी’वर माझ्या वडिलांचे - शंकरभाऊंचे भाषण मुंबई केंद्रावरून व्हावयाचे होते. ते ऎकण्यासाठी मोठ्या उत्सुकतेने आम्ही घरातली सगळीजण माडीवरच्या दिवाणखान्यात जमलो होतो. आजसारखा घरोघरी ‘आकाशवाणी’चा प्रवेश तेव्हा झालेला नव्हता. तिची अजून अपूर्वाईच वाटत होती आम्हाला! 

आकाशवाणीवर बातम्यांचा कार्यक्रम सुरू झाला. वेळ होती रात्री नऊची! बाबा जवळच ऎकत बसले होते, त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे आपल्या दोन्ही हातांचे पंजे एकमेकात अडकवून! शंकरभाऊंच्या कार्यक्रमाची अनाउन्समेंट निवेदकाने केली अन्‌ कान देऊन आम्ही ऎकू लागलो. ‘वाघाच्या ‘शिकारी’संबंधीचा आपला अनुभव सांगण्यात ते अगदी रंगून गेले होते. "वाघोबाची डरकाळी सरदारसाहेबांनी आणि मी ऎकली मात्र, आपली शिकार नजरेच्या टप्प्यात आल्याचे आम्ही हेरले आणि सावधान होऊन सज्ज झालो आणि त्यापाठोपाठ..." शंकरभाऊम्चे बोलणे नेहमीच मोठे सरस आणि डौलदार असते. त्यांच्या ओघवत्या शैलीत आम्हीही इतके वाहून गेलो की, ‘अशी झाली अमची वाघाची पहिली शिकार’ हे त्यांचे शब्द आणि त्यापाठोपाठ "आत्ताच आपण श्री शंकरराव किर्लोस्कर यांचे भाषण ऎकत होतात. पुढील कार्यक्रम आता लवकरच सुरू होईल" इत्यादी निवेदकाचे निवेदनही कधी संपले तेच आम्हाला कळले नाही. आम्ही आपले, "किती छान बोलले नाही का?" "काय बाई जिवावरचा प्रसंग तरी" असलेच काहीबाही आपापसात बोलण्यात दंग झालो होतो. पाच-सात मिनिटे या गलक्यातच गेली. एवढ्यात आमचे लक्ष सहज बाबांकडे गेले. पाहतो तर त्यांची मान खाली वाकलेली, त्यांच श्वासही काहीसा भरभर चालल्याचे आम्हाला जाणवले. तशी आम्ही सारीजण घाबरून, "बाबा ऽऽ बाबा काय होतंय तुम्हाला?" करीत त्यांच्याभोवती जमा झालो. क्षण दोन क्षण त्यांनी मानही हलवली नाही की काही उत्तरही दिले नाही. दिवाणखान्यात एकदम विचित्र शांतता निर्माण झाली. भिंतीवरच्या घड्याळाची टकटक उगीचच कानामनाला कातर करू लागली.

थोड्या वेळाने बाबांनी मान वर केली. आमचा जीव जरा भांड्यात पडला. काहीशा थिजलेल्या स्वरात, आपल्या वृद्ध बहिणीकडे - शंकरभाऊंच्या आत्याबाईंकडे - वळून एकदम भावनावेगाने ते म्हणाले, "दुर्गे, माझा शंकर माझ्या डोळ्यांना दिसत नाही, तरीही दोनतीनशे मैलांवरून त्याचा आवाज मला ऎकायला मिळाला. ही किमया या ‘आकाशवाणी’चीच नाही का? दुर्गे, माझा गणू, माझा माधव, माझी कृष्णी आणि त्यांची आई ही तरी कुठे दिसताहेत माझ्या डोळ्यांना? तीही दूरच आहेत इथून! मग त्यांचा आवाज नाही का गं, अशाच एखाद्या ‘आकाशवाणी’ने माझ्या कानांना कधी ऎकू यायचा? फक्त एकदाच ऎकायला मिळाला तरी पुरे गं, दुर्गे ऽ..." आणि त्यांना पुढे बोलवेना!

सारा जन्म दुःखाचे डोंगर निमूटपणे पचविणारे, जातिवंत बुद्धिवादी म्हणून मान्यता पावलेले, पहाडासारखे असलेले माझे आजोबा ‘आकाशवाणी’च्या या किमयेने पार कोसळले! दिवाणखान्यातून आम्ही आम्ही बाहेर पडलो ते पाणावलेले डोळे पुसतच!

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color