स्वागतकक्ष arrow मराठी पुस्तके arrow मधुघट arrow स्वप्नलक्ष्मीच्या सहवासात
स्वप्नलक्ष्मीच्या सहवासात
लेख़क Administrator   
 

प्रत्यक्ष कधी न पाहिलेल्या आजीची आठवण - तिच्या मधुर, उदात्त जीवनाचा चित्रपट तिच्या नातीच्या डोळ्यापुढे आला तेव्हा भारावलेल्या शब्दात ती सांगते . . .
- - - - -  - - -  - 

आजी, खरं सांगू तुला ? माझ्या मनाची कवाडे पूर्ण खुली करून आज पोटभर तुझ्याशी हितगूज करणार आहे मी ! आजपर्यंत जेव्हाजेव्हा तुझा विषय निघे ना, तेव्हा बोलणारी व्यक्ती तुझ्याबद्दलच्या आदराने भारावून जाऊन मला म्हणे, ‘तुझी आजी म्हणजे सोलापूरची “भाग्यलक्ष्मी” होती बरं मालती. एक पुण्यश्लोक साध्वीची नात आहेस तू ! जीवनातल्या कोणत्याही सुखदुःखाच्या क्षणी हे तू विसरू नकोस. आणि तिनं दिलेला वारसा जतन करताना कसूर करू नको मुळीच. कळलं ना ?’

आजी, तुझ्याबद्दलचे हे गौरवोद्‌गार ऎकले ना, की आनंद, अभिमान, आदर यांच्या गाढ ऊर्मींनी माझे अंतःकरण उचंबळून येई. अनेकवार तुझ्या भेटीसाठी व्याकूळ होऊन मनाचा पक्षी भिरभिर नजरेने तुल पाहात शोधत राही. पण सारेच व्यर्थ ठरे !

पण मला सांग ना आधी की, तुला नाही का गं माझ्या भेटीची ओढ वाटली कधी ? इतक्या वर्षात तुला क्धी सुद्धा वाटले नाही का, मी आपल्या नातीला आंजारावे, गोंजारावे, डोळे भरून प्पाहावे, वात्सल्याने न्हाऊ घालावे ? मला आशीर्वाद देण्यासाठी हात उत्सुक नाही झाले तुझे कधी ? माझ्या जन्माच्याही आधी तू इहलोकाचा निरोप घेऊन गेलीस ना ? असा काय अपराध माझा ? का रुसलीस माझ्यावर अशी ? सांग ना, सांग. तुझ्या भेटीसाठी असा पाठशिवणीचा खेळ खेळता खेळता पार दमून गेले होते मी. पण कशी अचानक भेटलीस त्या दिवशी तू मला !

काय झाले सांगू ? अगं, गेल्या दिवाळीचीच गोष्ट बरं का, दोनतीन दिवस थंडी-वार्‍याने मी जरा कुरकुरत होते. तेव्हा थोडी विश्रांती घ्यावी म्हणून माडीवरच्या खोलीत बिछान्यावर मी जरा अंग टाकले. वेळ तिन्ही सांजेची होती. खोलीतल्या लख्ख  दिव्याचा प्रकाश सोसवेना मला, म्हणून त्या दिव्यावर मंद निळ्या रंगाची शेड मी घातली होती. त्या प्रकाशाचा मंद झोत समोरच्या भिंतीवर रेंगाळत होता. अन्‌ त्या भिंतीवर तुझे छायाचित्र लावलेले होते. ते चित्र बहुधा तुझ्या अखेरच्या आजारातले असावे. कारण तुझा मूळचा शामल वर्ण त्यात फार काळवंडलेला दिसत होता. आजाराने तुला आलेली क्षीणता, व तुला दीर्घकाल तुला सोसाव्या लागलेल्या यातना लगेच कळत होत्या. या चित्रात पाहणार्‍याच्या मनात विलक्षण कालवाकालव होई. काळ्याभोर अशा तुझ्या डोळ्यातले पाणी मात्र त्या मानाने मंदावलेले दिसत नव्हते. चिंचोळ्या कपाळावरील तुझ्या कुंकवाचा ठसठसशीत टिळा तेव्हाच मन वेधून घेई. तुझ्या तेजस्वी सौभाग्याचा तो राखणदारच होता जणू ! मानेजवळून व खांद्याला खेटून असा तू आपल्या वस्त्राचा पदर घेतला होतास, त्यामुळे तुझ्या गळ्यातले इतर अलंकार निसुटतेच दिसत होते. याला अपवाद एक होता - अन्‌ तो तुझ्या मंगळसूत्राच्या टपोर्‍या मण्यांचा ! तुझ्या ओठावर एक चिमुकली लहर चमकताना दिसत होती. पण ती कशाची दर्शक होती ? तू भोगलेल्या दुःखाची ? की तुला लाभलेल्या सुखाच्या तृप्तीची. त्याचे कोडे बरीक मला अखेरपर्यंत नीटसे उलगडलेच नाही.

