स्वागतकक्ष arrow मराठी साहित्य arrow लेख arrow औषध कडू, गुण गोड भाग - ३
औषध कडू, गुण गोड भाग - ३
लेख़क मालतीबाई शं. किर्लोस्कर   

फर्ग्युसन महाविद्यालयात बी. ए. च्या शेवटच्या वर्षात मी शिकत होते. वार्षिक परीक्षा पाचसहा दिवसांवर येऊन ठेपली होती. त्या सुमारास माझ्या मनाने एकदम कच खाल्ली, आणि परिणामी त्यावर्षी परीक्षेला न बसण्याचा मी निश्चय केला. बोर्डिंग सोडून घारी जाण्यासाठी मी सामानाची बांधाबांध करू लागले. मनाला चमत्कारिक उदासीनता जाणवत होती. डोळे पुन्हा पुन्हा भरून येत होते. तेवढ्यात माझी जिवलग मैत्रिण ‘नलिनी’ (ही आता अर्थशास्त्रातील, आडनावाप्रमाणे ‘पंडिता’ आहे) खोलीत आली आणि काहीशा व्यथित पण परखड शब्दात मला म्हणाली, "मालती, हा काय वेडा विचार घेऊन बसली आहेस तू डोक्यात? ऎनवेळी परीक्षा सोडून जाण्याचा? मी तुला अगदी मनापासून सांगते, तू बैस परीक्षेला. झालेल्या अभ्यासावर तुला सेकंड क्लास सहज मिळेल. जरा धीर धर. तू घरी निघालीस असे कळताच सरल, शांता इत्यादि मैत्रिणींनीही तीच भाषा सुरू केली आहे. त्यांना असे ‘नर्व्हस’ करायला तुझे वागणेच कारणीभूत ठरते. मी बोलते त्याचा तुला आज राग येईल पण मला राहवत नाही म्हणून बोलते. हा निष्कारण येणारा भित्रेपणा तुला पुढील आयुष्यात फार फार नडेल. मी ‘मालवण’ची राहणारी आहे तिथले ‘लवण’ फार खारट असले तरी तुझ्या मनःप्रकृतीला त्याची फार गरज आहे." नलिनीचा आवाज तापला नव्हता. पण माझ्यावरील प्रेमाने त्यात कंप निर्माण झाला होता. तो मला जाणवत होता. मी तिचे म्हणणे ऎकले नाही नि परीक्षा टाकून घरी आले याचा मला आज फार खेद होतो. पण तिच्या ‘मालवणी लवणाने’ माझ्या जीवनात कायमचे मानाचे स्थान मिळवले. त्यानंतरच्या आयुष्यात माझ्या पळपुटेपणाशी होईल तेवढ्या निकराने मी झगडते आहे.
* * * * *
मराठीची प्राध्यापिका म्हणून मी नुकतीच कामाला सुरुवात केली होती. तेव्हाचा हा एक संवाद. प्राचीन काव्य वाचीत असता एका अनोळखी शब्दावर मी अडखळले. तासाची वेळ झाली होती. तेव्हा वाचता वाचता मी दादांना (प्रा. रा. श्री. जोग यांना) उतावळेपणाने विचारले, "दादा, या शब्दाचा अर्थ काय हो?" दादा त्यांच्या शांत, संयमी स्वभावाबद्दल आणि अभ्यासूवृत्तीबद्दल सर्वदूर प्रसिद्ध असलेले, पण काहीशा नाराजीच्या स्वरात ते म्हणाले, "तू घरच्या मुलांसारखीच आहेस, तेव्हा तुला मी अर्थ सांगतो, पण यापुढे नेहमी लक्षात ठेव, तासाला जाण्यापूर्वी किंवा कोणतीही अभ्यासातली शंका विचारण्यापूर्वी  त्याबाबतचे आवश्यक ते संदर्भ आपण स्वतः वाचनालयात जाऊन किंवा इतर परिश्रम करून शोधायला शिकले पाहिजे. तू आता प्राध्यापिका झाली आहेस त्यामुळे सूक्ष्म व सखोल अभ्यासाची गरज वाढतच जाणार हे विसरू नकोस." या व्यवसायात आता तीस वर्षापेक्षा अधिक काळ माझा गेला, पण माझ्या गुरुवर्यांनी दिलेला मंत्र मी सदैव कटाक्षाने जपत आले आहे. अशा किती आठवणी सांगाव्या?

विद्याची सोनल औषध पिऊन केव्हाच झोपी गेली होती, पण माझे मन विचारचक्रात फिरत होते. जणू ते म्हणत होते, "कोंडाण्यावरून पराभवाच्या भीतीने पळून जाणार्‍या सैन्याचे किल्ल्यावरून खाली जाणारे दोर सूर्याजीने तोडले म्हणूनच किल्ला सर झाला, ‘सिंहगड’ ठरला. स्वामी पेशव्यांनी जवळच्या आप्तांना कठोर बनून अपराधाची सजा देण्याचे धार्ष्ट्य केलेम्हणूनच मराठी राज्याचे संरक्षण, संवर्धन झाले ना? युगप्रवर्तक शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना त्यांच्या चुकीबद्दल पन्हाळ्याच्या सजा कोठडीत टाकले; एकांतवासाची शिक्षा दिली - अशा अनुभवांनीच बापसे बेट सवाई असा मृत्युंजय संभाजी घडला ना?

इतिहास असो की समाज असो, तो घडविणार्‍या अनेक थोरांची जीवने आपल्याला काय सांगतात? त्यांच्या आयुष्यातील यशाचे, कर्तृत्वाचे फार मोठे श्रेय आहे एका विचारसूत्राला - "औषध कडू, पण गुण गोड "याला!           
* * * * *                         

 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color