स्वागतकक्ष arrow मराठी साहित्य arrow लेख arrow आमचा रणजितभाई (भाग ७)
आमचा रणजितभाई (भाग ७)
लेख़क मालतीबाई शं. किर्लोस्कर   

मला दिसलेल्या रणजितचे हे ईषत्‌ दर्शन. त्याच्याबद्दल गेली काही वर्षे मात्र एक काळजी माझ्या मनाला कुरतडत असते. मूळचा हा चांगला बलदंड असावा, चांदीच्या बंद्या रुपयासारखा खणखणीत. (त्याची जुनी छायाचित्रे पहाना.) पण हल्ली मात्र ती प्रकृती पार ओसरून गेली आहे. म्हणून त्याला कळकळीने सांगावेसे वाटते, "अरे रणजितभाई, तुझ्यासारखी जातिवंत प्रतिभेची, रसिक माणसे आमच्यासारख्यांना जीवनप्रवासात क्वचितच भेटतात, पहायला मिळतात. तुमचे कसबी हात जी वाङ्मयसंपदा निर्माण करतात  त्याने केवळ तुम्हीच मानमान्यतेला पोहोचता असे नाही, तर आपला सारा समाजच त्याने श्रीमान्‌ होतो. अशी कितीतरी धनदौलत अजून तुला निर्माण करायची आहे. सध्या राजा रविवर्म्यासारख्या अलौकिक बलवंताचे जीवनदर्शन तुझ्या समग्र लेखणीने घडविण्यात तू व्यग्र आहेस (असा एखाद्या भव्योदात्त कलाकृतीचा ध्यास तू घेतलास म्हणजे तू किती राबतोस -चिंतन-मनन करतोस ते मॊ पाहिले आहे-) ही कलाकृती तुझ्या मुकुटात नवा मानाचा शिरपेच बसवणार. तिच्याकडे आम्ही आतुरतेने पहात आहोत. त्या सार्‍यांसाठी, तुझ्या असंख्य चाहत्यांसाठी आम्हा सुहृद-आप्तांसाठी तू प्रकृतीनं निकोपच असणं अगत्याचे, फार अगत्याचे आहे. आणि म्हणून तुझ्या निकोप प्रकृतीच्या आड येणारी सारी विघ्नं तू दूर केली पाहिजेस. माधवीवहिनींसारखी समंजस, सोशिक कलाविद्यानिपुण आणि तुझ्या जीवनात विरघळून गेलेली सहधर्मचारिणी तुला लाभलीय. म्हणून म्हणते आमची विनंती लक्षात घेशील ना? अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही तुझ्या आजवरच्या लौकिकात एक नवी भर होय. गौरवोत्सवाच्या क्षणी मी इतकेच म्हणते,

रणजित,
"सौख्याच्या शिखरी सदा विहरू दे मूर्ति तुझी लीलया ।
दुःखाची न कधी जिवास भिववी जन्मांतरी चाहुल।
हर्षाच्या उठती असंख्य लहरी चित्तामधी माझिया ।
आनंदाश्रु थरारती, क्षणभरी, अन्‌ प्रार्थिती मंगल ॥"

 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color