त्या दिवशी त्या बाजारात त्या निस्तब्ध क्षणी, त्या एकाकी स्थितीत तुझ्या त्या छायाचित्राने, तुझ्या वत्सल डोळ्यांनी किती धीर दिला, किती सोबत केली ते कसं सांगू तुला ? मनात आले माझ्या, लाडीगोडी करून म्हणावे तुला, कित्ती दिवस दूर राहिली आहेस गं मला सोडून ? मी फार रुसले आहे तुझ्यावर जेव्हा तू भेटशील ना, तेव्हा अशी मिठी मारेन तुझ्या गळ्याला की. . . की. . .पण माझे पुढचे शब्द ओठातच राहिले. कारण व्हरांड्यात कोणाची तरी चाहूल लागल्यासारखे वाटले.

आजी, का कोण जाणे, पण जेव्हा जेव्हा मला असे विषण्ण वाटते, माझ्यावरच रुसून खिन्नपणाने माझे मन कुठेतरी भटकू लागते, अबोध, अज्ञात अशी कशाची तरी हुरहुर लागून ते उदास होते, तेव्हा तेव्हा माझे डोळे पाणावतात, ओठाला कोरड पडून कंठ दाटतो, अन्‌ अशा वेळी तुझी - केवळ तुझीव मला फार आठवण येते. वाटते, अज्ञातातून, अंधारातून तुझी मधाळ हाक मला ऎकू येते आहे. ‘ मालती, बाळ मालती, अशी सचिंत का झालीस तू ? बेटा, मी आहे ना तुझ्या पाठीशी, अं ?’ 

दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी हीच - अशीच वात्सल्याने ओलावलेली तुझी हाक माझ्या कानावर आली. तुझ्या प्रत्यक्ष भेटीच्या कल्पनेने माझ्या अंगावर सुखोर्मी तरळल्या. आनंदातिशयाने व विस्मयाने माझ्या तोंडून शब्दच उमटेना. पण स्वतःला कसेबसे सावरीत मी म्हटले, ‘कोण - तू - तू - माझी आजी आलीस - ? . . .’

पण ती तू नव्हतीस अन्‌ ती हाकही नव्हती. दरवाजावरील वार्‍याने सळसळणारा पडदा आपल्या हळुवार हाताने दूर करीत, पावलांचाही आवाज न होऊ देता माझी सरलाकाकी खोलीत येत होती.
ती हाकही तिनेच मारली होती. तिच्या हातात बहुधा कागदात गुंडाळलेले एक पुडके दिसत होते. डाव्या हाताने ते अलगद तिने आपल्या हृदयाशी धरले होते. माझ्या पलंगापाशी येउन ती मायेने माझ्या अंगाखांद्यावरून हात फिरवू लागली. तिच्या स्निग्ध स्पर्शाने मला गहिवरून आले. ‘ बरं वाटतय का गं आता दुपारपेक्षा ? औषधाचा डोस देऊ का ? त्याच्यावर छानदार कॉफी पण देते तुला.देऊ ना ? ’ तिने प्रश्न केला. मी मानेनेच ‘नको’ म्हटले. माझ्या कुरळ्या केसातून शांतपणे तिचे हात फिरत होते. मग ती म्हणाली, ‘ बरं राहू दे तर. पण अहे बघ, माझ्या हातातल्या पुडक्यात काय गंमत आहे ती ओळखतेस का ? - खास तुझ्यासाठी आणली आहे ती. ओळख की. ’लहानपणी हादग्याचा खेळ खेळून झाल्यावर खिरापात ओळखताना आपली कशी गोड धांदल उडते ना, तशीच धांदल माझी त्या क्षणी उडाली. ‘ लखनौची साडी आहे का ? चंदनी पंखा आहे का ? नक्कीच केवड्याच्या अत्तराची बाटली असणार त्यात ! होय ना ?’ - मला आवडणार्‍या चारदोन वस्तूंची नावे मी भराभर घेतली. ‘टॉलस्टॉयची कादंबरी आहे का ?वृंदावनातल्या कन्हैय्याची हस्तीदंती मूर्ती आहे का ?’ असे प्रश्नहीमी अधिर्‍या मनाने विचारले, पण तिचे आपले एकच उत्तर ‘नाही.’ मग मात्र मी सपशेल शरणागती पत्करली. तेव्हा ती खुद्‌कन्‌ ह्सून म्हणाली, ‘आमची मालती हरली गं हरली !’ आणि ते पुडकेच तिने माझ्या स्वाधीन केले. एखाद्या आधाशासारखी मी त्याच्यावर झेप घातली. त्या गडबडीन त्यात असलेल्या वस्त्राची घडीच एकदम जमिनीवर घरंगळली. त्याचा अंजिरी मुलायम रंग अतिशय मोहक होता. रुईफूलकाठाची रुंद किनार त्याला किती शोभून दिसत होती. आणि त्याचा लालभडक जास्वंदी टोपपदर तर दृष्ट लागावी असा होता.

