स्वागतकक्ष arrow मराठी साहित्य arrow लेख arrow औषध कडू, गुण गोड भाग - २
औषध कडू, गुण गोड भाग - २
लेख़क मालतीबाई शं. किर्लोस्कर   

इंग्रजी चवथीतला असाच एक प्रसंग मनात कायमचे घर करून राहिला आहे. त्यावेळी मी सोलापुरात आजोबांजवळ शिक्षणासाठी राहिले होते. त्यांना भेटण्यासाठी ‘शंकरभाऊ’ (माझे वडील) तिथे आले होते. आमच्या घरातली सर्वच वडील मंडळी आम्हा मुलांशी फार खेळीमेळीने व जिव्हाळ्याने वागत. माझ्या बरोबरीच्या मैत्रिणींना त्याचे भारी नवल वाटायाचे. त्या म्हणायच्या, "आम्हाला बाई आमच्या ‘बाबां’ची, ‘दादां’ची भारी भीती वाटते. ट्रीपला जाण्यासाठी वर्गणी मागायची असो की सिनेमाला जायचे असो." माझ्या मनात येई, वडील मंडळींना कशासाठी भ्यायचे? ती तर आपली मित्रमंडळीच जणू. तर त्या दिवशी काय झाले, काकींनी मला हाक मारली आणि म्हणाल्या, "जा ग, बाबांना सांग जेवायचे झाले आहे, खालती या." माझे आजोबा माडीवर रेडिओ ऎकत बसले होते. बातम्या चालू होत्या. वेळ रात्रीची आठ सव्वाआठची. मला पोंच तेवढाच. मी खुशाल जिन्याच्या खालच्या पायरीवरच उभी राहिले आणि दोन्ही हात तोंडाशी फुगवूनच स्वरात खालून हाक दिली, "बाऽबा, जेवायला खाली याऽ." जेवणघराकडे जाण्यापूर्वी हातपाय धुऊन यावे म्हणून मी जाते तो माझ्या पाठीशी ‘शंकरभाऊ’ येऊन उभे! माझ्या खांद्यावर ममताळूपणे हाता ठेवीत, शांतपणे त्यांनी मल विचारले, "मालढोक, (ते मला मुलासारखे संबोधीत) तू माडीवर येऊन ‘बाबांना’ निरोप सांगितला असतास तर तुला काही त्रास झाला असता काय?" तो प्रश्न ऎकताच मला वरमल्यासारखे झाले. मी गप्पच उभी राहिले व पानावर जेवायला बसल्यावरही माझे मौनच होते. आपल्या घरातील वडील माणसे आपल्याशी खेळीमेळीने, जणू समवयस्क बनून बोलतात, वागतात हा त्यांचा मोठेपणा आहे. पण म्हणून आपण त्यांचा यथोचित मान राखयला विसरणे हे बरोबर नाही हे पटदिशी लक्षात आले. आजतागायत असा वेडेपणा मी पुन्हा केला नाही.
* * * * *
प्रतिवर्षीप्रमाणे उन्हाळ्यात सुट्टीसाठी आम्ही मुले किर्लोस्करवाडीला जमलो होतो. चांदण्यात गच्चीवर हास्यविनोद, गप्पाटप्पा हे चालू होते. त्या ओघात मासिकाकडे आलेल्या एका लेखाबद्दल ‘शंकरभाऊ’ काही सांगत होते. लेख एका लेखिकेचा होता. कशाने ते मला नीटसे स्मरत नाही, पण तिच्याविषयी माझ्या मनात दुरावा होता. ती साधारण आमच्याच वयाची - असलीच तर दोन-तीन वर्षांनी मोठी होती. तिच्या लेखाचा विषय निघताच काहीसे उसळून मध्येच मी म्हटले, "ती आंधळी ना? आहे मला ठाऊक!" शंकरभाऊ बोलताबोलता एकदम थांबले. माझ्याकडे त्यांनी टक लावून पाहिले, आणि काहीशा व्यथित स्वरात म्हणाले, "या घरात राहणारी, या टेबलावर जेवणारी सगळी माणसे समंजस आणि सुसंस्कृत आहेत असे मी मानतो. आणि एखाद्या व्यक्तीच्या शारीर अधूपणाचा, व्यंगाचा असा कडवटपणे उल्लेख करणे त्यात बसते असे नाही मला वाटत. जोरात आलेल्या तापाने तिची दृष्टी अंध झाली यात तिचा काय दोष सांग बरे? तुझ्या कानांनी तुला कमी ऎकू येते म्हणत तुला कोणी हिणवले तर कसे वाटेल तुला? सांग -" त्यांच्या बोलण्याने टेबलावरचे सगळे वातावरण बदलले. उरलेले जेवण मी निमूट खाली मान घालून जेवले. हा धडा आजतागायत पक्का लक्षात राहिला आहे.

* * * * *

  
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color