स्वागतकक्ष arrow मराठी साहित्य arrow लेख arrow औषध कडू, गुण गोड भाग - १
औषध कडू, गुण गोड भाग - १
लेख़क मालतीबाई शं. किर्लोस्कर   

"सोनल, बेटा, असा हट्ट नाही करू, तू शहाणी ना? घेऊन टाक बरं औषध चटकन. ते जरासंच कडू आहे पण त्याचा गुण किती छान आहे. थोड्याच वेळात ताप उतरून जाईल तुझा. हं घे." आमची ‘विद्या’ - माझी भाची - आपल्या छोट्या छोकरीला समजावून सांगत होती.

संध्याकाळची वेळ होती, अंगणात खुर्ची टाकून मी वाचीत बसले होते - ‘विद्या’चे शब्द माझ्या कानावर पडताच मलाही माझे लहानपण आठवले. नुकताच मी इंग्रजी पहिलीत प्रवेश घेतला होता. त्यामुळे लहन मुलांच्या बोर्डिंगातून मोठ्या बोर्डिंगात माझी रवानगी झाली होती. वय सुमारे दहा. जेवणाच्या वेळचा एक प्रसंग - पहिल्याच पंधरवड्यात घडलेला. पाठीमागचा ताकभात मी जेवीत होते, त्यादिवशी भाजी होती तांबड्या भोपळ्याची. मी तिला मुळीच हात लावला नव्हता म्हणून उजव्या हाताला ती जशीच्या तशीच पडून राहिली होती. आमच्या मेट्रन ‘आक्का चिपळूणकर’ फार शिस्तीच्या आणि कडक. पंक्तीतून त्या फेर्‍या मारीत आणि सर्वांकडे बारकाईने लक्ष ठेवीत. जेवण संपताच ताटवाटी हातात घेऊन ती घासण्यासाठी मी नळाकडे जाऊ लागले, तो लगबगीने माझ्यामागोमागच त्या आल्या आणि माझा डावा हात पकडून म्हणाल्या, "हां, थांब बघू जरा. ही भाजी का टाकलीस तू पानात? बोर्डिंगचा नियम ठाऊक आहे ना तुला? पानात पहिल्यांदा वाढलेले पदार्थ प्रत्येकीने खाल्लेच पाहिजेत हा? पदार्थ आवडोत की नावडोत"- एवढे बोलूनच त्या थांबल्या नाहीत तर मला हाताला धरून त्यांनी पुन्हा पंक्तीत आणून बसवले. तो सारा प्रसंग जसाच्या तसा माझ्या डोळ्यंपुढे आजही उभा आहे. रागाने लालबुंद झालेले माझे डोळे वाहू लागले आहेत, झगा किंचित वर उचलून डोळ्यातील पाणी मी पुसले आहे, पंक्तीतल्या मुली माना उंचावून, वेळावून माझ्याकडे पुनः पुन्हा बघताहेत. डावा हात कमरेवर ठेवून उजव्या हाताने पदर खोचीत ‘आक्का’ समोर उभ्या आहेत - मी तरी काय कमी होते, मीही हटूनच बसले आणि - हुंदके देत देतच म्हटले, "मला नाही ही गिळगिळीत हौदभर पाणी घालून केलेली भाजी आवडत. आमची ‘नन्नी’ (आई) किती छान करते याच भोपळ्याची भाजी. ही खाल्ली तर उलटी होईल मला." त्याही तेचढ्याच पक्क्या. त्या म्हणाल्या, "होऊ दे, होऊ दे, मग बघीन मी काय करायचं ते. आधी भाजी खा मुकाट्याने." त्यांचा ठेका कायमच राहिलेला दिसताच अस्मादिकांनी सपशेल शरणागती पत्करली - भाजीचा गोळा मी निमूट गिळून टाकला.

चाळीसावर वर्षे होऊन गेली या गोष्टीला, पण ह्या एवढ्या कालावधीत घरात काय पण बाहेर खानावळीत प्रवासात देखील जेवताना पुन्हा पहिले वाढलेले अन्न मी टाकलेले मला आठवत नाही. टाकावेसेच वाटले नाही. ते ‘आक्कां’नी केलेल्या कठोर पण गुणी संस्काराने!

                                                * * * * *  
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color