‘ओहो ! - काय सुरेख आहे गं !’ पण कुठून पैदा केलीस इतकी देखणी वस्तू तू ?’ डोळे विस्फारित मी तिला विचारले. ‘अगं, ती एक गमतीची, योगायोगाचीच कथा आहे. मालती, परवा काय झालं, पलीकडच्या खोलीत आपला तो मोठ्ठा पेटारा आहे ना सामानाचा ? तो कशालासा य्घडला होता हं ’ काकी सांगू लागली. ‘तर काय झालं, क्रोशानं विणलेल्या रुमालात काहीतरी चकाकत आहे असा मला भास झाला. कुतूहलानं तो रुमाल उघडून बघते तर गं काय ? सासूबाईंचं हे रेशमी ‘कडेल’. अन्‌ त्याच्यावरच ज्ञानेश्वरीची एक सुबक चिमुकली प्रत दिसली मला. तीच ज्ञानेश्वरी वाचायच्या म्हणे त्या रोज. सासूबाईंवर तुझी फार भक्ती आहे हे मला ठाऊक म्हणून माझ्या मनात कल्पना आली, तुलाच हे कडेल बक्षीस दिलं तर - आजीची आठवण म्हणून ? आणि मग पाडव्याच्या मुहूर्तानं आणली ही भेट तुला. पण आअवडली का ही तुला - तुझ्या आजीची भेट ?’ काकीच्या या प्रश्नाचे उत्तर द्यायला माझे मन जागेवर असेल तर ना ? त्या रेशमी वस्त्राच्या सुखद स्पर्शाने मझ्या अंतःकरणात एकदम कड आले. काही मिनिटे मनाच्या एका विलक्षण अवस्थेत गेली माझी. हा भास, हे स्वप्न की काय ? आजी, ज्या तुझ्या भेटीची असंख्य वेळा मी उत्कंठित मनाने वाट पाहिली,तो क्षण खरच आला होता काय ? आपल्या हातानं मी ते वस्त्र हृदयाशी घट्ट धरले आणि डोळ्यातून येणार्‍या आसवांनी माझा पदर भिजून गेला.

संध्याकाळचा शांत,  स्निग्ध प्रकाश आता हळूहळू मावळू लागला होता. माझे मन अन्नुभूत व अनिर्वचनीय अशा भावभावनांनी दाटून आले होते. तरल लहरींनी व्यापून गेले होते. दूरवर कुठेतरी वाजणार्‍या रेकॉर्डचे स्वर ऎकू येत होते.

‘सांजवात लाविता . . . आई, स्मरण तुझे होते- ’!

त्या तुझ्या मुलायम वस्त्राने , बरं का आजी, मी न पाहिलेला भूतकाळ माझ्या मनात जागा केला. आपलं हृद्‌गतच जणू त्यानं माझ्याजवळ खोललं.  काळचे कॅलेंडर फर्रदिशी वाजले अन्‌ सुमारे पन्नास वर्षापूर्वीचे सोलापूरचे आपले घर माझ्या अंतश्चक्षूंना दिसू लागले.

१९१२ सालच सुमार असावा. थंडीचे दिवस आहेत. वेळ रात्री अकरासाडेअकराची आहे. पाण्याने भरलेला तांब्या व फुलपात्र घेऊन तू जिन्याच्य पायर्‍या चढते आहेस. दिवसभराच्या कष्टांनी व सांसारिक जबाबदार्‍यांनी, खरं म्हणजे तू फार थकलेली आहेस. पण चेहर्‍यावर त्याचा लवलेशही न दिसू देता तू पावले टाकते आहेस.

माझे आजोबा किती गोरेपान, केवढे भव्य अन्‌ देखणे !च्यवसायाने ते धन्वंतरी खरे, पण अनेक कलांची अन्‌ विद्यांची त्यांना फार आवड. उत्तम सतार ज्या रसीलेपणाने ते वाजवतील तेवढ्याच रसिकतेने इंग्रजी, मराठी काव्यग्रंथाचा सुगंध ते लुटतील, जाणकाराच्या बुद्धीने स्थापत्यशास्त्रात ते जेवढे लक्ष घालतील, तेवढ्याच अगत्याने ते खगोलशास्त्रातील अनेक अनेक गूढे रंजक रीतीने समजावून सांगतील व जाणून घेतील.

या माझ्या आजोबांच्या खोलीत डोकावून पाहताना तू मला दिसते आहेस. पण त्या स्वारीला त्याचा पत्ता असेल तर ना ? कसल्याशा जाडजूड ग्रंथराजात मन गढून गेलेले दिसते आहे त्यांचे. त्यांच्या चेहर्‍यावर दिव्याचा प्रकाश पडला आहे व त्यामुळे त्यांच्या झुपकेदार मिशा आणि करारी मुद्रा स्पष्ट दिसते आहे. त्यांची एकाग्रता भंगू नये म्हणून तू हळूच प्रवेश केलास खोलीत, पण तुझ्या हातातील लबाड कंकणांनी तुझे गुपित फोडलेच. तो नाद ऎकून आजोबांनी मान उंच करून तुझ्यकडे पाहून स्मित केले, होय ना ?’

‘थोडीसुद्धा विश्रांती नाही घ्यायची का ? रात्रीचं जाग्रण कसे सोसवेल ते जिवाला ?’ तू प्रश्न केलास. तुझा स्वर जणू अमृतात भिजला आहे. आजोबांना तो गोडवा नक्कीच जाणवला - त्या स्वरांचा, त्या शब्दांचा. ते शब्द त्यांना पुन्हा पुन्हा ऎकावेसे वाटताहेत. पण तसे न बोलता ते म्हणाले. तुम्हाला तरी मिळते आहे का विश्रांती ? आटोपली का सारी कामं तुमची ? ’त्यांचे प्रेमळ शब्द तुझ्या कानांनी आधाशीपणानं टिपून घेतले. तू उत्तर दिलेस, ‘हं  - उरकली की !’

तुम्हा उभयतांच्या संवादातली माधुरी, त्यातून व्यक्त होणारी परस्परांबद्दलची गाढ ओढ माझ्या कानाला आजही जाणवते आहे. उत्तररात्री रंगलेल्या, एखाद्या भक्तीपर पदाचे चरण मनवर रेंगाळावेत ना, तशी ती ओढ मला भासते आहे.

आज धारवाडहून येताना, हे एक गाठोडं तुमच्या आईनं दिलय. ते पाहिलत का ?’ विणलेल्या एका रुमालाकडे बोट दाखवीत त्यांनी विचारले. अजुनी तू उभीच होतीस. ती त्यांच्या या शब्दानंतर किंचित ओणवी झालीस. ती तुझी अवघडलेली स्थिती आजिबांना जाणवली असावी. ते आर्जवी स्वरात म्हणले, ‘बसा की ! उभं कशाला राहयचं ? आपल्या माणसाजवळ कशाला संकोच ? मी का कुणी परका आहे ? ’ अन्‌ मग एखाद्या आज्ञाधारक बालकाप्रमाणे पण लाजून तू त्यांच्या शेजारी बसलीस. अलगद हाताने रुमालात गुंडाळलेली वस्तू तू उलगडू लागलीस. संकोच व प्रीती या नाजूक भावनांनी त्या अंधारातही तुझे मन कसे उजळले असेल, याची कल्पना मी करू शकते आहे मनाशी. निम्मेशिम्मे गाठोडे उलगडून होताच त्यातून झळाळणारे अंजिरी कडेल तुला दिसले. माउयघराहून आलेली प्रेमाची भेट ती. किती आनंदाने तू तिला जवळ घेतले असशील, आसवांनी तुझ्या डोळ्यात कशी गर्दी केली असेल, त्या भाग्यवान‌ वस्त्राच्या स्पर्शाने तुझे मन किती मोहरून आले असेल हे सारे सांगायला माझ्याजवळ शब्दच नाहीत गं.

काळाच्या कॅलेंडरची पाने पुन्हा एकवार फडफडली. तुझे एक नवीनच चित्र मला दिसू लागले.

एका संस्थेतल्या मोठ्या प्रशस्त खोलीत तू वावरताना दिसते आहेस. लहनमोठ्या, पाचपन्नास, भिन्नभिन्न जातीजमातीच्या, वयाच्या स्त्रिय अंवतीभंवती वावरताहेत. सोलापुरात अर्धशतकापूर्वी तूच प्रथम स्त्रियांसाठी शाळा सुरू केलीस ना ?

त्या शाळेचाच हॉल दिसतो आहे हा. तजेलदार काळ वर्ण तरीही त्यावर घातलेला, रंगीबेरंगी भडक पोशाख, बोलण्यात येणारी धेडगुजरी मराठी भाषा अन्‌ गळ्यात लटकणारा येशूचा क्रॉस, न्यावरून कोपर्‍यात उभा असलेला घोळका आपल्या सोलापुरातील ख्रिस्ती भगिनींचा आहे. हे न सांगताच ओळखता येते आहे. बरीच उंची, श्रीमंती वस्त्रे नेसून कमरेच्या किल्ल्यांचा जुडगा खुळखुळवत जाणार्‍या, विशाल घेराच्या या रूपवती स्त्रिया म्हणजे गावातील कोणी गुर्जर-जैन भगिनी असाव्यात, होय ना ? ‘अहो गौरव्वा’,  ‘काय हो पंचव्वा ?’ करीत एकमेकींशी बोलणार्‍या, आपल्या लफ्फेदार इरकली लुगड्यांचा घोळ फलकफलक हलवीत आणि गळ्यातील शिवलिंग सांभाळीत चालणार्‍या स्त्रिया त्यांच्या कपाळावरील भस्माच्या पट्ट्यांवरून तुझ्या लिंगाइत मैत्रिणी दिसताहेत.  

माझ्या उजव्या हाताला बसलेल्या स्त्रिया क्रोशाचे रुमाल अन्‌ लोकरीचे भरतकाम करण्यात गर्क दिसताहेत. तूच त्यांची शिक्षिका वाटते ? याच ‘सरस्वती-मंदिरात बालसंगोपनावर तू उपयुक्त माहिती सांगायचीस ना ? इथेच ज्ञानेश्वरीवरील तुझे रसाळ प्रवचन ऎकण्यासाठी बायकांची झुंबड उडायची ना ? पराक्रमी महापुरुषांची, पुण्यवती सतींची सांगताना तिथेच तुझ्या रसवंतीला भरते येई ना ? चैत्राचे हळदीकुंकू, संक्रांतीचा तिळगूळ समारंभ सामुदायिक रीतीने साजरे करावेत, त्यामुळे स्त्रियांची दगदगही वाचते व सहकारी जीवनाचे शिक्षणही ह्यांना मिळते, असे पुरोगामी विचार इथेच तू जिव्हाळ्याने सांगायचीस ना ? सिद्धेश्वराच्या तळ्यावरचे आवळीभोजन किंवा श्रावणी सोमवारची सहल याचे मनसुबे तुम्ही इथेच रचत होतात ना ? 

पण काय गं, आज हे आवार रंगीबेरंगी वस्त्रालंकारांनी नटून थटून आलेल्या स्त्रियांनी अगदी गजबजलेले दिसते आहे ! तुझ्या मागे मागे करीत लाजत, मुरडत, ठुमकत ठुमकत चालणार्‍या कोण गं त्या दोघी चिमुरड्या ? तुझ्या भाचे-पुतणे सुना वाटतं ? हळूहळू आवाजात त्या दोघी मधूनच कुजबुजताहेत. अंगावरची जरीची लुगडी अन्‌ मौल्यवान्‌ अलंकार सावरताना कोण धांदल उडते आहे त्यांची सारा बोंगा आवरायला येतोय का बघ एकीला तरी. मज्जाच वाटते आहे हे सगळे मनोहारी दृश्य पाहायला. पण तुझे झोकदार लुगडे मोठे थाटाचे दिसते आहे हं. परवाच्या अंजिरी ‘कडेला’ची घडी आजच मोडलीस वाटते ? आहे बुवा ! पण दृष्ट काढली का तुझी कोणी ?

‘अगं बाई - डॉक्टरीणबाई आल्या वाटतं ? तुझ्याकडे कौतुकाने पाहात अभिमानाने काहीजणी म्हणाल्या. ‘सारी दुपार तर इथेच हळदीकुंकवाची तयारी करण्यासाठी खपत होत्या. धन्या आहे बाई त्यांची !’ एका चतुर अंगनेने हजरजबाबीपणाने इतरांना माहिती पुरवली. बायकांच्यासाटी अहोरात्र झटतात बिचार्‍या. नावाप्रमाणे ‘लक्ष्मी’ आहेत त्या आमच्या गावाच्या. पण गर्व जरा तरी आहे का माऊलीला ? अहो, विजापुरच्या दुष्काळ्ग्रस्त लेकराबाळांसाठी घरोघरी जाऊन मूठमूठ धान्य गोळा करण्यासाठी यांनी किती हिंडावं ?किती राबावं ? सुमारच नाही त्याला.’ गोरगरिबांना औषधपाणी करण्यात त्यांचं पाऊल नेहमी सर्वांच्या पुढे ! पहिटकरणीचं दुखणं तर यांच्या मधुर बोलण्यानं निम्मं बरं होतं. हात तरी किती मऊ आहे म्हणता ? बाळंतपण अन्‌ शुश्रूषा करावी तर यांनीच. ’ एक अनुभवी पुरंध्री तुला सर्टिफिकीट देत होती. श प्रपंचाचा व्याप मोठा. एकत्र कुटुंब. पाहुण्या-रावळ्यांची सतत वर्दळ म्हणजे घरात सगळेच बघायला हवे. पण यांच्या ‘कपाळाला आठी अन्‌  तोंडाला मिठी’ पाहिली आहेत तुम्ही कधी ? स्वतः दुखणेकरी पण लोकसेवेची यांना भारी तळमळ ’

- अशा एक ना दोन शब्दांनी सार्‍या तुला नावाजताहेत अन्‌ हे सारे ऎकताना माझे मन-कान अभिमानाच्या तृप्तीने कठोकाठ भरून येते आहे. या मैत्रिणींच्या मेळाव्यातून तू फिरते आहेस, हसत आहेस, तुझे धब्द कानावर पडत आहेत - डांग्या खोकला कमी झाला का तुमच्या नातवाचा सत्यंकाकू ? मामंजींचा ताप दोषीच ठरला का सावित्रीबाई ? ’ असा क्षेमसमाचार विचारत तुझी फेरी होते आहे. बोलताबोलता सहजच हातावर ओघळलेला पदराचा शेव तू डाव्या हाताच्या पंजाने खांद्यावर टाकलास अन्‌ पुन्हा एकवार माझे लक्ष तुझ्या त्या चमचमणर्‍या वस्त्रावर खिळले. ‘नवं घेतलत वाटतं लक्ष्मीबाई हे कडेल ? खुलतं आहे हो तुम्हाला !’ कोणी प्रशंसा करीत तुला म्हणाले. त्यावर, ‘ माहेरहून आलंय. मंडळी धारवाडला गेली होती ना, त्यांच्याबरोबर. पण तुम्हीच सांगा अन्नपूर्णाकाकू, नव्या लुगड्याची घडी मोडायचं का वय आहे माझं आता ? ती सारी हौसमौज करायची या मुलींनी आता. म्हणून मी या गोदू- रुक्मिणीला म्हटलं, ‘ मुलींनो, तुम्हीच मोडा की गं घडी,’ तर या लबाड म्हणतात कशा, ‘आपणच मोडावी. आपल्यालाच छान दिसेल हे कडेल.’ बघितलंत कशा चहाटळ आहेत या ! ’ तू सांगितलेस.

तुझ्या जिव्हाळ्याच्या शब्दांनी तुझ्या त्या लेकी- म्हणजे सुना - बघ कशा टम्‌ट्म्‌ फुगल्या आहेत. तू हसशील मला आजी, पण तुझ्या या सुनांचा मला फार हेवा वाटतो. तुला डोळे भरून पाहण्याचे, तुझ्या हातचा चवदार स्वयंपाक जेवण्याचे तुझ्या मायेची शाल पांघरण्याचे सौख्य यांना लाभले. अन्‌ मला मात्र - नुसते पाहिले सुद्धा नाहीस ना तू एकदाही ?

दोन वर्षानंतरचे हे तुझे चित्र आहे. ‘ वा ! आवडतं अंजिरी कडेल नेसून कुठे निघाळि आहेस गं आजी, एवढ्या धांदलीने ? नाकात नथ, गळ्यात कंठी असे ठसठशीत दागिनेही दिसताहेत की आज तुझ्या अंगावर चढलेले ! घमघमणार्‍या जुईचा तू खोप्यावर घातलेला गजरा, आपल्या दारच्याच वेलाचा ना ? हातात हळदीकुंकवाची कोयरी, भरगच्च असा हार, नारळ घेऊन कुणाच्या स्वागताची तयारी करते आहेस गं  एवढ्या मनोभावे ? आम्हाला सांग की ! अं ?’ पण माझा हा प्रश्न त्या धांदलूत तुला ऎकू गेला नसावा. पण तरीही माझ्या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले.

आपल्या घराच्या दिवाणखान्यात जमलेल्या स्त्रीवृंदातल्या एका पोक्तशा बाईंकडे वळून तू सांगत होतीस, ‘द्वारकाताई, बसा ना, उभ्या का तुम्ही ? उमाबाईंसाटीच हे सारं ओटीचं साहित्य आणलं आहे मी. तुम्ही पुनःपुन्हा त्यांच्याकडे एवढ्या निरखून का बघता आहात ? हं, हं त्या जातीनं महार असूनही मी त्यांचं कीर्तन कसं ठरवलं या विचारानं तुम्हाला थोडं नवल वटलं असेल ना ? पण अहो, त्यांच्या गळ्याची गोडी काय सांगू तुम्हाला ? कृष्णाची मुरलीच जणू. शिवाय ज्ञानेश्वरी, भागवत इत्यादीचं वाचन आणि पाठंतर सुद्धा खूप आहे त्यांचं. हे सगळं कळल्यावर मला बाई राहवेनाच. आपल्या सरस्वती मदिरातच त्यांच्या कीर्तनाच कार्यक्रम व्हावा अशी फार इच्छा होती माझी. पण काहीजणी त्यांच्या जातीमुळं जरा संकोच करू लागल्या. म्हणून घरीच ठर्वला मी कार्यक्रम. देवपूजेत हो कसली जात अन्‌ धर्म ? मनाचा भक्तिभाव निर्मळ असला म्हणजे झालं ! खरं की नाही.? एक बईमाणूस एवढ्या धिटाईनं, चार माणसात उभं राहून कीर्तन करते आहे, रसाळ अभंग म्हणून त्याचं सुंदर स्पष्टीकरण अधिकारवाणीनं करत आहे, याच्या कल्पनेनंदेखील आम्हा बायकांची मान अभिमानानं उंच व्हायला हवी. नाही का ?’ पण तुझे बोलणे पुरे होण्यापूर्वीच कोणीतरी तुला बोलावून म्हटले, ‘डॉक्टरीणबाई, चला ना, पूर्वरंग संपत आला - ’ अन्‌ मग धांदलीने आत जाण्यासाठी तू वळते आहेस.

आपल्या दिवाण्खान्यात स्त्रीपुरुषांनी एकच गर्दी केली आहे. बाईंच्या मधुर कीर्तनासंबंधी प्रशंसोद्‌गार काढीत मंडळी आपापसात कुजबुजत आहेत. धूप-कापूर-उदबत्ती-फुले यांचा मंद सुगंध सर्वत्र दरवळतो आहे. झांजांचा खणखणाट, पेटीचा भरदार सूर तब्बलजीची डग्ग्यावरची थाप हवेत घुमते अहे. ‘रघुपति राघव राजाराम रघुपति राघव राजाराम ’ या शब्दांनी भाविकजन वेडावून गेला आहे.कीर्तनकर्त्या बाईंनी पांढरा स्वच्छ पोशाख केला आहे. त्यांच्या गळ्यातली तुळशी माला डोळ्यात भरते आहे. त्यांचे रुंद कुंकुमभूषित कपाळ, भावपूर्ण वेहरा आणि निष्पाप डोळे याम्च्या दर्शनाने भक्तमंडळींचा त्यांच्याविषयीचा आदरभाव द्विगुणित झालेला सहज दिसतो आहे. त्यांचे धवल वस्त्र व तुझे अंजिरी कडेल रात्रीच्या उजेडात एकदमच उजळून निघते आहे. त्यांना हळदकुंकू लावून फुलांचा हार त्यांच्या गळ्यात घालण्यासठी तू पुढे सरकली आहेस अन्‌ मझे मन तुझ्या त्या परम रमणीय मूर्तीवरच खिळले आहे. सभोवतलच्या पावन वातावरणानं ते भरून आले आहे. तुझ्या उदात्त वाणीचे रव माझ्या कानात घुमताहेत.

काही दिवसांपूर्वी, बरं का आजी, रमाबाई रानड्यांचे पुस्तक मी वाचीत होते. त्यात न्यायमूर्ती रानडे यांची प्रकृती एकदा फार बिघडली असता आजोबा त्यांना औषधोपचार करायला गेल्याचे मी वाचले अभिमानाने माझा ऊर भरून आला. त्या उभयतांचा खूप मोठा सत्कार ते दोघे सोलापुरात आले होते तेव्हा झाला होता ना ? स्त्रियांतर्फे त्यांच्या स्वागताचे बाषण तू केले होतेस म्हणे. शाबास आहे हं तुझी ! तू कसे आणि काय भाषण केले असशील सांगू ? -  

‘अध्यक्षमहाराज व सौ. रमाबाईसाहेब,  आपल्या पदस्पर्शाने आमचे गाव आज भाग्यवान‌ झाले आहे. आपले स्वागत करायला फार आनंद वाटतो. तो आनंद व्यक्त करायल आमच्याजवळ श्ब्दच नाहीत. आपल्या उदात्त चारित्र्याने व देशभक्तीने कोणाची मान मम्र होणार नाही ? आपण करीत असलेल्या कार्याला यथाशक्ती हातभार लावण्याची शक्ती-बुद्धी ईश्वराने आम्हास द्यावी. आपण उभयतांस त्याने दीर्घायुरोग्य द्यावे हीच त्याच्या चरणी आमची प्रार्थना. इतके बोलून मी माझे भाषण पुरे करते’ याव अशाच विनीत वणीने तू बोलली असशील. त्या भाषणात मोरोपंत, वामन पंडित - या तुझ्या आवडत्या पंडित कवींच्या सुरस वचनांचा तू समुचित वापर केला असशील. (त्यांचे शिकडो वेचे ती स्वयंपाकघराच्या भितीवर लिहून ठेवून पाठ करीत होतीस असे मी ऎकले आहे.) अन्‌ त्यामुळे तुझे ते चिमुकले भषणही मोठे आकर्षक व डौलाचे झाले असेल.

पण कय गं, तुझे पाय मधूनमधून कापत होते ना बोलताना ? टेबलाचा आधार घेत होतीस ना ? भयाकुल मनामुळे घाशाला कोरड पडल्यासारखे वाटत होते ना ? स्वाभाविकच आहे ते. हजारो प्रेक्षकांच्या पुढे एवढ्या मोठ्या सार्वजनिक सभेत बोलण्याच तुझा तो पहिलाच प्रसंग होता वाटते. पण मला ते चित्र डोळ्यांना विशेष सुखकर वाटले. तुझे आवदते अंजिरी रंगाचे शकुनाचे ते कडेल तू त्या वेळी नेसली होतीस ना ? भाषण संपवून तू खाली बसताच झालेला कौतुकपूर्ण कडकडाट जणू आत्ताच घडल्याप्रमाणे माझ्या कानांना ऎकू येतो आहे. शालीन सौभग्यवतीला शोभेलशा विनयाने ती जेव्हा त्या थोर दांपत्याला खाली वाकून नमस्कार केलास तेव्हा त्या दोघांच्य मुद्रेवर व नजरेत तुझ्याबद्दल दाटलेला आदरयुक्त कौतुकाचा भाव माझ्या डोळ्यांना आजही दिसतो आहे. तू आपल्या जागेवर बसण्यासठी वळलीस अन्‌ सायंकाळच्या रम्य, मनोहारी उन्हात तुझे अंजिरी, लालभडक टोपपदराचे कडेल झगमग करीत असताना मला आढळले.

तुझ्यासंबंधीची अत्यंत हृदयस्पर्शी, आठवण मातर आजी, तुझ्या आवडत्या वन्संनी - आप्पांच्या आत्याबाईंनी सांगितली आहे. त्या आता नव्वदाच्या घरात पावले टाकीत आहेत. अन्‌ स्वाभाविकच खूप थकल्याही आहेत. परवा माझा वाढदिवस होता, म्हणून आवडीने तुझे ते कडेल नेसून मी त्यांना नमस्कार करायला गेले हं. तर क्षणभर त्या माझ्याकडे बघतच राहिल्या, आणि मोतीबिंदू झालेल्या, अधू अशा त्यांच्या डोळ्यातून घळघळा पाणी येऊ लागले. ते बघून काहीशा अपराधी चेहर्‍याने मी खिन्नपणे विचातले, ‘आत्ति, आशीर्वाद घ्यायला आले मी तुझा, तर तुझ्या डोळ्यांना पाणी का गं ? माझ्या हातून काही चुकलं का ? - ‘ नाही हो मालती, पण बाळ तुझं हे लुगडं बघताच माझ्या जिवलग वहिनीची तीव्रतेनं आठवण झाली बघ मला. अंधुक अंधुकच दिसते आहे मला. पण तिचं अस्संच अंजिरी रंगाचं एक कडेल होतं.’ आत्तीला पुढे बोलवेना. आणि गतकाळच्या आठवणीनी ती गहिवरली. काही वेळ तशाच अवघड स्थितीत गेला. अन्‌ मग मी तिला वस्तुस्थिती सांगताच, आनंदाने न राहवून तिने एकदम आपल्या कापर्‍या हाताने टाळ्या वाजविल्या व ती म्हणाली, ‘तुझ्या आजीची अशीच इच्छा होती गं  माझ्या बयो ! तू हे लुगडं नेसलेलं पाहून तुच्या डोळ्याचं पारणं फिटलं असेल आज. ’

अन्‌ मग, बरं का आजी, तिने जी हकीकत सांगितली, ती मी कशी विसरू ? तुझ्या आजीसारखी गुणवती सती क्वचितच दिसायची. सार्‍यांच्या खस्ता खाल्ल्यान्‌ बिचारीनं अन्‌ अखेरीस राजयक्ष्म्यानं तिला पछाडलं. सगळ्या धन्वंतर्‍यांनी हात टेकले. तुझा आजोबा तर तिच्या काळजीनं खंगू लागला. शेवटी हवापालटीसाठी नांगरवाडीला तिला नेलं. पण -

एक दिवस तिनं तुझ्या आप्पांना क्षीण स्वरानं हाक मारली. कारण तोच सर्व मुलात मोठा होता ना ? तो म्हणजे मुलखाचा अवखळ. अभ्यासाचे तर नाव नको असायचे त्याला. पण मनाचा होता भारी कोवळा, मायाळू आणि म्हणून त्याच्या आईच फार लाडका. त्यावेळी तो असेल सतरा-अठरा वर्षाचा.

ती वेळ रात्रीची दहा साडेदहाची असावी. डिसेंबरच्या मध्याचे दिवस. त्यामुळे थंडीचा आलेला कडाका चावर्‍या वार्‍यामुळे जास्तच जाणवत होता. त्या चिमुकल्या घरात आतल्या खोलीत कंदिलाच्या अंधुक प्रकाशात वहिनींच्या भोवती कोंडाळे करून तिच्या पंचप्राणांचे रक्षण करण्यासाठीच जणू काही आम्ही सर्वजण बसलो होतो. त्या शांत पण अस्वस्थ वातावरणात घड्याळाचू टिकटिक भयाण वाटत होती. भइंतीवरच्या आमच्याच सावल्या मन कुरतदत होत्या. माझी वहिनी आता थोड्याच काळाची सोबतीण आहे या विचारांनी आमची मनं दाटली होती.’

बोलत बोलता आत्ति एकदम थांबली. आपला हुंदका कष्टाने गिळत ती पुढे म्हणाली, ‘त्या तसल्या कुंदकुंद वातावरणात ‘शंकऽऽर’ म्हणून वहिनीनं शंकरला हाक मारली. त्या हाकेतल्या आर्द्रतेनं रडवेला झाला बिचारा ! पण प्रसंगाचं गांभीर्य जाणून तो झटकन्‌ तिच्याजवळ गेला. वहिनी बिचारी इतकी वाळून गेली होती, की गादीवर तिला शोधायला लागावं. आपले शुष्क झालेले हात शंकरच्या अंगावरून कोमलतेनं फिरवीत ती म्हणाली, ‘शंकर, राजा, . . . मी आता थोड्या वेळाची सोबतीण आहे बरं.  तू असा अचपळ. पण आता सारं तुलाच नीट सांभाळायला लागणार बाबा. सांभाळशील ना धाकट्यांना ? धीर देशील ना तुझ्या वडिलांना ? फार इच्छा होती सुनमुख बघावं, नातवंडं बघावं. पण भगवंताची इच्छा वेगळीच दिसते. आणि तीच मानायला हवी ना आपण ? . . . अहेवपणी जाते आहे हे काय भाग्य काय थोडं आहे ? - पण हे बघ, एक मात्र इच्छा राहिली आहे, ती पुरी करशील का ? तू प्रपंच मांडलास, घरकुल केलंस ते मुलाबाळांनी फुललं की माझ्या मोठ्या नातीच्या हाती हे समोरच्या कपाटातलं अंजिएरी कडेल दे. आणि तिला सांग तुझ्या आजीनं दिली आहे तुला आहे ही अहेवपणाची भेट. ती नीट जतन कर. विजयाला फार आवडलं होतं ते. मी मनात म्हणत होते तिला मूलबाळ झालं कीदेईन याची चौघडी करून. पण तीच बिचारी कायमची माघारी आली. तेव्हा तुझ्या मुलीला - ’

पण तेवढ्या बोलण्याचे श्रम तिला सोसले नाहीत. तिनं उजव्या कुशीवर मान वळवली. करुणार्द्र अश्रूपूर्ण नजरेनं सार्‍यांकडे एकवार पाहिलं आणि , ‘येते मी शंकर . . .’ म्हणेपर्यंत तिचे डोळे मिटले. अन्‌ आमच्या घरतला नंदादीप विझून गेला पोरी - ’ आत्याबाईंचे डोळे घळघळा गळू लागले. तिच्या व्याकुळ अवस्थेने माझ्या काळजात तुटू लागले.

ती - माझ्यासाठी म्हणून तू ठेवलेली, अहेवपणाची म्हणून तू दिलेली भेट, मी आज माझ्या अंगाखांद्यावर ल्याले आहे. त्या वस्त्राच्या स्पर्शाने माझ्या अंतःकरणात उमटणार्‍या हर्षविषादाच्या उर्मी तुला दिसत असतील काय गं ? परलोकातील तुझ्या घरकुलाच्या गवाक्षातून तू डोळे भरून या क्षणी मला पाहात असशील काय गं ? तुझे हे वस्त्र नेसताना प्राजक्ताची गंधलाट रोमारोमातून जाते आहेसे वाटून मी थरारते आहे हेतुला दिसते आहे कायगं ? सांग ना, एकदाच बोल ना माझ्याशी !       

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color